सहज तुला गुपित एक सांगते दुपारी...!

Submitted by अतुल ठाकुर on 8 November, 2018 - 19:52

download_0.jpg

सुमन कल्याणपूर यांच्या आवाजाचे लताच्या आवाजाशी असलेले साम्य या विषयावर बरंच लिहिलं बोललं गेलंय. पण काही गाणी ऐकली की असं वाटतं एखादं नवथर कोवळ्या तरुणीचं गाणं जर दोघींनी म्हटलं तर लताचा आवाज अठरा वर्षाच्या तरुणीचा वाटेल आणि सुमनताईंचा आवाज सोळा वर्षाच्या तरुणीचा वाटेल. "ममता" या चित्रपटात डबलरोल असलेल्या सुचित्रासेनच्या तोंडी "रहे न रहे हम" हे अविस्मरणीय गाणे आहे. त्यात तृप्त अशा प्रेयसीचा आवाज लताचा आहे आणि आधुनिक परंतु अल्लड अशा तिच्या मुलीसाठी सुमनताईंचा आवाज वापरला आहे. यामागचं कारणही हेच असावं. आणि हीच कोवळीक अगदी प्रकर्षाने "सहज तुला" मध्ये जाणवते.

अशोकजी परांजपे यांचे हे गीत म्हणजे म्हणजे ज्याला आपण सिनेमॅटीक म्हणतो तसे आहे. कदाचित मी गावी अनेक वर्षे राहिल्यामुळे असेल पण काही गाणी त्या वातावरणात घेऊन जातात. आजुबाजुला भरपूर गर्द हिरवाई आणि त्यात लपलेली अंतरा अंतरावर असलेली घरं. त्यातच नुकतंच लग्न झालेली आणि माहेरी आलेली एक तरुणी आपल्या लाडक्या सखिला एक गुपित सांगते आहे.

सहज तुला गुपित एक सांगते दुपारी
डोळियांत आली गडे प्रीत माझी लाजरी

बैसते ओटीवरी, नजर वळे अंगणी
अंगणांत बहरते रानजाई देखणी
जाई खाली उभा असे हासरा शिकारी

सांजवेळी गोठ्यांतली गाय लागे हंबरू
सोडते ग धारेसाठी, ओढ घेई वासरू
गोठ्यामध्ये दिसे सखे, सावळा मुरारी

पहाटेला ओठावरी गीत एक जागले
अंतरात कोणसे, हळुच बाई बोलले
ओढळले मन नेई माझिया सासरी

...आणि ते सांगताना तिच्या नजरेत लज्जा दाटून आली आहे. कारण तिचा पती तिला सगळीकडे दिसतो आहे. दुसर्‍या कडव्यातील ओटा, अंगण हे सारं आता गावातही दुर्मिळ होऊ लागलं आहे. पण अंगणातल्या जाईखाली तिला तो दिसतो. आणि तोही कसा? तर हासरा आणि हृदय विद्ध करणारा शिकारी म्हणून. "हासरा शिकारी" म्हणून कवीने परस्परविरोधी गोष्टी एकत्र आणूनही विलक्षण परिणाम साधला आहे. तिची शिकार आधीच झालेली आहे. आता माहेरी आल्याने प्रितीत घायाळ असलेल्या तिला तो सगळीकडे दिसणारच. आमच्या काव्यशास्त्रात नावाजल्या गेलेल्या विप्रलम्भ शृंगाराचे हे एक सुरेख उदाहरण. विरह तर आहे पण कायमचा नाही. पुन्हा भेट होणार आहे. आणि त्या दरम्यानची गोड हुरहुर येथे रंगवली आहे. पुढे सांजवेळचा उल्लेख आहे.

ही वेळ आधीच कातर. अनेक भावना मनात दाटून आणणारी. त्यात वासराची ओढ असलेली पान्हा फुटलेली हंबरणारी गाय. अशा वेळी तिला दिसतो सावळा मुरारी. येथे राधेचा उल्लेख नाही पण आम्ही काव्यशास्त्रवाली माणसं व्यञ्जनेने सुतावरून स्वर्ग गाठण्यात तरबेज असतो. त्यामुळे येथे सावळ्या मुरारीला पाहणारी ही तरुणीच राधेच्या रुपात आहे यात शंका नाही. पुन्हा एक वेगळा प्रणय येथे रंगला आहे. दुपारी हे गुपित सखिला सांगताना सांजेनंतर पहाटेचा उल्लेख आहे. त्यात तर आमच्या नायिकेले स्पष्ट कबुलीच दिली आहे.

आपल्या सजणाच्या आठवणीत रमलेल्या तिला पहाटे ओठावर फुललेल्या गीतात ओळखिच्या खुणा दिसतात आणि तिचे मन सासरी ओढ घेते. अतिशय तरल असे हे गीत तितक्यात तरल चालीत बांधले आहे अशोक पत्की यांनी. गाण्याची चाल गाण्याच्या प्रकृतीला आणि सुमनताईंच्या आवाजाला अगदी चपखल बसली आहे. सुमनताईंच्या आवाजाबद्दल काय बोलणार? गाणे ऐकताना असं वाटतं या आवाजात काय नाही? नुकत्याच लग्न झालेल्या तरुणीची हुरहुर आहे, कोवळीक आहे, सखिला सांगण्याची ओढ आहे, ते सांगतानाची दाटून आलेली लज्जा आहे. हे गाणं ऐकणं म्हणजे खरंच एक सुरेख अनुभव आहे.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलय. कुठे ऐकता येईल हे गाणे?
तो हा अन्य कुणी असण्याची मुभा कवी व वाचक दोघांनाही आहे हे देखील कवितेतील सौंदर्य आहे > Proud