अवंतिका

Submitted by अननस on 21 November, 2018 - 18:31

सकाळी ११ -११:३० ची वेळ असेल, याच महिन्यात घेतलेली नवीन साडी नेसून, अवंतिकाने ड्रायव्हर ला गाडी बाहेर काढायला सांगितले. नवीन चंदेरी रंगाची धुवून पुसून लख्ख केलेली गाडी दारासमोर आली. डोळ्यावर काळा चष्मा लावून अवंतिका गाडीमध्ये जाऊन बसली. गळ्यातली प्लॅटिनम ची नाजुक माळ तिच्या नाजूक सौंदर्याएवढीच उठून दिसत होती.

अवंतिकाने गाडी शॉपिंग मॉल कडे घेण्यास सांगितली. गाडी चालली होती. फळे, खेळणी, हात रुमाल, लहान मुलांचे कपडे, खोटी चमकदार कानातली असे विकणारे लोक आपापल्या गाडीवर, सायकलवर विकायला ठेवून रस्त्याच्या कडेला उभे होते. हे पाहून, अवंतिकाने ड्रायव्हर ला गाडी रस्त्याच्या कडेला थांबवायला सांगितली. लग्न करून किल्लेदारांच्या घरी आल्यापासून अशी रस्त्यावर शॉपिंग करायची मजा तिने घेतलीच नव्हती.

'किल्लेदारांची सून रस्त्यावर शॉपिंग करत आहे.. हे आईसाहेबांना कळले तर त्यांना काय वाटेल?' अवंतिकाच्या मनात विचार आला.
'वाटेल ते वाटू दे, खूप दिवसांनी अशी संधी येत आहे... ' आपलाच विचार तिने खोदून काढला... मनसोक्त जगण्याचा आनंद दिला पण लुटायचा होता.

रस्त्यावर ओळीने गाडीवाले उन्हात या गाडीवर वस्तू विकायला ठेवून उभे होते. अवंतिका पहिल्या गाडीवाल्याकडे गेली, तिने गाडीवर मांडलेली खोटी कानातली पाहिली. सहज एक कानातले हातात घेऊन पाहिले, मग दुकानदाराला त्याची किंमत विचारली.

'५० रुपये,', पांढरा पैजामा आणि शर्ट घातलेला, उन्हाने रापलेला, बारीक, जेमतेम सव्वा पाच फूट उंची असलेला दुकानदार म्हणाला.

चांगलं गिऱ्हाईक मिळणार अशी आशा त्याच्या डोळ्यात कोठेतरी झळकून गेली. अवंतिकाने आपली पर्स चपापली, इतक्या कमी किमतीचे सुट्टे पैसे तिच्या जवळ आहेत का बघायचे होते.
मग थोडा विचार करून, ती तशीच पुढे चालू लागली...

'ताई, किती देणार.. ?', दुकानदार ओरडला.

मग अवंतिकाला थोडं समाधान वाटले. अवंतिका मागे वळून म्हणाली, 'बघून सांगते..'

'पुढे असं नाही मिळाले तर या', आपलं गिऱ्हाइक चालले आहे याची निराशा लपवत दुकानदार म्हणाला.

मग अवंतिकाने अजून दोन चार दुकानदारांकडे अशीच चौकशी केली. २-५ रुपये कमी जास्त सोडले तर सगळीकडे साधारण किंमत सारखीच होती..

मग अवंतिका परत पहिल्या दुकान दारापाशी आली. गिऱ्हाइक परत आलं याचा आनंद सकाळपासून उन्हात उभ्या असलेल्या दुकानदाराच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.

'नक्की कितीला देणार सांगा?', मोठ्या आत्मविश्वासाने अवंतिकाने विचारले..

'चला, ४५ रुपये द्या ', दुकानदार म्हणाला..

४५? काहीतरीच, १०० ला तीन द्या ', थोडीशी ओरडल्यासारख्या आवाजात अवंतिका म्हणाली.

दुकानदार थोडा बावचळला. त्याला बावचळलेला बघून, अवंतिका मनातल्या मनात थोडी खुश झाली.

'नाही परवडत ताई', काकुळतीच्या स्वरात दुकानदार म्हणाला.

'चला तुम्ही, ४० रुपये द्या', दुकानदार पुढे म्हणाला.

;नाही, नाही, ४० कसले, १०० ला ३ द्या..' अवंतिकाने आपला भाव धरून ठेवला.

'नाही परवडत ताई', निराशेच्या स्वरात दुकानदार म्हणाला.

तो निराशेचा सूर ऐकून,अवंतिकाला अजून थोडे अवसान आले..

'नक्की भाव सांगा', अवंतिका काहीशा आज्ञावाचक स्वरात म्हणाली.

'आता तुम्हाला काय सांगायचे ताई, चला ११० ला तीन देतो', आधीच्याच निराश सुरात दुकानदार म्हणाला..

अवंतिकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू येऊन गेले. मग तिने तीन कानातली निवडली... एव्हाना दुपारी रामजन्माची उन्हाची वेळ होऊन गेली होती.

अवंतिकाने आपल्या पर्समधून पैसे काढून दुकानदाराला दिले. काहीशा निराशपणे पण काही न मिळाल्यापेक्षा काहीतरी मिळाल्याच्या मानलेल्या समाधानात दुकानदाराने ते पैसे घेतले.. एकदा कपाळाला लावून, ते खिशात ठेवले.

'कानातल्यांचे खडे पडणार नाहीत ना?', अवंतिकाने एकदा परत उलट तपासणी केली.

'तुम्हाला खराब माल नाही देणार ताई', वैतागलेला दुकानदार आपला वैताग लपवत म्हणाला.

अवंतिका परत आपली वाट पाहणाऱ्या ड्रायव्हर कडे वळून चालायला लागली.

'या बायका म्हणजे, एक वस्तू घ्यायला २ तास कचकच करतील', वैतागलेला दुकानदार मनातल्या मनात म्हणाला.

अवंतिका गाडीत जाऊन बसली. ए. सी. लावला होता म्हणून,बाहेरच्या उन्हात आणि धुळीत असलेले जग तोडणारी, गाडीची काच अवंतिकाने वर केली.

आज अवंतिकाने किती दिवसांनी समाधानकारक खरेदी केली होती.. ती कानातली अवंतिका कधी वापरणार नसली तरी अशा खरेदीची मजा काही औरच.

आज दुपारी, जेवण झाल्यावर, पुरुषी अहंकार, स्त्रियांवर होणारे बलात्कार आणि इतर समस्या या क्लब मध्ये इतर बायकांबरोबर होणाऱ्या चर्चेमध्ये तिला आपले विचार मांडायचे होते.

Group content visibility: 
Use group defaults

काहीच कळलं नाही. हा आनंद कुणीही घेत असतं. त्याकरता तिची गाडी, प्लॅटिनमचं गळ्यातलं वगैरे काही नसतं तरी चालेलं असतं.

बडी धेंडं गरिब लोकांशी घासाघीस करुन वस्तु घेताना पाहिलेय. शेवट्ची वाक्ये सुचक आहेत.

शेवटचे वाक्य टाकून बळेच अथोरिटीव्ह बायका आणि बलात्कार वगैरे विषय लिंक करायचा प्रयत्न केलाय.
तो खरे तर ललिताचा विषय नाही.

त्या ऐवजी "फेरीवाल्यांच्या अतिक्रमानाबद्दल निषेध मोर्चाला गेली " वगैरे काही असते तर विरोधाभास तरी दिसला असता

<तो खरे तर ललिताचा विषय नाही.>
प्रस्तुत लेखकाचं एकंदरित लिखाण पाहिलं तर ज्या स्त्रियांना बलात्कार, अत्याचार इत्यादींचा काही त्रास नाही , अशाच स्त्रिया त्याबद्दल फुकाची टिवटिव करत असतात, प्रत्यक्षात त्या अप्रेसर असतात, असंच लेखकाला सुचवायचंय.
शिवाय अवंतिकाला हे सगळं लग्नामुळे आयतं मिळालंय. तिला स्वतःला पैसे कमवायला काहीही करावं लागत नाही. लग्नापूर्वीची परिस्थिती तशी नसावी.

आता तो विक्रेता पुरुष नसून तिथे स्त्री विक्रेती असती, तरीही खरंतर अवंतिकाच्या वागण्यात काही फरक पडला नसता.

क्लास कन्फ्लिक्टवर लेखकाने स्वतःची जेंडर कन्फ्लिक्टच्या कॉन्ट्रास्टची थियरी सुपरैम्पोज केलीय.

(कस्लं भयाण मराठी लिहिलंय मी Uhoh )

परिस्थिती ची गरज म्हणून, आपल्या मनाविरुद्ध करावे लागणं किंवा इतरांना त्यांच्या मनाविरुद्ध काही गोष्टी करायला लावणे ही अनेक व्यक्तींची मर्यादा असू शकते.

परंतु परिस्थितीची गरज नसताना दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या मनाविरुद्ध वागायला लावल्याने जो सुखावतो तो अहंकार.. मग ते ५ रुपयाचे कानातले घेणे असो किंवा स्त्रीकडून शरीरसुख मिळवणे असो. सुदैवाने असा अहंकार स्त्रियांना असत नाही तो फक्त पुरुषांना असतो त्यामुळे, पुरुषांनीच आत्मपरीक्षण करून समाज सुधारू शकेल.

Kahihi ahe.
Badarayan sambandh.
+ asha Bai var balatkar hou shakat nahi, tila Tasha bhiti vatat nahi he ajun el assumption.

<<<त्याकरता तिची गाडी, प्लॅटिनमचं गळ्यातलं वगैरे काही नसतं तरी चालेलं असतं.>>>
ती खूप श्रीमंत असूनहि थोड्या पैशासाठी घासाघीस करते, गरीब लोकांना पैसे देण्या ऐवजी त्यांच्या कडून स्वस्तात वस्तू विकत घेते असे दाखवायला. लगेच पुढे ती एका मोठ्या दुकानात गेली आणि तिथे ५००० रु. म्हंटल्यावर लगेच ५००० रु. काढून देऊन एकच कानातले घेतले, असेहि लिहायला पाहिजे होते म्हणजे विरोधाभास, श्रीमंत लोकांची गरीबांना लुबाडण्याची सवय या गोष्टींवर भाष्य झाले असते.
श्रीमंत म्हंटल्यावर त्यांचे सगळेच कसे वाईट असे दा़खवायचे असते.

<<<परिस्थितीची गरज नसताना दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या मनाविरुद्ध वागायला लावल्याने जो सुखावतो तो अहंकार.>>>
बरोबर.
<<सुदैवाने असा अहंकार स्त्रियांना असत नाही तो फक्त पुरुषांना असतो त्यामुळे, पुरुषांनीच आत्मपरीक्षण करून समाज सुधारू शकेल.>>
ही गोष्ट पूर्वी, बरेच उलट सुलट बोलून, भांडून, वैयक्तिक टीका करून, थोडक्यात नेहेमीच्या मायबोलीच्या नियमांप्रमाणे मायबोलीवर सिद्ध झाली आहे.