गंध भाकरीचा….

Submitted by Asu on 12 November, 2018 - 09:26

खरपूस भाकरीचा दरवळणारा गंध म्हणजे गरीबाला आनंदकंद ! सुखवस्तू माणसालाही तो जगण्याचे भान देतो.
गंध भाकरीचा….

मन जेव्हा उदास होते
मना काही ना भावते
जगणे वाटे फेकून द्यावे
दर्दभरे मग गाणे गावे

नेतील पाय तिथे फिरावे
कशास वाटे व्यर्थ जगावे
डोळे मिटुनि स्तब्ध रहावे
गाव सोडुनि बाहेर यावे

झोपड्यांची गरीब वस्ती
हाडांचीच माणसे नुसती
चिमणी एक मिणमिणती
अंधाराची सर्वत्र गस्ती

डोकावून मी जेव्हा पाही
चुलाण पेटून प्रकाश देई
माय माऊली थापे भाकरी
खरपूस भाजी तव्यावरी

सुगंध कुटी जो दरवळला
नाही कधी कुणी शोधला
भाकरीचा सुगंध आगळा
सर्व गंधांहून असे वेगळा

भाकरीची ही गंधित कुपी
गरीबाघरची दौलत छुपी
फुले फुलवुनि चेहऱ्यावरी
दरवळे मनी आनंद रुपी

प्रफुल्ल होऊन श्वास घेतला
जगण्यासाठी जीव आसुसला
घरात शिरता मनात भरला
सुगंध भाकरीचा दरवळला

- प्रा. अरुण सु. पाटील (असु)
(दि.11.11.2018)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान