मन का थरथरले?

Submitted by निशिकांत on 29 October, 2018 - 01:11

मन का थरथरले?---

गुलाब, चाफा, जुई, मोगरा
अंगणात नव्हतेच बहरले
फेसबुकावर तुला पाहता
गंधाळुन मन का थरथरले?

मोहरलो मी आज अचानक
नाव तुझे अन् फोटो दिसता
भूतकाळच्या झंझावाती
फिरू लागलो बघता बघता
तुझ्या हासर्‍या शिडकाव्याने
बीज आठवांचे अंकुरले
फेसबुकावर तुला पाहता
गंधाळुन मन का थरथरले?

करून चिमणीच्या दाताने
अर्धा अर्धा पेरू वाटुन
घालमेल अंतरात होते
खातानाचा प्रसंग आठवुन
चिनगारीवरच्या राखेला
आज कशाला तू फुंकरले?
फेसबुकावर तुला पाहता
गंधाळुन मन का थरथरले?

गावाकडच्या शाळेमध्ये
रोज भेटणे, हसणे, रुसणे
प्रेम काय हे माहित नसता
नजरांना नजरांचे भिडणे
पौगंडावस्थेत आपुले
विश्व जणू होते मंतरले
फेसबुकावर तुला पाहता
गंधाळुन मन का थरथरले?

पुरे जाहले खेळ खेळणे
व्हर्च्युअल संगे उडण्याला
फोर्मॅटिंग मी माझे केले
अ‍ॅक्च्युअल संगे जुळण्याला
क्लिकवर नाही, हाकेवरती
प्रिया पाहुनी मन शिरशिरले
फेसबुकावर तुला पाहता
गंधाळुन मन का थरथरले?

भेट आजची तुझी अधूरी
शुभशकून हा एक असावा
जरूर भेटू दोघे आपण
मनात किंतू जरा नसावा
स्वागत करण्या पायघड्यांना
आजच आहे मी अंथरले
फेसबुकावर तुला पाहता
गंधाळुन मन का थरथरले?

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users