पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २७. कुदरत (१९८१)

Submitted by स्वप्ना_राज on 27 November, 2018 - 06:43

kudrat1.jpg

माझ्या लहानपणी आमच्या घरी एक स्टिरिओ होता. त्यावर वाजवायच्या गोल रेकॉर्डस मिळायच्या. स्टिरिओ निकामी झाल्यावर कॅसेटसच्या जमान्यातही त्या आमच्या घरी जपून ठेवल्या होत्या. पुढे घर renovate केलं तेव्हा जागेअभावी त्या कोणालातरी देऊन टाकल्या. त्या स्टिरिओचं काय झालं माहित नाही. तर ह्या रेकॉर्डसमध्ये शोलेच्या नुसत्या संवादांची रेकॉर्ड होती, शान, कुर्बानी, मुकद्दरका सिकंदर ह्या चित्रपटांची गाणी होती. काही इंग्रजी गाण्यांच्या रेकॉर्डस सोबतच जगजीत आणि चित्रा सिंगचा फोटो असलेली गझलची रेकॉर्ड होती. ह्या साऱ्यात शोलेचे संवाद आणि जगजीतची गाणी ह्या माझ्या फार लाडक्या रेकॉर्ड्स होत्या. पण आणखी एका चित्रपटाची गाणी माझी खूप आवडती होती. तो चित्रपट होता चेतन आनंदचा कुदरत. कुदरतच्या रेकॉर्डच्या कव्हरवर हेमाच्या एकामागे एक दोन छबी असलेलं चित्र होतं - पुढची हेमा शहरी पोशाखातली आणि मागची ग्रामीण. तसंच शहरी वेषातली हेमा राजेशला दूर असलेलं काहीतरी दाखवतेय असंही चित्र होतं. ह्या दोन्ही चित्रांचं एक गूढ आकर्षण तेव्हा मला होतं. बहुतेक घरात रेकॉर्ड आधी आली असावी कारण नंतर जेव्हा मी तो चित्रपट पाहिला तेव्हा ह्या दोन्ही चित्रांचा अर्थ लागला. तोवर मी ह्या चित्रपटाची फॅन झाले होते. कारण विचारलं तर मला नक्की सांगता नाही येणार. पुनर्जन्माच्या कल्पनेचं जबरदस्त आकर्षण असल्याने असेल किंवा चित्रपटाची कथा (तेव्हा नवी वाटल्याने!) भावली म्हणून असेल किंवा तिचं सादरीकरण आवडलं म्हणून असेल. टेक्निकली आपली ही मालिका गोल्डन एरामधल्या चित्रपटांवर आहे तेव्हा '८१ सालचा कुदरत ह्यात बसत नाही. पण नुकताच पुन्हा पाहिला (पण इतर चित्रपटांच्या फाईलसारखा हार्डडिस्कवरून डिलीट केला नाही) म्हणून तुम्हाला त्याबद्दल सांगावंसं वाटलं इतकंच.

kudrat2.jpg

चित्रपटाला सुरुवात होते तेव्हा आपल्याला ट्रेनचा आवाज येतो. फार दूरचा शॉट असल्याने अगदी नीट पाहिल्यावर एक ट्रेन घाटातून वाट काढत जाताना दिसते. ह्या ट्रेनमध्ये बसून २० वर्षांची चंद्रमुखी आणि तिचे आई-वडील सिमल्याला जात असतात. खरं तर तिची आई मूळची सिमल्याचीच असते पण चंद्रमुखी दोन महिन्याची असताना ते सगळे मुंबईला शिफ्ट झालेले असतात. इतक्या वर्षांनी मुलीच्या आग्रहाखातर तिला सिमला दाखवायला घेऊन जात असतात. एका बोगद्यातून गाडी बाहेर पडते तेव्हा तिची आई सरला दूरवरून दिसणारं सिमला लेकीला दाखवते. पण जेव्हा ते पाहून चंद्रमुखी 'इथे तर मी आधी आलेय' असं म्हणते तेव्हा तिचे आईवडिल थोडे बुचकळ्यात पडतात. अर्थात ही फक्त सुरुवात आहे ह्याची त्यांना पुसटशीही कल्पना नसते.

सिमल्याला पोचल्यावर तिघे मॉलरोड वर फिरायला जातात तेव्हा तिथे त्यांना सरलाची मैत्रीण कांता भेटते. ती दरवर्षी सिमल्याला येत असते. ह्या वर्षी अमेरिकेहून वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेला तिचा psychiatrist मुलगा नरेशही तिथे आलेला असतो. कांता त्यांना दुसर्या दिवशी चहाला घरी बोलावते. जेव्हा चंद्रमुखी आणि तिचे आईवडील कांताने भाड्याने घेतलेल्या कॉटेजमध्ये पोचतात तेव्हा चंद्रमुखी ते कॉटेज भूतकाळात कसं होतं त्याचं अचूक वर्णन करते. एव्हढंच काय तर एकदा नरेशसोबत फिरायला बाहेर पडलेली असताना अचानक एक झाड बघून एव्हढी अस्वस्थ होते की नरेशला तिला परत घरी आणावं लागतं. मात्र तिच्या ह्या विचित्र वागण्याचा कोणालाच अर्थ लागत नाही. नरेश बघताक्षणी तिच्या प्रेमात पडलेला असतो. तेव्हा दोघांच्या आया त्यांच्या लग्नाचे बेत करू लागतात.

सिमल्यातलं एक बडं प्रस्थ म्हणजे चौधरी जनकसिंग. हे आपली मुलगी करुणा हिच्यासह रहात असतात. करुणा तिथल्या हायकोर्टात वकील असते. चंदिगढमध्ये वकिली करणारा जनकसिंगांच्या दिवंगत मित्राचा मुलगा मोहन त्यांना भेटायला सिमल्याला येतो. त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर जनकसिंगानीच त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचललेला असतो. मोहनवर त्यांचे फार उपकार असतात आणि त्याला त्याची जाणीवही असते. तो सिमल्याला आल्यावर जनकसिंग त्याला तुझी सिमल्याचा सरकारी वकील म्हणून नेमणूक करून घेतली आहे हे सांगतात. तसंच करुणा आणि त्याच्या लग्नाचा विषयही काढतात कारण आपली मुलगी मनोमन मोहनवर प्रेम करतेय हे जसं त्यांना ठाऊक असतं तसंच मोहन नकार देणार नाही ह्याचीही खात्री असते.

मोहनला सिमल्याला येताना ट्रेनमध्ये त्याला त्याचा जुना मित्र प्यारे भेटलेला असतो. तो सिमल्याच्या गेईटी थिएटरचा मॅनेजर असतो. एके दिवशी सकाळी तो मोहन, करुणा आणि चौधरी जनकसिंगना सरस्वतीदेवी ह्या प्रसिध्द गायिकेच्या कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला येतो. ह्याच कार्यक्रमाला चंद्रमुखी आणि नरेशही आलेले असतात. तेव्हा गर्दीत प्रथम चंद्रमुखी आणि मोहनची नजरानजर होते. प्यारे जेव्हा मोहन आणि करुणाची सरस्वतीदेवीशी ओळख करायला घेऊन जातो तेव्हा त्या मोहनकडे टक लावून पाहत राहतात. मोहनला हे जाणवत नाही पण करुणाला मात्र ते विचित्र वाटतं. कार्यक्रमादरम्यान चंद्रमुखी पुन्हापुन्हा मोहनकडे बघत असल्याचं नरेशच्या लक्षात येतं. पण काही वेळाने तिला अस्वस्थ वाटू लागतं म्हणून ते मध्येच उठून निघून जातात.

त्या रात्री चंद्रमुखीला एक विचित्र स्वप्न पडतं. एक हवेली दिसते. मग एक तरुण धावताना दिसतो. त्याच्यामागून एक तरुणी धावत असते. धावताधावता ती वाटेच्या मधोमध आलेल्या वडाच्या पारंब्यात अडकते. त्यातून सुटका करून घेऊन ती त्या तरुणापर्यंत पोचणार तोवर तो कड्याच्या अगदी टोकाला पोचलेला असतो. ‘मरणार, तो आता मरणार' असं किंचाळत ती घामाघूम होऊन जागी होते. ‘वाईट स्वप्न पडलं असेल' अशी आईवडील तिची समजूत काढतात.

सकाळी 'तुला सरस्वतीदेवीने भेटायला बोलावलं आहे' असा निरोप घेऊन प्यारे मोहनकडे येतो. करुणाही सोबत निघते. वाटेत प्यारे त्यांना एका झाडाकडे घेऊन जातो. ‘माधो-पारो' हे शब्द बुंध्यावर कोरलेलं ते झाड पुऱ्या सिमल्यात प्रसिद्ध असतं. अशी बोलवा असते की एकमेकांवर खरं प्रेम असलेले प्रेमी तिथे गेले तर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव होतो. नेमके त्याच वेळी चंद्रमुखी आणि नरेशही फिरत फिरत तिथे येतात. कालच्या कार्यक्रमात ऐकलेलं सरस्वतीदेवीचं गाणं करुणाला गुणगुणताना ऐकून चंद्रमुखी अचानक संतापते आणि 'तुला हे गाणं गायचा काही हक्क नाही' असं तिला सुनावते. आणि मग मोहनजवळ जाऊन म्हणते की आपण खूप पूर्वी कधीतरी भेटलोय. अर्थात ती कधी चंदिगढला आलेली नसते किंवा तोही मुंबईला आलेला नसतो. तिचं हे वागणं पाहून मोहन आणि करुणा पार गोंधळून जातात. त्यांना कसं रिएक्ट व्हावं तेच कळत नाही. त्या रात्री चंद्रमुखीला तेच स्वप्न पुन्हा पडतं. मात्र ह्या वेळी तो तरुण कड्यावरून कोसळलेला असतो. ती जागी होते तेच ’माधो' अशी हाक मारत.

मोहनला पाहून तिचं वारंवार अस्वस्थ होणं नरेशच्या नजरेतून सुटत नाही. तो तिच्या मानसिक स्थितीचं निदान करण्यासाठी हिप्नोटाईज करून पाहावं असं सुचवतो. चंद्रमुखी तयार होते. पण ह्या सेशनमध्ये जेव्हा ती थेट आपल्या मागच्या जन्मात जाऊन पोचते तेव्हा आश्चर्यचकित व्हायची पाळी नरेशवर येते. ती आपलं नाव 'पारो' तर आपल्या नियोजित वराचं नाव 'माधो' सांगते. पार अवाक झालेला नरेश तिला साल कुठलं आहे म्हणून विचारतो तेव्हा ती सांगते १९४५ म्हणजेच ती तब्बल ३० वर्षं मागे गेलेली असते. नरेश ही गोष्ट तिच्या आईवडिलांना सांगतो. तिच्या बोलण्यात कुठल्यातरी हवेलीचा आणि माधो राहत असलेल्या 'बडेगाव' नामक खेड्याचा उल्लेख आलेला असतो. ही भानगड काय आहे त्याचा मुळातून तपास केल्याखेरीज चंद्रमुखीवर उपचार करणं अशक्य आहे हे लक्षात येताच नरेश आणि तिची आई तिला घेऊन सिमल्यानजीक असलेल्या बडेगाव नावाच्या त्या खेड्यात त्या हवेलीच्या शोधात जातात. तिथे गेल्यावर चंद्रमुखी माधोचं घर बरोबर ओळखते. गावकऱ्यांच्या बोलण्यातून माधो नावाचा कोणी तरुण आणि त्याची सत्तो नावाची बहिण २५-३० वर्षांपूर्वी तिथे राहत होते हेही कळतं. काल कोणी एक बाई येऊन घराची साफसफाई करून गेली असं काही मुलं नरेशला सांगतात पण ती बाई कोण होती हे काही त्यांना माहित नसतं.

kudrat3.jpg

चंद्रमुखीला आणखी काही आठवतं का ते पाहत ते तिथे फिरत असताना तिला समोरच एक चर्च दिसतं, तिथे उभ्या असलेल्या मोहनला बघून तिच्या गतजन्मीच्या आणखी काही स्मृती जाग्या होतात. त्या स्मृतीत मोहनही असतो पण तो माधो म्हणून. आणि ती स्वत: असते पारो. मात्र ती हवेली कुठे आहे हे काही तिला आठवत नाही. नरेश मोहनला घरी बोलावून हे सगळं सांगतो आणि चंद्रमुखीचा इलाज करण्यासाठी त्याची मदत मागतो. आधी तर मोहन साफ नकार देतो. पण चंद्रमुखी जेव्हा त्याला 'मला भेटायला याल ना' असं विचारते तेव्हा मात्र तो होकार देतो. का ते त्याचं त्यालाच कळत नाही.

सरस्वतीदेवीच्या विनंतीला मान देऊन मोहन आणि करुणा गावच्या जत्रेत जातात. तिथे नरेशसोबत आलेली चंद्रमुखी मोहनला 'माधो-पारो' लिहिलेल्या त्या झाडाखाली पुन्हा भेटते. ती जीव तोडून त्याला आपण आधीच्या जन्मात भेटलोय म्हणून सांगते पण त्याला काहीच आठवत नसतं. पुरावा म्हणून मागच्या जन्मी पारोने त्या झाडाच्या बुंध्याखाली पुरलेले 'माधो-पारो' हे शब्द असलेले तिच्या हाराचे तुकडेसुध्दा उकरून काढून दाखवते. मोहनला हे सगळं काय चाललंय ते कळत नसतं. एकीकडे त्याला स्वत:ला काही आठवत नसतं पण चंद्रमुखी जवळ असल्यावर तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवावासा वाटतो. तिच्याबद्दल एक अनामिक ओढ वाटते. परिणामी तो करुणाशी साखरपुडा करायला नकार देतो आणि त्याचं कारणही तिला सांगतो. त्याने लग्नाला नकार दिलाय हे ऐकून चौधरी जनकसिंग भडकतात. एक पार्टी आयोजित करून त्यात मोहन आणि करुणाच्या लग्नाची अनाउन्समेंट करायचं पक्कं करतात. करुणा मात्र त्याच पार्टीत चंद्रमुखी आणि मोहनच्या लग्नाची अनाउन्समेंट करता यावी म्हणून तिला घेऊन त्याला यायला सांगते. ठरल्याप्रमाणे नरेश चंद्रमुखीला घेऊन पार्टीत येतो. पण जेव्हा ती जनकसिंगना पाहते तेव्हा किंचाळत हवेलीच्या बाहेर पळून जाते. तिची अवस्था पाहून मोहन तिला पुन्हा हिप्नोटाईझ करायला नरेशला भाग पाडतो. ह्या सेशनमध्ये मात्र ती मागच्या जन्मातल्या घटनांबद्दल जे सांगते त्याने त्या दोघांच्या पायांखालची जमीन सरकते.

असं काय सांगते चंद्रमुखी? तिला खरंच मागचा जन्म आठवत असतो का हा सगळा तिच्या मनाचा भ्रम असतो? तिला स्वप्नात कुठली हवेली दिसत असते? जनकसिंगना पाहून ती एव्हढी का घाबरते? सरस्वतीदेवींना मोहनविषयी एव्हढा जिव्हाळा का वाटत असतो? काय असते माधो-पारोची कहाणी? ह्या प्रश्नांच्या उत्तरांचा कयास बांधणं अजिबात अवघड नाही पण ती चित्रपट पाहून मिळवणं अधिक मनोरंजक आहे. खास करून तुमचा पुनर्जन्मावर विश्वास असेल तर. पण माणूस आणि जन्म ह्यांचं गुणोत्तर १:१ आहे असं तुमचं मत असेल तर ह्या चित्रपटाच्या वाटेला जाण्यात अर्थ नाही. अर्थात चित्रपट पाहणार असाल तर पुढला लेख वाचू नका हे सांगायला नकोच.

ह्या मालिकेच्या निमित्ताने चित्रपट पाहताना माझ्या लक्षात येतंय की सर्वसामान्य चित्रपटांत काही खास अभिनयकौशल्य वगैरे दाखवायची संधी फार कमी वेळा असते. बहुतेक व्यक्तिरेखा सरधोपट आणि इमोशनल सीन्स चावून चोथा झालेले ह्या सदरात मोडतात. एखाद-दुसरा अपवाद सोडला तर संवाद प्रेक्षकांना ऐकू जातील एव्हढ्या स्पष्ट सुरात म्हटले आणि त्यांना साजेसे भाव चेहेर्‍यावर आणले म्हणजे गंगेत घोडं न्हालं. फक्त नट-नटीचं वय व्यक्तिरेखेच्या वयाशी सुसंगत असलं पाहिजे. नाहीतर पोरांना शाळेत सोडून आई-बाप मिळालेल्या फावल्या वेळात बागेत गाणी म्हणत बागडताहेत असं वाटू शकतं (विश्वास बसत नसेल तर 'साजन बिना सुहागन' मधलं ‘मधुबन खुशबू देता है’ म्हणणारे नूतन आणि राजेंद्रकुमार पाहा. परिणामांना मी जबाबदार नाही.). बहुतेक नट-नटयांना हे जमलेलं असतं. काही अपवाद असतात. ह्या अपवादात राजकुमार आणि प्रिया राजवंश येतात. ७० सालच्या 'हीर-रांझा' मध्ये ह्या दोघांना नायक-नायिकेच्या भूमिकेत कास्ट केल्यानंतर ह्या चित्रपटात जनकसिंग आणि करुणा ह्या वडील-मुलीच्या भूमिकेत कास्ट करण्यामागे चेतन आनंदने काय विचार केला असेल ते एक तोच जाणे. 'चेहेऱ्यावर कुठल्याही भावांचा अभाव' हे पु.लं.चे शब्द इथे चपखल बसतात. राजकुमारला सोडून देऊ पण लंडनच्या प्रसिद्ध RADA मध्ये प्रवेश घेतलेली प्रिया राजवंश असा ठोकळ्यासारखा अभिनय कसा करू शकते ते मला काही केल्या समजत नाही. Angry

आता ही वाफ काढून झाल्यावर नायक-नायिकेकडे वळते. राजेश खन्ना (मोहन आणि माधो) आणि हेमामालिनी (चंद्रमुखी आणि पारो) दोघांना 'महबूबा' नंतर पुन्हा एकदा डबलरोल करायची संधी मिळालेली आहे. राजेश मोहनच्या भूमिकेत convincing वाटतो पण खेडवळ माधो म्हणून पटत नाही. मोहन खेडवळ माणसाचं सोंग काढून आलाय असं वाटत राहतं. ह्या दोन्ही भूमिकांच्या मानाने तो थोराडही दिसतो. हेमा चंद्रमुखी म्हणून सुरेख दिसलेय पण पारोच्या गेटअपमध्ये वयाने थोडी मोठी वाटते. का ते कळत नाही. पारोच्या भूमिकेसाठी तिने हेल काढून बोलायचा प्रयत्न केलाय खरा पण तो अपुरा असल्याने फसलाय असंच म्हणावं लागतं. त्यामानाने डॉक्टर नरेश म्हणून विनोद खन्ना शोभलाय. खरं तर असला चिकणा डॉक्टर समोर असताना चंद्रमुखी मोहनचा विचार करूच कसा शकते ते मला हा चित्रपट अनेक वेळा पाहूनही कळलेलं नाहीये. नया जनम नया मॉडेल! हाकानाका. Proud

चंद्रमुखीचे आईवडिल झालेत नेहमी खलनायकी भूमिका साकारणारे पिंचू कपूर आणि शम्मी. किमान एका तरी व्यक्तिरेखेचे आईवडिल दोघेही धडधाकट पृथ्वीतलावर पाहून बरं वाटतं. कारण करुणाची आई नाही तर नरेशचे वडिल. पारोचे फक्त वडिल असतात तर माधोची फक्त बहिण. मोहनला तर कोणीच नसतं. असो. २० वर्षाच्या मुलीच्या आईवडिलांच्या मानाने हे दोघे थोडे अधिक वयस्कर वाटले तरी अजिबात उपरे वाटत नाहीत हे विशेष. खरं तर त्यांना ह्या भूमिकेत पाहून मस्तच वाटतं. चरित्र कलाकार साचेबध्द भूमिकांत कास्ट होणं हा त्यांच्यावर अन्याय असतो. आणि त्यांना त्याच त्याच भूमिकांत पाहणं त्रासदायकही वाटतं. उदा. केष्टो मुखर्जी आधी पोलीस शिपाई जगतराम असतो असा नुसता उल्लेख आहे पण तो दिसतो ते मात्र त्याच्या नेहमीच्या बेवड्या रुपात. अरुणा इराणीने पूर्वीची सत्तो आणि ३० वर्ष उलटून गेल्यावरची पोक्त सरस्वतीदेवी ह्या दोन्ही भूमिका चांगल्या वठवल्या आहेत. ह्या अभिनेत्रीला अधिक चांगलं काम मिळायला हवं होतं असं मला नेहमी वाटतं.

बाकी छोट्या भूमिकांत देवेन वर्मा (मोहनचा मित्र प्यारे), ए.के. हंगल (मिस्त्री बिल्लीराम), ओम शिवपुरी (न्यायाधीश), सत्येन कप्पू (पारोचे वडील), सप्रू (जनकसिंगचे वडील), टॉम ऑल्टर (मेजर टॉम वॉल्टर्स), मुक्री आणि कल्पना अय्यर आदि मंडळी दिसतात. हा चित्रपट पाहताना मला जाणवलं की प्रमुख अभिनेत्यांबद्दल आपल्याला बरीच माहिती असली तरी ह्या चरित्र अभिनेते-अभिनेत्रीबद्दल एक नाव सोडलं तर बाकी फारसं काही माहित नसतं. कधी कधी तर त्यांचं नावही माहित नसतं. आपण ते कधी जाणून घ्यायचा प्रयत्नही करत नाही. उदा. मोहन सिमल्याला येत असतो तेव्हा त्याच्या ट्रेनच्या डब्यात प्यारेशेजारी एक जोडपं बसलेलं दाखवलंय. त्यातल्या नवऱ्याला मी अनेक चित्रपटांत पाहिलंय पण त्याचं नाव काय आहे कोणास ठाऊक. Sad

लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे ह्या चित्रपटातली जवळजवळ सगळीच गाणी माझी लाडकी आहेत. पहिला उल्लेख अर्थातच 'हमे तुमसे प्यार कितना' चा. हे गाणं दोन रुपांत येतं - परवीन सुलतानाच्या आवाजातलं सरस्वतीदेवी गाते ते. आणि किशोरच्या आवाजातलं माधोच्या तोंडी आहे ते. दोन्ही माझी अतिशय आवडती. पहिल्यात माधो-पारोचं असफल प्रेम पाहिलेल्या सरस्वतीदेवीच्या आवाजातली वेदना आहे. तर दुसर्‍यात पारोच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या माधोचं अधीरपण आहे. माझं नंतरचं आवडतं गाणं 'दुखसुखकी हर एक माला'. हेही दोन रुपांत आहे. एक मोहम्मद रफीच्या आवाजात आहे. दुसरा आवाज गायक चंचलचा आहे असं का कोण जाणे पण मला आत्तापर्यंत वाटत होतं. पण चित्रपट पाहताना कळलं की चंद्रशेखर गाडगीळ नावाच्या गायकाने ते गायलं आहे. मला हा गायक कोण ते माहित नाही. ह्या गाण्याचे लिरिक्स haunting आहेत. तिसरं लाडकं गाणं 'छोडो सनम काहेका गम' किशोरसोबत अ‍ॅनेट पिंटो नावाच्या गायिकेने म्हटलंय. लताचं 'तूने ओ रंगीले कैसा जादू किया' आणि आशाचं 'सजती है यूही महफिल' आवडतात पण त्यांचा नंबर माझ्या लिस्टमध्ये नंतरचा आहे. आशा आणि सुरेश वाडकरचं 'सावन नही भादो नही' मात्र मला फारसं आवडत नाही.

पण चित्रपट खूप आवडता असला तरी त्यातल्या उणिवा जाणवत नाहीत असं थोडीच आहे? इथे तर अगदी 'प्रथमग्रासे मक्षिकापात:’ तश्यातला प्रकार. अगदी सुरुवातीला 'असतो मा सद्गमय' ह्या श्लोकाचं इतकं सदोष उच्चारण आहे की कानात बोटं घालावीशी वाटतात. Angry ह्या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन चेतन आनंदने केलं आहे असं श्रेयनामावलीमध्ये नमूद केलंय. प्रिया राजवंशला पाहून हे खरं असावंसंही वाटतं. पण मग चित्रपटभर दिसणाऱ्या त्रुटींची टोटल लागत नाही. उदा. चंद्रमुखी जर चौधरी जनकसिंगला ओळखते तर तो तिला पार्टीत बघून कसा ओळखत नाही? आपल्याच घरात काम करणारया मुलीला 'त्या' रात्रीआधी त्याने कधीच पाहिलं नसेल? चंद्रमुखीला सरस्वतीदेवीची ओळख आधी का पटत नाही? एक नामांकित वकील असलेला मोहन फक्त जगतरामच्या साक्षीवर अवलंबून राहून पूर्वजन्मीतल्या स्मृतींवर आधारलेली केस कोर्टात कशी उभी करतो? जगतराम कसला कागदी पुरावा नष्ट करतो? मोहन तो आधीच ताब्यात का घेत नाही? हवेलीत भक्कम पुरावा मिळूनही तिथे रात्री संरक्षणासाठी एकाच शिपाई का ठेवला जातो? करुणाला तिथे राहण्याची परवानगी कशी दिली जाते? पारोला त्या खोलीत नंतर गेल्यावर तो हार मिळत नाही तर तिचा शोध घेणाऱ्या जगतरामला तो हवेलीत नंतर कुठून मिळतो? कोर्टात साक्षीदारांची लिस्ट आधी सादर करावी लागत नाही का? तसं असेल तर करुणा ऐनवेळी नरेशला साक्ष द्यायला कशी बोलावू शकते? गुन्हा घडतो तेव्हा जनकसिंगचे वडील हयात असतात. मग हवेलीत मिस्त्रीला का बोलावलं आहेस हे ते विचारत नाहीत का? २-४ वर्षांत एखादा परिसर ओळखू न येण्याइतका बदलतो तर ३० वर्षांत सिमला तसंच कसं राहतं की चंद्रमुखीला जुन्या खुणा लगेच सापडतात? पारो आणि माधो दोघे आधीच्या जन्माचाच चेहेरा घेऊन पुन्हा कसा जन्म घेतात? आत्मा अमर आहे तर चेहेरा कुठलाही असला तरी आत्म्याला आत्म्याची ओळख पटायला नको? (इथे मला पु.लं.च्या 'आत्मू डांबिस आहे' ची तीव्रतेने आठवण होतेय!) माधो आत्महत्या करतो का त्याचा मृत्यू अपघाती असतो तेही नीट स्पष्ट होत नाही. तसंच मोहनला आपला पूर्वजन्म स्पष्टपणे कधीच आठवलेला दाखवलं नाहीये. मग तो हे सगळं सव्यापसव्य का करतो? पारोला हवेलीत 'त्या' रात्रीआधीही जनकसिंगचा काही अनुभव आलेला असतो का? कारण ती माधोला मला हवेली आवडत नाही म्हणते तसंच 'तूने ओ रंगीले' गाण्याच्या वेळीही त्याला पाहून लपते. काही प्रसंग तर प्रचंड विनोदी वाटतात उदा. नरेशने केलेलं हिप्नॉसिसचं सेशन आणि भृगुशास्त्राच्या पोथीच्या मदतीने पारोच्या हत्येची उकल करायचा मोहन आणि सरस्वतीचा प्रयत्न. 'प' का पुनर्जन्म होगा और इस जनममे उसका नाम 'च' से शुरू होगा. कैच्या कै. इंग्रज अधिकाऱ्याचा आणि त्याच्या बायकोचा प्रणय पाहून चक्क घराच्या पडवीत बसून माधोने पारोला (ओष्ठ्य!) किस करण्याचा प्रसंग तर 'अ आणि अ' चा कळस आहे. चेतन आनंदसारख्या दिग्दर्शकाकडून ही अपेक्षा नक्कीच नाही. Sad

पण आधी म्हटलं त्याप्रमाणे माधो-पारोची ही कथा बऱ्यापैकी मनोरंजक पध्दतीने सादर करण्यात तो यशस्वी झालाय. चंद्रमुखीला पूर्वजन्माच्या घटना आठवतात तेव्हा झिरझिरीत पडद्यासारखी फिल्म पाडून आणि उचलून आधीचा जन्म दाखवायची क्लृप्ती मला हा चित्रपट प्रथम पाहिला तेव्हाही आवडली होती आणि आताही आवडली. एकातून एक निघणारी वर्तुळं दाखवायच्या जुन्या पध्दतीपेक्षा नक्कीच उजवी. पूर्ण चित्रपटभर ८०च्या दशकातल्या सिमल्याचं मनोरम दर्शन घडतं आणि आता असं सिमला आपल्याला पाहायला मिळणार नाही ही चुटपूट लागते.

‘कुदरत' ह्या शब्दाचा 'निसर्ग' असा अर्थ आहे हे मला माहित होतं. हा चित्रपट पाहून 'नियती' ह्या अर्थानेही तो वापरला जात असावा असं वाटतं. तसं असेल तर न्याय मिळविण्यासाठी लोकांना पुनर्जन्म घ्यायला लावणारी नियती थोडी inefficient वाटते, नाही का? एखाद्या व्यक्तीचे आणि आपले पटकन सूर जुळले किंवा पहिल्यांदा पाहताच एखाद्याबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाली तर कधीकधी आपण ह्याचा कुठल्यातरी पूर्वजन्माशी संबंध लावतो. अर्थात ह्या व्यक्ती आपण (ह्याच जन्मात!) ओळखत असलेल्या दुसर्‍याच कुठल्यातरी व्यक्तीशी थोडंफार साम्य असणाऱ्या असतात म्हणून हे होतं अशी थिअरी आहे. Deja Vu म्हणजे एखादा क्षण किंवा घटना पूर्वी घडून गेल्यासारखी वाटणं ह्याही गोष्टीचा पूर्वजन्माशी संबंध असेल असं वाटतं पण ते आपल्या मेंदूचे खेळ असतात अशी थिअरी आहे.

थोडक्यात काय, जितके 'आहे रे' वाले तितकेच 'नाही रे' वाले. पण पुनर्जन्माच्या ह्या खेळाबाबत असं म्हणता येईल की 'दिलके बहलानेके लिये गालिब ये खयाल अच्छा है'. किंवा मजरूह सुलतानपुरीच्या शब्दांत सांगायचं झालं तर......

सामना करे जो इसका
किसीमे ये दम है कहा
इसका खिलौना बनके
हम सब जीते है यहा
जिस राहसे हम गुजरे
ये सामने होती है
दुख सुखकी हर एक माला
कुदरतही पिरोती है
हाथोंकी लकीरोमे
ये जागती सोती है

----
अवांतर - नुकतीच धरमशालेला जाऊन आले तेव्हा St. John in the Wilderness नावाच्या चर्चच्या आवारात 'प्रिया राजवंश' ह्या नावाची memorial plaque पाहून चक्रावले होते. कदाचित ही त्याच नावाची दुसरी महिला असेल असं वाटलं होतं पण ही अभिनेत्री प्रिया राजवंशचीच memorial plaque आहे. विकीवर ती पाहू शकता.

तसंच प्रीतम हॉटेलच्या मालकाने आपल्या 'ये है मुंबई मेरी जान' ह्या सदराअंतर्गत लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत लिहिलेला अभिनेता राजकुमारवरचा लेख इथे वाचा. ह्या सदरातले इतर लेखही वाचनीय आहेत.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

{याची फ्रेम बाय फ्रेम कॉपी असलेल्या चित्रपटात तिच्या जागी सोनमने जे काही केलेय ते तुलनेत प्रचंड उच्च वाटते.}
हा कोणता सिनेमा?

अग, हिप्नॉसिसच्या सेशननंतर बाकीच्यांना हे मागच्या जन्मीचं लफडं आहे ते कळतं पण हेमाच्या दृष्टीने सगळं आठवायची सुरुवात ते कॉटेज बघितल्यावरच झालेली असते. म्हणून म्हटलं की तिथून निघालं तरी ते थांबवणार कसं. असो. हे सगळं theoretical discussion आहे. आपल्यापैकी कोणीच हा अनुभव घेतलेला नाहिये ना Proud

कोर्टातले तिचे सिन्स तर मला महाभयाण वाटले. 'तह-ए-दिल से माफी चाहती हू' हे वाक्य तर ती प्रचंड नाटकीपणाने उच्चारते. आणि शेवटच्या हवेलीतल्या सिन्समध्ये तिचा shell-shocked अभिनय अपेक्षित आहे तो ती मख्खपणाने भरून काढते असं मला वाटलं. RADA मधून शिक्षण घेऊन हा एव्हढा मख्खपणा अजिबात अपेक्षित नाही.

सोनम म्हणजे ती त्रिदेव मधली का? मला आधी वाटलं तू अनिल कपूरच्या मुलीबद्दल बोलते आहेस Proud 'मिट्टी और सोना' हे नाव वाचून चित्रपटाचा काळ लक्षात आला. आजकाल असल्या नावाचे चित्रपट नाही बनत ना. चित्रपटांच्या नावासारखी अभिनेत्यांची नावंसुध्दा सेम असल्यावर असला घोळ होतो.

प्रि रा चा अभिनय किती बोर होता आणि तिने कसा चुथडा केलाय हे समजण्यासाठी सोनम चा अभिनय बघायचा? ते ही सोबत चंकी पांडे असलेल्या मिट्टी और सोना नामक चित्रपटात्ला? नक्को रे बाबा Happy

प्रि रा चा अभिनय किती बोर होता आणि तिने कसा चुथडा केलाय हे समजण्यासाठी सोनम चा अभिनय बघायचा? ते ही सोबत चंकी पांडे असलेल्या मिट्टी और सोना नामक चित्रपटात्ला? नक्को रे बाबा Happy>>>>

तुम्ही नशीबवान, तुम्हाला चॉईस होता/आहे. तेव्हा मी टीव्हीची दिवानी होते, दु द जे काही दाखवायचे ते भक्तिभावाने बघायचे. मिट्टी और सोना मी शेजाऱ्याच्या विडिओवर पाहिले होते. तोही एक काळ होता, vcr व तीन चार पिक्चरच्या कॅसेटी भाड्याने आणायच्या, शेजारी पाजारी बोलवायचे व हो जा शूरु करायचे. आताच्या डिजिटल पिढीला ही शेजारी पिक्चर बघायला जायची भानगड कळणेच मुश्किल, vcr आणि त्या दिव्य कॅसेटी अजिबातच कळणार नाही.

कोर्टातल्या सीन्समध्ये ती राजेश पेक्षा उजवी वाटली मला. (म्हणजे राजेशचे काम किती भयाण वाटले असावे याचा विचार कर)

त्या आधी, जेव्हा राजेश येऊन तिला तो लग्न करू शकत नाही सांगतो तेव्हा ती दोन्ही हात उडवून जे काही करते ते बघून हंसते जख्मच्या भयाण आठवणी जाग्या झाल्या. बाकी त्याआधी ती नेहमीसारखी प्लॅस्टिक वाटलीत. राजेश लग्नाला लगेच हो म्हणतो तेव्हा धक्काच बसला (तुझ्या परीक्षणात तू वॉर्निंग दिली नाहीस ना, असे काही असणार म्हणून Happy Happy ) पण सगळेच घोडनवरे व घोडनवऱ्या, कसले कसले धक्के बसवून घ्यायचे म्हणून दुर्लक्ष केले. तिला शेवटी विनोदच्या गळ्यात बांधणार की काय असे वाटत होते, आपल्याकडे कुणाला एकटे सोडायचे नाही ही पद्धत आहे ना. पण विनोदचे नशीब चांगले असावे.

vcr व तीन चार पिक्चरच्या कॅसेटी भाड्याने आणायच्या, शेजारी पाजारी बोलवायचे व हो जा शूरु करायचे.>> >>>हे माहितीये.
मी लहान असताना पहिलंय. माझ्या पाचव्या कि सहाव्या वाढदिवसाला कयामत से कयामत तक, तेजाब, आणि कुठला तरी एक असे पिच्चर माझ्या मामाने व्हीसीआर आणुन लावले होते. Happy

मित्ति और सोना मधलं फक्त एक गाणं सारखं टीव्ही वर लागायचं ते आठवतं, मोटार बोट वर
सारे लडके करे तो करे शादी, बस एक तुम कुवारे रहना, बस एक तुम हमारे रहना
(याचा मूळ पोस्ट शी काहीही संबंध नाही, हे स्वतःच्या मेमरी डिस्प्ले साठी दामटलेले घोडे आहे ☺️☺️☺️)

{{{ कधी क्लासिकल शिकली नसेल पण तुकडा performance.
Submitted by गुगु on 2 December, 2018 - 02:00 }}}

साज नावाच्या सिनेमात शबानासोबत गायिकेची भुमिका केली होती तिने. हा चित्रपट लता व आशा यांच्यावर आधारित आहे अशी अफवा कुणीतरी पसरवली होते.

मित्ति और सोना मधलं फक्त एक गाणं सारखं टीव्ही वर लागायचं ते आठवतं, मोटार बोट वर
सारे लडके करे तो करे शादी, बस एक तुम कुवारे रहना, बस एक तुम हमारे रहना
(याचा मूळ पोस्ट शी काहीही संबंध नाही, हे स्वतःच्या मेमरी डिस्प्ले साठी दामटलेले घोडे आहे ☺️☺️☺️)
Submitted by mi_anu on 3 December, 2018 - 14:29

हे गाणं दीवाना मुझसा नही नामक सिनेमातलं आहे गाण्यात मोटर बोट दिसत नाही.

https://www.youtube.com/watch?v=X8nDMieBDb8

आणि अशांच शब्दांतलं थोडं फार वेगळं गाणं इन्सानियत मध्ये आहे इथे मोटरबोट दिसते आहे.

https://www.youtube.com/watch?v=0YtaIUGtgI8

हिर रांझा मला बघवला नव्हता, खास करून प्रिया राजवंशी मुळे. प्रत्येकवेळी ती तसेच हातवारे करत धावत जाते असे काहीसे आठवतेय. इंटरमिशनच्याही आधी उठून निघून गेलो होतो.

झुमो नाचो गाओ यारॊ मजा करो,
दुनिया मैं कभी ना किसीं से डरो
खेल खेल मैं पन्ना पलटे,
मिट्टी बन जाये सोना,

Happy

देवा, शप्पथ सांगते, मी जेव्हा मिट्टी और सोना पाहिलेला तेव्हा नक्की कुठला पाहिलेला हे माहीत नव्हते. त्या जोडीचे एकदम तीन चार चित्रपट आले होते व गाणीही सारखी होती. पडद्यावर जे दिसते ते भक्तिभावाने पहायचे हेच काम मला तेव्हा होते. मिऔरसो हा हंसते जख्मची कॉपी आहे हेही माहीत नव्हते. हं ज नंतर पाहिला, पाहताना अचानक देजा वू व्हायला लागले, हळूहळू डोक्यात प्रकाश पडला आणि प्रिराचा अभिनय बघून सोनम प्रचंड ताकदीची अभिनेत्री आहे हा साक्षात्कार झाला. चित्रपटाचे नाव मिट्टी और सोना हे आता नेटवर बघून कन्फर्म केले.

हंसते जख्म मधली सगळीच गाणी सुंदर आहेत.

आणि पिक्चरयजेशन तितकेच क्लासिक व एकमेवादित्य आहे. त्यातल्या 'ये माना मेरी जान' ची स्वप्नानेच स्टेप बाय स्टेप चिरफाड केलीय त्या दुसऱ्या बीबीवर.

मी नाही ग. बहुतेक मामीने केली आहे ती चिरफाड. ते वाचून नंतर मी ते गाणं पाहिलं. हीर-रांझा मधल्या एका गाण्यातला राजकुमारचा टुणटुण उड्या मारत शेतातून येताना शेवटच्या उडीला धडपडण्याचा सीन अद्वितिय आहे. दोन्ही हात वर हवेत उंच. ह्सते-जख्म मधली सगळी गाणी फक्त ऐकावीत. पाहू नयेत.

देवा रे! चित्रपटांची नावं सारखी, अभिनेत्यांची नावं सारखी, आता गाण्याचे बोल पण रिपिट म्हणजे कळस आहे अगदी.

मानव, असं पिक्चरच्या मधून उठून जायचा प्रसंग एकदाच माझ्यावर ओढवला. गोविंदा आणि राणी मुकर्जीचा हद कर दी आपने. भ या ण.

vcr व तीन चार पिक्चरच्या कॅसेटी भाड्याने आणायच्या, शेजारी पाजारी बोलवायचे व हो जा शूरु करायचे.-> हे फार भारी होत लहानपणी. गणपतीत विशेषतः असे करायचो आम्ही. पुण्यात वाड्यात लावायचे..आम्ही चादरी वगैरे घेऊन जायचो...फार फार तर एक सिनेमा बघायचो ..नंतर झोपून जायचो. पण सिनेमा पहायची क्रेझ खूप होती .कुठलेपण आणि कुठे पण जाऊन पाहायचो.

पडद्यावर जे दिसते ते भक्तिभावाने पहायचे हेच काम मला तेव्हा होते. >>>>
हे भक्ती भावाने पहातानाच "कॉल गर्ल म्हणजे काय ग आई?" विचारून आई ला ओशाळवाणे केले होते. (त्यात सोनम कॉल गर्ल असते)

आणि तो VCP आणताना, सोबत थम्सप, वेफर्स, समोसे.
रात्री दोनला दणकून भूक लागायची मग लुनावरून स्टेशनला चक्कर मिळेल ते खायला आणायला. (लुना आली म्हणून ब्रह्मरायण संबंध जोडू नये.)

सनी ताइ नव्यानेच इन्ट्रोड्युस झाल्या तेव्हाचीवृत्तपत्रे वाचून एका घरात "पोर्न स्टार म्हनजे काय हो बाबा? " असा हृदय्विदारक प्रश्न विचारण्यात आला होता... (ह्या प्रश्नाचे उत्तर .. गप्प बैस मूर्खा असे देण्यात आले होते Happy )

स्वप्ना.
बघ!! आम्ही कस्से लहानवयात हुश्शार होतो हे सांगायचं होत.

शास्त्रीय संगीताच्या मैफलित भैरवी हा शेवटचा राग असतो.
हेच तत्व पुर्वीच्या सिनेमातही पाळलं जायच. शेवटच गाण भैरवीत.
पण हमे तुमसे प्यार कितना... भैरवी असूनही टायटल सॉंग नंतर दुसरं गाणं आहे.

@बिपीनचंद्र
अफवा नाही खरच साज चं कथानक लता आशाशी जुळणारं आहे.
अरूणा इराणीने अचानक गायलेलं देशभक्तीपर गीत म्हणजे ऐ मेरे वतन के लोगों.
साज मधलं गाणं ज्यात अरूणा शबानाला फक्त रूमझुम रूमझुम गाऊ देते. ते म्हणजे अपलम् चपलम्.
असे बरेच प्रसंग सारखे आहेत.

Pages