शरदाचं चांदणं (तनिष्काच्या ऑक्टोबर अंकात आलेला माझा लेख )

Submitted by स्मिता द on 22 October, 2018 - 06:20

तनिष्काच्या ऑक्टोबर अंकात आलेला माझा लेख
......................................................................................................................
शरदाच चांदणं
आवडता ऋतू म्हणजे शरद. हा हिवाळा सुरू होण्या आधीचा काळ. या दिवसांमध्ये, पावसाळा नुकताच संपलेला असल्याने वातावरण अतिशय आल्हाददायक असते . नवरात्र, दसरा, दिवाळी, कार्तिक पौर्णिमा,.. हे उत्सव सोहळे या शरदातले.

स्मिता दोडमिसे

श्रावणातील पावसाने न्हायलेली सगळी झाडे , पाने मुक्त रंग उधळणं करतात. पण जसा रुणझुणत्या पावसाला मंद मंद सरींबरोबर परतीचे वेध लागतात तशी सगळ्या निसर्गाची मुक्त उधळणं केलेला पसारा आता आवरायला सुरूवात झालेली असते. अल्लड रुणझुणत येणाऱ्या श्रावणातल्या पहाळ्या आता विरळ होत जातात. कंच न्हायलेली हिरवाई टवटवीत दिसते पण अगदी अल्लड टवटवी नसते ती धीर गंभीर अशी युवती होते. अन हळू हळू शांत अशी प्रौढा व्हायला लागते. एक ठेहेराव जाणवतो सगळ्या आसमंतात. पावसाने दाणादाण उडवल्यामुळे जी सगळी धावपळ, धांदल उडलेली असते तिला कुठेतरी ठेहेराव आल्या सारखे वाटते. स्वच्छ निरभ्र आकाश, स्वच्छ ताजी हवा, पावसाळ्यातला तो कुंदपणा धुतल्यासारखे. स्वच्छ, सुंदर आणि निरभ्र. मग लक्षात येते आला शरद ऋतु. आपण आपले सहा ऋतू मानले आहे. अगदी कवीचे ' सहा ऋतूचे सहा सोहळे' असतात. पण मला खुप भावतो तो वसंत आणि शरदाचा सोहळा. वसंत जसा सगळ्या कवींचा आवडता आहे तसाच शरदानेही भुरळ घातलीच आहे. कालिदास त्याचा ऋतू संहार मध्ये शरदाचे वर्णन करतो. कालिदासाला तो रूपरम्या नववधूसारखा सुंदर, टवटवीत वाटतो. पण आपले कवी अनिलही शरदागम काय सुंदर लिहून जातात
आभाळ निळे नि ढग पांढरे हवेत आलेला थोडा गारवा
कोवळी सकाळ मनमोकळी धरा तळी रंग एक हिरवा
साचून राहिल्या गढूळ पाण्याची हळूहळू जाली निर्मळ जळें
काठावर उभ्या राहून बाभळी वाकून पाहती रूप सावळे
असेच या धरेचे बदललेले रूप असते नाही शरदात! आभाळ निळे, पाणी निळे. वर्षाऋतूच्या जोरदार सरींनी गढुळले पाणी आता जरा निवळायला लागते अन स्वच्छ सुंदर दिसायला लागते. साचल्या गढूळ पाण्याचे स्वच्छ जलात रूपंतर व्हायला लागते. वर्षेच्या वर्षावात अन श्रावणातल्या मुलायम असा हळूवार कुरवाळल्याने झाडांना नवी पालवी फुटायला लागते. आभाळ निळे नि ढग पांढरे, हवेत आलेला थोडा गारवा या शरदागमाच्या खुणा आहेत. आरशासारख्या लख्ख शांत पाण्यात ही नवीन फुटलेली पालवी हळुवार डोकावून आपले रूप पाहतात , निरखतात असेच वाटते. श्रावणात जसा सगळा निसर्ग गर्द हिरवा होतो, शरदात ती हिरवाई हळू हळू खाली उतरायला लागते. इतक्‍या दिवस वर दिसणारी रंगाची श्रीमंती आता खाली दिसायला लागते. वसुंधरेने उभ्याने नेसलेले रंगीत हिरवे वस्त्र आता खाली पहुडताना पांघरून घेतलेय असेच वाटते .नव्या फुटणा-या पालवीला जागा द्यायला जुनी जाणती पाने अलगद खाली उतरतात. पानझडीचा ऋतू सुरू होतो. इतक्‍या दिवस अंगाखांद्यावर ल्यायलेले वैभव आता छान गालिचा पसरते. रंगाचा सुंदर सडा खाली पसरला जातो. वाळलेल्या गळालेल्या पानाच्या सड्याबरोबरच प्राजक्ताचा सडा दारी पडतो. कुंद कळ्या बहरायला लागतात. सायली , जाई , जुई यांचा संमिश्र गंध आसमंतात भरून राहतो. मधूनच सोनटक्‍क्‍याचा, शेवंतीचा गंधही त्यात मिसळतो. जानेवारी ते जून हे मोगऱ्याचे दिवस. जुलै ते डिसेंबर हे कुंदाचे दिवस. शरद ऋतू हा कुंद, शेवंतींच्या बहरण्याचा ऋतू. किरातार्जुनीय या भारवीच्या महाकाव्यात यक्ष अर्जुनाला म्हणतो, 'हे अर्जुना, हा शरद ऋतू फलदायक असून तो परिश्रमांचा मोबदला फुलांच्या रूपाने देतो. या ऋतूत नद्या, सरोवर यांचे जल स्वच्छ व नितळ असते. मेघ शुभ्र असतात ' असा हा शरद ऋतू तुझ्या सफलतेचे व्रत वृद्धिंगत करो!'
सभोवताली ही रंगीत गालिच्यांची चित्रं निसर्गाच्या कॅनव्हासवर दिसायला लागली, की समजायचे ऋतुराज शरदाचे आगमन झाले. अश्‍या वेळेस वातावरणात वेगळीच रंगसंगती दिसून येते. पावसाळ्यात तरी केवळ हिरवळ दिसते. पण शरदाच्या दिवसात, सगळेच रंग दिसतात, हिरवे गवत, त्यावर पडलेली विविध रंगांची पानं.. सगळ्यात रंगीबेरंगी ऋतू आहे हा. प्रत्येक ऋतूतील दिवस आणि रात्र एकच वाटते पण शरदाची रात्र मला कायम जास्त देखणी भासते. रात्रीचा निरव शांतता, लख्ख चांदण, निरभ्र आकाश अन वातावरणात पसरलेला तो रातराणी, शेवंती, कुंदा, सायली, जाई ,जुईचा गंध अगदी धुंद करणारी रात्र असते. काही रात्री गंभीर असतात, तर काही अगदीच शांत. शरदाची रात्र म्हणजे अलगद पसरत जाणाऱ्या अलवार धुंद अशा मुग्ध जाणिवेची असते. शरदाच्या रात्री ही मोठ्या असतात, ठेहेराव असलेल्या निरभ्र, अथांग रात्री. मला ना कीचकवध मधील गदिमांचे गाणे
धुंद मधुमती रात रे
तनमन नाचे, यौवन नाचे
उगवला रजनीचा नाथ रे, हे वर्णन शरदातील रात्रीचे वाटते.
शरद ऋतू हा रात्रींच्या सौंदर्याचा ऋतू आहे. निळाईचे गडद आभाळ अन उगवलेल्या हजारो तारा. हवेत ही स्वच्छ शुभ्र असे मार्दव असते. धुलिकणाचा लपंडाव नसतो- तारांगण निरखावे शरदाच्या रात्रीच. कालिदासाने या ऋतूतील रात्रींना ज्योतिष्मती रात्र म्हटलं आहे. गुलाबी थंडीची हुरहुरती चाहूल लागलेली असते. गडद अशा, लांबलचक रात्री मग प्रियेची आठवण येणारच ना. प्रियकराच्या आठवात मग्न झालेली तरुणी म्हणते
शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नाचा झुलतो झुला
थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला
राती भराला येउ दे प्रिती
शांताशेळकेंच्या या शब्दात ती शरदाची रात अगदी मुर्तीमंत उभी राहते. या दिवसात शरद पौर्णिमा किंवा कोजागरी येते. या पौर्णिमेला दिसणारे चंद्राचे तेज परत काही वर्षभर दिसत नाही. हवा शीतल असली तरी बोचणारी थंडी निदान पूर्व रात्री तरी कधी भासत नाही.
कोजागरी आणि शरद ऋतूचे नाते तर निरंतर. मस्त गुलाबी हवा, हवेत छान गारवा , स्वच्छ हवा अन आभाळभर चांदणे, चंद्र असा मोठा लखलखता चंद्र आहे साक्षीला मधला चंद्र आणि मग मित्र मंडळी समवेत जागवलेल्या त्या रात्री, लाजबाब ! लहानपणापासूनच्या कोजागरीच्या रात्री नजरेसमोर येतात. अगदी लहानपणी कोजागरी म्हणजे रात्री सगळ्यांनी एकत्र यायचे, मग हास्य विनोदाची उधळणं, कुठे गाण्याच्या भेंड्या तर कुठे विनोदी किस्से. तेव्हा सगळ्यांनी एकत्र येऊन अशी मजा करण्याची भारी मौज वाटायची, मोठेपणी तर ती शरदाची रात्र म्हणजे शारदसुंदर गाण्यातली अशीच वाटायची. गुलाबी थंडीत ते एकत्र येणे कोजागरीच्या निमित्त्याने. ते सहेतुक स्पर्श, नजरानजर, सहेतुक गायलेले गाणे सगळेच अप्रतिम. ही कोजागरीची विविध रुपे उभी राहतात. 'को जागरती ' म्हणणाऱ्या लक्ष्मीला कायम " अहम जाग्रामी " म्हटलेले आठवते. कोजागरीच्या रात्री पडणारे चंद्राचे तेज आरोग्य दयी असते. त्यामुळे त्या चंद्राची चंद्रकिरणे पडलेले दूध प्राशन करणे आरोग्यदायी असते. ही भूमिका नंतर कळत गेली पण तरीही कोजागरीची रात्र म्हणजे अशी उल्हासाची आनंदाचे पर्वणी हे समीकरण मात्र अजूनही मना मनात घट्ट रुजलेले आहे.
शरद ऋतूचं आणखी एक वैशिष्ट्य मला जाणवतं ते म्हणजे तिन्ही ऋतूंचा त्यात झालेला संगम. दस-याला हिवाळा सुरू होतो. याच शरदऋतूत उन्हाळाही येतो त्यालाच आपण ऑक्‍टोबर हीट म्हणतो. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्याचा त्रिवेणीसंगम म्हणजे शरद ऋतू. नवीन फुटणा-या कोवळ्या पालवीसारखे नवनवीन गोष्टींच्या स्वागताला सज्ज व्हायचे . काल, आज आणि उद्या असाच शरद ऋतू असणार आहे अन असाच आपल्या अनाहत सौदयांच्या अगणित आठवणी देउन लुभावणार आहे ! शरद ऋतूतील स्वाती नक्षत्रात पडणार्‍या पावसाच्या थेंबाचे जसे मोती शिंपल्यांमध्ये तयार व्हायला लागतात तसे जणू ते लखलखणारे चांदणमोती आभाळभर पसरतात आणि मग नखशिखांत लखलख सुरू राहते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults