मेंडेलीफची कविता

Submitted by Asu on 26 November, 2018 - 22:17

मेंडेलीफची कविता

मूलद्रव्य हे शब्द घेऊनि
कविता रचली रसायनी
पिरिआॅडिक टेबल म्हणती कुणी
कुणी म्हणती आवर्त सारणी

मेंडेलीफ तव कारागिरी
अद्भुत केली किमयागिरी
मानवतेचे उपकार शिरी
कविता केलीस जादुभरी

मात्रा वृत्त काव्य रसायन
अष्टचक्र जरी वृत्त गहन
नाद लयीचा ठेका घेऊन
बांधिली कविता त्यात महान

द्रव्य रचिता अणुक्रमे
नियम पाळती आवर्तनांचे
द्रव्ये सहज चालत येती
गणात समान गुणांचे

प्रत्येक जागी घट्ट बसविला
ना मिळता शब्द कोशी
दुसऱ्यांसाठी शब्द शोधण्या
सोडून दिली जागाच तशी

अर्थांची ज्या खात्री केली
भविष्यवाणी नव शब्दांची
शब्दा आधी अर्थ सांगुनि
मती चेतविली शास्त्रज्ञांची

द्रव्यांचे फक्त स्थान कळवा
क्षणात त्याची कुंडली मिळवा
पंचांग हे रसायनांचे
भविष्य सांगते मूलद्रव्यांचे

धातू, अधातू, निष्क्रिय द्रव्य
रचिली कविता अद्भुत दिव्य
मेंडेलीफ तुज सलाम सहस्त्र
उपकृत तव रसायनशास्त्र

- प्रा. अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults

तोंडपाठ होतं, त्यावरच्या प्रश्नांचे गुण होते हक्काचे॥
एसपीडीएफ , तत्पर आणि उदासीन द्रव्ये. वेगळ्याच गुणांचा हाइड्रोजन, लॅन्थनम मालिका द्रव्ये,समृद्ध, जड धातू,अधातू, अस्थिर वगैरे काहींची नावे कवितेत अपेक्षित.

छान.
Mendeleev चा मराठी उच्चार मेंडेलीफ होतो हे आज कळले.

मस्त!

प्रतिसादाबद्दल सगळ्यांना धन्यवाद !
अस्तित्वात नसलेल्या मूलद्रव्यांचे आवर्तसारणीत स्थान नक्की करणे आणि त्याचे गुणधर्मही सांगणे अशी अद्भुत कामगिरी करणारा मेंडेलीफ खरोखर किमयागारच होता. आवर्तसारणीत मूलद्रव्ये त्यांच्या अणुभाराच्या क्रमांकावर मांडल्यावर विशिष्ट क्रमांकानंतर (अष्टक) गुणधर्मांचे आवर्तन होते हा शोध तर महानच !
मेंडेलीफच्या या अद्भुत कार्याचे गारूड माझ्या मनावर कॉलेज जीवनापासूनच होते. रसायनशास्त्रावर मेंडेलीफने केलेल्या उपकरातून उतराई होण्याची ही थोडीशी धडपड !

लहानपणापासून वाटायचे गणित, सायन्स या विषयात देखील कविता असायला पाहीजेत. आपण त्या कशा असायला हव्यात याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. शास्त्रीय कवितांसाठी साधारण कवी नाहीत चालायचे मात्र... शास्त्रज्ञ कवीच हवेत.

शास्त्रज्ञ + कवी = कवी + शास्त्रज्ञ = कवीज्ञ

लहानपणापासून वाटायचे गणित, सायन्स या विषयात देखील कविता असायला पाहीजेत. आपण त्या कशा असायला हव्यात याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. शास्त्रीय कवितांसाठी साधारण कवी नाहीत चालायचे मात्र... शास्त्रज्ञ कवीच हवेत.

शास्त्रज्ञ + कवी = कवी + शास्त्रज्ञ = कवीज्ञ>>+११११११११११११११११११११११११११११११