उत्सव...

Submitted by झुलेलाल on 31 October, 2018 - 00:37

आजही काहीच पत्ता लागला नाही. दोन दिवसांपासून घरात अक्षरश: सुतकी वातावरण होतं. मुलांच्या डोळ्यातील पाण्याला तर खळ नव्हता. धाकट्या मुलीने तर कालपासून काहीही खाल्लेदेखील नव्हते. तोदेखील विषण्ण होऊन घरात बसला होता. एवढा शोध घेऊनही सापडत नसल्याने स्वत:वरच चरफडत होता. भिंतीवरचा त्याचा फोटो पाहून तर त्याला रडूच कोसळले.
... तेवढ्यात फोन वाजला. त्याने क्षणाचाही विलंब न लावता फोन कानाला लावला.
‘हॅलो, मी वृद्धाश्रमातून बोलतोय. तुम्ही दिलेली जाहिरात वाचली. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला तुमचा कुत्रा इथे आलाय. तुमच्या आईशी खेळतोय. लवकरात लवकर या आणि तुमच्या कुत्र्याला घरी घेऊन जा!’
फोन कट झाला. तो आनंदाने उचंबळत होता.
‘टाॅमी सापडला!’ तो आनंदाने ओरडला, आणि मुलं त्याला बिलगली.
... पुढच्या क्षणाला घरात आनंदोत्सव सुरू झाला!!

Group content visibility: 
Use group defaults