पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २४. महबूबा (१९७६)

Submitted by स्वप्ना_राज on 9 November, 2018 - 11:07

वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरोsपराणि
तथा शरीराणि विहाय जीर्णा
न्यन्यानि संयाति नवानि देही

गीतेच्या दुसर्‍या अध्यायातला बाविसावा श्लोक. अर्थ आपल्या सगळ्यांना माहित असलेला. जसा माणूस जुने कपडे टाकून देऊन नवे परिधान करतो तसाच आत्मा जुनं शरीर टाकून देऊन नवं धारण करतो.

माणसाला पुनर्जन्माच्या संकल्पनेचं एव्हढं आकर्षण का? मृत्यूनंतर आपलं काय होतं हे कोणालाच माहित नाही. आपलं अस्तित्व एक दिवस - कदाचित आपल्या ध्यानीमनी नसताना - कायमचं संपून जाणार ही कल्पनाच भल्याभल्यांना घाबरवून सोडते. उलट मृत्यूनंतरही नव्या रुपात, नव्या शरीरात का होईना पण आपण ह्या जगात परत येणार हा केव्हढा दिलासा वाटतो. शिकल्या-सवरलेल्या मनाला ह्यावर विश्वास तर ठेवावासा वाटतो पण तो अंधविश्वास आहे की काय ही शंकाही पाठ सोडत नाही. मग शाळेत शिकलेला एक शास्त्रीय नियम आठवतो - उर्जा निर्माण करता येत नाही किंवा तिचा नाश करता येत नाही. फक्त ती एका रूपातून दुसर्यात रूपांतरित करता येऊ शकते. अत्यंत गुंतागुंतीची रचना असलेलं मानवी शरीर एक यंत्र मानलं तर आत्मा म्हणा किंवा प्राण म्हणा ते यंत्र चालू ठेवणारी उर्जाच. मग ती माणसाच्या मृत्यूनंतर दुसर्‍या रुपात जाऊ शकते का? प्रश्नाचं होय किंवा नाही असं ठाम उत्तर देता येणं कठिण. देव किंवा भूत मानणारे आणि न मानणारे ह्या तटांसारखेच पुनर्जन्मावर विश्वास असणारे आणि नसणारे असे दोन तट जे एकमेकांना कधीच भेटू शकत नाहीत.

पैकी अस्मादिक पुनर्जन्मावर विश्वास असणारया अलिकडल्या तटावर. त्यामुळे ही संकल्पना मध्यवर्ती असलेले हिंदी चित्रपट मला भारी आवडतात. मग तो मधुमती असो, कुदरत असो, ऋषी कपूरचा कर्ज असो किंवा एरव्ही ज्या शाहरुखचं तोंडही पाहायला मला आवडत नाही (त्याच्या पंख्यांनी माफ करावं!) त्याचा ओम शांती ओम असो. ह्या सगळ्या चित्रपटांमध्ये कथा इथून तिथून सारखीच. एक प्रेमी युगुल. आधीच्या जन्मात जन्मजन्मांतरी सोबत राहायच्या आणाभाका घेऊन झाल्यावर कोणीतरी काडी घातल्याने किंवा नियतीच्या दशावताराच्या खेळामुळे त्यांची ताटातूट होते. काही वर्षांनी दोघे पुन्हा जन्म घेतात, पुन्हा भेटतात, पुन्हा प्रेमात पडतात. आता त्यांच्या प्रेमात बिब्बा घालायला कोणीतरी परत सज्ज असतंच. पण हे नाटक सहसा दोन अंकी असल्याने दोन जन्मांत आटपतं. मग सुखांत. And they lived happily thereafter. क्कचित एखादा 'करन-अर्जुन' किंवा 'कर्ज' अपुरा राहिलेला सूड पुरा करण्यासाठी घेतलेल्या जन्माची कहाणी सांगतो. त्यात प्रेम हा कळीचा मुद्दा नसतो. बाकी सगळ्या चित्रपटांत मात्र पुनर्जन्माचा हा सारा खेळ असतो तो हरवलेलं प्रेम परत मिळवण्यासाठी, अर्धवट राहिलेला डाव पुन्हा मांडण्यासाठी. १९७६ साली आलेला शक्ती सामंतचा 'महबूबा' सुद्धा ह्या नियमाला अपवाद नाही.

इथे कहाणी सुरु होते ती दुसर्‍या जन्मात. सूरज हा नावाजलेला गायक आणि संगीतकार. त्याचे सगळे शोज अगदी हाऊसफुल होणारे. त्याचा पुढला कन्सर्ट जयपूरला होणार असतो. अगदी फ्लाईटची तिकिटं, हॉटेल सगळं बुकिंग झालेलं असतं. अचानक त्याला भेटायला त्याचा डॉक्टर मेहुणा विनोद येतो. तो शहरात काही औषधं घ्यायला आलेला असतो. बहिणीच्या मृत्यूनंतर सूरजला आपल्या व्यस्त दिनक्रमामुळे विनोद आणि आपला भाचा बंटू दोघांना भेटायला जायला फारसा वेळ मिळालेला नसतो. सूरज विनोदला एक रात्र राहायचा खूप आग्रह करतो पण विनोदच्या पेशंटला औषधाची गरज असल्याने त्याचं जाणं आवश्यक असतं. तो सूरजला आपल्याकडे यायचं निमंत्रण देऊन निघून जातो आणि सूरज आपल्या सेक्रेटरी सिन्हासोबत रीटाच्या घरी पार्टीसाठी रवाना होतो. ही रीटा त्याची चाहती असते आणि आता प्रेयसी. सूरजला मागच्या आठवड्यात मिळालेल्या अ‍ॅवॉर्डच्या आनंदाप्रीत्यर्थ तिने ही पार्टी आयोजित केलेली असते. तिचे वडील सूरजला बक्षीस म्हणून एक तानपुरा भेट देतात. हा तानपुरा चंदनगढच्या राजनर्तकीचा, रत्नाचा, असतो. त्यावर तिचं नावही कोरलेलं असतं. सूरज तो तानपुरा घेऊन घरी येतो.

त्या रात्री सूरज संगीताच्या, गाण्याच्या सुरांनी जागा होतो खरा . पण तो आवाज कुठून येतोय हे मात्र त्याला कळत नाही. भरीत भर म्हणून त्याचा सेक्रेटरी जेव्हा वाईट हवामानामुळे फ्लाईट रद्द झाल्याचं सांगत येतो तेव्हा त्याला काहीच ऐकू येत नाही. कन्सर्ट रद्द करता येणं शक्य नसल्याने दोघे कारने जयपूरला जायला निघतात. धुंवाधार पाऊस कोसळत असतो. वाटेत एके ठिकाणी एक माणूस त्यांची कार अडवतो आणि नदीला पूर आल्यामुळे पुढचा रस्ता बंद झालाय असं सांगतो. आता अश्या अनोळखी जागी रात्र कुठे काढणार असं सिन्हा त्याला विचारतो तेव्हा तो चंदनगढचा डाकबंगला जवळच आहे म्हणतो. तू पुढे जा, मी मागून सामान घेऊन येतो असं सिन्हाने सांगितल्याने सूरज एकटाच पुढे जाऊन डाकबंगल्याचा दरवाजा ठोठावतो. एका सुंदर तरुणीने दार उघडलेलं पाहून तो चौकीदार आहे का असं विचारतो. ती सांगते की आहे पण ह्या वेळी इथे नाहीये. ती चौकीदाराची मुलगी रत्ना असते. तिने दाखवलेल्या खोलीत विश्रांती घेत असताना सूरजला पुन्हा तेच गाण्याचे सूर ऐकू येतात. ते गाणं, रत्नाचं रहस्यमय अस्तित्त्व, तिचं त्याच्याकडे गूढ रीतीने पाहणं सगळं त्याला अतिशय अस्वस्थ करतं पण कश्याचाच अर्थ लागत नाही.

सकाळी तिचा, त्या गूढ गाण्याचा पाठलाग करत करत तो चंदनगढच्या राजमहालात पोचतो. पण तिथे पोचल्यावर अचानक गाणंही बंद होतं आणि रत्नाही कुठेतरी गायब होते. तिला शोधत फिरणाऱ्या सूरजला एक वृद्ध माणूस दिसतो. तो जेव्हा त्याला 'मला रत्नाने इथे आणलंय' असं सांगतो तेव्हा त्या वृद्धाचा विश्वास बसत नाही. तो म्हणतो की रत्नाचा मृत्यू होऊन अनेक वर्ष उलटली आहेत आणि तिचा आत्मा इथे राजवाड्यात भटकतोय. अर्थात ह्यावर सूरजचा विश्वास बसत नाही तेव्हा तो माणूस त्याला एका खोलीत नेऊन तिथे भिंतीवर टांगलेली रत्नाची तसबीर दाखवतो. ती बघून सूरजच्या पायांखालची जमीन सरकते कारण तसबिरीतली तरुणी थेट त्या चौकीदाराच्या मुलीसारखी दिसत असते. आणि मग त्या तसबिरीतली रत्ना जणू त्याच्याशी बोलू लागते. त्यांच्या आधीच्या जन्माची कथा त्याला उलगडून सांगते.

आधीच्या जन्मातलं त्याचं नाव असतं प्रकाश. त्याची आणि रत्नाची भेट त्याच महालात झालेली असते. ती राजनर्तकी असते. आणि तो असतो एक गायक. दोघांची जुगलबंदी होते. ती पाहून राजासकट राजसभेतले सर्व लोक खुश होतात आणि राजा त्याला राजगायक म्हणून नेमतो. त्याच्यावर मोहित झालेली रत्ना तानपुरा वाजवताना त्याची बोटं जखमी झाल्याचं गौरीकडून कळताच त्याला मलम पाठवते.

तर इथे प्रकाशच्या गुरूकडे ठाकूर हिम्मतसिंग येतात. त्यांनीच प्रकाशला १५ वर्षांपूर्वी गाणं शिकायला त्यांच्या आश्रमात आणून ठेवलेलं असतं. त्यांच्या मुलीशी, जमुनाशी, प्रकाशचं लहानपणी लग्न झालेलं असतं. हे लग्न व्हावं अशी त्याच्या वडिलांचीच इच्छा असते. अर्थात प्रकाश आश्रमात येतो तेव्हा तो लहान असल्याने गुरुजींनी अजूनपर्यंत त्याला ह्याबद्दल काहीच सांगितलेलं नसतं. महाशिवरात्रीच्या रात्री ते जमुनाला शिवमंदिरात घेऊन येतात जेणेकरून तिची आणि प्रकाशची भेट होईल. रत्ना प्रकाशसोबत फिरायला गेलेली असताना तिच्या बोलण्यातून त्याला कळतं की तिला फक्त आईच होती जी लखनौमध्ये एक तवायफ होती. रत्नाला रुढार्थाने कोणी पिता नाही हे कळूनही तो आपलं तिच्यावर प्रेम असल्याचं तिला सांगतो. दोघं जन्मजन्मांतरी एकत्र रहायची शपथ घेतात. पण तिचे उस्ताद बंदे अली खान ह्यांना तिची प्रकाशशी वाढती घसट अजिबात पसंत नसते. ते तिला त्याचं लग्न आधीच झालंय हे सांगतात. दरम्यान प्रकाशलाही आपल्या गुरुकडून आपलं लग्न लहानपणीच झाल्याचं कळतं. पण वडिलांच्या मृत्यूनंतर ठाकूर हिम्मतसिंगचे आपल्यावर अनंत उपकार आहेत ह्याची जाणीव ठेवूनही तो त्यासाठी आपल्या प्रेमाची कुर्बानी द्यायला तयार नसतो. तर एकुलत्या एका लेकीच्या भविष्याच्या काळजीने हैराण झालेला ठाकूर त्यांचं लग्न लावून द्यायचंच ह्या इरेला पेटतो.

प्रकाश रत्नाला भेटून आपण ५ वर्षांचे असताना आपलं लग्न झालं होतं आणि अश्या लग्नाला आपण मानत नाही हे सांगतो. पण आपल्यामुळे प्रकाशची समाजात छी-थू होईल ही भीती रत्नाला असते. तेव्हा प्रकाश सगळं सोडून दूर निघून जायचा प्रस्ताव मांडतो. त्या संध्याकाळी शिवमंदिरात येऊन तो तिची वाट पाहणार असतो. आता फैसला रत्नाने करायचा असतो. ती संध्याकाळी मंदिरात येते पण पेश्याने नाचणारी असल्याने पुजारी तिला गाभाऱ्यात प्रवेश नाकारतो. त्याच वेळेस तिथे आलेली जमुना तिला ओळखते आणि मध्यस्थी करून गाभाऱ्यात घेऊन जाते. ती जेव्हा आपली ओळख 'प्रकाशची पत्नी' अशी करून देते तेव्हा मात्र व्यथित झालेली रत्ना प्रकाशला न भेटताच तिथून निघून जाते. इतकंच काय तर प्रकाश तिला न्यायला तिच्याकडे येतो तेव्हा ऐषोआराम, संपत्ती, कीर्ती, वैभव सोडून मी तुझ्याबरोबर येणार नाही असं त्याला सांगते. दुखावलेला प्रकाश तिला टाकून बोलतो. आणि घरी जाऊन आपण जमुनाशी लग्न करायला तयार आहोत असं गुरुजींना सांगतो.

प्रकाशच्या लग्नात मुजरा सादर करायचं आलेलं आमंत्रण रत्ना स्वीकारते. लग्नाच्या रात्री 'पूरणमाशी'च्या रात्री रत्ना शिवमंदिरात आली होती हे सत्य जमुनाच्या तोंडून निघून जातं. प्रकाश तिला सांगतो की ती मला भेटायला आली होती, आम्ही पळून जाणार होतो पण तुझ्यासाठी तिने आमच्या प्रेमाचं बलिदान दिलं. प्रकाश रत्नाकडे जातो तेव्हा ती आणि तिचे उस्ताद शहर सोडून गेल्याचं गौरी सांगते. रत्नाने जाताना आपला तानपुरा प्रकाशसाठी भेट म्हणून ठेवलेला असतो. प्रकाश तिच्या शोधार्थ जातो तर ठाकूर आणि त्याचे लोक त्याला अडवायला त्याच्यामागे जातात. प्रकाश रत्नाला गाठून तिला आपल्याबरोबर येण्यास राजी करतो पण ठाकूरने त्याला अडवायला मारलेली गोळी लागून त्याचा बग्गीवरचा ताबा सुटतो. बग्गी दरीत पडते आणि रत्ना-प्रकाश दोघांचा मृत्यू होतो.

चंदनगढच्या महालातल्या रत्नाच्या तसबिरीसमोर उभा असलेल्या सूरजला हा सगळा पूर्वजन्म आठवतो. रत्ना अजून आपली वाट बघतेय हेही जाणवतं. पण हा सगळा धक्का त्याच्या सहनशक्तीपलिकडचा असतो. तेव्हढ्यात तिथे त्याला शोधत आलेला त्याचा सेक्रेटरी त्याला सावरून तिथून घेऊन जातो. पण आता रोजच्या दिनक्रमात सूरजचं लक्ष लागत नाही. रत्नाचा आवाज सतत त्याचा पाठलाग करत असतो. तो रत्नाचा तानपुरा जवळ घेऊन बसू लागतो. हवालदिल झालेला सिन्हा रीटाला आता लग्न करून टाका असं सुचवतो. पण त्याच्या आतच सूरज आपल्या मेहुण्याकडे निघून जातो. तिथे नियतीने त्याच्यासाठी एक वेगळंच कोडं घालून ठेवलेलं असतं. त्या गावातल्या पाणवठ्यावर त्याला हुबेहूब रत्नासारखीच दिसणारी एक तरुणी दिसते. ही खरं तर असते झुमरी. पण सूरजला ती आपली रत्नाच वाटते. सूरजच्या सुरांनी झुमरी त्याच्याकडे खेचली जाते. तिला काहीच आठवत नसतं तरी तो तिला परोपरीने तिचा आधीचा जन्म आठवून द्यायचा प्रयत्न करतो. अर्थात ह्या प्रयत्नात तो तिथल्या सरदाराच्या मुलाचा, अप्पाचा, रोष ओढवून घेतो कारण झुमरीच्या वडिलांनी मरताना सरदाराला तिचं लग्न अप्पाशी करायचं वचन दिलेलं असतं. शेवटी तो तिला चंदनगढच्या महालात नेऊन रत्नाची तसबीर दाखवतो. तो महाल, ती तसबीर पाहिल्यावर मात्र झुमरीच्या गतजन्मीच्या स्मृती जाग्या होतात. सूरज हाच प्रकाश आहे आणि आपण रत्ना आहोत हे तिच्या लक्षात येतं. पण तोवर सूरजच्या शोधात सिन्हा आणि रीटा गावात येऊन पोचलेले असतात. आणि सूरज-झुमरीच्या जवळीकीने सरदार आणि इतर गावकरी संतप्त झालेले असतात. नियतीने सूरज-झुमरीला पुन्हा एकदा त्याच वळणावर आणून उभं केलेलं असतं.

सूरज-झुमरीच्या प्रेमाची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होते का नाही ह्याचं उत्तर तुम्हाला माहित आहे. त्यामुळे पुनर्जन्माच्या संकल्पनेचं खास आकर्षण नसलेल्यांना हा चित्रपट 'शिळ्या कढीला उत' आणण्याचा प्रकार वाटू शकतो. पण 'जनम जनम का बंधन' आणि राजेश खन्ना ह्यापैकी एक किंवा दोन्हीचे चाहते असाल तर गुलशन नंदाच्या 'सिसकते साझ' ह्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट चुकवू नका. Happy

आता एव्हढं सांगितल्यावर सूरज आणि प्रकाश ह्या दोन्ही भूमिका राजेश खन्नाने केल्या आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. प्रकाशच्या भूमिकेत त्या उपरया मिशीसोबत तो थोडा अवघडलेला वाटत असला तरी सूरज म्हणून बेसनाच्या लाडवातल्या बेदाण्याइतका फिट्ट बसला आहे. पावसाळी रात्री धुवांधार पाऊस कोसळत असताना एकाकी रानात बसून वारयावर भुरूभुरू केस उडवत गिटारचे सूर छेडत तो बोलावणार असेल तर मी कितीही जन्म घ्यायला एका पायावर तयार आहे. Wink हेमामालिनीने राजनर्तकी रत्ना आणि गावातली तरुणी झुमरी दोन्ही भूमिका व्यवस्थित रंगवल्या आहेत. फक्त दोघींच्या संवादफेकीत थोडा फरक आणला असता तर बरं झालं असतं. मला नृत्याची काही जाण नाही. पण 'गोरी तोरी पैंजनिया' आणि 'आपके शहरमे' ह्या दोन्ही गाण्यात तिने सुरेख नृत्य केलं आहे. अप्पाच्या भूमिकेत प्रेम चोप्रा आणि डॉक्टर विनोद म्हणून सुजितकुमार आपापली कामं चोख करतात. बाकी भूमिकांत योगिता बाली (जमुना), असरानी (सेक्रेटरी सिन्हा), आशा सचदेव (रीटा), हरीन्द्रनाथ चट्टोपाध्याय (रीटाचे वडील), चंद्रशेखर (ठाकूर हिम्मतसिंग), नझीर हुसेन (प्रकाशचे गुरु), मदन पुरी (सरदार), मनमोहन कृष्ण (रत्नाचे उस्ताद), लीला मिश्रा (झुमरीची आई), मीना टी (गौरी) आणि मास्टर अलंकार (बंटू) दिसतात.

ह्या चित्रपटातलं 'मेरे नैना सावन भादो' हे गाणं - लताच्या आणि किशोरच्या आवाजातलंसुध्दा - माझं एव्हढं लाडकं आहे की अनेक दिवस चित्रपटाचं नाव 'सावन भादो' आहे असंच मला वाटत होतं. पुढे त्या नावाच्या चित्रपटात रेखा आहे हे कळलं. Happy आर. डी. सिंपली रॉक्स! 'बात पुरानी है, एक कहानी है, अब सोचू तुम्हे याद नही है, अब सोचू नही भूले, वो सावनके झुले' ह्या ओळींत आनंद बक्षीने पुनर्जन्मावरच्या सगळ्या चित्रपटांचं सार सांगून टाकलं आहे. Happy ह्या गाण्याबद्दलचा किस्सा विकिपीडियावर नक्की वाचा. ‘पर्बतके पीछे चंबेदा गाव' आणि 'चलो री' हीसुद्धा माझ्या लाडक्या गाण्यांच्या लिस्टमध्ये आहेत. ‘पर्बतके पीछे चंबेदा गाव' ह्या गाण्यात एका शॉटमध्ये मागच्या बर्फाच्छादित पर्वतात एक गोठलेला पाण्याचा प्रवाह (ह्याला हिमनदी म्हणतात का?) अक्षरश: कुंचल्याने रंगवल्यासारखा दिसतो हे आवर्जून सांगावंसं वाटलं. 'आपके शहरमे', 'जमुना किनारे आजा' आणि 'गोरी तेरी पैंजनिया' ऐकण्यासारखीच. राजेश खन्ना म्हणजे किशोरचा आवाज हे समीकरण असतानाही 'गोरी तेरी पैंजनिया' हे सूरजच्या आधीच्या जन्मातलं गाणं असल्याने राजेशने त्यासाठी मन्नाडेंचा आवाज सुचवला अशी माहिती विकिपीडियावर मिळते. त्यामानाने टायटल सॉंग 'महबूबा' मला तरी फारसं आवडलं नाही.

चित्रपटात मला जाणवलेली सर्वात मोठी त्रुटी म्हणजे जर झुमरी हा रत्नाचा दुसरा जन्म असतो तर सूरजला चंदनगढच्या डाकबंगल्यात भेटलेली तरुणी कोण असते आणि चंदनगढच्या राजमहालात त्याला रत्नाच्या तसबिरीजवळ कोणाचा आवाज त्याच्या पूर्वजन्मीची कथा सांगतो ह्याचं काहीही स्पष्टीकरण मिळत नाही. त्या राजमहालात सर्रास कोणालाही जाऊ-येऊ देतात, तिथली तसबीर घेऊन जाऊ देतात हे पटत नाही. ठाकूर हिम्मतसिंगने १५ वर्षांपूर्वी प्रकाशला आश्रमात सोडलेलं असतं. मग जमुना आपल्या १० वर्षांच्या तपस्येचा उल्लेख रत्नाजवळ का करते? उरलेली ५ वर्षं ती काय करत असते? मरायच्या आधी सगळ्यांचे आई किंवा वडील आपल्या मुलांच्या लग्नाबद्दलचं वचन देऊन त्यांची मान का अडकवून ठेवतात हे हिंदी चित्रपटातलं प्राचीन अगम्य कोडं कल्पांतापर्यंत सुटेल असं काही वाटत नाही. शेवटला घोड्यांवरचा पाठलाग मात्र मस्त वाटला.

चित्रपटातल्या नायिकांनी केलेल्या देहप्रदर्शनाबद्दल मागच्या काही लेखांवरच्या प्रतिक्रियांत बराच उहापोह झाला होता. ह्या चित्रपटात राजेश खन्ना आणि प्रेम चोप्रा दोघांनीही अहमहमिकेने दाखवलेली chest hair पाहून नायकांनासुध्दा तसं करायला सांगावं लागतं का ते स्वत:हून करतात असा एक मजेशीर प्रश्न मात्र पडला. है कोई जवाब? Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते एक फेमस गाणं आणि पुनर्जन्मावर आहे ही माहिती, इतकेच माहीत होते या चित्रपटाबद्दल.

काकाच्य कानावरचे केस लाब होत गेले तसे त्याचे पिक्चर वाईट होत गेले ही माझी फार जुनी थिअरी आहे Happy मात्र ७० च्या दशकात फायटिंग लोकप्रिय झाल्यावर तोपर्यंत बर्‍यापैकी डिग्निफाइड दिसणारे सुनील दत्तसारखे लोकही नंतर कानावर केस वाढवून डॅशिंग रोल्स करू लागले. आणि अनेकांच्या बाबतीत ना डिग्निफाइड ना डॅशिंग असे काहीतरी विचित्र ते दिसू लागले.

सिने क्षेत्रात जिथे केतकी माटेगावकर सगळीकडे मोठी झाल्यावर स्पृहा जोशी न बनता प्रिया बापट बनते त्या सृष्टीत असे नगण्य नियम पाळायचेच नसतात >>> लोल किंवा सारिका मोठी झाल्यावर विनोद मेहरा बनतो.

हो हे बरोबर दिसते. मी कधीतरी सारिकाचे नाव वाचले होते त्या बालकलाकाराच्या रोल बद्दल. आत्ता चेक केले तर 'बॉबी' बरोबर आहे. मुलगा का मुलगी ते क्लिअर नाही.

पाहिलाय महबूबा.
आवडलेला तेव्हा. आता पाहिला तरी आवडेल.
कारण गाणी आणी राजेश खन्ना. Happy
मेरे नैना अत्यंत फेव्हरेट. मला लता पेक्षा किशोर चं खुपच जास्त आवडतं.

साधना +१ हेमा माझीही प्रचंड आवडती नटी असल्याने तिचे नृत्य, अभिनय यात कधी अपेक्षा ठेवलीच नाही.

अमिताभ फॅन असल्याने काका कधी आवडला नाही, फक्त अवतार मध्ये आवडला होता, ते पण अभिनयाकरता, रोमान्स करता नाही.

किशोर ने पण बरचसं तारलयं राजेश खन्नाला.

काका कधी आवडला नाही, फक्त अवतार मध्ये आवडला होता, ते पण अभिनयाकरता, रोमान्स करता नाही.>> आनंद आराधना, अमर प्रेम, दाग, कोरा कागज था ये मन मेरा?!

आनंद आणी नमकहराम मध्ये आवडला. खरे सांगायचे तर मला रोमँटीक हिरो कधीच नाही आवडले, उगाच शामळु वाटायचे ते. राजेश खन्ना अभिनयात उच्चच होता. पण मला रोमँटीक पिक्चर आवडत नसल्याने तो बाद झाला. आराधनापेक्षा कटी पतंग मध्ये फार देखणा दिसला होता.

राजेश खन्ना त्याच्या मॅनरिझम्स मुळे प्रचंड लोकप्रिय होता. पण नंतर बॉबकट केलेले केस घेऊन वावरला आणि त्याचे मॅनरिझम्स आणि हा अवतार हे सगळेच विनोदी झाले प्रकरण..

Pages