सेल्फी (भाग २)

Submitted by सेन्साय on 21 November, 2018 - 05:13

सेल्फ़ी ― २
~~~~~~~~~

"मन: संकल्पविकल्पात्मक:" आणि "निश्चयात्मिका बुद्धी" हे तर आपल्याला माहिती आहेच. मन - बुद्धि - चित्त आणि अहंकार मिळून बनते ते मानवाचे अंतःकरण. मानवाच्या जीवन विकासासाठी उचित निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या बुद्धीच्या अंमलाखाली असलेला मनाचा भाग म्हणजे चित्त. अर्थात ह्या चित्ताला विचलित करायचे, कुमार्गावर आणायचे तर त्यासाठी त्या मानवाच्या बुद्धीला आपल्या अधिपत्याखाली आणणे गरजेचे आहे. ह्यासाठीचा सहज सोपा मार्ग म्हणजे त्या व्यक्तीचा अहंकार वाढवत नेण्यास कारणीभूत ठरेल असे विविध मार्ग त्याच्या जीवनात आणून आमिष निर्माण करणे.

अहंकार म्हणजे 'मी पण' अर्थात मानवी मन आणि जे मुळातच चंचल आहे तेथे त्याचे प्रतिरुप अहंकार कसा स्थिर असेल ! तोही वाढत जातो आपापल्या सवयी अन् वागणुकीनुसार ... मी किती शिकलो, किती कमावतो, कसा उच्च जातीचा, कसा पिळदार यष्टीचा असे अनेक अहंकार मनात घर करत वयानुसार पुढे वाढतच जातात. मानवी देहात स्त्री पुरुष भिन्नता असली तरी अहंकार ह्या एका गोष्टीत मात्र पुरेपूर समानता आहे. त्यामुळे मी कशी सुंदर दिसते हां अहंकार मला अजून अधिक सूंदर दिसण्यासाठी काय करावे लागेल ह्याच विवंचनेत कायम मनाला अस्थिर ठेवत राहतो. आणि ही अस्थिरता शमविण्याचे उत्कृष्ट ठिकाण म्हणजे आरसा ... अर्थात आपलेच प्रतिबिंब .... फक्त उलटे ! जे मला माझ्या मनातील आभासी जगाचा (उलट्या विश्वाचा) परिचय करुन देते. आरश्यातील माझे प्रतिबिंब म्हणजे एकप्रकारे सेल्फ़ीच झाली. ह्या प्रतिबिंबालाच गुलाम बनवण्याची मनीषा बाळगुन असलेला ह्यनामारिआ ईश्वर प्रणित वैश्विक नियमांचा स्वतःच्या स्वार्थपूर्तीसाठी पुरेपूर वापर करायला घेऊ पाहत होता.

प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक तेजोवलयाच्या क्षमतेनुसार त्याचे त्याचे असे एक घटाकाश असते. आणि ही प्रत्येंक व्यक्ती एकत्रितरित्या ह्या जगात वावरत असल्याने तिच्या घटाकाशाचा संबध सामायिक महत् अवकाशातही असतोच. म्हणजे एकदा का त्या व्यक्तीच्या घटाकाशाचा ताबा ह्यनामारिआकड़े आला की त्याचा वापर करुन तो ह्या महदाकाशाचे माध्यम वापरत हवे तेव्हा, हव्या त्या ठिकाणी पृथ्वी वरील कुठल्याही व्यक्तीच्या मनावार ताबा मिळवून आपले ईप्सित साध्य करू शकणार होता. ही त्याची आसुरी महत्वाकांक्षा पूर्ण करता यावी म्हणून त्याने मोबाइल ही लघु रूपातील प्रतीकात्मक रचना वापरत आपल्या योजनेच्या पहिल्या टप्प्यास आरंभ केला होता.

अशीच आसुरी महत्वाकांक्षा बाळगणारे आणि त्यासाठी शुक्राचार्य प्रणित मार्ग अवलंबणारे अनेक जण पृथ्वीच्या विविध खण्डात गुप्तपणे कार्यरत असल्याने आपल्या साधनेला कोणाचा अडथळा येवू नये, मिळणाऱ्या यशामध्ये कोणी वाटेकरी असू नये म्हणून ह्यनामारिआने एक विशिष्ट चिन्हांकित यंत्र विकसित केलेले होते. ह्या चिन्हांची प्रतिकृती म्हणून तरसाच्या चामडयावर विविध पक्ष्यांचे रक्त वापरत अशुभ मंत्रोच्चाराने त्या मोबाइलचे कव्हर बनवले होते. हे कव्हर म्हणजे खरे तर त्या सर्व दुष्ट शक्तींवर एक प्रकारे लगाम होता जेणेकरुन त्यांना आपापले अस्तित्व गुप्त राखण्यास मदत मिळत होती. नेमके ते कव्हरच अनुश्रीने काढून फेकून दिल्याने ह्या सर्व शक्ति आता अनियंत्रित झाल्या आहेत.

पहिला बळी लगेचच सिद्धतेच्या दुसऱ्या दिवशी घेत आफ्रिकेपासून सुरु केलेली ही मालिका पुढील ६ टप्प्यानी जात पूर्ण होणार आहे.
दुसरा बळी पूर्वयूरोपमध्ये तर तिसरा दक्षिण अमेरीकेत घेवून आता हां मोबाईल त्याचा चौथा आणि महत्वाचा बळी घेण्यास पश्चिम भारतात आलेला आहे..... ल्यूसिफर सैतानाची प्रतिमा रेखणारे ६ बिंदु आणि त्या सर्वाचा मध्य अर्थात मुख असलेला हां ४था टप्पा म्हणजे भारत आहे. पृथ्वीच्या सात खंडावरुन एकेक असे सात तरुणींचे बळी मिळवल्यानंतर ल्यूसिफरची आकृति पूर्णत्वास जाऊन ह्यनामरिआस त्याच्या यशामुळे पुढील मार्ग मोकळा होऊ शकणार आहे.

ह्याच वेळी ईथे अनुश्रीच्या आयुष्यात महत्वाचा बदल घडायला सुरुवात झालीय. ह्या मोबाईल सोबतच तिच्या आयुष्यात दोन नवीन व्यक्ति येतात... अनिर्बंध झालेल्या दुष्ट शक्तींच्या बंदोबस्तासाठीची ही दत्तगुरूंचीच योजना असते.

समांतर विश्वरचनेत...अनेक आकाशगंगेपलीकडे असलेल्या निबुरा ग्रहावर झियसने तत्काळ एक सभा घेत ल्युसिफरच्या बंदोबस्तासाठी आपली पुढील योजना आखली आणि सर्व तयारीनिशी हैय्यवानस ह्या आपल्या अतिप्रगत यानातून प्रकाशाच्याही जास्त वेगाने तो अनुश्री वास्तव्य करत असलेल्या पृथ्वीच्या दिशेने निघाला ... आणि तिच्या ऑफिसमध्ये आजच जुने बॉस शांघायच्या ऑफिसला जॉइन होणार असल्याने उद्या परदेशातील ऑफिसमधून नवीन बॉस येणार असल्याची घोषणा झाली.
.
._________________________________
.... अमावस्या नसुनही आज सर्वत्र काळाकुट्ट अंधार का पसरलेला आहे असा !

आणि हे काय ?
चंद्र तर आकाशात दिसत नाहीच आहे, तरी त्याचे प्रतिबिंब मात्र ह्या सरोवराच्या पाण्यात स्पष्ट दिसतेय मला.

... पण ते इतके स्तब्ध का ?
पाण्यावर कुठलेच तरंग कसे नाही जाणवत मला ?

आणि मुख्य म्हणजे ह्या प्रतिबिंबाकडून कसलाच प्रकाश का नाही उमटला बरे ?

अनुश्रीच्या मनात प्रश्नांची वादळे घोंघावु लागली पण त्यांहीपेक्षा जोरात अजून काहीतरी विलक्षण वेगाने घोंघावत तिच्याच दिशेने येत असताना तिला दिसले. पण त्याला कसलाच स्पष्ट आकार नव्हता... कधी ते हिंस्र लांडग्याप्रमाणे गुरकावत झेपावणारे दिसले तर लगेचच सुंदर नाजुकश्या सस्याप्रमाणे उड्या मारत येताना दिसले.

ओह ! हे काय .... ते तर आता चक्क माझ्याच चेहऱ्याप्रमाणे वाटते आहे. पण मी तर ही ईथे आहे मग समोरून येणारी मी कसे असेन ? नाही, हे शक्य नाही. हां फक्त माझा भास आहे. हो, नक्कीच. हां निव्वळ आभास आहे. पण मला आता सर्व बाजूनी फक्त माझाच चेहरा का दिसतोय...
तेही फक्त चेहरा ?

$$$ गजानना श्री गणराया...$$$

सकाळी ६ वाजता होणाऱ्या नेहमीच्या अलार्मने अखेर अनुश्रीला जाग आली. पण ह्याआधी जे काही अनुभवले ते खरंच स्वप्न होतं का याविषयी तिच्या मनात अजूनही संभ्रमच होता. फटाफट सकाळची सगळी कामे आटपत तिने आता बाकीचे विचार बाजूला टाकून आपल्या वॉर्डरोबकड़े मोर्चा वळवला आणि आपल्या आवडीच्या गर्द गुलाबी साडीला मैचिंग अशी सर्व ज्वेलरी आरश्यासमोर मांडून छान तयार झाली. तसेतर टिपटॉप राहण्याची तिला अंगभूत आवड़ होतीच पण आज थोड़े स्पेशल काम असल्याने काटेकोरपणे तिने स्वत:चा मेकअप पूर्ण केला आणि नेहमीप्रमाणे रिक्षाने ऑफिससाठी जायच्या ऐवजी कुल कॅब मागवली.

" हॅलो डॉ.अल्बर्टो झियोनादस.
वेलकम इन इंडिया, सर !"

ऑफिसमधील सर्वात सोज्वळ सुंदरता लाभलेल्या अनुश्रीलाच अनेकदा नवीन पाहुण्यांचे स्वागत करण्याचा मान मिळायचा, त्याप्रमाणे आजही ती सुंदरसा बुके पुढे करत विमानतळावर आपल्या नवीन बॉसचे तिच्या ऑफिसच्या वतीने स्वागत करत होती.

डॉ.अल्बर्टो झियोनादस एक उंचेपुरे साढ़ेसहा फूटी प्रसन्न चेहऱ्याचे हासरे व्यक्तिमत्व. वयोमानापरत्वे केस अनुभवाच्या शिदोरीची चंदेरी छटा जास्त दाखवत असले तरी आपल्या सीनियरिटीचा कुठलाही दर्प बोलण्यात आणि वागण्यात दिसत नव्हता. ह्यामुळेच कदाचित अनुश्रीही त्यांच्यासोबत मोकळेपणाने बोलू लागली. तसेही ऑफिस येईपर्यन्त बराच वेळ लागणार होता त्यात हे नेहमीचे ट्रैफिक. त्यामुळे गप्प बसण्यापेक्षा गप्पा मारणे बरे हे डॉ.अल्बर्टो झियोनादस ह्यांनीसुद्धा ओळखले. आणि त्यांनी अनुश्रीला पहिलाच प्रश्न केला ― डू यु बिलीव्ह इन ड्रीम्स !

ह्या अनपेक्षित प्रश्नाने अनुश्री क्षणभर दचकलीच. तिला तिचा हां नवीन बॉस पक्का मनकवडा असणार अशी शंकाही आली. तरीही बोलायला काहीतरी विषय हवा म्हणून अन् त्यातल्या त्यात आपल्या सकाळच्या प्रश्नांची उत्तरेही कदाचित मिळतील म्हणून अनुश्रीने सकाळचे सर्व स्वप्न (!) त्यांना सांगितले. आणि ह्यावरील डॉक्टरांचे विवेचन ऐकून तर क्षणभर तिला ते जर्मन नसून कोणीतरी सनातन हिंदू धर्माचीच कोणी अधिकारी व्यक्ति बोलतेय असे वाटले. त्यांच्या स्पष्टीकरणानुसार तिला आता सकाळच्या अनुभवाबद्दल खात्रीच वाटू लागली.

डॉक्टर तिला समजावताना म्हणाले ― अंधकार म्हणजे काय ? तर प्रकाशाचा अभाव. जेथे प्रकाशाचा मूलस्रोत नाही तेथे त्या सरोवरातील प्रतिबिंबाचे चंद्रकिरण कसे जाणावणार. परावर्तनाचे कार्य पूर्णत्वास नेण्याच्या क्षमतेचा अभाव असल्याने अंधकार हां फक्त अभावाचे निदर्शक आहे ... अर्थात अतृप्ती - असमाधान. कुठलीही कार्य पूर्णत्वास नेण्याचे सामर्थ्य नसल्याने अनैसर्गिक अशी कधीही न संपणारी लालसा ! ह्या अंधारात अशा अनेक विविध लालसा आपले अस्तित्व राखून आहेत ज्याना योग्य संधी मिळाली की वाटेल त्या मार्गानी आपले वर्चस्व प्रस्थापित करुन मानवाच्या जीवनात नरक अर्थात नकारता - कर्तेपणाचा अभाव आणून कुमार्गीयांचे बल वाढवत राहतात. हे अंधकार मार्गीयांचे प्रकाश मार्गीयांशी सुरु असलेले युद्ध युगानुयुगे आणि कल्पानुकल्पे सुरूच आहे. आकाशात चंद्र नाही पण तरीही ते प्रतिबिंब दिसते आहेच म्हणजे मूळ गोष्टीची निव्वळ प्रतिकृती दाखवणारी अस्तित्वहीन अशी तरीही स्वतःचे असे एक गुणवैशिष्ट्य राखून असणारी आभासी दुनिया ! ह्या दुनियेलाच उलटी पृथ्वी अर्थात आगर्था नगरी म्हणतात....

इतक्यात अनुश्रीची मोबाईल रिंग वाजू लागल्याने त्यांचे हे संभाषण तिथेच थांबले. एका अनोळखी नंबरवरुन हां कॉल आला खरा पण उचलेपर्यन्त फोन कट झाला होता. कदाचित त्या दोघांचे संभाषण खण्डित करण्याच्याच उद्देशाने तो कॉल होता का ?

कारण त्यातील शेवटचे तीन आंकड़े होते ... ६६६ !

(क्रमशः)

― अंबज्ञ

Group content visibility: 
Use group defaults