त्या रात्री

Submitted by Rajashree Barve on 5 November, 2018 - 05:08

राजश्री नितीन बर्वे
फोन नं ९८२०३९६६६५
e-mail id - rnbarve28gmail.com

त्या रात्री

घरी पोहोचले तोपर्यंत मी नखशिखांत भिजले होते. आज पावसाने चांगलाच जोर धरला आहे. नशीब बस वेळेवर आली. काळोख होण्यापूर्वी. जास्त रात्र झाली की मला भीती वाटते एकटीला. मी पहिला फोन ह्यांना लावला.
“ मी पोहोचले बरं का घरी.”
“ओके. शीतल आली असेल ना घरी?”
“नाही हो. अजून तरी नाही आली. मी नुकतीच कुलुप उघडून आले आहे. आता लावते तिला फोन.”
“ती आली की कळव मला. एक एसएमएस तरी टाक.”
“ओ यस. चला बाय.”
ह्यांचा फोन ठेवला आणि मी शीतलला फोन लावला. तिचा फोन संपर्कक्षेत्राच्या बाहेर होता. मग मी म्हटलं थोडया वेळाने करू. मला चांगली चरचरून भूकही लागली होती. मी मुगडाळ तांदळाची खिचडी लावली. घरून थोडं दही आणलं होतं. त्याची मस्तपैकी कढी केली. पापडही भाजले. जेवायच्या आधी परत एकदा शीतलला फोन लावून पाहीला. ती जवळपास आली असेल तर एकदमच जेवू म्हणून. पण आताही फोन लागला नाही.
“शीतल येईल ना आज?” उगाच मनात शंका आली. यायलाच हवी. मी एकटी नाही राहू शकत घरी तिला चांगलंच माहित आहे. शिवाय ती येणार हे नक्की करूनच मी माझं घर सोडलं होतं. आता रात्रीचे आठ वाजले होते. त्या जुनाट घरात मी जास्तीत जास्त रात्री दहा साडेदहा पर्यंत राहू शकले असते. नंतर मात्र…
मला माझाच राग आला. मी काही आता लहान नव्हते घाबरायला. चाळीशी पार केली होती मी आणि तरीही घाबरत होते मुर्खासारखी. मी मग टीव्ही चालू केला. मला टीव्हीचा सर्वात जास्त उपयोग करमणुकीपेक्षा सोबत म्हणून होतो. म्हणजे इथे आल्यापासून तरी. एकापाठोपाठ सिरियल्स चालू असल्या की बरं असतं. सोबतीला कुणी आहे असं वाटत रहातं. पण आज मोठ्या पावसामुळे की काय कोणास ठाऊक टीव्हीतही काहीतरी बिघाड झाला होता. त्यावरच्या मुंग्या बघून मी तो बंद केला. टीव्ही बिघडला होता तोपर्यंत ठीक होतं. वीज नाही गेली म्हणजे मिळवलं.
मी परत एकदा शीतलला फोन लावून पहिला. रोहितलाही लावून पाहावा का? पण नको. तो बाईक चालवत असेल. जाऊ दे वाट पाहूया अजून थोडा वेळ. मग मी मोबाईल वर गाणी लावली आणि ऐकत बसले. माझं सहजच दरवाजाकडे लक्ष गेलं. माझ्याकडून तो उघडा राहिला होता मघा. तो बंद करण्याकरता मी गेले. दरवाजा लावताना तो भयानकपणे करकरला. माझ्या अंगावर शहारा आला. कधीपासून म्हणतेय शीतलला ही दरवाजाची बीजागरं बदलून घेऊया म्हणून. किती जुनी झाली आहेत. हे आमचं स्टाफ क़्वार्टर म्हणजे एक हेरीटेज वास्तू म्हणता येईल. नक्की ८०-९० वर्ष तरी झाली असणार ह्या घराला. कसलं दणकट आहे अजून. त्या दगडी भिंती, मोठाले,एखादया वाड्याला असतात तसे दरवाजे,ऊंच छत आणि चक्क भिंतीला खुंट्या, कोनाडे वगैरे . पूर्वी असायच्या तश्या कोटा लाद्या. त्या बहुतेक मागाहून लावून घेतल्या असाव्यात आमच्या दोघींचे नवरे जाम खुश झाले हे घर बघून. कारण चांगलं मोठं पण होतं. पाच खोल्या होत्या. आजूबाजूला छान दाट झाडी वगैरे. एकदम गावात असल्याचा फील.
आमच्या बँकेला स्वस्तात मिळालं असणार. थोडा एका बाजूला असल्याने स्टाफ तयार होणार नाही माहित होतं. म्हणून मग ते शेरिंग स्टाफ क्वार्टर म्हणून ठेवलं होतं. शीतल माझी रूम पार्टनर होती. दोघीही एकाच बँकेत होतो. हल्ली आमची बँक बाई पुरुष काही पाहत नाही. प्रमोशनवर सरळ ग्रामीण भागात पाठवून देते. अगोदर मी नांदेड ब्रान्चला होते आणि ती औरंगाबादला. आमची तशी जुजबी ओळख होती. एकाच ठिकाणी बदली झाल्याने आम्ही ओळख वाढवली. तिला प्रमोशन घ्यायचं नव्हतं. तिला कुटुंबापासून लांब राहायचं नव्हतं. पण तिच्या नवऱ्याने खूपच आग्रह केला. मी पाहतो मुलीकडे. तू काळजी करू नकोस बिनधास्त जा म्हणाला. मला खरंच कौतुक वाटलं त्याचं. माझ्या घरून विरोध होता. ह्यांचा आणि मुलांचाही. म्हणजे माझ्या काळजीपोटी.एरवी मी तशी स्मार्ट होते. एकट राहता येत नाही एवढाच काय तो माझा विक पाॅईंट होता. पण आम्ही एकीला दोघी असल्याने प्रमोशन घ्यायचं ठरवलं. तसाही फक्त दोन वर्षांचाच प्रश्न होता. मग आम्ही आपापल्या घरी परत जाणार होतो.
मला हे घर तेव्हाही आवडलं नव्हतं आणि आता ह्या क्षणी तर मला ते नकोसंच झालं होतं. मला आपली इटालियन मार्बलच्या टाईल्स, स्लाईडिंग खिडक्या, लॅच असलेले दरवाजे अशी आधुनिक घरंच आवडतात. इथे राज राजवाड्यांच्या काळात असल्यासारखं वाटतं. असो. दोन वर्षातले सहा महिने होऊन गेले होते. आम्ही काउंट डाऊन करत होतो.
माझी खिचडी वगैरे खाऊन झाली आणि माझं परत एकदा घड्याळाकडे लक्ष गेलं. अरे बापरे! रात्रीचे दहा वाजून गेले होते. काय करावं मला काही सुचेना.बाहेर पावसाने चांगलाच जोर धरला होता.आणि नुसता पाऊसच नाही तर विजांचा कडकडाटही. तसाही मला पाऊस अजिबात आवडत नाही. आणि त्यातून त्या एकांड्या घरात मी रात्रीची एकटी असताना पाऊस असणं फारच भयाण होतं.मी असा विचार करणं म्हणजे भीतीला ‘ये गं बाई, बस माझ्या मांडीवर’ असंच म्हणण्यासारखं होतं. म्हणून मी तो विचार सोडला. आज नेमके शेजारच्या बंगल्यातही कोणी नव्हते. नाहीतर मी त्या काकूंकडे जाऊन बसले असते. आणि इतर बंगल्यातील कोणालाच मी ओळखत नव्हते. आता जाऊन ओळख काढायचीही ती वेळ नव्हती.
वेळ घालवण्याकरता , खरं तर भीती घालवण्याकरता मी ह्यांना फोन लावला . शीतल अजून आली नाही म्हणून हेही जरा काळजीत पडले. पण शीतलच्या आईचा फोन येऊन गेला होता. तिच्याकडून शीतल नक्की निघाली आहे हे कळलं होतं. फार फार तर काय तिला उशीर होईल. पण ती येणार हे नक्की. त्यामुळे मी जरा निश्चिंत आहे असे मी ह्यांना सांगितले . उगाच त्यांना तरी का टेन्शन दया? त्यांचा फोन झाल्यावर मी उगाच बहिणीला, आईला वगैरे फोन लावत बसले. अशा वेळेस सगळी हक्काची माणसंच आठवतात. नंतर अकरा सव्वा अकरा वाजून गेल्यानंतर मात्र मला त्यांना त्रास देणंही प्रशस्त वाटेना. आता मी काय करावं ते काही कळेना. तसा वाॅचमन होता आमच्या त्या बंगल्यांच्या कॉलनीला. पण तो तास दोन तासांनी आमच्या बंगल्याजवळून जायचा. आता मात्र मी शीतल वर जाम वैतागले. उशीर होणार तर एक साधा फोन करता येत नाही का हिला? त्या दोघांचेही फोन न लागण्याचं कारण मला समजत नव्हतं.
मी त्यांना मनातल्या मनात दूषणं देत असतानाच बेल वाजली. आणि मला हुश्श झालं. माझा तिच्यावरचा राग क्षणात नाहीसा झाला. आली बाई एकदाची. नाहीतर माझी पार वाट लागणार होती.
“किती ग उशीर केलास हा? बारा वाजत आले.”
“हं” एका शब्दात उत्तर देऊन ती आत शिरली. तिचे सुजलेले डोळे पाहून मी थोडी चरकलेच. पण लगेच विचारायला नको म्हणून मी गप्पच बसले. ती थेट बाथरूम मध्ये गेली. तिच्या हात पाय धुण्याचा, तोंडावर पाण्याचे हबके मारण्याचा तर आवाज झालाच. पण न आवरता येणाऱ्या हुंदक्यांचाही आवाज आला. ती यायच्या आधी तिच्या आईचे जवळ जवळ चार तरी फोन येऊन गेले होते. आई म्हणाली होती की ती चार वाजता निघाली आहे म्हणून . औरंगाबादहून इथे यायला फक्त अडीच तीन तास लागतात. आम्ही दोघीही शुक्रवारी घरी जायचो आणि रविवारी परतायचो. हे मला बसमध्ये बसवून द्यायचे आणि रोहित तिला बाईक वरून सोडायचा.
आजची तोच सोडणार होता. मग हिला इतका वेळ का? आणि आता वर एकटी कशी आली? रोहितने खालीच सोडलं? बॅग वर तरी ठेऊन जायचं. आमचे हे असते तर नक्की वर आले असते. ह्यांच्यात आणि रोहितमध्ये हाच तर फरक होता. हे माझी खूप काळजी घेतात.
नॅपकीनला तोंड पूसत ती बाहेर आली. मी आत जाऊन पाणी आणलं. ग्लासभर पाणी ती घटाघट प्यायली. मी तिच्याकडे एकटक पाहत होते. तिचं काहीतरी बिनसलं होतं. नक्कीच. आजच नाही तर गेले चार पाच महिने.
पूर्वी त्याचे तिला रोज सकाळ संध्याकाळ फोन यायचे. पण अलीकडे फोन कमी झाले होते. कधी कधी, नव्हे बरेचदा, फोनवर वादावादीही व्हायची. मला कळू नये म्हणून ती दुसऱ्या खोलीत जायची.
“तू जागी कशी अजून?” तिच्या प्रश्नाने मी वर्तमानकाळात आले.
“मी झोपणार? एकटी? तुला माहित आहे ना मला एकटीला झोप येत नाही?” हे ऐकून ती हसली. मी तिच्या हसण्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे म्हटलं, “आणि हो तुला सांगायचं राहिलं. तुझ्या आईचा तीन चार वेळा फोन येउन गेला.”
“माझ्या आईचा?”
“हो अगं. तिला काळजी नाही का वाटणार? शेवटी आई आहे ती. तिला करतेस फोन तू पोहोचलीस म्हणून?. नाहीतर थांब मीच लावते.”
“नको अगं. आता नको लावूस.”
“का पण? करते ना. ती वाट पाहत असेल. तिने बजावलं आहे मला. तू आल्या आल्या लगेच कळव म्हणून.”
मी असं म्हणतेय तर तिच्या डोळ्यांच्या कडा परत पाणावल्या. मी माझा फोन घेण्याकरता म्हणून उठले तर तिने मला हाताला धरून बसवलं.
“थांब. आता बेल वाजली तर सगळ्यांचीच झोपमोड होईल. मी एसएम एस करते आईला.” तिने लगेच तिच्या फोनवरून एसेमेसही टाकला आईला.
“शीतल, काही झालंय का?” ह्या प्रश्नांवर तिने मान फिरवली. आता नको रात्रीचा कुठलाच त्रासदायक विषय. मला वाटलं. म्हणून मग मी विषय बदलला.
“तुला रोहितनेच सोडलं ना?”
“ …..”
ती कुठेतरी हरवली होती बहुधा.
“अगं मी काय विचारतेय तुला? तुला कुणी रोहितनेच सोडलं ना?”
“अं… हो… न… नाही…. “
“म्हणजे काय नक्की? हो की नाही?”
“हो त्यानेच पोहोचवलं.” आता ती छद्मी हसली. ती त्याच्यावर वैतागली होती हे नक्की. त्यांचं आता नक्कीच वाजलं असणार. तिने ढीग लपवायचा प्रयत्न केला होता इतके दिवस. पण ते लपत नव्हतं. एकत्र राहणार म्हणजे कळणारच ना? त्यांच्या बिघडलेल्या नात्याची कल्पना येत होती हल्ली. तिला मदत करायचीही इच्छा होती माझी. माझा स्वभाव असाच आहे. दुसर्यांना मदत करण्याचा . अगदी कुठल्याही टोकाला जाऊन. आणि स्त्रियांवरचा अन्याय तर मला मुळीच सहन होत नाही. मागे मी माझ्या मोलकरणीला नवऱ्याची पोलिसात तक्रारही करायला मदत केली होती. गुरासारखा बडवायचा तिला. अर्थात रोहित एवढया थराला जाणार नाही म्हणा. पण त्यांच्यात काहीतरी तेढ होती नक्की. ती दूर करायला हवी होती. पण त्यासाठी ती काही बोलायला तर हवी.
मी खूप भरभरून बोलायचे. ह्यांच्याबद्दल, मुलांबद्दल, एकंदरीतच संसाराबद्दल. पण ती गप्पगप्पच असायची. तशी ती अबोल नव्हती. आणि म्हणूनच तिचं ते गप्प राहणं मला खटकायचं. तिला बोलतं करण्याचा मी खूप प्रयत्न करायचे. कधी कधी मुद्दाम माझ्या आणि ह्यांच्या भांडणाच्या खोटया खोटया कहाण्या रचून सांगायचे. हेतू इतकाच की तीही स्वतःचं काही सांगेल. थोडी मोकळी होईल. पण नाही. ती काहीच बोलायची नाही. मग मला वाटायचं जाऊ देत ना. कशाला कुणाच्या खाजगी आयुष्यात डोकवायचं?. तिला वाटेल तेंव्हा ती सांगेल. आणि खात्रीही होती की कधीतरी ती सांगेलच.
आज ती वेळ आली होती बहुतेक. आजचा तिचा चेहरा तर खूपच वेगळा वाटत होता. रडका असला तरीही नेहेमीसारखा भांबावलेला नव्हता. उलट शांत आणि काहीतरी ठरवल्यासारखा ठाम वाटत होता.
“चल, तुला डाळ तांदळाची खिचडी केलीय ती वाढते. कढीपण आहे. मस्त गरम करते. तुला आवडते ना? बरं वाटेल जरा. तीन तास बाईकवर बसणं खूप त्रासदायक असतं माहित आहे मला. “
“नाही गं. नको.”
“नको? वाटेत काही खाणं झालं का तुमचं ?”
“हं” ती विशेष बोलत नव्हती. त्यामुळे पुढे काय बोलावं ह्याचा मी विचार करत होते. मग मी विचारलं
“उशीर का झाला तुला? आई म्हणाली चारला निघालीस म्हणून.”
“झाला. मध्ये मध्ये थांबलो. पाऊस होता ना म्हणून.”
“अगं, आणि हे तुझ्या हाताला काय लागलंय. केवढं खरचटलंय.” तिच्या कोपराच्या खाली मोठी जखम दिसत होती.
“थांब. औषध आणते” मी सोफ्रामायसीन आणलं. तिला लावलं. त्यावर बँडेजही गुंडाळल. मी तिची काळजी घेतेय हे पाहून ती परत गहीवाराल्यासारखी झाली. झोपायची तयारी करून मी म्हटलं,
“चल. झोपूया आता,वाजलेत बघ किती? उद्या ऑफिसही आहे ना?” दिवा मालवून मी माझ्या बेडवर गेले.
तेवढयात ती म्हणाली, “मेघा, थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. चालेल तुला ?”
“हो. अगं असं काय विचारतेस शीतल? तुझ्यापेक्षा झोप जास्त आहे का मला? बोल.”
मी दिवा लावला नाही पण उठून बसले. मेघा, मी रोहितला नकोशी झालेय.” मला तशी थोडीफार कल्पना होती पण तिच्या तोंडून ऐकल्यावर त्यावर शिक्कामोर्तब झालं . मला ते ऐकून कसतरीच वाटलं .
“नक्की काय प्रोब्लेम आहे शीतल? इतके दिवस आपण एकत्र राहतोय. मी पाहतेय तुला. ओळखतेही आता छान. तुझ्यासारखी बायको मिळणं हे मोठं भाग्यच खरं तर. मग त्याला कसली अवदसा आठवली?”
“अवदसा? हो अवदसाच ती. ती… थर्ड पर्सन … वो …”
“म्हणजे त्याचं कुणाशीतरी…. ?”
“हो. तो मान्य करत नव्हता प्रथम. पण ते नक्की आहे. बायकोला कळणार नाही नवऱ्याचं बदललेलं रूप?”
“मग काय म्हणणं आहे त्याचं ?”
“त्याचं म्हणणं ? हेच… घटस्फोट…”
“मग?”
“मग काय? मी नाही देणार असं सांगितलंय त्याला.”
“नोटीस पाठवलीय त्याने?”
“नाही. अजून नाही. त्याला वाटलं त्याच लफडं कळल्यावर मी सोडेन त्याला. मूर्ख आहे. त्याला वाटतंय तसं होणार नाही. मी मुळीच सोडणार नाही असं निक्षून सांगितलं मी त्याला.”
“कधी झालं तुमचं बोलणं?”
“हल्लीच. गेल्या आठवडयात. ह्या वेळेस मी गेले होते तर खूप फोर्स करत होता. पैसेही देतो म्हणे. नालायक.”
आता बाहेर पाऊस परत चालू झाला होता विजांचा गडगडाटही होत होता. त्याचं हे ठरलं होतं म्हणूनच त्याने हिला लांब पाठवलं होतं का? घरापासून लांब. संसारापासून लांब. मला कसतरीच वाटायला लागलं. माझ्यासारखीच, माझ्याएवढीच माझी मैत्रीण. तिचा संसार तुटत होता. तिची मुलगीही लहान होती. कसं निस्तरणार होती ती हे सगळं. चांगली नोकरी असल्याने पैशांची चिंता नव्हती. पण काहीच चूक नसताना असा मध्येच काहीतरी घडणं म्हणजे…
“आई बाबांना माहित आहे?”
“नाही. मुळीच नाही. मी नव्हतं सांगितलं इतके दिवस. वाटलं तात्पुरतं असेल त्याचं हे. क्षणिक आकर्षण वाटलं असेल त्याला. येईल परत ताळ्यावर. त्याच भरोश्यावर होते मी. माझंच चुकलं. उगाच विश्वास ठेवला त्याच्यावर. आता ती अगदी हमसून हमसून रडायला लागली. मी माझ्या बेडवरून उठले. दिवा लावला. तिच्या बेडवर जाऊन बसले. तिचा हात हातात घेऊन दाबला. तिला थोडा वेळ रडू दिलं. मग म्हटलं,
“एवढं टोक गाठू नकोस. बरेच पुरुष करतात ह्या वयात असं. तू आईच्या कानावर घाल. ती बोलेल त्याच्याशी. शिवाय तुझे सासू सासरेही आहेत ना?”
“हो. सर्वजण आहेत. पण त्याचा आता काहीच उपयोग नाही. त्याचं नक्की ठरलंय.”
“काय?”
“हेच घटस्फोटाचं. आणि दुसऱ्या लग्नाचं.”
“घटस्फोट घेणं इतकं सोपं नाही. त्याला सिद्ध करावं लागेल.”
“ मला माहित आहे ते. त्याला बजावूनही झालं माझं. आकांडतांडवही करून झालं. पण तो मुळीच बधला नाही. त्याचं दुसऱ्या लग्नाचं नक्की ठरलंय म्हणाला. निर्लज्ज. तो काहीही झालं तरीही तिला सोडणार नाही. त्याला जे वाटतंय तेच तो करणार.”
“हॉरिबल. हॉरिबल आहे हे सगळं. पण तरीही शीतल. तू धीराने घे. आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत. पुढच्या शुक्रवारी मी येते तुझ्यासोबत. सर्व मोठया मंडळींच्या कानावर घालू आपण. बघूच या. तो कसं दुसरं लग्न करतोय ते.”
“हो ना, मेघा? नक्की ना? नाही ना होणार त्याचं दुसरं लग्न? तू मदत करशील मला? बोलशील माझ्या, त्याच्या आई बाबांशी? सांगशील त्यांना हे त्याचं दुष्कृत्य?”
तिचा परत एकदा बांध फुटला. तिच्या पाठीवरून मी फक्त हात फिरवत राहिले. क्षणात मी तिची आई झाले.
“मेघा, तो खूप दुष्ट आहे गं. तो काय म्हणाला माहित आहे? तो म्हणाला तू मला घटस्फोट दिला नाहीस तर मी तुला मारून टाकायालाही मागे पुढे पाहणार नाही.”
हे ऐकून मात्र मी चांगलीच संतापले. काय माणूस आहे हा? इतका नीच? इतक्या खालच्या पातळीला कसा जाऊ शकतो हा?
मी न राहवून तिला म्हटलं, “ आणि तुला तरी ह्या असल्या माणसाबरोबर का राहायचं आहे? खरं तर तूच मागायला हवास घटस्फोट त्याच्यापासून.”
“हो. मीही आधी तसंच ठरवलं होतं. पण …”
“ पण…. पण काय….? ठरवलंयस ना? छान केलंस. मग आता तुला कशाला बोलायचं आहे त्याच्या आई वडिलांशी. आपण आता वकीलालाच भेटू.”
“ ते बघू. पण तू बोलशील ना माझ्या आईबाबांशी. सांगशील ना त्यांना त्याचं हे असलं वागणं. चक्क मला धमकी देतो? मारण्याची? तीही त्या सटवीसाठी?” बोलता बोलता तिचा आवाज चढला, “ त्याला वाटलं तो माझा काटा काढेल आणि मी काहीच करू शकणार नाही? गप्प बसेन? तसंही तो मला बावळट समजायचा पहिल्यापासून आणि होतेही मी बावळट. मुर्खासारखं प्रेम केलं त्याच्यावर. अगदी आताआता पर्यंत. हल्ली हल्ली तर मला फार संशय होता. तरीही कोणालाही बोलले नाही. अगदी ह्या कानाचं त्या कानाला कळू दिलं नाही. म्हणूनच त्याला वाटलं त्याच्या मुस्कटदाबीने तो मला नामोहरम करेल. पण नाही मी आता शांत बसणार नाही. त्याचं हे बिंग फोडणारच. आणि मेघा तू मला त्यात मदत करायची आहेस. करशील ना?”

“शीतल, शांत हो. आधी रडणं थांबव बरं.” मी तिचे डोळे पुसले. तिला मिठीत घेतलं.
“तू जे म्हणशील, जसं म्हणशील ना तसंच मी करीन.”
“हो ना? मग उदयाच औरंगाबादला जाशील?”
“उदया? लगेच उदया?”
बरं उदया नाही तर परवा किंवा जेंव्हा कधी तुला जमेल तेंव्हा. तुझ्या मिस्टरांबरोबर जा हवं तर”`
“आणि तू? तूही असशील ना बरोबर?”
“हो येईन मी. पण आई बाबांना सामोरं जाणं जड जाईल गं मला. म्हणून म्हणतेय , पहिलं तू बोल त्यांच्याशी. आणि मी आता जे तुला सांगितलं ना ते सगळं सांग त्यांना. “
“बरं, ठीक आहे.तसंच करू आपण. चल आता किती वाजलेत ते बघ. झोपूया आता. हा विचार तू आता सोड बरं. आपण उद्या बोलू. ओके?”
“बरं, चल. सॉरी हं मेघा, तुला उगाच त्रास माझ्यामुळे. ती बेडवरून उठली. बाथरुमला जाण्यासाठी.
“अगं त्रास कसला? आणि सॉरी काय म्हणतेस? मैत्रीण मानतेस ना मला ? आता आत जा आणि फ्रेश हो जरा. डोळ्यावर गार पाणी मार बरं. किती लाल झालेत बघ ते.”
ती बाथरुमला जाता जाता परत थांबली. मागे वळून म्हणाली, “पण मेघा फक्त एक सांगू शेवटचं?”
“हो अगं बोल ना .”
“काहीही झालं ना तरी मी हरणार नाही. आत्महत्या वगैरे तर मुळीच करणार नाही. जर यदाकदाचित उद्या माझं काही बरं वाईट झालं ना तर तू सरळ पोलिसात जा. त्यांना सांग त्याने मला धमकी दिली होती म्हणून. कम्प्लेंट कर त्याची. निदान माझ्या आई बाबांना तरी सांग हे. कारण मला काही जरी झालं ना तरीही त्याला रोहितच जबाबदार असणार आहे. नक्की. अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेघ.” असं म्हणून ती आत गेली.

हे ती असं मध्येच काय बोलून गेली होती ? थोडं असंबद्ध नव्हतं का हे? आत्महत्येचा विषयच कुठून आला हिच्या डोक्यात ? म्हणजे काय म्हणायचं काय होतं हिला नक्की? हे पहिल्यांदा कळलं तेंव्हा आत्महत्येचा विचार आला होता की काय हिच्या मनात ? बाप रे !!! ही बाहेर आली की हिला विचारायला हवं. आधीचं काहीही असो. पण आताचा तिचा निर्धार मला भावला होता. ती लढण्याकरता सज्ज होती आणि मी तिला मदत करणार होते.

ती बाहेर येण्याची मी वाट पहात होते. ती आली की तिला तिच्या बोलण्याचा अर्थ विचारयचा होता . आत्महत्या असा शब्दही तोंडातून उच्चारायचा नाही हेही बजावायचं होतं. दहा पंधरा मिनिट झाली तरी ती बाहेर यायचं काही चिन्ह दिसेना. आत काही हालचाल होतेय असेही जाणवेना. आता मात्र मी हादरले. काय करतेय काय ही आत एवढा वेळ? आणि कसलाच आवाज का येत नाही आहे? हिने काही करून तर घेतलं नसेल ना स्वतःला ? छे ! असं कसं करेल ती? आताच तर बोलून गेली ना की मी आत्महत्या वगैरे मुळीच करणार नाही म्हणून? मी ताडकन उठले. बाथरूम पाशी गेले. बाथरूम मधला लाईट त्याच्या दरवाजातल्या काचेतून दिसत नव्हता. संडासातही काळोखच होता. मी मग घरभर फिरून आले. पाचही खोल्या शोधल्या. हीचा मागमूस नाही. “शीतल ए शीतल, शीतल …” मी एकापाठोपाठ एक हाका मारल्या. पण ओ नाही. आता माझी पाचावर धारण बसली. मी बाथरूम आणि संडासाचा दरवाजे एकदमच ढकलले. दोन्ही दरवाजे करकरत उघडले. पण आत …. आत कोणीच नव्हते. मी जोरात किंकाळी फोडली. आणि तिथल्या तिथे बेशुध्द झाले.
तीन एक तास तरी मी बेशुद्धच होते म्हणे. माझी किंकाळी ऐकून वाॅचमन धावत आला. आजूबाजूच्या दोघातिघांना त्याने मदतीला घेतलं. पाईपावरून तो वर चढला आणि हॉलच्या गॅलरीत आला. खिडकीतून हात घालून कडी काढावी लागली त्याला. मला शुद्धीवर आणण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. पहाटे पाचच्या दरम्यान मी शुद्धीवर आले. माझे डोळे उघडले तेव्हा मला हे दिसले. ह्यांना पाहून माझ्या जीवात जीव आला. माझी विचारपूस करून, मी आता ठीक आहे पाहून बाकी सर्व निघून गेले.
“बरं झालं हो तुम्ही आलात. पण तुम्ही कसे आलात?”
“सांगतो सर्व सांगतो. तू आधी मला सांग. शीतलच्या आत्महत्येच्या बातमीने तू घाबरलीस आणि बेशुद्ध पडलीस ना?”
“काय ? शीतलची आत्महत्या? काय बोलताय काय तुम्ही?” माझ्या पोटात मोठा खड्डा पडला.
“म्हणजे? तुला माहीत नाही? मला वाटलं की त्या बातमीनेच तू बेशुद्ध पडलीस. ती बातमी कळल्या कळल्या मी तुला फोन लावला. खूप रिंग वाजूनही तू तो उचलला नाहीस. तेव्हाच मला वाटलं तू घाबरून बेशुध्द झाली असणार. म्हणून मग मी वाॅचमनला फोन लावला आणि तडक इथे यायला निघालो.” हे त्यांना कसं कळलं ते सांगत होते आणि मी त्यांना मिठी मारून गदगदून रडत होते. माझ्या डोक्यावरून हात फिरवत हे म्हणाले, “मेघा तू शांत हो बघू आधी. आणि नीट आठवून सांग मला. तू बेशुध्द का पडलीस मग? तुला काय कळलं होतं? तुला फक्त ती गेल्याचं सांगितलं का कुणी ?”
“अहो, शीतल काल इथे होती रात्री. माझ्यासोबत.”
“व्हाॅट? काहीही काय बरळतेस मेघा तू? चल आता जरा झोप बरं तू. सकाळी बोलू आपण. तुझी झोप अर्धवट झालीय आणि तुझ्या मेंदूवर ताण आलाय बहुतेक” ह्यांचा मुळीच विश्वास बसला नव्हता माझ्या बोलण्यावर. मला माहित होतं मी सांगते त्यावर कुणाचाच विश्वास बसण्यासारखा नव्हता. मलाही आता काल हे सगळं घडून गेलं आहे ह्यावर विश्वास बसत नव्हता.
“तुम्हाला कसं आणि कधी कळलं शीतलचं?” आता वेळेशी सांगड घालून बघणं मला आवश्यक वाटत होतं.
“मला रोहितच्या भावाचा फोन आला रात्री दोन वाजता. रोहित शीतलला पोहोचवायला म्हणून आला होता. खूप पाऊस होता म्हणून दोघं मध्ये कुठेतरी थांबली होती संध्याकाळी सहाच्या दरम्यान. हिला एका झाडाखाली थांबवून हा चहा आणायला म्हणून टपरीवर गेला. चहाचे ग्लास घेऊन हा परततोय तो ह्याला शीतल स्वतःला दरीत झोकून देताना दिसली. तो धावला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पुढे बॉडी शोधायला दोन तीन तास लागले. मिळाली तेव्हा थोडी धुगधुगी होती अंगात. पण त्यात काही अर्थ नव्हता. हॉस्पिटलमध्येही नेलं होतं. १०-११ च्या सुमारास एकदम सिरियस झाली. डॉक्टरांनी शर्थ केली पण काही उपयोग झाला नाही. मग पुढे पोस्ट मार्टेम वगैरे. रोहितने तुलाही फोन लावायचा प्रयत्न केला म्हणे. कारण त्यातल्या त्यात जवळ तू होतीस ना? पण तुझी फक्त रिंग वाजत होती.”
आता मला सर्व उलगडा झाला. शीतल ११ च्या दरम्यान गेली ती थेट इथे आली होती. तिने मी घाबरू नये ह्याची काळजी घेत मला सर्व काही सांगितलं होतं. तिने सांगितलेला शब्द न शब्द मला आठवत होता. घटनास्थळी नसूनही तिच्या खुनाची माहिती असलेली मी एकमेव व्यक्ती होते. तिला न्याय मिळवून दयायची जबाबदारी तिने माझ्यावर टाकली होती. तिने माझ्यावर विश्वास टाकला होता. आता मला तो सार्थ करायचा होता. आणि तो मी करणारच होते.

***
राजश्री नितीन बर्वे
फोन नं ९८२०३९६६६५

*मोठी तिची सावली* या पुस्तकातून
लेखिका राजश्री बर्वे
दिलीपराज प्रकाशन

https://diliprajprakashan.in/product/मोठी-तिची-सावली/

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त Happy

Atishay utkantha wardhak ani khilwun thewnari katha ahe. Khup awadli. Likhan shaili sudhdha apratim. Dolyasamor prsng jivant ubhe kelet.

, हो प्रतिलिपिवर पण टाकली आहे...इथले वाचक वेगळे आहेत म्हणून इथे पण टाकली, >>>>> मी आता प्रतिलिपीवर वाचत नाही. पूर्वी मात्र एखाद्या लेखकाची कथा आवडली की त्याच्या/तिच्या सगळ्या कथा वाचायचे. मला वाटत हीच ती कथा, जी वाचल्यावर मी तुमचं बाकी सगळं लिखाण वाचून काढलं. म्हणूनच मला माबोवर टाकलेल्या दोन्ही कथा आधी वाचल्यासारख्या वाटल्या. तुमच्या सगळ्या कथा एका दिवसात वाचणं हीच तुमच्या लिखाणाला दाद, नै का? Happy

हो मीरा, खरंय...वाचकांचा अभिप्राय/फीडबॅक खूप महत्त्वाचा असतो... धन्यवाद... माझा नुकताच आलेला रहस्य गूढ कथांचा संग्रह नक्की वाचा आणि अभिप्राय द्या..ह्या दोन्ही कथा त्यात समाविष्ट आहेत..

हो, पुढचा भाग लिहायचा विचार आहे...
ह्या कथेवर आधारित एकांकिका पण लिहिली आहे.. कुणाला हवी असल्यास कॉन्टॅक्ट करावा...

छान