संवाद ईश्वराशी

Submitted by मकरंद गोडबोले on 16 November, 2018 - 09:46

शेंदराचे ओरखाडून थर
मी शोधत रहातो तुला
सापडलास अस वाटत
तेव्हा तुझे भाट मला लुटत रहातात

मधेच म्हणते कुणी
मोक्षाला पर्याय नाही
ते जाउंदे, मेल्यानंतर बघू

तोपर्यंत तरी भेट
जरा गप्पा मारू चार
सांगतो माझे सुखदुःख
गैरसमज करून घेउ नकोस
त्रास घालवायला नाही बोलवत तुला
हे इथे या आयुष्यात मिळालेल सगळं कबूल आहे
सूख आणि दुःख सुद्धा
पण सूख भोगायला खूप आहेत अवती भवती
दुःख वाटायला गेलो तर कुणी जवळ करत नाही
म्हणून तुझी आठवण आली
जरा तुझ्या गळ्यात पडून
ढाळतो दोन चार अश्रू
टाकतो एखाद दुसरा पेग
असशील ना रे बरोबर
काय चढत दुःख सांगतो तुला मग
तुलाही कळेल
काय काय घडलंय तुझ्या हातून
तक्रार नाही रे
पण ऐक तर नुसते
तुझ्या घावांची वारांची गोष्ट नाही लावणार
पण या हृदयाला चर्र करून जाणाऱ्या गोष्टिचा

आवाज तुलाच ऐकू येतो फक्त
म्हणून बोलवतोय
बस जरा शेजारी
रडू दे पोटभर
उतरू देत कढ दुःखाचे

हे सगळे जगलोय रे मी
पूर्णपणे
हेच हवय परत
इतकंच सांगायचय
तू याला माया म्हणतोस
ते माझ्यासाठी सत्य आहे
तुझा तो शाश्वत मोक्ष
माझ्यासाठी मिथ्या आहे

जगू दे मला परत मनस्वी
पापपुण्याच्या तराजूशिवाय
स्वर्गनरकाच्या चाबकाशिवाय
फक्त एकच असूदे नियम जगण्याला
आकंठ
इतकेच आहे मागणे
आणि थोडी तुझी सोबत
बस्स!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults