आणखी एक…. (गूढ कथा) --- राजश्री बर्वे

Submitted by Rajashree Barve on 29 October, 2018 - 15:03

आज प्रज्ञा येणार आहे. माझ्या घरी. आज परत तो दिवस. निर्णयाचा. होकार की नकार. चार महिने फिरतोय आम्ही. एकमेकांना आवडतोय. एकमेकांच्या खूप जवळ आलोय. ते मान्यही केलंय. पण लग्नाचं पक्कं झालं नाहीय. म्हणजे झाल्यातच जमा आहे. माझ्याकडून तर नक्की. पण प्रज्ञाचं आज नक्की काय ते ठरेल. तसं तर मागेही ठरलं होतंच की. एकदा नव्हे दोनदा. त्या दोघींबरोबर…. तरीही बिनसलंच… तुटलंच… जोवर बाहेर फिरणं असेल तोवरच चालू रहातं. पण घरी आणलं की बिनसतं. हमखास. माझी जन्मदात्री,माझी आई माझ्याजवळ राहायला मागत नाही तर ह्या तर परक्या बायका. त्या राहतील ही अपेक्षा ठेवणंच चुकीचं. पण वाटतेच ना आशा !! ती ठेवावीच लागते आयुष्यात. नाहीतर जगणं कठीण होऊन जाईल माणसाला.
आई म्हणते “तू बदल”
पण मी म्हणतो, “का?”
खरंच का बदलावं माणसाने? कशासाठी स्वतःला बदलायचं? त्यापेक्षा गुणदोषांसकट एकमेकांना स्वीकारलं तर नाही चालणार? आणि हो. मला नाही बदलायचंय स्वतःला. मला जे आवडतं, रुचतं तेच मी करणार. काकाने नाही का केलं? आणि काकीने स्वीकारलंच ना त्याला? ती नाही त्याला सोडून गेली सर्व कळूनही?
आईला दुःख होतं, मला काकाकडे ठेवल्याचं. चांगलं शिक्षण मिळावं म्हणून ठेवलंन तिने मला त्याच्याकडे. पण मी भलतंच शिक्षण घेतलं. अर्थात हे तिचं मत. माझं नव्हे. आता काळी जादू करणं ह्यात काय वाईट आहे? मला तर खूप रस वाटतो त्यात. ब्लॅक मॅजिक… तंत्र मंत्र, सुया टोचलेली बाहुली, मंतरलेला केस, उभं चिरलेलं लिंबू, बुक्का, कुंकवाचा मळवट…. सारं काही इंटरेस्टिंग… खूप खूप इंटरेस्टिंग… माझं मन रमतं त्यात. आता ह्यात माझा काय दोष आहे? तसंही नोकरीत किंवा अगदी सरळसोट बिझनेस मध्ये तरी काय ठेवलंय? आणि सर्वांनी सरधोपट मार्गानीच जावं असं थोडंच आहे? शेवटी उपजीविकेचं, पैसे मिळवायचं काहीतरी साधन हवंच ना? ते हे असलं म्हणून कुठे बिघडलं? आणि नोकरीत म्हणा किंवा बिझनेस मध्येही काही जण वाममार्गाने पैसे मिळवतातच ना? मग हाच व्यवसाय वाईट का म्हणायचा?
किती माणसं येतात माझ्याकडे. काही जणं स्वतःच्या उत्कर्षाकरता येतात. करिअरकरता कित्येक तरुण येतात.तारुण्य, सोंदर्य टिकवण्याकरता तर नटयाही येतात. पण जास्त करून लोकं कोणाशीतरी वैर घेऊनच येतात. दुसऱ्याच्या वाईटावर किती जणं असतात ! असू देत बापडी. अशी माणसं आहेत म्हणूनच चालतंय माझं. अर्थात मी हा माझा बिझनेस कुणालाच सांगत नाही. माझ्या ह्या मोठाल्या घरातली एक खोली मी ह्याच कामाकरता ठेवली आहे. बाहेरच्यांना त्याचा थांगपत्ता लागत नाही. शक्यतो ज्याचं काम आहे त्यांना बाहेरच भेटतो. बाहेरही घरापासून लांब एक खोली भाडयाने घेतली आहे. माझं बरचसं काम त्या तिथेच चालतं.
माझ्या घरातील ही खोली मी शक्यतो एकटा असतानाच वापरतो. क्वचित कधी होम करायचा असेल किंवा ध्यान लावायचं असेल किंवा बाहेरगावच्या माणसांची कामं असतील तरच मी ती इथे करतो. मी बाकी सर्व कामात निष्णांत झालो आहे पण कुणाच्या मनाचा ताबा घेणं मला अजून जमत नाही. ते जर जमलं असतं तर मी इतके दिवस लग्नाचा राहिलोच नसतो. त्यामुळे मला त्या कामाची खूप प्रॅक्टीस करावी लागते. माझी शक्ती वाढवण्याचं काम मी माझ्या खोलीत करतो.
मला ह्या सर्व गोष्टींकरता जे सामान लागतं ते मी इथेच ठेवतो.मेणबत्त्या, हळद लावलेले तांदूळ, गोणपाटाचे कापड, तुटलेल्या काचा, नखांचे तुकडे, सुया, सुऱ्या आणि तत्सम धारदार वस्तु ह्या सर्व गोष्टी तर इथे आहेतच पण त्याव्यतिरिक्त प्रेत जाळल्यानंतर होणारी राख, विविध प्राण्याच्या कवट्या एवढच कशाला माणसाच्या हाडांचा सांगाडा असं सगळं सामानही इथे आहे. त्यामुळे बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला इथे अजिबात प्रवेश नाही. लोकांना सांगायला ती अडगळीची खोली आहे. आई माझ्याकडे अगदी क्वचितच येते. पण तीही त्या खोलीजवळ फिरकत नाही.
मला खात्री आहे. प्रज्ञा जरी घरी आली तरीही तिला हे सर्व कळणार नाही. ब्लॅक मॅजिकचं. पूर्वीच्या दोघींना तरी कुठे कळलं होतं? पण तरीही त्यांनी नकार दिलाच की. नकाराचं कारण म्हणजे माझ्याकडे असणाऱ्या काळ्या मांजरी. मला काळं मांजर फार आवडतं.काळं म्हणजे साधं काळं नाही तर अगदी काळं कुट्ट. तुकतुकीत काळं. आता ह्यात नकार देण्यासारखं काय आहे खरं तर. काहीजणं कुत्रे नाही का पाळत. कुत्रे पाळणा ऱ्याचं केवढं अप्रूप असतं लोकांना ! मला मात्र कुत्रे अजिबात आवडत नाहीत. त्यांच्या त्या मालकाबद्दलच्या पझेसिव्हपणाचा मला अगदी राग येतो. कुणावरही एवढं प्रेम करायची काय गरज आहे ? त्यापेक्षा मांजरीसारखं असावं. त्या कशा सर्वांपेक्षा जास्त प्रेम स्वतःवर करतात. नेमका मला हाच गुणधर्म आवडतो. आता मांजरीमध्येही काळ्या मांजरीचं का ? ह्याचं उत्तर माझ्याकडेही नाही. आवडतात झालं.
माझी पहिली काळी मांजर माझ्याकडे एका पावसात आली. झाली त्याला आता बरीच वर्ष. मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असेन. तसे काकाकडून मंत्र तंत्र विद्या शिकणं चालूच होतं. पण आईच्या दबावामुळे नोकरीच्या शोधातही होतो. त्याच दिवशी मी पहिली मूठ मारली होती. काय होतंय ह्या टेन्शनमध्ये होतो. काकाचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. पण मीच डळमळीत होतो. त्याच दिवशी ती पहिली मांजर आली. बघताच तिच्या प्रेमात पडलो. काळी कुट्ट पण तुकतुकीत. गारगोटयासारखे चकचकीत डोळे. हिरवे आणि भेदक. त्या डोळ्यांमध्ये पाहताना का कुणास ठाऊक पण मला माझी शक्ती वाढल्याचा भास झाला. त्या दिवशी मारलेली मूठ यशस्वी झाल्याचं तीन तासांत कळलं. मग काय जाम खुश झालो मांजरावर. शुभशकुनी म्हणून तिला पाळायचं ठरवून टाकलं. ती मांजर तेंव्हा प्रेग्नंट होती. म्हणून तिचं नाव पेटू ठेवलं. ते कायमचंच. पेटुला पाच पिल्लं झाली. त्यातली दोन गेली. उरलेल्या तिघांमधील एक पांढरं होतं. ते देऊन टाकलं. उरलेली दोन पेटुसारखीच. काळी कुळकुळीत. चकचकीत. ती ठेवून घेतली. नंतर मग मांजरी पाळायचा छंदच जडला.
आता काका काकी दोघंही नाहीत. आई असून उपयोग नाही. ती माझ्याजवळ राहायला तयार नाही. माझ्याकरता मुलगी बघायलाही तयार नाही. मी एकटाच राहतो आणि माझ्याबरोबर ह्या पाच काळ्या मांजरी. जगाला विचित्र वाटतं. काही जणं घाबरतात. काही जणांना किळस वाटते. ह्या मांजरीमुळे माझ्या घरात कोणी फिरकत नाहीत. मला त्याची पर्वा नाही. माझा तर वेगळाच कयास आहे. माझ्या मते काळ्या मांजरी काळ्या जादूला पूरक आहेत. त्यांच्या वास्तव्याने ब्लॅक मॅजिकची पाॅवर वाढते. माझा तरी तसाच अनुभव आहे. कारण दिवसेंदिवस मला माझी शक्ती वाढल्याचा अनुभव येतो आहे. आणि मला ती अजून अजून वाढवायची आहे.
आता सामान्य माणसाप्रमाणे मलाही संसार थाटावासा वाटतो आहे. मी गेल्या दोन वर्षांपासून त्या प्रयत्नात आहे. मागच्या दोन्ही मुलींनी माझ्यावर मनापासून प्रेम केलं. अर्थात मीही त्यांच्यावर केलं. पण परिणीती लग्नात झाली नाही. त्यांना घरी घेऊन आलो होतो. आज प्रज्ञाला आणणार आहे तसाच. काळ्या जादूचं लपवायचं पण काळ्या मांजरीचं नाही असं पहिल्यापासूनच ठरवलं आहे. पहिली घरी आली तेंव्हा मांजरींना पाहूनच घाबरली. दरवाज्यातून आतही यायला तयार नाही. शेवटी मांजरींना त्या अडगळीच्या खोलीत ढकललं. खोलीला कडी लावून घेतली. मग कुठे ती आत तरी आली. पण तेंव्हाच तिने अट घातली. मांजरी किंवा ती कुणा एकालाच निवडावं लागेल. माझ्याकडे चाॅईस होता. मग मी माझ्या मनाप्रमाणेच निवड करणार ना? तेच दुसरीच्या बाबतीतही घडलं. आणि आता प्रज्ञा येणार आहे.
प्रज्ञा तशी स्मार्ट आहे. तिला प्राणी आवडतात असंही ती म्हणाली होती एकदा. तिने हो म्हटलं पाहिजे. म्हणजे हा प्रश्न कायमचा निकालात निघेल. आता धीर धरवत नाही. हे लग्न ठरलंच पाहिजे.
बेल वाजली. मी दरवाजाजवळ जायच्या आतच पेटू गेली. तुम्हाला खोटं वाटेल पण पेटुला लॅच उघडता येतं. उडी मारून. प्रज्ञाने प्रथम तिलाच पाहिलं. आधी दचकली. पण मग लगेच सावरली. तिने पेटूच्या अंगावरून हात फिरवला. तसा माझा जीव भांडयात पडला. पहिला गड तर सर झाला. मी प्रज्ञाचं स्वागत केलं. ती येउन सोफ्यावर बसली. ती बसली खरी पण तिच्या लक्षात यायला वेळ लागला की तिच्या बाजूलाच सोफ्यावर पेटुची मुलं कल्लू आणि शेरी बसले आहेत. मी प्रज्ञाकडे मोठया आशेने पाहत होतो. अजून दोन मांजरी पाहून तिच्या कपाळावर सूक्ष्म अशी आठी उमटलीच. हा नकाराचा अलार्म तर नव्हता.
“काय रे? ह्या मांजरी तुझ्या?” मी नाही म्हणावं अशी तिची अपेक्षा असणार पण माझा नाईलाज होता.
“हो मग? दुसऱ्या कुणाच्या?” कुठूनतरी आत्मविश्वास गोळा करून मी म्हटलं.
“तुला इतक्या आवडतात मांजरी? आणि त्याही काळ्या?” मला ह्याच गोष्टीचा राग येतो. काळं असलं तर काय होतं. गोऱ्या गुबगुबीत मांजरी आवडल्या तर त्याचं लोकांना एवढं आश्चर्य वाटत नाही. पण मला आता वाद घालायचा नव्हता.ह्या क्षणी प्रज्ञाच्या होकाराइतकं महत्वाचं दुसरं काहीच नव्हतं.
“हो आवडतात मला काळ्या मांजरी.”
“ह्या तीन झाल्या. अजून किती आहेत?” तिचा स्वर थोडा घाबरलेला होता का? की मला उगाच तसं वाटतंय. मी ते उत्तर दयायच्या आत आतून बाहेर आलेल्या अजून दोन मांजरीनी दिलं. राणी आणि मधु. त्या एकमेकींशी भांडत गुरकावत आतून बाहेर आल्या. माझ्या पाचही मांजरी आता तिच्या समोर आल्या होत्या. तिच्या कपाळावरच्या आठ्या वाढल्या. पण आता कुठे मला थोडं बरं वाटलं. माझ्याकडचे सर्व पत्ते मी बाहेर काढले होते. आता माझ्याकडे काळी जादू सोडून लपवण्यासारखं काही नव्हतं. खरं तर ते जास्त महत्वाचं आहे हे मी जाणतो. पण ते सांगणं मला शक्यच होणार नाही. नाहीतर माझं लग्न कधीच होणार नाही. लग्नानंतर बघू असं मी सारखं माझ्या मनाला बजावत राहतो. आताही बजावलं.
“अरे मी काय विचारतेय. ह्या पाच झाल्या. अजून आहेत का कुठे आत वगैरे?”
“नाही नाही. बास एवढयाच आहेत.”
“एवढयाच?” तिला हसू आलं त्या शब्दाचं. तिचं हसू पाहून मी सुखावलो. म्हणजे तिला फारसा आक्षेप दिसत नाहीय. माझ्या आशा पल्लवित झाल्या.
“तुझी काही हरकत नाही ना?” मी तिला खूप महत्व देतोय असं तिला वाटावं म्हणून मी म्हटलं.
“विचार करावा लागेल.” मिश्किल हसून ती म्हणाली.
“पण तुलाही प्राणी आवडतात असं म्हणालीस मागे.”
“हो पण मांजरी नव्हे. मला कुत्रे आवडतात.ते माणसांवर खूप प्रेम करतात.”
“ असतील पण मांजरी काही वाईट नसतात.”
“हो ना. ते दिसतंच आहे.” ती गुरकावणाऱ्या मांजरीकडे बघत म्हणाली.”
“अगं त्या दोघी ना त्या जरा भांडखोरच आहेत. एकमेकींशी तर भांडतातच पण मलाही
बोचकारतात कधी कधी.”
“अरे बापरे म्हणजे मलाही सावध राहावं लागेल.”
“तसंच काही नाही.” उगाच सांगितलं तिला असं वाटून गेलं. पण सांगणं भाग होतं. कारण सर्वसाधारणपणे पाळीव प्राणी मालकावर कधी रागावत नाहीत ना? मग त्या मांजरी आता जर माझ्यावर गुरकावल्या असत्या तर ते बरं दिसलं नसतं. आता सांगून झालंय त्यामुळे आता त्यांनी काही केलं तरी हरकत नाही.
“एक महत्वाचं सांगायचंय असं म्हणायचास ते हेच का ह्या मांजरीबद्दल?”
“होय. विचित्र वाटलं असेल ना तुला?”
“हो, खरं तर. असं सहसा दिसत नाही ना म्हणून. ह्या अशा काळ्या मांजरी पाळण्याचं काही खास कारण?”
“खास कारण? कसलं?”
“मला काय माहित? मी तुला विचारतेय.”
“नाही. खास काही नाही. फक्त आवडतात एवढंच. तुला कुत्रे कसे आवडतात तसेच.”
आता हे संभाषण इथेच थांबवायला हवं. हिने जास्त खोलात जाता कामा नये. तिला जाऊच देता कामा नये. विषय बदलायलाच हवा.
“मग तुझा काय निर्णय आहे?”
तिचं उत्तर यायच्या आतच राणी आणि मधु परत आमच्यावर आमच्यावर गुरकावू लागल्या. राणी तर माझ्या अंगावरच आली. तिचं नखही लागलं मला. मग मात्र मी जाम वैतागलो. एक तर माझा महत्वाचा निर्णय व्हायचा होता आणि त्यातच ह्या मध्ये मध्ये.
“घाबरू नकोस हं. ही त्यांची स्टाईल आहे प्रेम व्यक्त करण्याची.” प्रज्ञा हसली पण मी म्हटलेलं तिला पटलं नाहीच.”
“बरं थांब. ह्या दोघींना मी बंद करून येतो. नाहीतर आपल्याला मुळीच बोलू देणार नाहीत. अशाच त्रास देत बसतील.”
मी त्यांना उचललं आणि त्या अडगळीच्या खोलीत नेऊन टाकलं. खोलीचं दारही लावून घेतलं. मग मी प्रज्ञाकरता जायफळ घातलेली कॉफी केली. तिला आवडते तशी. लग्नानंतरही मी तिच्यासाठी रोज कॉफी करणार आहे. फक्त कॉफीच नाही तर खूप काही. मी तिचे खूप लाड करणार आहे. तिला कधीच अंतर देणार नाही. फक्त तिने हो म्हणायला हवं.
“चल, तुझं घर तरी दाखव.” कॉफी पिऊन झाल्यावर ती म्हणाली.
“तुझं नाही आपलं म्हण.”
“ते अजून ठरायचंय.”
च्यायला ! होच का ? मला वाटलं पटली. असो पण त्या दोघींसारखं आकांडतांडव तर नाही केलं मांजरींना बघून. मी सकारात्मक विचार करायचं ठरवलं. मी तिला घर बघायला घेऊन गेलो. घरातल्या सर्व खोल्या दाखवल्या. ती सोडून.
तिने विचारलंच, “तिथे काय?”
मी म्हटलं, “अडगळीची खोली.”
“चल ना दाखव.” तिचा हट्ट.
“अगं, त्यात काय बघायचंय?”
“मला बघायची आहे.” तिचा ठाम निर्णय.
अरे बापरे. ही शक्यता आपण विचारातच नाही घेतली. असं काही अपेक्षित नव्हतंच.
शिवाय आज रात्री एकावर प्रयोग करायचा आहे म्हणून तयारी करून ठेवली आहे. काळ्या कापडाचा चिंध्या भरून बाहुला बनवून ठेवलाय. काळ्या धोत्र्याची फांदीही आणून ठेवली आहे. शिवाय जमिनीवर काढलेलं वर्तुळ. त्याच्या आत काढलेली ती चांदणी. शंभर एक मेणबत्त्या. सगळं काही तसंच आहे तिथे. उघडयावर. त्या खोलीत तिला नेणं कसं शक्य आहे? त्या खोलीत गेल्यावर कुठली मुलगी मला होकार देईल? आता काय करावं? काहीतरी करायलाच हवं. घास अगदी तोंडापर्यंत आला आहे तो वाया जाऊ देता कामा नये.
काहीतरी करून तिला तिथे जाण्यापासून परावृत्त करायला हवं.
“चल. दाखवतोस ना ती खोली?”
“ठीक आहे. बघ. पण त्याआधी तुला तुझा निर्णय सांगावा लागेल.” उगाच वेळ पुढे ढकलण्याकरता मी म्हणालो.
“मुळीच नाही. आधी मला तिथे जायचंय.”
तेवढयात मला आठवलं मी त्या मांजरींना तिथे बंद केलं होतं ते.
“अगं, त्या दोघी रागीट मांजरी आहेत तिथे. तुझ्या अंगावर येतील. तुला नीट ओळखत नाहीत ना? तुझी सवय व्हायला वेळ लागेल त्यांना.” मी माझ्यावरच खुश झालो. मस्त कारण आठवलं मला आयत्या वेळी. आता तरी ही नाही जाणार असं वाटलं. पण माझं नशीब ह्यावेळेसही चांगलं नव्हतं बहुधा. तिने हेका सोडला नाही. उलट मी तिला उगाच घाबरवतोय असं वाटून ती अजूनच हट्टाला पेटली.
“मला भीती दाखवतोयस त्यांची?”
“छे! मी कुठे दाखवतोय भीती. तूच घाबरतेयस त्यांना. चेहेराच सांगतोय तुझा.” मी सुचेल ते, सुचेल तसं बोलत होतो.
“मी? मी मुळीच घाबरले नाहीय.”
“हो? मग जाऊन दाखव एकटी.”
मी मुद्दामच म्हणालो. मला वाटलं ती जाणार नाही. पण आज माझे ठोकताळे साफ चुकत होते. ती माझ्या बोलण्याकडे लक्ष न देता निघाली.
“बघ हं पण. त्या दोघी नक्की गुरकावणार तुझ्यावर. नखं मारतील तुला, उडीही मारतील तुझ्या अंगावर.” मी तिला अडवण्याचा शेवटचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी झाला. ती त्या खोलीत गेलीच. मी इथे अस्वस्थपणे फेऱ्या मारू लागलो. जिंकत आलेला डाव एकदम उलटला होता. माझं भवितव्य परत एकदा गर्तेत गेलं होतं. माझ्या नशिबात लग्नच नाही हे नियतीने अजून एकदा सिद्ध केलं होतं. प्रज्ञाला गमवावं लागणार हे मला सहनच होत नव्हतं. आणि मी ते होऊही देणार नव्हतो. मला ती हवी होती. खूप खूप हवी होती.
ठीक आहे प्रज्ञा. मग आता तुझीही गत त्या दोघींसारखीच. लग्नाला नाही तर म्हण. बघ मग माझी कमाल. मला एखादी व्यक्ती हवी असली की मी ती मिळवतोच. माणसाच्या रुपात नाही तर मांजरीच्या. उदयापासून माझ्याकडे सहा मांजरी होणार. माझी शक्ती अजून वाढणार ! माझ्या डोळ्यात रक्त चढत होतं. त्या दोघींनीही नाही म्हटलं तेंव्हा चढत होतं तसं… अगदी तसंच….

********

राजश्री नितीन बर्वे
९८२०३९६६६५
e-mail id - rnbarve28gmail.com
“मोठी तिची सावली” ह्या रहस्य-गूढकथासंग्रहातून
https://diliprajprakashan.in/product/मोठी-तिची-सावली/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खतरनाक ट्विस्ट.
भाग्यश्री आपले कौतुक, आपण प्रेडीकत करू शकला. मला अनपेक्षित होते.

पेटुची पिल्लं कल्लू आणि शेरी, त्या वाक्यावरुन कथा प्रेडीक्ट करता आली खरं तर, पण जबरदस्त बांधलीय!

खतरनाक ट्विस्ट. >>> +१
त्या मुलीच मांजरी असतील असं वाटलं नव्हतं.
प्रज्ञाच कॅरॅक्टर स्ट्राँग दाखवलं आहे. सगळं कळून पण हो म्हणाली असा सिक्वेल येऊ दे आता.
तिची चांगली शक्ती वि. याची वाईट शक्ती

मस्त राजश्री Happy

तुझे लिखाणाचे कसब वाखाणण्याजोगे आहेच !

मस्त रंगवली आहे गोष्ट !
राणी आणि मधु. त्या एकमेकींशी भांडत गुरकावत आतून बाहेर आल्या>> इकडे शंका आली होती शेवटाची.

मस्तच.आवडली.
मला आधी हेडर वरून कथेचे नाव राजश्री बर्वे आहे आणि कथा राजश्री बर्वे नावाच्या गूढ व्यक्ती/आत्म्याबद्दल आहे असं वाटलं होतं.
सिक्वेल मध्ये प्रज्ञा याच्यापेक्षा स्ट्रॉंग मांत्रिक आणि शेवटी भांडण होऊन याच्यावरच करणी करते असंही घेता येईल ☺️☺️

मस्त आहे कथा, पण मी आधी कायप्पा वर वाचली आज सकाळी. ह्या कथेची कायप्पवर फिरायला सुरुवात झाली आहे

>>आधी कुठे तरी वाचली आहे? तुम्ही प्रतिलिपीवर टाकली होती का?<< +१००१ मला सारख देजावू फिलिन्ग येत होतं.
तुमची ही कथा तुमचं नाव नाव खोडुन कुणीतरी ढापली आहे, आणि व्हॉ.अ‍ॅ वर फिरवतो आहे Sad !!

ho maajhi aahe katha. Mi pratilipi var takli hoti. Ha font jamat nahiy. Kaal copy paste keli katha mhanun takta tari aali. Mothi tichi savli ha majhach aahe kathasangrah. Link dili aahe kathechya shevti book hava asel tar.

सिक्वेल मध्ये प्रज्ञा याच्यापेक्षा स्ट्रॉंग मांत्रिक आणि शेवटी भांडण होऊन याच्यावरच करणी करते असंही घेता येईल >> अगदी अगदी Happy
मला पण असेच वाटलेले

ही त्या राधिका आपटेच्या अहल्या च्या कथे सारखीच वाटते . ती माणसांना दगड बनवते , हा मांजर.

मस्त आहे कथा!

> पेटुची पिल्लं कल्लू आणि शेरी, त्या वाक्यावरुन कथा प्रेडीक्ट करता आली खरं तर, > कसं काय?

> सिक्वेल मध्ये प्रज्ञा याच्यापेक्षा स्ट्रॉंग मांत्रिक आणि शेवटी भांडण होऊन याच्यावरच करणी करते असंही घेता येईल > भांडण करायची गरज नाही. ती सगळा सेटअप तयार असलेल्या खोलीमधेच आहे. राणी आणि मधूशी। बोलून बाहेर असलेल्या यालाच उंदीर बनवू शकते.

बादवे मूठ मारणे म्हणजे काय?

खतरनाक ट्विस्ट. >>> +१२३
त्या मुलीच मांजरी असतील असं वाटलं नव्हतं. >>> १२३
तीही काळी जादूवाली निघेल का असे वाटले होते.. >>> मला पण

Pages