एका स्पेशल दिवाळीची साधी गोष्ट !

Submitted by Charudutt Ramti... on 11 November, 2018 - 09:02

एखाद्या सुगरणीने मनापासून बनवलेल्या चकली वर जसे टोकदार काटे येतात नं, तसेच काटे दिवाळी जवळ आली की माझ्याही अंगावर येतात. प्लॅनिंग कमिशन किंवा नीती आयोग वगैरेचे कमिशनर किंवा चेअरमन सुद्धा कधीतरी कंटाळा आला की 'जाऊद्या ओ! काय रोज रोज उठून प्रत्येक गोष्टीचं प्लांनिंग करायचंय... होईल सगळं वेळ आली की आपोआप व्यवस्थित, इतके वर्षं नाही का झालं?' असं एकवेळ म्हणत असतील. पण आमच्या घरचे मात्र नवरात्र संपून दसऱ्याचं सोनं लुटून, त्यानंतर पाच दिवसांनी कोजागिरीचं दूध आटवून (आणि मग ते गटवून) झालं की लगेचच ते रुईकर पंचांग, दाते पंचांग, झालंच तर भिंतीवर खिळ्याला लटकवलेलं कालनिर्णय किंवा महालक्ष्मी दिनदर्शिका, शिर्के दिनदर्शिका आणि काहीच नाही मिळालं तर ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ किंवा ‘कॉसमॉस बँके’चं जे काही पहिल्यांदा हाती येईल ते कॅलेंडर घेऊन त्यावर लिहिलेल्या नोव्हेंबरातल्या प्रत्येक तारखेवर किंवा तिथी वर बॉल पेनाने सर्कल करत दिवाळीचं नियोजन सुरु करतात.

“तुला दिवाळीची यंदा किती दिवस सुट्टी आहे रे ?” आई मस्त पैकी संध्याकाळसाठी मोठ्या हिंदालियम च्या कढईत ( आधी शाळेत पदार्थ विज्ञानाच्या प्रयोग शाळेत आणि पुढे अभियांत्रिकी शिक्षणात धातूविज्ञानात इतके असंख्य धातू आणि अधातू वगैरे शिकलो पण हिंडालियम नावाचा मिश्रधातू फक्त 'भाग्यलक्षमी' गृहोपोयोगी स्टील आणि वस्तू भांडारामध्येच उत्खननात का सापडतो, आणि तळण्याचे पदार्थ फक्त ह्या हिंडालियम नावाच्या धातूतच रुचकर का होतात, असा एक शोधनिबंध मी लिहायला घेतला आहे! विषयांतरा बद्दल क्षमस्व ), तर हिंडालियम च्या कढईत आई उडीद वडे तळत होती. एका हातानं वड्याचं पीठ उकळत्या तेलात सोडता सोडता उगाचंच आपलं विरंगुळा म्हंणून मला कोड्यात (खरं तर कचाट्यात) टाकायचा प्रश्न तिने केला.

“दोन दिवस आहे सुट्टी. लक्ष्मी पूजन आणि पाडवा.” – आता ह्या दिवाळीच्या सुट्ट्यांच्या विषयाच्या तोंडफोडीमुळे, तिने उडीद वड्याबरोबर सांबारासाठी केलेल्या हिरव्या मिरचीच्या फोडणीची आणि त्यामुळे घरभर पसरणाऱ्या ढास लावणाऱ्या खाटा' ची चाहूल मला आधीच लागते. त्यामुळे थोडा नरमाईच्या स्वरातच मी उत्तर देतो.

“ असली कसली रे नोकरी तुझी दळभद्री? ” - आईने वड्याचं तेल वांग्यावर बिंग्यावर न काढता डायरेक्ट माझ्या नोकरीवरच काढलं आज. हे वांग्यावर काढतात ते वड्याचं तेल फक्त बटाटे वड्याचं नसून ते उडीद वड्याचं सुद्धा असू शकतं हे मला पहिल्यांदाच समजलं. माझ्या नोकरीचा आणि विशेषतः सुट्ट्यांचा विषय मिळाल्यावर बायको, आईनं गरम केलेल्या तव्यावर ( खरं तर हिंडालियम च्या कढईत ) तिच्या फुकटच्या पोळ्या भाजायला आतल्या खोलीतून बाहेर आली, हातातलं काम अर्धवट सोडून. तिच्या मागं मागं मग आमची साडेसहा सात वर्षांची कार्टी पण आली...सर्कशीत चाबूक खाणारा वाघ पाहायला लोकं कशी आतुरतेनं येत असत तशी.

माझ्या नोकरीतल्या सुट्टया हा माझी आई आणि बायको दोघींच्या अगदी आत्मीयतेच्या विषय असतो. त्या दोघींचं जगात फक्त दोनच गोष्टींवर एकमत आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे "डोनाल्ड ट्रम्प सध्या जे काही करतोय ते अत्यंत योग्यच आहे" ( हे त्या दोघींचं मत का बनलं असेल हे सांगणाऱ्यास मी एक्कावन्न हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं आहे ) आणि दुसरी गोष्ट ज्यावर ह्या दोघींचं जरा जास्तच एकमत आहे ती म्हणजे. मला प्लांनिंग मधलं प ( खरं तर जोडाक्षर असल्या मुळं ‘प’ आणि ‘ल’ दोन्हीही ) सुद्धा कळत नाही.. ह्या दोन गोष्टी सोडल्या तर ह्या दोघींचं जगातल्या दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर एकमत नाही ह्यात दुमत नाही. पण एकदा का ह्या दोघीचं ह्या दोन गोष्टींच्या व्यतिरिक्त कोणत्या तरी तिसऱ्याच गोष्टीत एकमत होतानाची मला चिन्हं दिसायला लागली की, ‘मालवाहू तीनचाकी रिक्षांतून अंड्यांची वाहतुक करणारा अब्दुल किंवा सुलेमान रस्त्यातल्या मुन्सिपाल्टीच्या खड्यांना जितका घाबरतो’ त्यापेक्षा कितीतरी जास्त मी ह्या दोघींच्या होणाऱ्या संगनमताला घाबरतो. ह्या दोघी जेव्हा माझ्याविरुद्ध एकत्र येतात तेंव्हा, अमेरिका आणि रशियाच्या शीतयुद्धाच्या पार्श्व भूमीवर पंडित नेहरूंनी युनो मध्ये घेतलेली तटस्थतेची भूमिकाही फिकी पडेल इतकी तटस्थ भूमिका आमचे बाबा घेतात, त्याला कारण ही तसंच आहे, कारण त्यांचा ह्या विषयाचा अभ्यास आणि अनुभव दोन्ही गाढा आहे. सुभाषचंद्र बोस काँग्रेस मध्ये कसे नेहरूंच्या मुळं एकाकी पडले तसा मीही आमच्या घरातल्या कार्यकारिणीत, ह्या असल्या बाका प्रसंगात प्रसंगात अगदी एकटा पडतो.

“बाकीच्या सगळ्यांना ‘एट एट डेज हॉलिडेज’ आहेत बाबु, फक्त तुला एकट्यालाच सुट्टी नाही.” - आधीच भडकणाऱ्या आगीत तेल ओतण्याचं काम माझ्या मुली इतकं सुंदर दुसरं कुणीच करू शकत नाही. परवाच दसऱ्याला माझ्या ऑफिसने सर्व एम्प्लॉईज ना अर्धा किलो खारे काजू आणि तितकेच रोस्टेड बदाम दिले होते. माझ्या लेकीने आणि बायकोने ते सर्वच्या सर्व काजू आणि बदाम, परवा केलेल्या पुलाव आणि ड्रायफ्रूट बासुंदीत वेचून वेचून खात अवघ्या पंधरा वीस मिनीटांत संपवले. ज्या मिठात काजू खारवले होते त्या खाल्ल्या मिठाला न जागता तिघींनी म्हणजे, “माझी आई, बायको आणि मुलगी” (हे दोन अंकी नाटकाचं नांव म्हणून सहज खपेल) माझी अशी संभावना केल्या मुळे मी जाम वैतागलो.

" हे बघ , तू पाडव्याच्या आधी एक दिवस जोडून सुट्टी काढ " - प्रेमस्वरूप आई.

“ ब रं " - माझ्यात दडलेला साने गुरुजींचा श्याम.

“आणि जरा घरात लक्ष दे ” - वात्सल्य सिंधू आई.

“ ब रं " - माझ्यात दडलेला श्रावण बाळ !

“आणि जरा ही यादी घे आणि उद्या ऑफिस मधून येताना सगळं सामान आण. दिवाळी तोंडावर आलीय. किराणा संपलाय.” - आमच्या रंग मंचावर कधी सीता तर कधी महिषासुर मर्दिनी असा डब्बल रोल करणारी, माझी अर्धांगिनी.

“ तू ऑन लाईन का नाही मागवत ? " - माझ्यातला गरीब बिचारा बिभीषण.

“ सांगीतलयं तेव्हढं ऐक ” - प्रेमस्वरूप आई आणि महिषासुर मर्दिनी अर्धांगिनी एकाच सुरात कोरस मध्ये.

“ -- -- -- -- --“ - माझ्याताला श्याम आणि बिभीषण एकत्र.

" सुट्टी टाकतोयस नं ? " - दोघीं पैकी कुणीतरी

" म्हणजे काय, टाकली " - माझ्यातला शाम किंवा बिभीषण ह्या पैकी कुणीतरी.

“आणि सुट्टी टाकल्यावर व्यवस्थित पणे “आऊट ऑफ ऑफिस” टाक, उगाच घरात सणावारा दिवशी कॉल घेत बसू नकोस, सुट्टी काढून मग काही उपयोग नाही तुझा आम्हाला. आणि कॉलच घेणार असशील सुट्टी काढून सुद्धा, तर मग सरळ ऑफिस मधेच जा, घरीं नगाला नग म्हणून बसण्या पेक्षा " - इति माझी, “अग्नी ला साक्षी” मानून मीच घरी हसत हसत आणलेली आणि घरी आल्यावर अग्नी पेक्षाही पेक्षाही आग डोंब असा वणवा निघालेली माझी सुविद्य बायको. स्वतःच्या एकुलत्या एक नवऱ्याला आपल्या सक्ख्या सासू समोर असं ‘नsग’ म्हणून संबोधायला उरी केवढं धाडस पाहिजे, सोप्प नाहीय वाटतंय तितकं.

माझी बायको माझ्या आई समोर मला नsग म्हणते असं समजल्यावर एकदा माझ्या बाबांनी…
"तू नको वाईट वाटून घेऊ, तुझी आई तर मला तुझ्या आजी समोर ‘हिमनग हलतच नाही तुमचा’ हा एकदा बसला की" असं म्हणायची! तुला तर तुझी बायको नुसता 'नग' च म्हणतेय ना हिमनग नाही ना म्हणत?.” - 'ह्या सास्वा सुनांचं हे नवऱ्याला असं घालून पाडून बोलणं बहुदा अनुवांशिक असेल, मी केलं तसं तुही दुर्लक्ष करायला शिक” असं म्हणत समजूत काढली होती. मगाशी वर सांगितलं ना त्यांचा अनुभव दांडगा आहे ह्या विषयातला.

वर आणि बोलले आमचे तात, “नाही केलं दुर्लक्ष आपणच, तर मग नाही होत संसार. आणि मग अण्णा हजारे किंवा मोदींसारख्या जन्मभर लोकांच्या शिव्या खात आयुष्य काढावं लागतं. करोडो लोकांच्या शिव्या खात जगण्यापेक्षा एकट्या बायकोच्या शिव्या खात जगणं कितीतरी सुसह्य असतं हे विसरू नकोस.” असा मौलिक सल्लाही त्यांनी मला दिला होता. तो मी आजतागायत अगदी शिरोधार्यपणे पाळत आलो आहे. मी मग घरातलं अणूयुध्द टळावं म्हणून पडती बाजू घेत दोन दिवस रजा टाकली. एक दिवस दिवाळी आधी, आणि एक दिवस दिवाळी नंतर. कारण आईचं म्हणणं होतं दिवाळी आधी रजा टाक. आणि बायकोचं म्हणणं होतं दिवाळी नंतर टाक. म्हणून मी दिवाळी च्या आधी आणी नंतर अशी सँडविच पॅटर्न मध्ये गरज नसतानाही चक्क दोन दिवस रजा टाकली. मला 'नरक चतुर्दशी दिवशी' माझा नरकासुर करून घ्यायची अजिबात इच्छा नव्हती.

दिवाळी ची रजा टाकून मी माझ्या दिवाळीतल्या किल्ल्याची एक बाजू भक्कम केली होती. पण अजूनही 'खरेदी' नावाच्या तोफेनी माझी तटबंदी ढासळण्याची शक्यता होती. माझा निम्म्याहून अधिक पगार कापरासारखा उडून गेला तरी सुद्धा… " शीब्बाई , यंदा कै मनासारखी खरेदी झालीच नै " - हे शब्द काळजात कट्यारी सारखे घुसले माझ्या, आणि तत्क्षणी " हे तीव्र शब्द ऐकण्यापूर्वी हे परमेश्वरा मला तुज जवळ बोलावून का नाही रे घेत ? " असं मला तीन अंकी नाटकात पूर्वी काशिनाथ घाणेकर किंवा बालगंधर्व वगैरे नाटकी शब्दात डायलॉग फेकायचे ना तास डायलॉग दुकानदारासमोर फेकावा असं वाटून गेलं. समस्त महिला वर्गाची आणि त्याच बरोबरीने बायकोच्या बहिणी, मैत्रिणी, आईच्या सर्व चुलत मावस वगैरे बहिणी ( पर्यायाने माझ्या ही चुलत मावस मावश्यासाठी ) ड्रेस मटेरियल चे कापड, स्टेनलेस स्टिल ची भांडी, प्लास्टिक चे सुशोभीकरणाचा कचरायुक्त टेबल टॉप्स, नाकं पुसायला डिझायनर हात रुमाल, कॉपर बॉटमची भांडी घासायचे अत्याधुनिक स्क्रब्ज अशी सगळी मनमोकळे पणाने खरेदी करून झाल्यावर हळूच दुकानदाराला “तुमच्या इथे ओल्ड स्टॉक काढतात तो डिस्काउंट सेल कधी असतो हो?” असं आमच्या सुविद्य पत्नीने विचारलं. दुकान दाराकडून अपेक्षित उत्तर आल्यावर " ओsकेss ओssकेss फेब्रुवारी माssर्च नंतर का? चाsलेsल चाsलेsल... हां आम्ही मग शर्ट पीस पॅन्ट पीस पहायला तेंव्हाच येतो, आत्ता नको घ्यायला " असं दुकान दाराकडे पहात पहात पण मला उद्देशून हिनं म्हंटल, तेंव्हा मी समर्थांच्या मनाच्या श्लोकांतील “नको रे मना मत्सरू दंभ भारू” नेमकी ही ओळ का गुणगुणत होतो तें माझं मलाच कळलं नाही.

मी माझ्या स्टेट बँकेच्या सेविंग्स अकाउंट्स च्या डेबिट कार्डांवरचा बॅलन्स मोबाईल वर चेक करून तो आता पुरणार नाही असं मनातल्या मनात पुटपुटत आयसीआयसीआयचं क्रेडिट कार्ड पाकिटातून काढण्याचा प्रयत्न होतो. तेव्हढ्यात ही " जाऊदे बाई , फारच गर्दी वाढायला लागलीये हे इथले सेल्स मन काही दाखवतच नाहीयेत नीट, आता उरलेली खरेदी अमेझॉन किंवा फ्लिप कार्ट वर ऑनलाइनच करु " असं काही तरी पुटपुटली तेंव्हा मला पटकन गुगल मॅप्स वर रामदासांनी दासबोध लिहिला ती ‘शिवथरघळ किंवा सरळ किंवा महाराजांनी समर्थांना इथे वास्तव्य ठेवा असं म्हणत बहाल केला तो सज्जनगड’ पुण्यापासून किती लांब आहे हे पटकन चेक करून ठेवावं, कुणी सांगा आपल्या हातूनही काही काव्य घडायची दैवी इच्छा असेल, असे रामदासी विचार मनात घर करू लागले.

इकडे घरी, नेहमी प्रमाणे फराळाचे कोणते पदार्थ ‘घरी केलेत’ आणि ‘कोणते विकत आणलेले आहेत’ हे लक्षात ठेवण्यात अस्मादिकांनी गल्लत केली. चकल्या आणि अनारसे घरी केलेले आहेत आणि चिरोटे व पुडाच्या वड्या विकत आणलेल्या आहेत. परंतु ऐन वेळी घोळ करत हे बरोब्बर उलट समजून, “चिरोटे मस्त झालेत पण दामले बाईंच्या ह्यावर्षीच्या चकल्या चांगल्याच फसल्या आहेत” असं बोलून गेलो. पुढच्या अर्धा तास मग मला उद्या म्हणजे पाडव्याला लागणाऱ्या श्रीखंडासाठीचा चक्का, पुरण यंत्रातून बारीक फेटून देण्याचे प्रायश्चित स्वीकारावे लागले. “रस्त्यावर गमबूट घालून शिक्षा म्हणून ‘उकळलेला डांबर झारीतून ओतत अलका टॉकीज ते दांडेकर पूल हा संबंध रस्ता खड्डे बुजवून परत बनव” म्हणून सांगितलं तर मला एकवेळ चालेल पण हे चक्का आणि श्रीखंड प्रकरण नको, इतका ह्या चक्का प्रकरणाचा मला तिरस्कार आहे. दोन्ही हातांची सर्व बोटं, बनियन, पायजमा, नाकावरचा शेंडा , पूजेच्यावेळी गंध लावतात ती कपाळाची दोन भुवयांमधील जागा सगळी कडे ह्या चक्का रुपी फेव्हिस्टिक चा प्रसाद लागला असतो देहावर त्या चक्क्याचं श्रीखंडात परिवर्तन होण्यापूर्वी. आणि इतकं होऊन सुद्धा तो म्हणावा तसा "एकसारखा" होऊन येत नाही अर्धा तास फिरवून फिरवून झाला तरीही. पण मला दहा वर्षाच्या संसारात एक गोष्ट मात्र अजून समजलेली नाही. हा दाट सर चक्का पुरण यंत्रातून फिरवताना किंवा बायकोला चकलीचं पीठ सोऱ्यातून कागदाच्या चौकोनी तुकड्यावर केंद्रवार्धिनी रांगोळीसारखं फिरवून देताना, दोन्ही हात ज्यावेळी नेमके बिझी असतात त्याचवेळी पाठीवर किंवा मानेवर वगैरे त्वचा चुटचुटल्या सारखी होत खाज सुटणे, किंवा नेमके त्याच वेळी कानांत काही तरी गुळगुळ ल्यासारखे होणे, ह्याचं नक्की काय गमक आहे हे मला एकदा चक्क मेडिकल कॉलेज मध्ये जाऊन अनॉटॉमी च्या प्रोफेसर ना विचारायचं आहे.

डाव्या हाताने कुंभाराने चाक फिरवावं आणि उजव्या हाताने मातीच मडकं घडवावं तश्या थाटात मी एका हाताने ते पुरण यंत्र गोल गोल फिरवत आणि दुसऱ्या हाताने ते स्टेनलेस स्टील चं भांड धरत चक्का फेटत होतो. खरं तर मी पुरण यंत्रा ऐवजी हा चक्का सरळ ऑम्लेट साठी अंड्याचा एग व्हाईट आणि येलो योक फेटतात त्या बिटरवर किंवा त्यापेक्षाही साधं मिक्सर वर पाच मिनिटांत फिरवू शकलो असतो. पण मी प्रायश्चित्त करण्याचं एकदा का स्वतः शी ठरवलं की मग असले चक्के पंजे सॉरी छक्के पंजे खेळत नाही.
"बास का ?" ह्या तीन वेळेला केलेल्या प्रश्नाला बायकोने " अजून एकदा फिरव...खाताना नाहीतर खाताना मग साखर लागते " असं म्हणत पंचेचाळीस मिनिटं झाली तरी माझी त्या प्रायश्चित्तातून सुटका होऊ दिली नाही. पुरण यंत्राच्या आणि चक्क्याच्या ह्या दुष्टचक्रात अडकल्याने आणि जमिनी वर पद्मासनात बसून बसून, मला पायांना एवढ्या मुंग्या लागल्या की त्याच मुंग्या चक्क्यातली न विरघळलेली साखर खाऊ लागल्या तर बरं होईल, निदान माझी सुटका तरी होईल लवकर दुष्टचक्क्यातून आय मिन दुष्टचक्रातून असं मला वाटू लागलं.

पंचावन्न मिनिटं चक्का फेटून झाल्यावर " जाऊदे तुला नाही जमणार , दे इकडं” असं म्हणत हिनं , पातेलं ओढून ( actually हिसकावून ) घेतलं आणि पुढच्या पाच मिनिटांत साखर एकसारखी झाली. चक्का फेटून झाल्यावर मी तिला विचारायचं “विरघळली का साखर” ते?. तीनं चक्का फेटताना मात्र, साखर विरघळली का ते मला 'न' विचारता तिचं तीच ठरवणार. आमच्या ऑफिसात व्हेंडर डेव्हलपमेंटच्या भाषेत ह्या मॅनेजमेंट थेअरी ला आम्ही ‘सेल्फ सर्टिफिकेशन’ असं म्हणतो. माझी बायको हे असं बऱ्याच गोष्टीत सेल्फसर्टिफिकेशन आमचं लग्न झाल्यापासून करत आली आहे. पंचेचाळीस मिनिटं दोन्ही हात भरून येईस्तोपर्यंत चक्का फेटूनसुद्धा काहीच क्रेडिट पॉईंट्स पदरी न पडल्यामुळे मी हात धुवायला घेतला तोच सौ. नं " आर्या बाबाला आकाश कंदील लावायला सांग " असं म्हणत ‘दंड भरला नाहीतर शिक्षेत वाढ’ च्या धरती वर दुसरं फर्मान काढलं. मग मी गिर्यारोहक एव्हरेस्ट सर करताना करतात, तश्या कसरती करत एक्स्टेंशन बॉक्स मधून दोन दा शॉक खात स्टुलावर चढून आकाशकंदील लावला. बायकोला "कसा दिसतोयं?" असं विचारत स्वयंपाक घरात बोलवायला गेलो आणि तिला हाताला धरून बाल्कनी मध्ये आणेस्तोवर एक्स्टेंशन बॉक्स मधून कसली तरी ठिणगी उडाली आणि आकाशकंदील विझला. ठिणगी पडल्यानं बायकोचा भडका उडण्याची शक्यता दिसल्यामुळे, मी अग्नी शामक दलाचे जवान ज्या शिताफीनं शिडी चढतात त्या शिताफीनं स्टुलावर चढत चाळीस चा दुधी बल्ब बदलत एक शुभ्र एलईडी लावला.

पहाता क्षणी क्षणार्धात संबंध घर प्रकाशात उजळून गेलं. त्या आकाश कंदिलाचा लक्ख: प्रकाश सौ. च्या आणि लेकीच्या चेहऱ्यावर पौर्णिमेचं चांदणं पसरावं तसा पसरला. हिनं चटकन फोन आणला आणि आम्हा तिघांचा एक सेल्फी काढला. आणि व्हॉटसऍप वर आमच्या "रामतीर्थकर" ग्रुप वर टाकला. पुढच्याच क्षणात, चार जणांचे तर्जनी आणि अंगठा एकत्र जुळवून ‘सुंदर’ अशी खूण दर्शवणारे ठसे आणि स्माइलीज आल्या. कामाचा सगळा शीण नाहीसा झाल्यासारखं वाटलं. मी दमलो होतो, पण खरं तर ‘ही’ जास्त दमली होती. सकाळ पासून नुसती धावपळ सुरु होती, स्वयंपाक, रांगोळी, झेंडूच्या माळा...उटणं, निरंजन, वासाचं तेल, एक एक वस्तू शोधत शोधत तिचे दिवाळीचे हौसेनं आणलेले कपडे घालायचेच तिचे राहून गेले होते. ती अजून रोजच्या गाऊन मधेच होती. कणकेचे हात नॅपकिनला पुसत. माझं लक्षच नाही गेलं इतके वेळ तिच्याकडे. मग आम्ही तिघेही पाच मिनिटं उसंत खात डायनींग टेबलाजवळ बसलो. मी हिने केलेल्या डब्यातल्या चकल्या डब्यात तसाच हात घालून खायला सुरुवात केली. दोन दोन चकल्या बायकोला आणि चिमुरडीला ही दिल्या खायला. तिघेही चांगलेच भुकेजलो होतो. बघता बघता बारा पंधरा चकल्या फस्त झाल्या. सुंदरच झाल्या होत्या ह्यावेळी हिच्या चकल्या. भाजणी तर अगदी खमंग झाली होती. हीनं मग "हं बास करा आता दोघेही...अजून नैवेद्य दाखवायचा आहे मला... आणि आता खात बसलात दोघं की जेवणार नाहीत" असं म्हणत डब्याला झाकण घट्ट लावलं, आणि परत स्वयंपाकाच्या ओट्या कडे गेली धावत धावत काही तरी कारपल्याचा वास आला म्हंणून. ही असंच भान हरपल्यासारखं सगळं करते दिवाळीत. आज नाही गेले दहा अकरा वर्ष. कारण तिला भराभर सगळं करून सगळ्यांना गरम गरम वाढायचं असतं…! तिच्याकडे मात्र लक्ष द्यायला कुणाला वेळ मिळेल न मिळेल, अगदी तिला स्वतःला सुद्धा. पण त्याची तिला ना फिकीर ना खंत. तिची दिवाळी म्हणजे मी, आर्या ,आणि आर्याचे आजी आजोबा. बास!

बायको तिकडे पुऱ्या लाटत होती आणि आई त्या भराभर तळत होती. मी आणि माझी लेक दोघेही मग आमच्या दिवाळीच्या नवीन कपड्यांवर सांडलेल्या चकल्यांचे बारीक बारीक अणुकुचीदार कण वेचून वेचून ते खात बसलो होतो बराच वेळ, दोघींचं लक्ष चुकवून...! असेच वेचून वेचून तोंडात चवीने टाकलेले असंख्य कण अन कण आमची दिवाळी दर वर्षी समृद्ध करून जातात.

चारुदत्त रामतीर्थकर
११ नोव्हेंबर १८, पुणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजकाल बरेच लोक 'नरक चतुर्थी' का लिहितात देव जाणे! चार आणि चौदा या संख्यांमध्ये काही फरक आहे की नाही?
वद्य वा शुक्ल पक्षातला चौथा दिवस = चतुर्थी
वद्य वा शुक्ल पक्षातला चौदावा दिवस = चतुर्दशी

अगदी भरून आले. मनाची कथा अन व्यथा दोन्ही छान मांडले आहेत.
तुमच्या जागी स्वतःला बघत होतो.
पुलेशु

खूप सुंदर ...
फक्त महाराजांचा जावळीचा एकेरी उल्लेख आदरार्थी व्हावा.

दत्तात्रय साळुंके जी : तुम्ही सुचवल्याप्रमाणे दुरुस्ती केलीय. पण देवाला आपण एकेरीने बोलावतो, त्या अर्थे मी लिहिलेलं होतं. पण आता तेही दुरुस्त केलंय.

श्रद्दा जी : 'चतुर्दशी'च लिहायचं होतं, चतुर्थी नव्हे. पण ती शुद्धलेखनातील चूक आता दुरुस्त केलेली आहे.

दोघांचेही ह्या सुचने बद्दल धन्यवाद.

छान लिहिलंय... विशेष म्हणजे बायको करत असलेल्या कष्टांची तुम्हाला जाणीव आहे.. हे वाचून छान वाटले..

छोटंसं पण खुसखुशीत लिखाण. आवडलं. मजा आली.

ती घरातल्या बायकांची युनिटी आणि त्या त्रिकुटाबद्दल वाचून ( सेक्युरिटी चौरासियाच्या केबिनमध्ये रात्र घालवणाऱ्या) मंदार जोगच्या छोटी पिस्तुल (मुलगी), उखळी तोफ(आई) आणि ए के 57 (बायको) ची आठवण आली Lol Lol

छान लिहिलंय... विशेष म्हणजे बायको करत असलेल्या कष्टांची तुम्हाला जाणीव आहे.. हे वाचून छान वाटले..+१११

छान लिहिलंय... विशेष म्हणजे बायको करत असलेल्या कष्टांची तुम्हाला जाणीव आहे.. हे वाचून छान वाटले..
>>>
+१११

छान लिहिलंय... विशेष म्हणजे बायको करत असलेल्या कष्टांची तुम्हाला जाणीव आहे.. हे वाचून छान वाटले.. <<< +१११

एक आनंदी कुडुंब म्हणून तुमचे उदाहरण द्यायला हरकत नाही.
जीवनातला आनंद अशा छोट्या गोष्टींमधे आणि स्निग्ध वातावरणात असतो हे सोपे रहस्य तुम्हाला उमगले आहे .....

छान खुसखुशीत लेखन वाचताना मजा येत होती पण

>"रस्त्यावर गमबूट घालून शिक्षा म्हणून ‘उकळलेला डांबर झारीतून ओतत अलका टॉकीज ते दांडेकर पूल हा संबंध रस्ता खड्डे बुजवून परत बनव” म्हणून सांगितलं तर मला एकवेळ चालेल पण हे चक्का आणि श्रीखंड प्रकरण नको, इतका ह्या चक्का प्रकरणाचा मला तिरस्कार आहे. > इथे ठेचकाळले..

आणि तो शेवटचा सेंटीमेंटी भाग वाचून इंग्लिश विंग्लिशच आठवला. अक्खे दोन-सव्वादोन तास काहीतरी वेगळंच दाखवायचं आणि शेवटची पंधरा मिंट आमची थोर्थोर कुटुंबसंस्था आणि त्यातले बायकांचे अतीमहत्वाचे काँट्रीब्युशन (म्हणजे पुर्या लाटणे आणि साफसफाई करणे) आणि त्याग याचा उदोउदो करून सॅल्यूट करायचा.

एकदम खुसखुशीत लिखाण. Proud Proud Proud

फक्त >> पण खालून आदिलशहा आणि वरून दिलेरखान एकत्र चाल करून आले की राजे कसे जावळी च्या खोऱ्यात दडून बसायचा तसा मी दडून बसतो शत्रू ला सामोरा न जाता, मावळ्याची बांधाबांध करत<< या वाक्यात नक्की कुणाचा अपमान/उपमर्द करायचा होता ते स्पष्ट केलेत तर बरे होइल..!

DJ जी , मी सदर परिच्छेद आता संपादन करून वगळला आहे ! तसा कुठलाच हेतू नव्हता. दुखावलेल्या भावनांबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत आहे.