कांदिसा - ४

Submitted by किरणुद्दीन on 24 October, 2018 - 11:02

नवा भारत मधे स्वप्नील चा फोटो आलाय असा फोन श्रीधरने केला होता.
संध्याच्या प्रश्नांना उत्तरे न देता श्रीधर फक्त एव्हढेच बोलला.

" बाहेर पडून नवा भारतचा अंक घे आणि तशीच माझ्याकडे रिक्षाने निघून ये. इथून आपण माझ्या कारमधून जाताना पुढचं बोलूयात "

यावर त्याची एक शब्दही बोलायची तयारी नव्हती.

कोप-यावरचा पेपरचा स्टॉल शोधून नवा भारतचा अंक तिने घेतला.
सगळा अंक चाळून काढला.

शेवटून दुस-या पानावर खाली स्नेहलचा फोटो होता.
सापडला आहे या शीर्षकाखाली. तिला धक्का बसला.

कुणी दिलाय या उत्सुकते तिने पाहीले तर येरवडा पोलीस स्टेशनचा फोन क्रमांक होता.
फोन लावावा का ?
पण बोलायचं काय
या विचाराने ती गोंधळात पडली. आता तिला श्रीधरचे म्हणणे समजले.

रिक्षाला थांबवून तिने ढोले पाटील रोडला घ्यायला सांगितले.

श्रीधर देखील तयारीतच होता.
पाणी चहा विचारायच्या भानगडीत न पडता त्याने कार काढली.
कपिला हॉटेलवरून मधूबन च्या लेनमधून वळण घेत बंडगार्डन मार्गे येरवडा गाठायला गर्दीमुळे पाउण तास लागला.

येरवडा पोलीस स्टेशनचा रायटर जोशी श्रीधरचा चांगला मित्र होता. त्याला हे दोघे येणार असल्याची कल्पना आधीच दिलेली दिसली.

जोशी श्रीधरला पाहून हसला. उठून बाहेर आला.

" पंधरा मिनिटे थांबतोस का ? कांबळे आला कि साहेबाला सांगून निघू. साहेबाला कल्पना आहे
मान्यता देण्यावाचून कुणालाच काही करता येण्यासारखे नव्हते.

बरोब्बर पंधरा मिनिटांनी जोशी बाहेर आला.
" चला निघूयात "

येताना श्रीधरने संध्याला ब-यापैकी कल्पना दिली होती.

येरवडा मनोरुग्णालय

ही पाटी असलेल्या वास्तूत आपण कधी येऊ असे संध्याला कधीही वाटले नव्हते.
पण आज ती इथे होती.

जोशी सोबत असल्याने दारावर अडवण्याचे प्रकार झाले नाहीत.

ते तिघे सरळ डॉक्टर पवारांकडे पोहोचले.
ओळख पाळख झाल्यावर जोशीने डॉक्टरांना पहिल्यापासून सगळे सांगायची विनंती केली.

--------------------------------------------------------------------------------------------------------

येरवडा पोलिसांनी हा पेशंट आणून सोडला तेव्हां त्याच्याकडे कुठलीही कागदपत्रे नव्हती. शून्यात नजर, अधून मधून दचकणे या लक्षणांमुळे त्याला मेंटल हॉस्पिटलला पाठवण्याचा निर्णय साहेबांनी घेतला. त्या आधी त्याला ओळखणारे कुणी असतील तर तपास घ्यावा यासाठी दूरदर्शन आणि शासनाच्या माहिती व प्रसिद्धी संचालनालयाकडे सापडला आहे ही जाहीरात त्यांनी पाठवून दिली.
ती प्रकाशित व्हायला शासनाच्या गतीने महिना लागेल ही सूचना त्यांना मिळाली होती.

प्रत्यक्षात ती अडीच महिन्यांनी प्रकाशित झाली.

बिननावाच्या, ओळखीच्या या पेशंटची केस डॉक्टर पवारांकडे होती. नाव गाव काहीही समजत नव्हते. फक्त शून्यात नजर.
अधून मधून दचकण्याची सवय हीच काय जिवंतपणाचे लक्षण होते.

त्याच्याकडून काहीही माहिती मिळत नव्हती. भिंतीवर आपटावे तसे शब्द विरून जात असत.
चार दिवसांनी एक पोलीस आला. एक डायरी पवारांच्या हातात देऊन गेला.
ती डायरी पोलीस स्टेशनला तशीच राहिली होती.

डॉक्टर पवारांना आशेचा किरण दिसला. या रविवारी ते डायरी घरी नेऊन वाचणार होते. कदाचित पेशंटची हिस्टरी हाती लागेल ही आशा त्यांच्या मनात होती.

" डॉक्टर काय आहे त्या डायरीत ?" न राहवून संध्याने विचारलेच.

"तुम्हीच वाचा. माझा राऊंड झाला कि पुन्हा बोलूच आपण.

डॉक्टरांकडून डायरी घेत संध्या म्हणाली
"मला पाहता येईल ?"

"आधी वाचून घ्या "

थरथरत्या हाताने डायरी उघडताना संध्याचे काळीज धडधडत होते.
पहिल्या पानावर कसलेसे अगम्य चित्र काढले होते.

चित्र कसले ?
लहान मुलं पेनाने रेघोट्या मारत एकात एक वर्तुळे काढतात तसे काही.

किंवा वेडाच्या भरात रेखाटलेले काही तरी निरर्थक.
पण तसेही नव्हते कदाचित..

तिने वाचायला सुरूवात केली..

क्रमशः

Group content visibility: 
Use group defaults

गेले चार दिवस हॉस्पिटल मागे लागल्याने मनात असून पुढचे भाग देणे शक्य झाले नाही. हे असे क्रमशः वाचणे ही शिक्षा आहे याची कल्पना आहे. या वेळी जरा सांभाळून घ्यावे. नंतर कसर भरून काढली जाईलच.

रोचक!

> गेले चार दिवस हॉस्पिटल मागे लागल्याने > काळजी घ्या.

छान आहे कथा Happy

स्नेहलचा फोटो होता. >> नवा भारत मधे स्वप्नील चा फोटो आलाय >>

स्नेहल की स्वप्निल???

छान चाललीये पण मागील भागांच्या लिंका दिल्यात तर बरं पडतं. सलगपणा राहतो.