माझ्यासवे जरासा

Submitted by निशिकांत on 2 November, 2018 - 06:01

परकेच भोवताली
ठेऊ कसा भरवसा?
मी बोलतोय हल्ली
माझ्यासवे जरासा

शोधीत माणसांना
फिरण्यात जन्म गेला
असल्यामुळे पशूंनी
मी पूर्ण घेरलेला
साधा मनुष्य दिसता
वाटे हवाहवासा
मी बोलतोय हल्ली
माझ्यासवे जरासा

जाता मुले विदेशी
सुविधा घरात आल्या
परिचय जुना असोनी
भिंती अबोल झाल्या
शापास या भयानक
उ:शाप ना दिलासा
मी बोलतोय हल्ली
माझ्यासवे जरासा

आलोय एकटा अन्
जाणार एकटा मी
ना थोरला कुणाचा
आहे न धाकटा मी
नाही कुणीच, माझा
ऐकावया उसासा
मी बोलतोय हल्ली
माझ्यासवे जरासा

देईन गारद्याला
मज मारण्या सुपारी
सुकल्यात पार माझ्या
हृदयातल्या कपारी
झालाय जीव आता
माझा मला नकोसा
मी बोलतोय हल्ली
माझ्यासवे जरासा

केली कधी शिकायत?
तू सांग चक्रपाणी
सुखदु:ख भोगताना
मी गायलीत गाणी
मैफिल सरेल केंव्हा
कर एवढा खुलासा
मी बोलतोय हल्ली
माझ्यासवे जरासा

निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देईन गारद्याला
मज मारण्या सुपारी
बापरे एवढं काय झालं
कविता म्हणून चांगली.

केली कधी शिकायत?
तू सांग चक्रपाणी
सुखदु:ख भोगताना
मी गायलीत गाणी
मैफिल सरेल केंव्हा
कर एवढा खुलासा
मी बोलतोय हल्ली
माझ्यासवे जरासा

अप्रतिम!! भारी!