पिस्ता क्रस्टेड मटण चॉप्स

Submitted by अमेय२८०८०७ on 13 November, 2018 - 12:30

शेफ जॉन एकदम भारी माणूस आहे. रेसिपी दाखवता दाखवता नर्मविनोदाचीही मस्त फोडणी घालतो. फावल्या वेळेत त्याचे व्हिडीओज बघणे हा आवडता उद्योग आहे. खालची रेसिपीही त्याचीच, एकदम सोपी दिसायला देखणी आणि चविष्ट. खरेतर ही पूर्ण rack of lamb घेऊन करायची पण आमच्या खाटकाकडे तशी मागणी केल्यावर त्याने जणू त्याची किडनी मागितल्यावाणी चेहरा केला आणि चॉप्स हवेत तर घ्या नायतर फुटा अशी देहबोली दाखवली.

साहित्य :
मटण चॉप्स,
मॅरीनेशन: लसूण, किसलेला कच्चा पपई, धणे जिरे पावडर, कोथिंबीर

मस्टर्ड पेस्ट, मध, काही थेंब लिंबाचा रस नीट फेटून घ्यावे

कोटिंग: मूठभर सोललेले तयार मिळणारे खारवलेले-भाजलेले पिस्ते, तेवढेच ब्रेडक्रंब्ज, आवडीचे सीझनिंग, लोणी, ऑलिव्ह ऑइल हे सर्व फूड प्रोसेसरमधून फिरवून भरभरीत करून घ्यावे

कृती:
मॅरीनेटेड चॉप्सना कढईत थोड्या तेलावर दोन तीन मिनिटे प्रत्येक बाजू असे फ्राय करून घ्यावेत, कच्च्या मटणाचा रंग जाऊन तपकिरी- सोनेरी रंग झाला पाहिजे.
थोडे थंड झाल्यावर या फ्राईड चॉप्सना मस्टर्ड पेस्ट-मिश्रण लावून वरून व्यवस्थित पिस्ता ब्रेडक्रंब्ज कोटिंग करून घ्यावे

बेकिंग डिशमध्ये फॉईल किंवा सिलिकॉन मॅटवर चॉप्स ठेवावेत.
ओव्हन 210 डिग्री से. प्रीहीट करून त्यात चॉप्स 20 मिनिटे किंवा शिजेस्तोवर बेक करावेत.

ओव्हनमधून काढून 5-7 मिनिटे रेस्ट करून मग आवडीच्या सॉस/डिप सोबत खावेत.

LRM_EXPORT_101620869701077_20181111_141918499.jpg

(चॉप्सचा वर दिसणारा हाडांचा भाग नीट साफ करून घ्यावा, त्याला थोडे मटण राहिले तर बेक करताना तांबूस-काळपट होईल, चवीवर परिणाम नाही होणार पण फोटोत जास्त चांगले दिसेल इतकेच!)

लसूण वर्ज्य नसेल तर गार्लिक आयोली (aioli) सोबतही छान लागतात.
5-6 मोठ्या लसूण पाकळ्या चिमूटभर सी-सॉल्टसोबत खलबत्त्यात स्मूथ रगडून घ्याव्यात आणि या पेस्टमध्ये चमच्याचमच्याने असे सहा सात चमचे ऑलिव्ह ऑइल टाकून जोरात फेटावे. काहीशा तीव्र चवीचे पण रोस्टेड मटणासोबत उत्तम साथ देणारे सुरेख emulsion तयार होते.

चॉप्स फ्राय केलेल्या कढईतच थोडा बारीक कांदा परतावा आणि पाणी/मटण स्टॉक, मिरपूड, थोडे तिखट घालून मिश्रण आटवून घ्यावे. आंच बंद करून यात थोडे लोणी घालून वितळवून घ्यावे. सॉसला ग्लेझ येईल.
हे सॉसही डिप म्हणून चांगले लागते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेष्ट दिसतेय... Happy
शेफ च्या चॅनल ची लिंक द्याल का प्लीज?

अमेय२८०८०७
कृपया पाककृती लिहिताना "पाककृती" हा लेखन प्रकार वापरा (लेखनाचा धागा नाही) ज्यामुळे आपोआप वर्गीकरण होते.

प्रयत्न केला हो,
पण त्यात फोटो जोडायचा ऑप्शन दिसेना, केवळ लेखनाचा धागा निवडलं तरच मजकुरात इमेज किंवा लिंक द्या हा पर्याय दिसू लागतो.

(आणि असं करायचं नसेल तर या ग्रुपमध्ये लेखनाचा धागा ही लिंक का आहे?)