मुक्तिबंधन

Submitted by nimita on 3 November, 2018 - 22:55

( *एका आईच्या सत्य अनुभवाचे शब्दांकन* )

"Congratulations madam!

धनश्रीच्या कपाळावरचा घाम टिपत नर्स म्हणाली. "मुलगा झालाय!"

"बाळ नॉर्मल आहे ना?"धनश्री नी घाबरतच विचारलं. "हो .." चेहेऱ्यावरचं प्रश्नचिन्ह लपवत नर्स उत्तरली

"मग अजून रडत का नाहीये?" धनश्रीचं वाक्य संपतंय न संपतंय तोच बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि तिनी समाधानानी निःश्वास सोडला.

पुढच्या काही मिनिटांतच डॉक्टरांनी दुपट्यात गुंडाळलेलं तिचं 'bundle of joy' तिच्या शेजारी, तिच्या कुशीत ठेवलं आणि म्हणाले,"काळजीचं काहीही कारण नाहीये, मॅम! आज खूप वर्षांनंतर इतकी परफेक्ट labour process बघायला मिळाली... अगदी कॉलेज मधे असताना थेअरी मधे शिकलो होतो तशी!! It was a picture book delivery . So just relax and enjoy. "

डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून धनश्री नी आपल्या बाळाचा छोटुसा गुलाबी हात हातात घेतला आणि हलकेच दाबला. जणू काही त्याचं अभिनंदन च करत होती ती!तिच्या छोट्या पार्टनर नी पण लगेच तिचं बोट आपल्या हातात घट्ट पकडलं. गेल्या नऊ महिन्यांचं त्यांचं नातं आता एक अतूट बंधन झालं होतं.

जेव्हा नर्स त्या दोघांना लेबर रूम मधून त्यांच्या खोलीत घेऊन जात होती तेव्हा मधे एका खोलीतून कुणाच्यातरी रडण्याचा आवाज धनश्रीच्या कानांवर आला. तिनी त्याबद्दल जेव्हा नर्सला विचारलं तेव्हा ती म्हणाली," आज पहाटे त्या बाईंचा मुलगा गेला. बऱ्याच दिवसांपासून आजारी होता."

हे ऐकलं मात्र आणि धनश्री च्या छातीत धस्स झालं.तिनी तिच्याही नकळत आपल्या बाळाला एका हातानी अजून जवळ ओढलं आणि दुसऱ्या हातानी त्याची दृष्ट काढली.

खोलीत जाऊन जरा स्थिरस्थावर होइपर्यंत तिचा नवरा आणि मोठी मुलगी दोघंही येऊन पोचले.

कशी गंमत असते बघा...काल पर्यंत तिची चार वर्षांची मुलगी तिला लहान वाटत होती,आणि आज अचानक ती 'मोठी' वाटायला लागली...तिच्या छोट्या भावाची 'ताई' झाली.

बाळाला बघून दोघे ही खूप खुश झाले. नवऱ्याला आणि मुलीला बाळाशी खेळताना, हसताना बघून धनश्री तृप्त झाली. त्यांचं कुटुंब आता पूर्ण झालं होतं.

नंतरचे दोन दिवस कसे गेले ते कळलंच नाही. बाळाची भूक, झोप,सुसू पॉटी ...त्यात भेटायला येणाऱ्यांची भर...पण luckily बाळ अजिबात रडकं नव्हतं. खूपच शांत होतं.. रात्रीसुद्धा फक्त भूक लागली की उठायचा आणि पोट भरलं की परत शांतपणे झोपून जायचा. त्यामुळे धनश्रीची पण विश्रांती अगदी व्यवस्थित होत होती.

तिसऱ्या दिवशी रात्री घरी परत जाताना तिची मुलगी खूप खुश होती, कारण दुसऱ्या दिवशी धनश्री आणि बाळ घरी जाणार होते. धनश्रीला पण आता 'कधी एकदा बाळाला घेऊन घरी जाते ' असं झालं होतं.

नवरा आणि मुलगी घरी गेल्यावर धनश्री पण झोपायच्या तयारीला लागली. बाळ शांत झोपलं होतं. त्याचा तो रेखीव,निरागस चेहरा बघून तिचा ऊर भरून आला. मागच्या दोन तीन दिवसांत ज्यांनी ज्यांनी तिच्या बाळाला बघितलं ते सगळेजण म्हणत होते," अगदी राजबिंडा आहे तुझा मुलगा." तिची एक मैत्रीण म्हणाली होती," याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच शांत भाव आहे गं. प्रत्येक लहान बाळ गोंडस असतंच, पण याच्याकडे पाहून एक वेगळंच समाधान मिळतंय."

काही जण बाळाच्या गालांवर पडणाऱ्या खळ्या बघून फिदा झाले होते. धनश्रीच्या मुलीची एक मैत्रीण आपल्या आईला म्हणाली होती," आई, मला पण अस्साच भाऊ पाहिजे, तू आंटी ला सांग ना आपल्यासाठी पण असंच अजून एक बाळ आणायला."

हे सगळं आठवून तिला खूप खूप छान वाटत होतं. त्याच नादात ती बाळाला कुशीत घेऊन कॉटवर आडवी झाली. बाळाच्या मुठीत आपलं बोट देऊन ती डोळे बंद करून पडून राहिली. गेल्या तीन दिवसांत हे मूठभर नातं अगदी जन्मजन्मांतरीचं असल्यासारखं वाटायला लागलं होतं धनश्रीला ! आणि त्यासाठी तिनी परत एकदा मनोमन देवाचे आभार मानले.

सगळं कसं शांत होतं.. पण थोड्या वेळानंतर तिला जाणवलं की बाळाची तिच्या बोटावरची पकड आता हळूहळू घट्ट होतीये. तिनी उठून बघितलं- बाळ अजूनही झोपलेलंच होतं. 'उगीच टेन्शन घेतेस तू' असं स्वतःला दटावत ती पुन्हा आडवी झाली. पण काही मिनिटांनंतर तिला कसलासा आवाज ऐकू येऊ लागला.....तिनी कान टवकारले, पटकन कॉट शेजारचा दिव्याचा स्विच ऑन केला. आवाज तिच्या शेजारूनच येत होता....तिच्या बाळाच्या घशातून आल्यासारखा वाटत होता. तिनी नीट लक्ष देऊन ऐकलं..हो, बाळाच्या प्रत्येक श्वासाबरोबर त्याच्या घशातून 'घर्र, घर्र' असा आवाज येत होता. 'सर्दी झाली की काय बच्चूला?' असा विचार करतच धनश्रीनी बेल वाजवून नाईट ड्युटी च्या नर्सला बोलावलं.

रात्रीचे अकरा-सव्वा अकरा वाजले असावे. डॉक्टरांची शेवटची राऊंड नुकतीच झाली होती त्यामुळे नर्स बाहेर व्हरांड्यातच होती.बेल चा आवाज ऐकून ती लगेच आली. धनश्रीनी तिला त्या आवाजाबद्दल सांगितलं. नर्सनी बाळाला बघितलं. आता ती 'घर्र घर्र' अजूनच वाढली होती. एकही क्षण न दवडता ती नर्स बाहेर पळाली आणि घरी परत जाणाऱ्या डॉक्टर ना हाक मारून परत बोलावलं.दोघंही ऑलमोस्ट पळतच खोलीत आले. डॉक्टर नी बाळाचा चिमुकला हात हातात घेऊन त्याची पल्स चेक केली. तोपर्यंत नर्स ड्युटी रूम मधून स्टेथोस्कोप घेऊन आली होती. तिच्या हातातून तो अक्षरशः हिसकावून घेत डॉक्टर बाळाच्या ह्रदयाचे ठोके ऐकायचा प्रयत्न करायला लागले.. त्यांच्या चेहेऱ्यावरची काळजी क्षणाक्षणाला वाढत होती.. ते पुन्हा पुन्हा स्टेथोस्कोप ची जागा बदलत होते.... डोळे बंद करून ऐकायचा प्रयत्न करत होते.. हे सगळं बघून धनश्रीच्या हृदयाचा ठोका चुकला... या सगळ्या घडामोडी अक्षरशः काही मिनिटांत झाल्या होत्या. पण तिला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं होतं. तिच्या बाळाला काहीतरी सिरीयस प्रॉब्लेम झाला होता.

काही मिनिटांपूर्वी या आयुष्याबद्दल देवाचे आभार मानणारी धनश्री आता तिच्याही नकळत देवाची प्रार्थना करत होती.

'सगळं ठीक आहे ना?' तिनी कापऱ्या आवाजात डॉक्टरना विचारलं.

'सॉरी मॅम, पण situation गंभीर आहे. मी आत्ता बाळाला NICU मधे नेतो आहे. बाळ नीट श्वास घेत नाहीये. त्यामुळे त्याची कंडिशन सिरीयस होतीये, हे बघा..." असं म्हणत त्यांनी बाळाचा हात थोडा वर उचलला आणि हलकेच सोडला....निष्प्राण असल्यासारखा तो खाली कॉटवर जाऊन आपटला... हे सगळं ऐकून आणि बघून धनश्री बधिर झाली ..डॉक्टरच्या म्हणण्याचा अर्थ न कळण्याइतकी अबोध नव्हती ती!

नर्स कडे बघून ते म्हणाले," Paediatrician ना फोन करून बोलावून घ्या लगेच.... It's an emergency." एवढं बोलून डॉक्टरनी बाळाला उचलून घेतलं आणि ते खोलीतून बाहेर गेले.

धनश्रीचं बोट सोडून तिचं बाळ तिच्यापासून लांब चाललं होतं आणि ती हतबल होऊन नुसती बघत होती. अचानक कोणीतरी धक्का दिल्यासारखी ती भानावर आली आणि बाळाच्या मागेमागे NICU मधे जाऊन पोचली.
धनश्री ICU मधे पोचेपर्यंत डॉक्टरांनी बाळाची ट्रीटमेंट सुरू केली होती. एकीकडे बाळाला वेगवेगळी इंजेक्शन देता देता ते धनश्रीला प्रश्न विचारत होते..."शेवटी दूध कधी प्यायला? रडत होता का? तुम्हांला किती वेळापासून ती घर्र घर्र ऐकू येत होती?" धनश्री तिला आठवतील तशी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होती..अगदी बारीकसारीक माहिती पण सांगत होती, कारण या सगळ्यामुळे डॉक्टरांना बाळाच्या ट्रीटमेंट मधे मदत होणार होती आणि हे ती जाणून होती.पण तिचे डोळे मात्र तिच्या बाळावर स्थिर होते.मनात सतत देवाची प्रार्थना चालू होती.

कारण त्या क्षणी यापेक्षा जास्त काहीच तिच्या हातात नव्हतं. त्या छोट्याशा जीवाला वाचवण्यासाठी ICU चा सगळा स्टाफ प्रयत्न करत होता. काही मिनिटांतच Paediatrician पण येऊन पोचल्या. ड्युटी वरच्या डॉक्टर नी त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. एकीकडे बाळाची तपासणी करताकरता त्या सगळं ऐकत होत्या. नर्स बाळाला सलाईन लावायचा प्रयत्न करत होती, पण तिला काही केल्या vein मिळत नव्हती. त्या इवल्याश्या जीवाच्या हातापायावर ठिकठिकाणी सुया घुसवल्या जात होत्या.....बाळ या सगळ्या संवेदनांच्या पलीकडे गेल्यामुळे त्याला दुखत नसेलही कदाचित, पण हे सगळं बघताना धनश्रीच्या मनावर मात्र अनंत आघात होत होते.

बऱ्याच प्रयत्नानंतर शेवटी सलाईन सुरू करण्यात डॉक्टरांना यश मिळालं आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण हा तर फक्त एक टप्पा होता. Emergency अजूनही संपली नव्हती. मुख्य डॉक्टर धनश्री ला म्हणाल्या," तुमच्या बाळाच्या श्वास नलिकेमधे इन्फेक्शन झालं आहे आणि त्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होतो आहे. त्यामुळे त्याच्या शरीरातली ऑक्सिजन ची पातळी खूप कमी झाली आहे. आम्ही त्याची श्वासनलिका स्वच्छ करायचा प्रयत्न करतो आहोत. बाकी emergency ट्रीटमेंट पण सुरू केली आहे, पण अजूनही धोका टळलेला नाहीये. पण आपण आपले प्रयत्न चालू ठेवूया." क्षणभर थांबून धनश्रीच्या पाठीवर हात ठेवून त्या पुढे म्हणाल्या," तुम्हीही देवाची प्रार्थना करा."

एवढं बोलून त्या परत बाळापाशी गेल्या.त्यांचं बोलणं ऐकून ती सुन्न झाली..एकटक तिच्या बाळाकडे बघत देवाचं नाव घेत एका कोपऱ्यात उभी राहिली.असा किती वेळ गेला कोणास ठाऊक, पण मधेच एकदम तिला तिच्या नवऱ्याची आठवण आली.. तिनी घड्याळात पाहिलं- मध्यरात्र उलटून गेली होती. तिनी एक नर्सला तिच्या घरचा फोन नंबर दिला आणि ड्युटी रूम मधल्या फोन वरून घरी कळवायची विनंती केली. आत्ता या क्षणी तिच्या बाळाला तिथे एकटं सोडून जायची कल्पनाही तिला मान्य नव्हती....

साधारण अर्ध्या पाऊण तासात तिचा नवरा हॉस्पिटलमधे येऊन पोचला. त्याला ICU च्या दाराशी उभा राहिलेला बघून ती अक्षरशः पळत त्याच्याजवळ गेली. तिचा पांढरा पडलेला चेहेरा बघून क्षणभर त्याच्या मनात धस्स झालं.. त्यानी घाबरतच विचारलं,"काय झालं? बाळ कुठे आहे?" तिनी डॉक्टरांच्या दिशेनी बोट दाखवत म्हटलं," त्याच्या श्वासनलिकेत इन्फेक्शन झालंय, ऑक्सिजन लेव्हल खूप कमी झालीये, डॉक्टर म्हणतायत की केस सिरीयस आहे."

हे ऐकून त्याची तिच्या खांद्यावरची पकड घट्ट झाली. दोघंही एकमेकांना धीर देत होते. तिला एकदम त्यांच्या मुलीची आठवण झाली. "कारमधे झोपलीये मागच्या सीटवर." तिचा नवरा म्हणाला. रात्रीची वेळ असल्यामुळे कार थेट आतपर्यंत आणता आली होती. त्याला तिथेच बाळापाशी थांबायला सांगून धनश्री पटापट चालत कार जवळ गेली . तिनी हळूच तिच्या मुलीला जागं केलं. समोर आपल्या आईला बघून ती खूप खुश झाली. धनश्रीला घट्ट मिठी मारत तिनी पहिला प्रश्न केला..."आई, आपल्या बाळाला काय झालंय?" सगळा धीर एकवटून धनश्री म्हणाली," अगं, सध्या थंडी आहे ना म्हणून सर्दी झालीये बाळाला. पण आपण सगळे मिळून देवाला सांगूया त्याला लवकर बरं करायला." बरं, चालेल " म्हणत छोटी ताई परत झोपेच्या अधीन झाली. तिला कडेवर उचलून आणून धनश्री नी खोलीतल्या आपल्या कॉटवर झोपवलं आणि ती पुन्हा ICU च्या दिशेनी धावली.

ती आत पोचली तेव्हा डॉक्टर तिच्या नवऱ्याशी बोलत होत्या." फायनली आता बाळाची कंडिशन स्टेबल झाली आहे.. पण अजूनही धोका टळला नाहीये. आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करतो आहोत ..पण मी तुम्हांला उगीच खोटी आशा नाही दाखवणार; बेबी या दिव्यातून जरी सुखरुप बाहेर पडलं तरी एक धोका अजून आहे...बराच वेळ ऑक्सिजन न मिळाल्यामुळे त्याच्या शरीरात काही irreversible damage झाला असण्याची दाट शक्यता आहे.. पण ते सगळं आत्ता सांगणं कठीण आहे.... Let us wait and watch."

तिथल्या नर्सला आवश्यक त्या सूचना देऊन डॉक्टर घरी गेल्या तेव्हा पहाटेचे साधारण साडेतीन चार वाजले होते. जाता जाता त्या धनश्रीला म्हणाल्या," तुम्ही पण झोप आता थोडा वेळ। तुम्हांला पण विश्रांतीची गरज आहे. ओली बाळंतीण आहात तुम्ही." उत्तरादाखल धनश्री कसंनुसं हसत म्हणाली," आता कुठली झोप मॅम...आता बाळाला सुखरुप घरी घेऊन जाईन तेव्हाच शांतपणे झोपेन."

तिच्या पाठीवर हात ठेवत तिला धीर देऊन डॉक्टर निघून गेल्या.

ICU मधली नर्स म्हणाली," तुम्ही दोघंही खोलीत जाऊन थोडा वेळ आराम करा. रात्रभर जागरण झालंय तुम्हांला. मी आहे इथेच. तसंही ICU मधे अटेंडन्ट ना थांबता येत नाही. तुम्ही अधून मधून येऊन बघून जा तुमच्या बाळाला."

तिचं म्हणणं बरोबरच होतं. त्यामुळे मनाविरुद्ध का होईना पण दोघं खोलीत गेले आणि तिथल्या खुर्च्यांवर विसावले.

त्यानंतरचे दोन तीन दिवस बाळाच्या तब्येतीत चढ उतार होत होते. डॉक्टर आणि नर्सेस त्यांच्याकडून प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. नातेवाईक आणि मित्र परिवारातले सगळे या अवघड प्रसंगी धनश्री आणि तिच्या नवऱ्याला सर्वतोपरी मदत करत होते. त्यांना धीर देत होते. काही जण त्यांच्या परीने तोडगे सुचवत होते.

इतर वेळी कदाचित धनश्रीच्या मनात या अश्या गोष्टींबद्दल शंका आली असती, पण आत्ता या परिस्थितीत ती तिच्या बाळासाठी काहीही करायला तयार होती.....बाळाच्या उशीखाली देवाचा फोटो ठेवण्यापासून ते त्याला दर तासानी अंगारा लावण्यापर्यंत सगळं सगळं करत होती. म्हणतात ना-'बुडत्याला काडीचा आधार' तसंच काहीसं !

कितीतरी नवस बोलून झाले होते तिचे.. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. सातव्या दिवशी सकाळी अचानक बाळाची तब्येत पुन्हा ढासळली.. डॉक्टरनी खूप प्रयत्न केले, जवळजवळ एक दीड तास झगडत होते सगळे ...धनश्री ICU च्या बाहेर उभी राहून काचेच्या दारातून सगळी धावपळ बघत होती. एकीकडे हातात देवाचा फोटो घट्ट पकडून महामृत्युंजय जप करत होती.....

थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आल्या आणि त्यांनी ते नको असलेले तीन शब्द उच्चारले, "I am sorry."

धनश्रीचं बाळ तिच्यापासून कायमचं लांब गेलं होतं. आता परत कधीच ते तिचं बोट मुठीत धरून झोपणार नव्हतं.

तिच्या मुलीला ही बातमी सांगताना धनश्री म्हणाली," इथल्या डॉक्टर आंटी आपल्या बाळाला बरं करू शकत नव्हत्या ना, म्हणून आता देव बाळाला त्याच्या घरी घेऊन गेलाय आणि लवकरच त्याला पूर्ण बरं करून परत पाठवणार आहे."

मुलीला सांगता सांगता तिनी स्वतःच्या मनाला पण हेच समजावलं.

दिवस सरत होते. धनश्री, तिचा नवरा आणि मुलगी हळूहळू वस्तुस्थिती स्वीकारायचा प्रयत्न करत होते. जे झालं त्याला देवाची मर्जी समजून त्यांनी कबूल केलं होतं.

तसंही 'जे होतं ते चांगल्यासाठीच' या विधानावर धनश्रीचा नेहेमीच दृढ विश्वास होता...पण तरीही तिच्या मनात मात्र बरेच प्रश्न होते....या घटनेतून नक्की काय चांगलं घडणार असेल? फक्त सात दिवसां करता त्या छोट्याशा जीवाला आमच्या आयुष्यात आणण्या मागे देवाचा काय हेतू असेल ? आमचा आणि त्या बाळाचा ऋणानुबंध तेवढाच होता का? पण मग त्या चिमुकल्या जीवाला इतक्या शारीरिक यातना का व्हाव्या? - असे हजारो अनुत्तरीत प्रश्न मनात दाबून ठेवून धनश्री तिच्या आयुष्याला पुन्हा सामोरी गेली.

कालांतरानी तिला दुसरी मुलगी झाली. त्यावेळी तिला वाटलं, "कदाचित देवानी माझं 'तेच' बाळ मला परत दिलं असेल. पण जर तसं असेल तर मग आधी हिरावून का घेतलं? आणि तेही त्याला इतक्या यातना देऊन? " खूप विचार करूनही तिला समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं.

तिची एक मैत्रीण म्हणाली,"तुझा आणि त्याचा इतकाच सहवास असावा." तर एकीचं म्हणणं होतं की,"या बाळाच्या हातून पुढे असं काहीतरी घडणार असेल की जे फक्त मुलीच्या जन्माला येऊन च शक्य होणार असेल."

यातलं काय खरं आणि काय नाही हे देवालाच माहीत होतं...सत्य स्वीकारून आयुष्यात पुढे जाण्याशिवाय धनश्रीकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. आणि म्हणूनच देवाकडे कुठलीही तक्रार न करता ती पुन्हा आपल्या संसारात रमली...नवरा आणि दोन्ही मुलींच्यात गुरफटून गेली. बघता बघता अठरा एकोणीस वर्षं लोटली. पण प्रत्येक वर्षी तिच्या मुलाच्या जन्मदिवशी आणि त्यानंतरच्या येणाऱ्या सातव्या दिवशी मनोमन ती तिच्या मुलाची आठवण काढत ते सात दिवस पुन्हा जगायची....कधीकधी तर तिला तिच्या बोटाभोवती बाळाच्या हाताची पकड देखील जाणवायची.त्या इवल्याशा नाजूक मुठीनी तिला अजूनही एका भाव बंधनात बांधून ठेवलं होतं.

कितीतरी वेळा तिच्या मनात यायचं...कुठे असेल आत्ता माझा बच्चू? परत माझ्याच जवळ आलाय का कुठे दुसरीकडे असेल ? जिथे कुठे असेल तिथे सुखात असू दे..बस्स् ..

कधीतरी वाटायचं की 'कुठल्याही प्रकारे का होईना पण या प्रश्नाचं उत्तर मिळावं.' शेवटी तिनी हे सगळं देवावर सोपवलं...मनोमन त्याची प्रार्थना केली..'देवा, तुला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा माझ्या या प्रश्नाचं उत्तर माझ्यापर्यंत पोचव.आणि ते सत्य स्वीकारायची ताकद ही दे मला!'

एकदा बोलता बोलता तिची एक खास मैत्रीण तिला म्हणाली," माझ्या ओळखीत एक Tarot card reader आहे...She is really good in her field...मला मनापासून वाटतंय की तू एकदा तिला भेट आणि तिच्याशी बोल." धनश्री ला वाटलं देवानी शेवटी तिची प्रार्थना ऐकली.

लवकरच त्या tarot reader ला भेटायचा योग आला. सुरुवातीच्या काही मिनिटातंच धनश्रीला तिच्याबद्दल एक विश्वास वाटायला लागला.. त्या दोघींच्यात एक instant connection असल्याचं जाणवलं तिला. आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय; पण आज पर्यंत मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी दाबून ठेवलेलं सगळं सगळं बाहेर पडलं. तिच्या मनातले हे सगळे विचार धनश्रीनी अगदी स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा कधी नव्हते सांगितले...त्याला उगीच मानसिक त्रास होईल म्हणून! पण आज तो बांध फुटला होता.

तिच्या त्या नवीन मैत्रिणीनी पण अगदी शांतपणे सगळं ऐकून घेतलं. काही क्षण डोळे मिटून ध्यान लावलं आणि मग तिनी धनश्रीसाठी Tarot reading सुरू केलं. पुढचा जवळजवळ एक तास ती बोलत होती आणि धनश्री ऐकत होती. तिच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द धनश्रीच्या मनाला पटत होता.. कानांवर पडणारे ते शब्द हळूहळू तिच्या मनातलं विचारांचं वादळ शांत करत होते... जणू काही एखाद्या वर्षानुवर्षं भटकणाऱ्या व्यक्तीला अचानक एक योग्य दिशा मिळावी तसं काहीसं झालं होतं.

या सगळ्या मंथनातून धनश्रीला जे गवसलं होतं त्याची सत्यता पडताळून बघणं कठीण आहे...कारण प्रश्न शेवटी विश्वास आणि श्रद्धेचा आहे....ज्यांचा tarot किंवा तत्सम गोष्टींवर विश्वास नाही त्यांना हे सगळं नाही पटणार...पण याचा अर्थ 'हे सगळं निरर्थक आहे' असा होत नाही..शेवटी काय- मानला तर देव नाहीतर दगड!

पण त्या दिवशी धनश्रीला मात्र सगळं पटलं.. तिची कार्ड्स बघून तिची मैत्रीण म्हणाली," तुझ्या मुलाला मुक्ती मिळाली आहे. In fact, त्या आत्म्याला मुक्ती हवी होती आणि म्हणूनच त्यानी तुझ्या पोटी जन्म घ्यायचं ठरवलं."

हे ऐकून धनश्री बुचकळ्यात पडली," त्यानी ठरवलं म्हणजे?" त्यावर ती मैत्रीण म्हणाली," आम्ही असं मानतो की 'The soul chooses the womb."

" पण मग त्यानी मलाच का निवडलं?" धनश्रीच्या मनातला गोंधळ तिच्या या प्रश्नात दिसत होता.

"He chose you because of the purity of your womb. आणि इथे purity म्हणजे अंतर्गत शारीरिक स्वच्छता नाही हं ... तर मन, आत्मा आणि आध्यात्मिक पातळीवरची purity.....त्यामुळे आता तू निश्चिन्त हो ! तुझ्यामुळे एका आत्म्याला मुक्ती मिळाली आहे."

"पण मग त्याला इतक्या शारीरिक यातना का सहन कराव्या लागल्या ?" धनश्रीच्या डोळ्यांसमोर ICU चं ते चित्र पुन्हा एकदा उभं राहिलं.

"ते सगळे त्या आत्म्याचे या जन्मीचे भोग होते. तू असं समज की त्याचा तो backlog राहिला होता आणि मुक्ती मिळण्यासाठी तो क्लिअर करणं आवश्यक होतं. पण आता तो या सगळ्यांच्या पलीकडे पोचला आहे आणि त्याच्या या प्रवासात तुझा खूप मोठा वाटा आहे."

धनश्रीला तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. इतक्या वर्षांपासून वारंवार मनात डोकावणारे प्रश्न आता अचानक नाहीसे झाले होते. 'कुठे असेल माझं बाळ?' या प्रश्नाचं उत्तर सापडलं होतं...आणि मुख्य म्हणजे इतकी वर्षं ती जे वेगवेगळे अंदाज बांधत होती त्या सगळ्यांपेक्षा कितीतरी उच्च पातळीवर जाऊन पोचलं होतं तिचं बाळ! आणि त्यासाठी काही अंशी तरी का होईना पण ती कारणीभूत होती.

या नुसत्या विचारानीच आता धनश्रीला एक वेगळीच तृप्तता जाणवत होती. अचानक त्या दोघांमधलं आई-मुलाचं नातं एक नवं soulful स्वरूप घेऊन समोर आलं होतं.

तिचं आणि तिच्या बाळाचं ते मुठीतलं नातं आता तिला सांकेतिक वाटायला लागलं.

म्हणजे- एखाद्या गर्दीच्या ठिकाणी रस्ता पार करून जाताना जसं एखादं मूल त्याच्या आईचं बोट धरून चालत असतं ना....तसंच काहीसं वाटलं तिला !

आणि म्हणूनच जेव्हा दुसऱ्या बाजूला जायची वेळ आली तेव्हा तिचं बोट सोडून निघून गेलं तिचं बाळ!

पण गंमत म्हणजे आता या विचारानी धनश्रीला दुःख नव्हतं होत.......त्याउलट -'आता माझ्या बाळाला कधीच कुठल्याही प्रकारचे कष्ट, क्लेश सहन करावे नाही लागणार....तो आता निरंतर सुखात राहणार...' या नुसत्या विचारानीच ती धन्य होत होती.

इतकी वर्षं ज्या नाजूक, गुलाबी मुठीच्या बंधनात ती अडकून होती त्याच बंधनामुळे तिच्या बाळाला मुक्ती मिळाली होती !

||ओम्||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माफ करा पण दिवाळीच्या दिवसांत असं गुढ आणि नकारात्मक लिखाण तुमच्याकडून अपेक्षित नव्हतं... (तुमचे याआधीचे लेख वाचले आहेत त्यामुळे हे प्रकर्षाने जाणवलं). सत्यघटनेवर आधारीत असल्याने तर जास्तच त्रास झाला.

अमा, वत्सला...खरं म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मी काही दिवसानंतर हा लेख share करायला हवा होता. पण हे सगळं लिहिताना आणि त्यानंतर माझ्या मनाची जी अवस्था होती त्यात ही दिवाळीची गोष्ट लक्षातच नाही आली.तुम्हांला जो मनस्ताप झाला त्याबद्दल अगदी मनापासून सॉरी. या पुढे नक्की काळजी घेईन. Happy

अमा, वत्सला...खरं म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मी काही दिवसानंतर हा लेख share करायला हवा होता. पण हे सगळं लिहिताना आणि त्यानंतर माझ्या मनाची जी अवस्था होती त्यात ही दिवाळीची गोष्ट लक्षातच नाही आली.तुम्हांला जो मनस्ताप झाला त्याबद्दल अगदी मनापासून सॉरी. या पुढे नक्की काळजी घेईन. Happy

निमिता, काल लेख वाचल्यावर जे वाटलं ते फार विचार न करता लिहून टाकलं. ... पण नंतर त्याचंही वाईट वाटलं. एव्हढ्या टोकेरी प्रतिसादाबद्दल मीच तुमची माफी मागते!
मला वाचून एव्हढं वाईट वाटलं तर जी आई यातून गेली आहे तिच्या मनःस्थितीची कल्पना करवत नाही.

निमिता,
जमलीये कथा. सत्यघटना आहे वाचुन वाईट वाटलं.

दिवाळी आहे तर सगळंच छान छान गुडगुड च हवं का?
अगदी कुणी लेख कविता पण छान छान च लिहायच्या?
आणि त्या तशा नसतील तर दिवाळीच्या दिवसात न प्रकाशित करता दिवाळी संपल्यावर प्रकाशित कराव्यात?
दु:खी, निराशाजनक कथा दिवाळीच्या दिवसात आल्याने / वाचल्याने नेमकं काय होतं ?
मला तर माबोफेमस "बाब्बो! दिवाळीच्या दिवसात नॉन्वेज" ची आठवण आली वरचे प्रतिसाद वाचुन.

दु:खी, निराशाजनक कथा दिवाळीच्या दिवसात आल्याने / वाचल्याने नेमकं काय होतं ?
मला तर माबोफेमस "बाब्बो! दिवाळीच्या दिवसात नॉन्वेज" ची आठवण आली वरचे प्रतिसाद वाचुन.>> +१ अगदी!

दु:खी, निराशाजनक कथा दिवाळीच्या दिवसात आल्याने / वाचल्याने नेमकं काय होतं ?
मला तर माबोफेमस "बाब्बो! दिवाळीच्या दिवसात नॉन्वेज" ची आठवण आली वरचे प्रतिसाद वाचुन.
>>>
+१

माझ्याने फारशी वाचवली गेली नाही . सध्या न वाचलेलीच बरी.