रात्र वैऱ्याची

Submitted by Asu on 25 November, 2018 - 22:21

दि.२६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री कसाब व इतर पाकिस्तानी अतिरेक्यांनी समुद्र मार्गे मुंबईत प्रवेश करून मुख्यतः ताजमहाल हॉटेल, सी.एस.टी., कामा लेन परिसरात निरपराध लोकांचे बळी घेऊन जे मृत्यूतांडव केले, त्या तांडवाचे व त्या अतिरेक्यांशी दोन हात करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या पराक्रमाचे वर्णन करणारी कविता -

रात्र वैऱ्याची

मुंबईच्या धुंद किनारी
वारा वाहे मंद सागरी
ओढून चादर रात्र अंधारी
शांत झोपली महानगरी

तटरक्षक दल घोरत पडले
मौका साधुनि दहशती घुसले
कुठून आले कुणा न कळले
समुद्र पिशाच्च जणू भासले

क्षणात पसरूनि इकडे तिकडे
मारले मानव जणू किडेमकोडे
नरभक्षक हे राक्षस भयंकर
मानवतेशी करती संगर

वडवानल होऊन आले
रात्रच सारी जाळून गेले
सुरक्षेची करून लक्तरे
वेशीवर टांगून गेले

भारतभूचे शूर शिपाई
तुंबळ करती घनघोर लढाई
लढून मरती देशापाई
तरी पकडला एक कसाई

गड राखला परि सिंह गेले
देशासाठी शहीद झाले
पाप कुणाचे कुणी फेडले
निष्पाप जीव प्राणा मुकले

कुर्बान होऊन देशावरती
अमर जगती त्यांची गणती
आठवणीस आज येता भरती
अश्रू अविरत ओघळती

- प्रा. अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults