©अन्न हे पूर्णब्रह्म

Submitted by onlynit26 on 3 November, 2018 - 04:30

©अन्न हे पूर्णब्रह्म

"आई आज टिफीनमध्ये भाजी कोणती दिलीय?" तेजसने केस विंचरताना विचारले.
" वाटाण्याची उसळ. " तो खुश होईल म्हणून प्रमिलाताई तेजसकडे पाहू लागल्या.
" काय गं, आज पण वाटाण्याची उसळ?"
" तुला आवडते ना?"
" हो, पण त्या दिवशी पण केली होती ना?"
" कोणाला म्हणे वाटाण्याची उसळ, कधीही दिली तरी नको होणार नाही एवढी आवडत होती." प्रमिलाताई लेकाकडे पाहून हसल्या.
" आई मी सिरियसली सांगतोय, मला ही वाटाण्याची उसळ नकोय टिफीनमध्ये " तेजस चिडतच म्हणाला.
" मग , रात्रीची भरलेले कारले देऊ का?"
" आई, हे अति होतय, तुला माहीत आहे ना मला कारले अजिबात आवडत नाही ते"
" अरे मग , तुला आवडती भाजीही आवडत नाही आणि नावडतीही आवडत नाही" असे बोलून त्या किचनमध्ये गेल्या. लेकासाठी एका डब्यात दही भरून घेऊन आल्या. ते पाहून तेजस वैतागलाच.
त्याने काही न बोलता फक्त चपातीचा डबा घेवून तो बॅगमध्ये भरला. काही वेळात ऑफिससाठी निघूनही गेला.

प्रमिलाताईना हे नवीन नव्हते. एकुलता एक लेक म्हणून त्याचे सारे नखरे सहन करत होत्या. बरं नवरा आणि मुलाचे वेगवेगळे नखरे होते; ते सांभाळताना त्यांची त्रेधातिरपीट उडायची. नखरे जरी नसते तरी रोज रोज काय भाजी करायची हा यक्ष प्रश्न बायकांपुढे असतोच.

तेजस ऑफिसमध्ये पोचला तेव्हा दहा वाजून गेले होते. वाटेत त्याला संकेत दिसला.
" अरे तेजस आज टिफीनमध्ये भाजी काय आहे?" त्याने मिटक्या मारत विचारले.
" तू सकाळीच डोक्यात नको जाऊस, बँगलोरला पाठवायच्या लायब्लिटी स्टेटमेंटचे काय झाले ते सांग." तेजस आपल्या डेस्कवर बॅग ठेवत म्हणाला.
" अरे मी ते मेल करणारच होतो पण केतकीने आणलेल्या आंबोळ्या दिसल्या आणि त्या मस्त चहासोबत मटकावल्या." हे ऐकून तेजसने कपाळावर हात मारला.
" तुम्हाला खाण्याशिवाय काही दिसत नाही काय रे?" हे ऐकायला संकेत तिथे नव्हता, हे पाहून तो अधिकच चिडला.

तेजसची दुपारपर्यंत चिडचिड चालूच होती. त्यात आज ऑफिस प्युन आला नव्हता . सगळी छोटी मोठी कामे त्यालाच करावी लागत होती.
'लंच ब्रेक झाला' असे सगळ्यांना सांगत संकेत त्याच्या डेस्ककडे येताना दिसला. तेजसनेही आवराआवर करत बॅगमधून टिफिन काढला. आपण भाजी आणली नाहीये हे त्याच्या लक्षात आले. बॅगच्या मागच्या कप्प्यामधून आपले वॉलेट काढत तो जाऊ लागला.
" हे काय? तू कुठे जातोयस?" संकेतने त्याला अडवत विचारले.
" अरे मी आज भाजीच आणली नाहीये, ती आणायला खाली जातोय."
" माझ्याकडे आज खुप आहे भाजी, त्यातली घे."
" काय आहे भाजी?"
" माझी आई सांगते असले प्रश्न कधी कधीच विचारायचे नाहीत, समोर आलेल्या अन्नाची स्तुती करत ते पोटात घ्यायचे." संकेतचे हे अन्न तत्वज्ञान ऐकून तेजस हसला.
" बरं, मला तुम्ही कोणते चविष्ठ पक्वान्न चपातीसोबत खायला देणार आहात ?" तेजसने हसत विचारले.
" आईने, क्रीस्पी, डीलिशिअस आणि माउथवॉटरींग असा पदार्थ टिफीनमध्ये दिलाय, ओळख बघू." संकेत अभिनय करत सांगू लागला.
" बटटाट्याची कापं?"
" नाही, माय फेवरेट भरलेले कारले." असे बोलत संकेत खोखो हसत सुटला. त्याला माहीत होते कि तेजसला कारले हा प्रकार अजिबात आवडत नाही. पण त्याला चिडवायला संकेतला मजा यायची. संकेतच्या हसण्यावर रिऍक्ट न होता तेजस भाजी आणायला निघून गेला.

तेजस मनातल्या मनात ऑफिस प्यूनला बडबडत हॉटेलजवळ पोचला. तो असता तर त्याला खाली उतरायला लागले नसते.
हॉटेल काउंटरला पैसे द्यायला त्याने वॉलेट उघडले असता त्यात फक्त त्याला दहा रूपये असल्याचे दिसले. पार्सल तसेच ठेवायला सांगून तो एटीएम सेंटरकडे निघाला. जवळचे एटीएम बंद असल्याने त्याला तिथूनच पुढे असलेल्या गलीतल्या एटीएम सेंटरमध्ये जावे लागले. तो मनातल्या मनात चरफडला.
गल्लीतील एटीएम सेंटर हे सहकारी बँकेचे असल्याने तिथे देखील पैसे मिळतील कि नाही , या बद्दल शंकाच होती.
एटीएमच दरवाजा ढकलून तो आत आला. आत आल्यावर त्याला अधिकच गरम जाणवू लागले.
" काय ओ, बँकेने एटीएममध्ये एसी बसवली नाहीये का?" तिथे बसलेल्या एका सुरक्षारक्षकाला त्याने विचारले.
तो काहीतरी म्हणाला पण त्या नीटसे समजले नाही. अशातच त्या सुरक्षारक्षकाला जोराचा ठसका लागला.
" सॉरी काका, तुम्ही जेवताय का?" आपण जेवताना प्रश्न विचारल्यामुळे त्यांना ठसका लागला. त्याबद्दल तेजसला वाईट वाटले.
तो त्यांच्याकडे गेला. तिथला प्रकार पाहून त्यांच्या मागे उभ्या असलेल्या तेजसच्या डोळ्यात आपोआप पाणी तराळले. ते काका पाण्यासोबत सुकी भाकरी खात होते.
" काका तुम्ही पाण्यासोबत भाकरी का खाताय?" असे तेजसने विचारल्या बरोबर ते काका चमकले. आपली भाकरी आणि भरलेली पाण्याची वाटी लपवू लागले.
"अरे , भाजी आणली होती रे, आताच संपली." काका असे म्हणाले खरे पण तिथे त्यांनी भाजी आणल्याची एकही खूणा नव्हती. तेजस काय समजायचे ते समजला. त्यांना अधिक प्रश्न न विचारता एवढेच म्हणाला.
" काका तुम्हाला मुलं किती?"
" दोन, शिकत आहेत."
" तुम्हाला तुमच्या मुलांची शपथ, या पुढचा एकही घास तुम्ही भाजीशिवाय घेणार नाहीत. अजून पाच मिनिटे थांबा. मी आलोच." असे बोलून तेजस एटीएम मधून पैसे काढून बाहेर पडला.
काका त्याच्या अवताराकडे पाहतच राहीले. त्यांचा भाकरीचा घास हातात तसाच राहीला.
तेजस लगेचच भाजी घेऊन आला होता. त्यांच्याकडे भाजी देत बाजूला बसला.
"काका, जेव्हा कधी तुमच्या टिफीनमध्येकडे भाजी नसेल तेव्हा यातले पैसे भाजीसाठी खर्च करायचे." हातातले ५०० रूपये त्यांच्या खिशात घालत तेजस म्हणाला.
" बाळ, तू एवढे का करतोयस माझ्यासाठी?"
" काही नाही काका, तुम्हाला नाही समजणार." डोळ्याच्या ओलावलेल्या कडा पुसत तेजस तिथून निघाला.

तो ऑफिसमध्ये आला तेव्हा सगळे त्याच्यासाठी जेवायचे थांबले होते.
" अरे भाजी आणायला गेलास ना? त्याचे रिकामे हात बघून संकेत म्हणाला.
" अरे एटीएममध्ये पैसेच नव्हते, तुमच्याकडे भाजी आहे ना, मग झालं." तेजस टिफिन घेत म्हणाला.
" ठीक आहे चला तर मग." संकेत म्हणाला.
सगळे जेवायला बसले. तेजसनेच सगळ्यांचे टिफीन उघडले. संकेतकडे कारले, केतकीने काळ्या वाटाण्याची उसळ आणली होती, विशालने गवार आणि स्नेहाने शिमला मिरचीची भाजी आणली होती. सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. कोणाकडचीच भाजी तेजसच्या आवडीची भाजी नव्हती. तो सगळ्यांकडची भाजी ताटात घेऊ लागला तेव्हा सर्वांनी तोंडात बोट घातली.
" तोंड उघडी नका टाकू, मी फोटो दाखवतोय तो जरा झुम करून बघा." त्याने मोबाईल काढून एटीएम मध्ये पाण्यासोबत भाकरी खाणाऱ्या काकांचा फोटो दाखवला. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं.
" संकेत तुझ्या आईचे अन्न तत्वज्ञान पटतेय रे, जगात असे
बरेच लोक आहेत, ज्यांना पुरेसे अन्न भेटत नाहीये. उपाशी मरत आहेत. अर्धपोटी झोपत आहे. कुपोषित लोकांच्या विषयीही बातम्या पेपरला येतात. हे सर्व वाचून आपण पुढचे पान उलटतो. आपल्याला त्यांच्या बद्दल जाणीव होत नाही, पण जेव्हा एखादा प्रसंग आपल्यासमोरच घडतो तेव्हा माझ्यासारखा अन्नासाठी नखरे करणारा माणूस मात्र आतून पूर्णपणे बदलतो." तेजसला पुढे काही बोलवेना.
अन्न हे कोणतेही असो ते पूर्णब्रह्मच असते.. त्याला कधीच नाकारू नये, लाथाडू नये..

समाप्त..

© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत. लेखकाच्या नावासहीत ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही. तसे न झाल्यास कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.
-------------------------------------------------------
लेखक - नितीन दशरथ राणे.
सातरल - कणकवली
सध्या वास्तव्य - बदलापुर (ठाणे )
मोबाईल नं. ९००४६०२७६८
दिनांक - ०३.११.२०१८

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान! आवडली.
पण एक सांगू का? तुमच्या आधीच्या कथा जास्त सहज, ओघवत्या वाटायच्या. काही संदेश देण्यासाठी लिहिलं आहे असं वाटायचं नाही. पण हल्ली तुमच्या कथांमध्ये असं जाणवतं की काही तरी संदेश द्यायचा हे ठरवून लिहिलंय. तुम्ही लिहिता छानच, त्यामुळे कथा उत्तम दर्जाच्याच आहेत. पण सहजता कमी झाली आहे.

मुद्दाम जुळवा जुळव करुन उपदेश कथा झालीय, वॉलेट मध्ये फक्त १० ची नोट घेवून कोण फिरते का असे चांगल्या पदावर असणारे कोणी !

मस्त, संदेश पण छान!
ही कथा नावासहित कायप्पवर फिरतेय .>>>> मला हे "काय्यप "खूप आवडले ...