प्रत्येक पिढीची गोष्ट

Submitted by अननस on 21 October, 2018 - 04:06

आज संध्याकाळी शाळे मध्ये सगळी गडबड होती. दिवस मावळला होता पण शाळेच्या प्रेक्षागृहाकडे मुलामुलींची गर्दी होती. उद्या शाळेमध्ये मध्ये विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होता आणि समीहन आणि संयुक्ता त्यांच्या नाटकाच्या शेवटच्या रिहर्सल साठी तयारीत होते. बॅकस्टेज ची मुलं सामान सुमान लावत होती. या सगळ्या गडबडीत, सुखदास जवळच्या हलवाया कडे गाडी हाकत होता. जशी संध्याकाळ रात्रीकडे झुकत होती, अंधार पसरत होता, धुळीने माखलेले एकाकी रस्ते तुडवत सुखदासची गाडी हलवायाकडे पोहचत आली.

'या, सुखदास शेठ!,' हलवाई सुखदासला पाहून म्हणाला.

सुखदासच्या नावापुढे शेठ लावावे याचे कारण म्हणजे, त्याचे वडील लक्ष्मीपती यांनी कमावलेली उदंड संपत्ती. कलकत्त्यातील नावाजलेल्या कापसाच्या आणि कापडाच्या व्यापाऱयांपैकी एक. सुखदास आणि शांती देवी ही लक्ष्मीपतीची अपत्य. यापैकी शांती देवीचे कलकत्त्यातील एका नावाजलेल्या संपन्न घरात लग्न झालेले. शांती देवीच्या सासरच्यांचा चहाचा व्यापार होता. आसाम, दार्जिलिंग या भागात चहाचे मळे होते. येथून तयार होऊन चहा कलकत्ता बंदरातून विलायतेला जात असे. लक्ष्मीपती सुद्धा कापूस विलायतेला पाठवत असत. गेल्या काही वर्षात कलकत्याच्या जवळपास कापड गिरण्या सुरु होऊ लागल्या होत्या. लक्ष्मीपतीने आपले पैसे या कापडगिरण्यांमध्येही गुंतवले होते. विलायतेहून येणाऱ्या कापडाच्या व्यापारातही लक्ष्मीपती भांडवल गुंतवून होता. एकुलत्या एक मुलीचे लग्न झाल्यावर सुखदास, लक्ष्मीपती आणि त्याची पत्नी दुर्गादेवी असे तिघेच कलकत्त्यातील उच्चब्रू वस्तीतील आपल्या वाड्यात राहत असत. घरी नोकर चाकरांचा राबता होता. कलकत्त्यातील रस्त्यांवरून धावणाऱ्या अगदी कमी मोटार गाड्यांमध्ये लक्ष्मीपतीची मोटारगाडी होती.

सुखदास ने हलवायाच्या दुकानातून रसोगुल्ले डब्यात भरून घेतले. पैसे देऊन गाडी हाकत तो परत शाळे कडे निघाला. शाळे कडे परत जाताना गेल्या तीन वर्षांचा काळ मनातून जात होता. हे मेट्रिक चे वर्ष होते. पुढच्या वर्षी सगळ्या मित्रांची ताटातूट होणार होती. इंग्रजी आणि संस्कृत यामध्ये प्राविण्य नाही तरी दर वर्षी पास होण्याइतपत गुण सुखदासला मिळवता आले होते. तसं म्हणायला गेले तर नाटक, कला हा सुखदासचा फारसा जवळचा प्रांत नव्हता. अभ्यासात चार चौघांसारखा असलेला सुखदास, नाटक, कला यामध्येसुद्धा चार चौघांसारखाच. असं असले तरीही, आज खटपट करून शाळेच्या प्रेक्षागृहाकडे गाडी हाकत सुखदास चालला होता आणि त्याचे मुख्य कारण होते संयुक्ता.

संयुक्ता कोलकात्त्यातील नावाजलेल्या प्राध्यापकांची तिसरी मुलगी. तिचे वडील संस्कृतचे निवृत्त प्राध्यापक होते. काही वर्ष कलकत्त्यामध्ये शिकवल्यानंतर वाराणसीच्या विद्यालयात संस्कृत शिकवायला गेले. तेथेच संयुक्ताचा जन्म झाला होता. नंतर निवृत्ती जवळ आल्यावर त्यांचे कुटुंब परत कलकत्याला आलं. मोठ्या दोन बहिणींची लग्न झाली होती. प्राध्यापक साहेबांचा पगार चांगला होता, राहणी साधी होती पण मोठ्या दोन मुलींच्या लग्नात हुंडा, मानपान आणि लग्न खर्च यात लक्ष्मी निघून गेली. संयुक्ताच्या सर्वात थोरल्या बहिणीला सासुरवासही होत असे. हे सगळं नवीन विचारांच्या संयुक्ताला पटणारे नव्हते. त्या काळात बंगाल मध्ये इंग्लंडहून आलेल्या कापडाबरोबरच नवीन विचारांचें ही वारे वाहत होते. राजा राम मोहन रॉय, केशव चंद्र सेन, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या नेतृर्त्वाने भारावून शिकला सवरलेला वर्ग स्त्रीशिक्षण, विधवा पुनर्विवाह याकडे सकारात्मक रीतीने बघायला लागला होता. आपल्या मोठ्या बहिणींप्रमाणे वयात आल्यावर लगेच लग्न न करता शिक्षण पूर करायचे अशा मताची संयुक्ता होती. संयुक्ता आणि तिच्या बहिणींचे नक्षत्रासारखे रूप, सर्वांमध्ये स्वतःला सामावून घेण्याचा स्वभाव, लग्नात वारेमाप खर्च करून आणि हुंडा देऊनही संयुक्ताच्या थोरल्या बहिणीला होणारा सासुरवास, हे सर्व पाहता, प्राध्यापक महोदयांचाही संयुक्ताच्या मनाविरुद्ध तिचे लग्न करण्याचा धीर होत नसे. कदाचित त्या काळात कलकत्त्यामध्ये मॅट्रिक पर्यंत अगदी बोटावर मोजण्यासारख्या मुलींमध्ये संयुक्ता एक होती .

यावर्षीच्या नाटकाचा घाट घालण्यामध्ये आघाडीवर होते म्हणजे प्रोफेसर लीड्स. प्रोफेसर लीड्स हे जन्माने इंग्लिश. गेले काही वर्ष कलकत्त्यामध्ये इंग्रजी शिकवण्यासाठी राहत होते. उत्तम इंग्रजी शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. दर रविवारी न चुकता चर्च मध्ये प्रार्थनेसाठी जाणारे, प्रेमळ स्वभावाचे निवृतीकड़े झुकलेले प्रोफेसर लीड्स शाळेत प्रसिद्ध होते. केशव चंद्र सेन यांनी देह ठेवण्यापूर्वी प्रोफेसर लीड्स आणि त्यांचा चांगला परिचय होता. स्त्रीशिक्षणाविषयी आस्था असणाऱ्या प्रोफेसर लीड्स यांची कलकत्ता शहरातही उत्तम इंग्रजी प्रशिक्षक याबरोबरच एक शुद्ध आचरणाची व्यक्ती अशी ख्याती होती. प्रोफेसर लीड्सच्या पुढाकारानेच यावर्षीच्या शालेय विविध गुणदर्शन कार्यक्रमात पहिल्यांदाच नाटकात स्त्री पात्रांचा समावेश होता. संयुक्ता आणि शाळेत बंगाली शिकवणाऱ्या प्राध्यापकांची मुलगी पद्मिनी या शाळेतील मॅट्रिक ला असणाऱ्या दोनच मुली या नाटकात होत्या. कदाचित कलकत्ता शहरात शाळेत नाटकात काम करणाऱ्या त्या पहिल्या मुली असतील.

सुखदासाची गाडी महाविद्यालयात आली तेव्हा तालीम संपली होती. नाटकात भाग घेणाऱ्या सर्वाना रसोगुल्ले वाटले. संयुक्ताला आणि पद्मिनीला घरी सोडण्यासाठी प्रोफेसर लीड्सने स्वतःची गाडी पाठवली. त्या अगदी थोड्या वेळासाठी झालेली संयुक्ताची भेट सुखदासला आठवत होती. अशा छोट्या छोट्या भेटींसाठीच सुखदास नाट्यमंडळा ला मदत करायला येत होता. घराची गडगंज स्थिती त्यामुळे नाट्यमंडळालाही हा नाट्य न कळणारा कलाकार हवासा होता.

शाळेत विविध गुण दर्शन कार्यक्रम झाला. कार्यक्रमामध्ये सगळ्यांच्या ओठावर कौतुक होते ते म्हणजे संयुक्ता आणि समीहन चे. समीहनही याच शाळेमध्ये मॅट्रिक ला होता. घराची परिस्थिती अगदी सामान्य. वडील सरकारी कचेरीतून कारकून म्हणून रिटायर झाले होते. दोन थोरल्या बहिणींच्या लग्नात वडिलांनी वारेमाप देणी घेतली होती. कलकत्यापासून काही अंतरावर समीहनच्या बाबांची आणि काकांची वडिलोपार्जित शेती होती. त्याकडे सध्या समीहन चे काकाच बघत असत त्यातून वडिलांना उत्पन्न काही मिळाले नाही तरीही दरवर्षी काही तांदूळाची पोती येत होती त्यातून समीहन च्या घराचा उदरनिर्वाह चालत असे. त्याचे वडील जसे मिळेल तसे पोस्टमध्ये कोणाची पत्रे लिहून देण्यासारखी कामे करत त्यातून वरखर्चाला चार पैसे मिळत. वर्गातील एक हुशार, आज्ञाधारक आणि अभ्यासू विद्यार्थी म्हणून समीहन शाळेत चांगलाच प्रसिद्ध होता. बांधेसूद,उंचापुरा, देखणा, सर्वांशी मिळूनमिसळून वागणाऱ्या समीहनची कोणालाही भुरळ पडावी असच त्याचे व्यक्तिमत्व होते. भाषेवर त्याचे विशेष प्रभुत्व होते. कष्टाळू समीहन ला कोणतेही काम सांगितले कि सांगणाऱ्याने निश्चिन्त राहावे कारण ते पूर्ण झाल्याषिवाय राहत नसे. समीहनच्या व्यक्तीमत्वावर आकर्षित झालेल्या व्यक्तींमध्ये संयुक्ता सुद्धा होती. संयुक्ता समीहनशी भेट गाठ होण्याची एकही संधी सोडत नसे.

विविध गुणदर्शनानंतर मॅट्रिक च्या परिक्षेपर्यंतचे दिवस कसे गेले कळलेच नाही. मॅट्रिक ची परीक्षा झाली आणि आपापल्या आयष्याच्या पुढच्या प्रवासाचं वळणावर प्रत्येक जण येऊन उभा राहिला. समीहनला आता नोकरी करून घराला आधार देणे भाग होते. पण समीहन तेथे थांबणारा नव्हता. काहीतरी व्यवसाय करावा, दारिद्र्याचे हे दैन्य आपल्या आयुष्यातूनही पुसून टाकावे आणि इतरांच्या आयुष्यातूनही दूर करावे हा मनात एक ध्यास होता.

मॅट्रिक चा रिझल्ट लागला, गुणवान विद्यार्ध्यांची सत्कार सभा आयॊजित केली होती. समीहन, संयुक्ता आपल्या पालकांना सार्थ अभिमानाने घेऊन आले होते. शाळेने लक्ष्मीपती, सुखदास आणि त्याची आई दुर्गादेवी यांनाही बोलावण्याचे शहाणपण दाखवले होते. सत्कार समारंभात भाषणात समीहनने आपल्या पालकांचे गुरुजनांचे आभार मानले. स्वतःसाठी,शाळेसाठी आपल्यासारख्या इतरांसाठी काहीतरी घडवावे याचे निश्चय बोलून दाखवला. सभा संपल्यावर संयुक्ताने आपल्या पालकांसहित समीहनची भेट घेण्याचे औचित्य साधले. आता घरात अनेक वर्ष लांबणीवर टाकलेला लग्नाचा विषय मूळ धरणार याची संयुक्ताला चांगली जाण होती. तरुणपणी 'अगदी सहज' होणाऱ्या या गाठीभेटींचा अर्थ समजण्या एवढे त्या दोघांचेही पालक जाणकार होते. समीहन आपल्या पुढच्या स्वप्नांविषयी आणि त्या दिशेने चाललेल्या प्रयत्नाविषयी बोलत होता. संयुक्ता समीहनचे बोलणे कानाने ऐकत होती,त्याची स्वप्ने आपल्या डोळ्याने बघत होती .दोघांचेही आई वडील आपल्या घराविषयी एकमेकांना माहिती सांगत होते. बोलता बोलता समीहनच्या घराची परिस्थिती, दोन थोरल्या बहिणींची लग्नात झालेली देणीघेणी हा विषय सहज पणे येऊन गेला. हे बोलणे झाल्यावर दोन्ही कुटुंबातील जेष्ठ व्यक्तीनी एकमेकांना नमस्कार केला आणि निरोप घेतला. समीहन आणि संयुक्ता यांची स्वप्न कितीही सुंदर असली तरीही आजच्या सत्यात हे नाते पुढे घेऊन जाणे व्यवहार्य नव्हते. निरोप घेताना संयुक्ता समीहन कडे बघत होती. वेगळे झालो तरीही तुझ्या स्वप्नांमध्ये मी भागीदार आहे असं तिची नजर सांगत होती. समीहन ने सुद्धा ही नजरेची भाषा ओळखली आणि आपल्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आपल्या घराकडे निघून गेला.

या सभेत सुखदासची नजर राहून राहून संयुक्ताकडे जात होती. ते पाहून दुर्गादेवीला मनातून कोठेतरी बरं वाटत होते. दुर्गादेवीला सुखदासाच्या वागण्याची काळजी वाटत असे. सुखदास वडिलांच्या व्यापारात फारसा लक्ष घालत नसे. मित्रांबरोबर वेळ घालवणे याशिवाय सुखदास फारसे काही उत्साहाने करत नसे. देवाच्या दयेने किंवा पूर्वजांच्या पुण्याईने सुखदास वाईट संगतीला मात्र लागला नव्हता. योग्य वेळी योग्य मुलीशी लग्न झाले कि, सुखदासची सगळी गाडी नीट रुळावर येईल असा दुर्गादेवीचा विश्वास होता. त्यामुळे संयुक्ताकडे वळणाऱ्या सुखदासच्या नजरेकडे पाहून दुर्गादेवी सुखावत होती. सुखदासने फारशी सर्वांची भेट घेतली नाही, विशेष सत्कार होण्यासारखे त्याला गुण मिळाले नव्हते. आजचे आमंत्रण प्रामुख्याने लक्ष्मीपतींना होते हे सुखदासच्या लक्षात आले होते. खूप चांगले गुण नाही मिळाले तरी सुखदास मॅट्रिक ची परीक्षा पास झाला होता.

सत्कार समारंभानंतर दोनच दिवसात संयुक्ताचे वडील मोठी आनंदाची बातमी घेऊन आले. संयुक्तांसाठी शहरातले एक चांगले स्थळ सांगून आले होते. त्यांची हुंड्याचीही काही अट नव्हती. एक ना एक दिवस हा दिवस येणार याची पूर्ण कल्पना संयुक्ताला होती. सुखदास सारखे स्थळ नाकारणे ही कोणत्याही मुलीसाठी सोपी गोष्ट नव्हती पण सुखदासला आपला पती म्हणून स्वीकारणे ही सुद्धा संयुक्ता सारख्या मुलीसाठी सोपी गोष्ट नव्हती. सामान्य आर्थिक परिस्थितीत पण सन्मानाचे आणि कर्तव्यनिष्ठ जीवन जगणारी संयुक्ता सुखदासला आपला पती मानून आपले तन आणि मन कशी देऊ शकली असती ज्यामुलाकडे कतृत्व, महत्वाकांक्षा सोडून सगळे होते? संयुक्ताने खरंतर गरीबीचे चटके खाणाऱ्या पण कर्मशील, ध्येयनिष्ठ आणि महत्वाकांक्षी समीहन ला मनातल्या एका कोपऱ्यात आपल्या पतीचे, जोडीदाराचे स्थान दिले होते. त्याच्या स्वप्नांना आपली स्वप्ने मानून टाकले होते. घरात मात्र परिस्थिती पूर्ण विरुद्ध होती. संयुक्ताचे आई-वडील आपल्या सगळ्यात लहान मुलीसाठी एवढे मोठे सधन आणि नावाजलेले स्थळ सांगून आले म्हणून आनंदात होते. सासरच्यांची हुंड्याची काही अट नव्हती त्यामुळे लग्न करून देणे संयुक्ताच्या घरच्यांना शक्य होते.लग्नाची मागणी सुद्धा मुलाकडून आली होती त्यामुळे मुलीला विशेष सासुरवास होणार नाही याची कोठेतरी खात्री वाटत होती.

'सुखदासशी कसे लग्न करू?', संयुक्ता विचार करत होती. 'लाडावलेला , अबोल, प्रेमळ पण काहीसा हट्टी आणि त्याहून महत्वाचे म्हणजे काही आयुष्यात आपल्याला घडवायचे आहे याची थोडी सुद्धा इच्छा नसणारा , रोज चांदीच्या ताटातून जेवणारा आणि मखमली गादीवर रात्री झोपणारा सुखदास आपला नवरा नसून दत्तक मुलासारखा आहे'. या विचाराने संयुक्ताच्या चेहेर्यावर हसू उमटले.

'माझं अगदी खरंप्रेम समीहनवर आहे, हे स्वतः:शी मान्य करायला पण हा दिवस यावा लागला... कसं मनाचे तंत्र कळत नाही आणि आपणच आपल्या मनाला जाणत नाही..नोकरी साठी धडपडणारा समीहन आत्ता लग्नाला तयार होईल की नाही हे पण माहीत नाही.. त्याला माहीत असेल का कि मी त्याला या परिस्थितीतही साथ द्यायला तयार आहे?

खरंतर सत्कार समारंभात घरच्यांची सुद्धा भेट झाल्यावर हे सरळ आहे की सध्या समीहन ला लग्न करायचे नाही आहे आणि दोन्ही घरच्यांना पण हे नाते फारसे व्यवहार्य वाटत नाही.
आणि खरं प्रेम म्हणजे त्याग... एकमेकांच्या इच्छा आकांक्षांमध्ये समरस होणे.. आता समीहन चा जास्त विचार न करणेच चांगले.. आणि त्याच्या स्वप्नांना आकार द्यायच्या त्याच्या प्रयत्नात आपण कशी मदत करू शकू याचा विचार केला पाहिले.. सुखदास आणि समीहन, यांची परिस्थिती वेगळी, गरजा वेगळ्या.. ', संयुक्ताच्या मनात विचार चक्र चालले होते.

'सुखदासाच्या घरासारखे सासर मिळाल्यावर, समीहन ला पण आपण सहज मदत करू शकू! '

पुढच्या दोन दिवसात, संयुक्ता आणि सुखदास यांच्या घरच्यांची एक बैठक झाली आणि लग्नाची तारीख ठरली.

एक एक दिवस सरत होता, लग्नाचा दिवस जवळ येत होता संयुक्ताच्या घरी लग्नाची गडबड उडाली होती. कधे मधे सुखदास आणि संयुक्ताची भेट होत होती. सुखदास ला या भेटी गाठी हव्या हव्याशा वाटत होत्या. संयुक्ताची हळू हळू सुखदासच्या घरच्यांशी जवळीक वाढत होती.

लग्नाचा दिवस आला. लग्नाचे विधी चालले होते, यज्ञ केला होता. लग्नासाठी आलेल्या पुरोहितांनी सांगितले, ' हा विवाह संपन्न होत आहे, हा विवाह तुम्हाला धर्म, अर्थ, आणि काम हे पुरुषार्थ प्राप्त करून देणारा होवो.' संयुक्ता पुरोहितांनी सांगितलेली वचन ऐकत होती. आपलं लग्न आपल्या स्वप्नांपेक्षा वेगळे असले तरीही आपल्याला अंदाज होता तसेच आहे असा विचार तिच्या मनात येऊन गेला. 'आता आपण कुमारिकेमधून सौभाग्यवती होत आहोत, फक्त समाजाच्या दृष्टीने नाही, तर आपल्या नव्याने आखल्या गेलेल्या भूमिकेच्या दृष्टिकोनाने सुद्धा.. आणि मनाने सुद्धा.. स्वप्नात रमणे हे कुमारिकांचे भाव जीवन आहे आणि वास्तवाचा स्वीकार करून परिस्थितीला सकारात्मक आकार देणे हे सौभाग्यवतीचे जीवन आहे.. आज आपण जीवनातला एक टप्पा नीट पार केला आहे याच केवढे समाधान आहे... ', असे विचार तिच्या मनात येत होते, त्यांना मध्येच बाजूला ठेवून यज्ञात तूप आणि इतर समिधांची आहुती देणे या सारख्या इतर पुरोहितांनी सांगितलेल्या क्रिया ती करत होती.

सुखदासला धर्माची फारशी जाण नव्हती पण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ वेदात सांगितल्याचे त्याने कधीतरी ऐकले होते. पुरोहितांनी फक्त 'धर्म, अर्थ आणि काम' हेच तीन पुरुषार्थ सांगितले 'मोक्ष' नाही म्हणाले असा एक विचार त्याच्या मनात येऊन गेला. सुखदासला पुरोहितांनी संयुक्ताच्या हाताला हात लावून पळीवरून पाणी सोडायला सांगितले. संयुक्ताच्या हाताला स्पर्श केल्यावर आपले स्वप्न पूर्ण होत आहे याचा आनंद सुखदासच्या चेहर्यावर उमटला.

सुखदास-संयुक्ताचा विवाह सोहळा हे शहरातला एक मोठा समारंभ होता. त्यामध्ये अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आल्या होता. समीहनला सुद्धा आमंत्रण होते. समीहनला एका कार्यालयाच्या नियोजनाची नुकतीच नोकरी मिळाली होती. समीहन सुखदास-संयुक्ताच्या लग्नाला लग्न लागायच्या अगदी काही मिनिटे आधी आला. विवाह सोहळा संपन्न झाल्यावर त्याने वधू - वरांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी सदिच्छा दिल्या. परत जाताना त्याने एकदा संयुक्ताकडे पाहिले, संयुक्तानेही त्याच्या डोळ्यात पाहिले. अजूनही संयुक्ताचे डोळे तेच सांगत होते जे सत्कार समारंभाच्या वेळी सांगत होते, ' त्यांची स्वप्ने एकच होती आणि त्या स्वप्नांमध्ये ते एकत्रच होते'.

सुखदासची आई दुर्गादेवी, लग्न समारंभात पुरती बुडून गेली होती. पहिल्यांदा लग्नाचे विधी, मग लोकांच्या भेटीगाठी, मानपान आणि जेवण यात सगळ्यांना हवं नको ते बघणे.. या सगळ्या गडबडीत लग्न लागताना सुखदासच्या चेहेऱ्यावर उमटलेला आनंद, तिने बघितला आणि 'याची साठी केला होता अट्टाहास ... ' असा समाधानाचा निश्वास सोडला. या सर्व गडबडीत अजून दोन गोष्टी दुर्गादेवीनी पहिल्या होत्या, एक म्हणजे संयुक्ताच्या चेहेऱ्यावर झळकलेले समाधान आणि समीहन परत गेला तेव्हा संयुक्ता - समीहन ची झालेली नजर भेट आणि संयुक्ताच्या डोळ्यात समीहन साठी दिसणारी तळमळ. लग्नझाल्यावर नवं वधूने घरात प्रवेश केला. त्याकाळच्या रीतीप्रमाणे दुर्गादेवीनी संयुक्ताला नवीन नाव दिले - समर्पिता.

लग्नापूर्वीची संयुक्ता आता समर्पिता होऊन लक्ष्मीपतींच्या घरी नांदत होती. सुखदासचे लग्नानंतरचे दिवस रोज एक नवीन सुख घेऊन येत होते. समर्पिता आपले दिवसभरची काम उरकून सुखदास जवळ येत असे. रात्री सुखदासच्या मिठीत शिरताना तिच्या मनात समीहनच्या गरिबीने गांजलेल्या पण आता मार्गाला लागलेल्या जीवनाचा, त्याच्या कर्तृत्वाचा एकदा तरी विचार येत असे आणि सुखावल्या सुखदास बरोबर तिच्या डोळ्यात समाधानाची झोप येत असे.

इथे समीहन रोज आपल्या कामाच्या ठिकाणी एक नवीन जबाबदारी उचलत होता. कार्यालयाचे व्यवस्थापन चोख बघितले जात होते. त्याच्या कामावर खुश होऊन समीहनचा पगार वाढून दिला गेला होता. समीहन च्या वडिलांनी त्यांच्या मुलींच्या लग्नामध्ये घेतलेली देणी आता पूर्ण पणे फिटत आली होती. सुखदासचा संसार सुखाने फुलत होता, तशी दुर्गादेवी समीहन काम करत असलेल्या कार्यालय मालकांच्या संपर्कात येऊ लागली. लक्ष्मीपतींच्या कामकाजासाठी लागणाऱ्या सभा समारंभांसाठी समीहन काम करत असलेले कार्यालय भाड्याने घेतले जाऊ लागले. कार्यालय मालक यांची व्यवसायातील मिळकत झपाट्याने वाढत होती, काहीच दिवसात त्यांचे कार्यालय कलकत्त्यातील सभा समारंभांसाठी एक नावाजलेले कार्यालय म्हणून गणले जाऊ लागले. चोख काम पहाणाऱ्या समीहनचीही मिळकत वाढत होती. चोख आणि उत्तम कार्यालय व्यवस्थापन यासाठी समीहन चा नाव लौकिकही वाढत होता.

मुलाच्या कतृत्वाने आपली सगळी देणी फिटली याचा समीहनच्या वडिलांना सार्थ अभिमान होता. समीहन ची जशी जशी स्वप्ने पूर्ण होऊ लागली तशी कतृत्वाची नवीन क्षितिजे दिसू लागली. त्याच्या काकांची आणि वडिलांची गावाकडे काही शेत जमीन होती. त्याला लागून असलेली काही एकर जमीन समीहन ने विकत घेतली.
'जशी आर्थिक स्थिती सुधारेल तशी अजून थोडे कर्ज घेऊन गावाच्या शेताजवळ पोहे, शेवया पाडायची छोटी गिरणी सुरु येईल. कलकत्यामध्ये त्याला भाव चांगला येईल'
समीहन च्या डोक्यात भावी उद्योगाची गणिते चालली होती.

लग्नानंतर सुखदास पूर्वींपॆक्षा वडिलांच्या कामकाजामध्ये अधिक लक्ष घालत असला तरीही पैशाच्या व्यवहारांशी त्याचा फारसा संबंध येत नसे. समर्पिता दुर्गादेवीच्या सल्ल्याने लक्ष्मीपतीच्या व्यापारात लक्ष घालू लागली आर्थिक व्यवहार, व्यापाराशी निगडीत लोकांचे संबंध यामध्ये समर्पिता लक्ष्मीपतीं बरोबर सल्ला मसलत करत असे. दुर्गादेवी बरोबर समीहन काम करत असलेल्या कार्यालयामध्ये जाण्याच्याही अनेक वेळी योग आला. त्या योगाने समीहन शी भेटी गाठी सुद्धा होत असत. परंतु या सर्व भेटी गाठींमध्ये दुर्गादेवींचा विश्वास सार्थ होईल अशा प्रकारे मर्यादा समर्पिताने कायम पाळल्या होत्या.

सुखदास-समर्पिताचे झालेले लग्न आणि त्यानंतर समीहन च्या कार्यालयाची झालेली भरभराट हे अनेकांच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नव्हते. स्वतः समीहनसुद्धा स्वकतृत्वावर कायम विश्वास ठेवणारा असला तरीही त्याच्या लक्षात ही गोष्ट आल्यापासून राहिली नव्हती.

जशी लक्ष्मीपती समर्पिता बरोबर सल्ला मसलत करत तशी कोणते कपडे घालावे यापासून नातेवाईकांशी असलेल्या संबंधा पर्यंत प्रत्येक गोष्टी मध्ये सुखदासला समर्पिता लागत असे. रात्रीचा रतिसुखाचा काळ सोडला तर इतर वेळी सुखदास हे समर्पिताचे मुलंच होऊन गेला होता.

सुखदास - समर्पिताचे वैवाहिक जीवन फुलत होते.समर्पिताचे लक्ष्मीपतीच्या व्यापारातील लक्षही वाढत होते.याचे लक्ष्मीपती आणि दुर्गादेवी यांना समाधान होते. समीहन व्यावसायिक प्रगतीच्या नवीन पायऱ्या चढत होता. काही दिवसापूर्वी डोक्यात असलेली पोहे-शेवया करण्याची गिरणी प्रत्यक्षात यायच्या मार्गावर होती आणि समीहन उद्योजक म्हणून काही वर्षात समाजासमोर येईल असे दिसत होते. एका कॊटुंबिक समारंभासाठी दसऱ्याच्या दिवशी लक्ष्मीपतींच्या घरी सगळे नातेवाईक जमले होते. सकाळी दुर्गापूजनानंतर काही वेळाने दुपारी जेवणाचा बेत होता.

'जय काली माँ !!!', या आवाजाने सगळ्यांचे लक्ष वाड्याच्या दाराकडे गेले. दारात भगवी वस्त्र घातलेला, छोटी दाढी वाढवलेला चाळीशीच्या आसपास वय असलेला एक संन्यासी उभा होता. लक्ष्मीपतीच कुटुंब खूप अध्यात्मिक नसले तरी प्रचलित धर्म कर्म पाळणारे होते. लक्ष्मीपतींनी संन्याशाला घरात बोलावले. सुखदास वडिलांमागून बाहेर आला, त्याची आणि संन्याशाची नयन भेट झाली, आणि लक्ष्मीपतीच्या धनातून, समर्पिताबरोबर घालवलेल्या त्या मोहक सुखाच्या रात्रींतून जे कधी मिळाले नाही ते आज चालत आले अशी एक भावना त्याच्या मनाला स्पर्श करून गेली. 'आज हे संन्यासी इथे कुठे?', असा प्रश्न सुखदासच्या मनात आला आणि लगेच संन्यासी म्हणाला, 'मला ठाकूरांनी तुमच्या घरी यायला सांगितले !!'

लक्ष्मीपतींच्या कुटुंबातील एका वयस्कर व्यक्तीला त्या दारावर आलेल्या संन्याशाची ओळख पटली, कालकात्याजवळ दक्षिणेश्वर मधल्या काली मातेच्या मंदिरात, ठाकूर म्हणून एक पुजारी होता. त्यांना अनेक जण रामकृष्ण म्हणत. त्यांनी देह ठेवल्यावर त्यांच्या तरुण संन्यासी शिष्यांनी रामकृष्ण मठ स्थापन केला होता. अनेक वर्तमान पत्रातून विवेकानंदांच्या अमेरिका आणि इंग्लंड मधल्या कार्याचे कौतुक झाले होते. त्या रामकृष्ण मठातील हा एक संन्यासी होता त्याला 'स्वामी अद्भुतानंद' म्हणून लोक ओळखत. दक्षिणेश्वरच्या काही व्यक्ती त्यांना 'लाटू महाराज' म्हणत. त्यांनी पुढे होऊन, महाराजाना बसायची विनंती केली.

बिहारी आणि बंगाली संमिश्र आणि काहीशा गावंढळ भाषेत बोलणारे लाटू महाराज न बसताच सुखदास कडे पाहत म्हणाले,
' यत्र नार्यास्तु पूज्यन्ते । तत्र रमन्ते देवता ।, स्त्रियांचा सन्मान होतो अशा ठिकाणी देवता वास करतात असा मनुस्मृतीत उल्लेख आहे. तुम्ही मोठे पुण्यवान लोक, कधीतरी ठाकुरांपाशी येत जा! '

दिलेले आसन आणि फळे न घेताच तो मध्यवयीन संन्यासी 'जय काली' म्हणत निघून गेला. आज अनेक वर्षांनी पहिल्यांदा, कदाचित आयुष्यात पहिल्यांदा सुखदासला काहीतरी नसल्याची जाणीव झाली. घराचा समारंभ संपला,सर्व नातेवाईक आपापल्या घरी गेले. रात्री जेवण वगैरे आटपून सुखदास आणि समर्पिता आपल्या खोलीत झोपायला गेले. सुखदास अजूनही लाटू महाराजांशी झालेल्या काहीशा अलौकिक भेटीचा विचार करत होता. शेजारी येऊन झोपलेल्या समर्पिता पासून थोडं अंतर ठेवून झोपावं असं त्याला लग्नानंतर पहिल्यांदा वाटले.

दुसरा दिवस उजाडला, नेहमी प्रमाणे सगळे जण आपल्या कामाला गेले. सुखदास आपले नेहमीचे काम म्हणजे कापूस गोदामांमध्ये जाऊन तिकडचा माल तपासणे, आल्या गेल्या मालाचा हिशोब ठेवणे, गोदामांवर आणि मालवाहकांचे काम करणाऱ्या व्यक्तींची भेट घेणे वगैरे काम करून तो परत येत होता त्यावेळी नुकतीच लक्ष्मीपतीनी घेतलेल्या नवीन कापड गिरणीचे मालक सुखदास ला येऊन भेटले आणि आपल्या गिरणीवर कधीतरी येण्याचे आमंत्रण देऊन गेले. आमंत्रणाचा स्वीकार करून सुखदास घरी परतला.

त्यादिवशी घरी एक आमंत्रण पत्रिका आली होती. सुखदासने ती आमंत्रण पत्रिका उघडून पाहिली, समीहन चे कलकत्त्यापासून काहीच अंतरावर राहणाऱ्या आणि मोठी भात शेती असलेल्या जमीनदारांची मुलगी सुनंदीनीशी लग्न ठरले होते. पत्रिका आपल्या खोलीत ठेवून सुखदास वाड्यात खाली चक्कर मारायला गेला. समर्पिताने ती पत्रिका वाचली, आपल्या छातीशी धरली आणि तिच्या डोळ्यातून पाण्याचा एक ओघळ आला. यानंतर खरंच समर्पिता आणि समीहन चे एकच स्वप्न आणि त्यासाठी चाललेली धडपड तशीच राहणार होती का? तिने पटपट डोळे पुसले, ती पत्रिका नीट ठेवून दिली. हे कधीतरी होणारच होत आणि वेळच्या वेळी समीहन पण आयुष्यात त्याच्या संसारात स्थिर होईल याच समाधान होत. सत्कार समारंभ पासून, आज पर्यंतचा सगळा काळ तिच्या मनात येऊन गेला. किती थोड्याकाळात समीहन ने केवढी प्रगती केली होती? काही वर्षांपूर्वी दोन वेळेच्या जेवणासाठी काकांनी पाठवलेल्या तांदूळाच्या पोत्यांवर अवलंबून असणारा समीहन आज घराची सगळी कर्ज फेडून एका छोट्या गिरणीचा मालक होऊ घातला होता. स्वबळावर एका मोठ्या धनाढय कुटुंबाशी त्याचे नाते जोडले जाणार होते. समीहनचे कौतुक करावे तेवढे कमीच होते. सुनंदिनी केवढी भाग्यवान आहे!! असे सगळे विचार तिच्या मनात येत होते तेवढ्यात तिला दुर्गादेवीनी जेवणाच्या तयारी साठी बोलावले तशी ती स्वयंपाक घराकडे पळाली. तिच्या दृष्टीने कतृत्वहीन सुखदास एवढी एक खंत सोडली तर तिच्या जीवनातही अनेक सुंदर गोष्टी लग्नानंतर आल्या होत्या. त्यादिवशी रात्री समीहनचा विचार तिने थोडा कटाक्षाने टाळला आणि योगायोगाने किंवा तिच्या भाग्याने सुखदासही तिच्या जवळ आला नाही.

दसऱ्याला एक आठवडा होऊन गेला. या आठ दिवसांमध्ये अजून एक गोष्ट झाली होती आणि ती म्हणजे एकदाही सुखदास समर्पिताच्या जवळ आला नाही. समर्पिता आणि सुखदास दोघेही रात्री आपल्या विचारात गुंगलेले असत. हा आपला विषय नाही अस कितीही स्वतःला सांगितले तरीही समर्पिताच्या मनात समीहनच्या लग्नाचा विचार येत असे. या सगळ्या विचारात सुखदास पूर्वी सारखा आपल्या जवळ येत नाही हे तिच्या लक्षातच आले नाही. सुखदासही परत परत विचार करून पाहत होता, 'असं नक्की काय आहे जे आपल्याला मिळाले नाही, जे आपल्याकडे नाही. कुटुंब, धन दौलत, मानपान, घर-दार, सुंदर सुगृहिणी आणि सर्व सुख देण्यास तयार असणारी बायको, हे सगळे असताना नक्की काय आहे ज्याची उणीव जाणवते? आता आपल्याला मुलं व्हायला हवे का?' पण अजून तर मन मुलाची जबाबदारी घ्यावी यासाठी नको म्हणत होते. अजून काही काळ समर्पिताबरोबर लग्नाचे नवे नवलाईचे दिवस तसेच टिकावे असेच वाटत होते.

काही कामानिमित्त समीहन आणि समर्पिताची भेट झाली त्यावेळी समर्पिताने समीहनचे अभिनंदन केले. समीहनलाही या भेटीत थोडा त्रयस्थपणा जाणवला पण अजूनही त्यांच्या नात्यातील एक अनामिक जवळीक टिकून होती. समीहनचे लग्न ठरल्यावरही आपली आणि त्याची पूर्वीची जवळीक आणि अबोल भाषा अजून शाबूत आहे याने समर्पिताला खूप बरे वाटले.

काही दिवसांनी सुखदासला गिरणी व्यवस्थापकांनी दिलेल्या आमंत्रणानुसार सुखदास गिरणी बघायला गेला. या गिरीणीमध्ये लक्ष्मीदासांनी नुकतेच काही महिन्यांपूर्वी पैसे गुंतवले होते. त्या काळात कापड गिरीणीमध्ये स्त्रियांना नोकरी मिळत नसे. कापड गिरणी पाहिल्यावर सुखदास खुश झाला, आपल्या वडिलांनी केलेली अनेकांपैकी ही एक सार्थ गुंतवणूक होती. गिरणी पाहून झाल्यावर एक चाळीशी उलटून गेलेली बाई सुखदासकडे आली आणि म्हणाली,
' गिरणीत काम मिळाले तर फार उपकार होतील साहेब!'

'आमच्या गिरणीत बायकांना नोकरी देत नाही मावशी!' सुखदास म्हणाला.
'फार गरज आहे साहेब, जवळच राहते, दोन मिनिटे घरी येऊन जाता का?', कळवळून बाई विनवत होती.

सुखदासला नाही म्हणावे ना. चालत थोडे अंतर गेल्यावर एक खोपट होतं तिथे आत तिची तीन मुलं खेळात होती. भिंतीवर एक टांगलेला होता, तो तिच्या पतीचा असल्यासारखे वाटत होते. फोटो कडे बघत सुखदास काही बोलणार याच्या आतच बाई म्हणाली,
' हे आमचे पती, याच गिरणीत कामाला होते, एकदिवस रात्री म्हणाले छातीत असह्य कळ आली. मी त्यांना दवाखान्यात घेऊन जाई पर्यंत सगळा खेळ संपला होता, आता या तीन लेकरांचे पोट कसे भरायचे हा प्रश्न पडतो. जे थोडे पैसे साठले होते त्यामध्ये एक- दीड महिना काढला'.
सुखदासला त्या बाईची दया आली, 'हे कधी झालं मावशी?', सुखदासने विचारले.

'भाद्रपद महिन्यात पौर्णिमेला', बाईने उत्तर दिले.

भाद्रपद महिन्याची ती पौर्णिमा सुखदासला आठवली. सुखदास समर्पिताला घेऊन कलकत्त्या पासून काही अंतरावर असलेल्या त्यांच्या जुन्या बंगालीत घेऊन गेला होता. पावसाळ्याचे दिवस होते, तरीही संध्याकाळी थोडा काळ उघडीप होती आणि त्यांना मोठ्या भाग्याने चंद्र दर्शन झाले. नंतर परत पाऊस सुरु झाला. बाहेर निसर्ग चिंब भिजत असताना, समर्पिताच्या कमनीय सौंदर्यात घालवलेली ती सुखातिशयात भिजवून टाकणारी ती रात्र सुखदासला चांगलीच लक्षात होती. सुखदास ला काय बोलावे कळे ना.

गिरणी व्यवस्थापकांना तिच्या नोकरीची काहीतरी तरतूद करायला सांगून सुखदास आपल्या घरी परतला. आज रात्री परत त्याला समर्पितापासून थोडे अंतर ठेवून झोपावे असं वाटलं. हा सगळा एक निव्वळ योगायोग आहे असा कितीही वेळा सांगूनही त्याच्यामनातून भाद्रपद पौर्णिमेला समर्पिताबरोबर काढलेली रात्र,आणि त्या गरीब गिरणी कामगाराच्या घरचे दैन्य याचा विषय जात नव्हता. रात्री किती तरी वेळ तो झोपेविना पडून राहिला. पुढचा आठवडा असाच निघून गेला. या आठवड्यात अनेकदा सुखदासला समर्पितच्या जवळ जाण्याचा अनावर मोह होत असे आणि त्याच बरोबर गिरीणीपाशी भेटलेल्या बाईचे दैन्य याची आठवण होत असे. या दोन आठवड्यात सुखदासने रस्त्यावरून जाताना जितके गरीब, भिकारी, अपंग रोगी पाहिले तितके आतापर्यंतच्या आयुष्यात पहिले नव्हते. काय झाले होते माहीत नाही पण डोळ्यावरचा एक पडदा निघून गेल्यासारखे सगळे जग एक वेगळ्याप्रकारे दिसत होते.

एक दिवस काही विशेष ठरवलेली कामे झाली नव्हती थोडासा हताश होऊन सुखदास घरी परतत होता, येताना रस्त्याच्या कडेला असलेल्या मंदिरातून घंटेचा आवाज आला आणि सुखदासला गावंढळ पण प्रेमळ भाषेत, 'कधीतरी ठाकुरांकडे येत जा!' असे सन्याशाचे शब्द आठवले. सुखदास वळून रामकृष्ण मठाच्या दिशेने आपली गाडी वळवली. एका जुन्या घरात रामकृष्ण मठ स्थापला होता. आवार, आतला वऱ्हांडा स्वच्छ आणि नीट नेटका ठेवला होता. आत रामकृष्णांची एक प्रतिमा ठेवली होती. सुखदास आला तेव्हा दिवे लागणीची वेळ झाली होती. रामकृष्णांच्या प्रतिमेसमोर दिवा तेवत होता.

सुखदास थोडा वेळ तेथे जाऊन शांत बसला. कदाचित याच शांततेची त्याला गरज होती का? हीच आज पर्यंत आयुष्यात न मिळालेली गोष्ट होती का? थोड्या वेळाने लाटू महाराज तेथे आली, सुखदास ला पाहून चेहेऱ्यावर आनंदाचे एक पटकन हसू उमटले तो आनंद आवारत त्यांनी विचारले, ' आज कास येणं केलं ?'

'सहज', सुखदास म्हणाला.

'बाकी सगळं चांगलं चालले आहे ना?', महाराजांनी विचारले.

सुखदास काही बोलला नाही. महाराज रामकृष्णांच्या प्रतिमेकडे पाहून म्हणाले, ' तरुण असताना मी ठाकुरांकडे जात असे. ठाकूर मला सांगत, इथे येणारी लोक संसारात होरपळलेली असतात'.

सुखदासने होकारार्थी मान हलवली. 'आजचा दिवस चांगला गेला ना?', महाराजांनी विचारले.

सुखदासने नकारात्मक मान हलवली.

'असू दे!', महाराज म्हणाले. सुखदासच्या हातावर प्रसाद म्हणून एक गुळाचा खडा दिला आणि म्हणाले, ' तुम्ही सगळी कर्तव्य तत्पर लोक आहात दिवसाची कामे नाही नीट झाली की बेचैनी यायचीच. एकदा ठाकूरांकडे गेलो होतो. दिवसभर काही नीट काम झाले नाही. नुसता बेचैन होतो. ठाकूर म्हणाले, लेटो, सांग बरं कोणता दिवस वाईट गेला?'

मी विचारले 'कोणता?'

ठाकूर म्हणाले, 'ज्या दिवशी ईश्वरस्मरण झाले नाही तो !'.

महाराजांनी सुखदासला हात जोडून नमस्कार केला आणि आपल्या कामाला निघून गेले. सुखदास पण प्रसाद घेऊन घराकडे परतला. घरी आला तेव्हा अंधार पडला होता. समर्पिताच्या चेहऱ्यावर थोडी काळजी पसरली होती. दोन सलग दिवस, काम संपल्यावर सुखदासला घरी यायला वेळ होत होता काळजीयुक्त समर्पिताचा चेहरा पाहून सुखदास म्हणाला, 'मठात जाऊन आलो', हे शब्द ऐकून समर्पिताच्या चेहऱ्यावरची काळजी मावळली.

आज रात्री परत सुखदासला समर्पिताच्या जवळ जायला संकोच वाटला.सुखदास आजकाल आपल्यापासून रात्री थोड अंतर ठेवून झोपतो हे आता समर्पिताच्या ध्यानात आले होते. समर्पिता झोपल्यावर थोडाकाळ सुखदास नुसता शांत बसला. आज रामकृष्ण मठात अनुभवलेली शांतता आणि लाटू महाराजांचे वचन त्याला आठवत होते. झोपायच्या आधी एकदा मनात दुर्गेचे स्मरण केले.

सुखदास मध्ये होत असणारा बदल समर्पितासाठी समाधानकारक असला तरीही काहीसा काळजीत पाडणारा होता. 'सुखदासला दुसरी कोणती मुलगी आवडायला लागली आहे का?, का आजकाल माझ्यातून त्याला पूर्वीचे सुख मिळत नाही? असे अनेक विचार तिच्या मनात उठत असत.

सुखदास मध्ये अजून एक झालेला बदल म्हणजे, पूर्वी रतिसुखाचा काळ सोडला तर इतर काळ तो जणू समर्पिताचे मुलचं होऊन गेला होता. तसा भाव आता सुखदासचा राहिला नाही. सुखदास बहुसंख्य वेळ आपल्या कामात किंवा विचारात घालवत असे. कसले विचार त्याच्या डोक्यात येतात याचा समर्पिताला अंदाज बांदता येत नसे. परंतु त्याचा व्यापार वाढवण्याशी विशेष संबंध नसावा कारण, नोकरी केल्यासारखे आपले कामकाजाचे तास झाल्यावर सुखदास फार जास्त व्यापारात लक्ष घालत नसे.

दिवस वेगाने जात होते. सुखदासचा रात्री झोपण्यापूर्वी थोडाकाळ शांत बसून दुर्गेचे स्मरण करायचे असा एक नियमच होऊन गेला होता. असं न केल्यास, आपला हा सुख-समृद्धीने भरलेला वाडा आणि वाड्याच्या भिंतीबाहेर उपासमारीने खंगलेली मुले, उपचार अभावी यातना भोगणारे रोगी,दोन वेळेच्या अन्नासाठी पदर पसरणाऱ्या स्त्रिया, पौर्णिमेला स्त्रीसुखात आपण बुडून गेलेलो असताना एका गरीब स्त्रीने हरवलेला आपला कमावता नवरा, या सगळ्यांचे विचार त्याला झोपू देत नसत.

आता समर्पिता कधीमधी रात्री सुखदासचे लक्ष आकर्षित करून घ्यायचा प्रयत्न करू लागली. कधी काही विषय काढून त्याच्याशी बोलत असे तर कधी झोपताना स्वत:हून त्याला मिठी मारत असे. कधी कधी सुखदासही अनेक दिवसांची भूक भागविल्यासारखा समर्पिताच्या जवळिकीला प्रतिसाद देत असे परंतु आता त्यामध्ये स्त्रीसुखाचा हक्क हा भाव जाऊन, आपल्या सय्यमाचा बांध तुटणे हा भाव अधिक होता. अजूनही सुखदास आपल्या जवळ येतो याचे समर्पितालाही समाधान असे.

काही दिवसांनी मठामध्ये नरेंद्रनाथांनीं 'शिव भावे जीव सेवा' हा मंत्र सांगितला आणि सुखदास सुद्धा इतर संन्याशांबरोबर आठवड्यातले काही तास गोर गरीबांची, रोग्याची सेवा करण्यात घालवू लागला. ज्यादिवशी त्याच्या हातून ही सेवा होत असे, त्या रात्री त्याच्या डोळ्यात समाधानाची झोप येत असे. किती साध्या गोष्टी आपल्याला कधी मिळाल्या नाहीत, असा विचार सुखदासच्या मनात येऊन जात असे.

एकदा मठात गेले असताना लाटू महाराज सांगत होते, 'स्वामीजी (विवेकानंद) संसारी साधकांना सांगत कि तुम्ही तुमचा व्यवसाय, उद्योग धंदा वाढवा.. ठाकूरांना संसार, परमार्थ सगळीच त्या जगन्मातेची लीला वाटत असे.', सुखदासाचे लाटू महाराजांचे निरूपण ऐकणे, आठवड्यातून काही तास सेवा करायला जाणे, आणि रात्री झोपण्यापूर्वी दुर्गेचे स्मरण करणे या गोष्टी हळू हळू नियमित होत होत्या. सुखदास आणि समर्पिताच्या वैवाहिक जीवनातील रतिसुखाचा काळ जवळ जवळ संपल्यासारखाच झाला होता.

सुखदासचे आधीच व्यापारात थोडेसेच लक्ष आणि आता रामकृष्ण मठाशी जास्त निगडीत होऊन जाणे. हा लक्ष्मीपतींच्या सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय होऊ लागला. लक्ष्मीपती आणि दुर्गादेवीचे नातलग, तसेच समर्पिताचे नातलग सुखदासची वारंवार चौकशी करत असत. लक्षमीपतींना किंवा दुर्गादेवीला सुखदासचे वागणे तक्रार करण्यासारखे वाटत नसले तरीही घर, दार, व्यापार हे सोडून संन्याशाच्या नादाला लागणे खूप भावत नव्हते. समर्पिताला काळजी वेगळी होती. तरुणपणी परमार्थाच्या नादाला नवरा लागला याचा अर्थ समर्पिता त्याला रतिसुख देत नसणार अशा नजरा तिला झेलाव्या लागत होत्या. त्यातून
कामकाजाच्या निमित्ताने समर्पिता आणि समीहन यांची होणारी गाठ-भेट, लक्ष्मीपतींच्या कामकाजाच्या बहुसंख्य सभा समारंभांसाठी वारंवार वापरात येणारे समीहन चे कार्यालय, लक्ष्मीपतींच्या व्यापारातील आर्थिक बाबींमध्ये समर्पिताचा असणारा सहभाग हा सगळा आता लोकांमध्ये चर्चेचा आणि निंदा नालस्तीचा भाग होऊन गेला होता. जशी मॅट्रीकच्या परीक्षेपूर्वी शाळेत अनेक लोकांनी संयुक्ता आणि समीहन अशी जोडी बनवली होती तशी लोक आतासुद्धा बनवत होते. लक्ष्मीपती आणि दुर्गादेवी यांना सुद्धा समर्पिताने सुखदासला संसारात थोडं रंगवावं असं वाटत असे. कधी मधी जेवताना विषय निघे,

'हळू हळू व्यापार तुम्ही बघायला लागा'. लक्ष्मीपती म्हणत..
'कलकत्त्या बाहेरच्या आपल्या बंगालीची व्यवस्था कधी तरी तू आणि समर्पिता जाऊन बघून या.. चार दिवस तेथेच राहिलात तरी चालले, ' - दुर्गादेवी

याचा अर्थ समर्पिताला समजत नसे असं नाही. ते फक्त सुखदास कडे पाहत असे. सुखदासही असे विषय सहसा टाळत असे.

स्त्री-सुखापासून आपल्या नवऱ्याला वंचित ठेवणारी एक निष्ठुर पत्नी ही आजूबाजूच्या लोकांची दृष्टी जशी समर्पिताला छळत होती तशीच अजून एक चिंता सतावत होती. 'या सगळ्या लोकांच्या न बोलून दाखवलेल्या आरोपांनी, लक्ष्मीपती आणि दुर्गादेवी, समीहन च्या कार्यालयाशी असलेले आपले व्यावहारिक संबंध थोडणार तर नाहीत?, समीहन आता जुनी देणी फेडून, आता आर्थिक दृष्ट्या आता सधन झालेल्या समीहन ला अजूनही कार्यालयातून मिळणाऱ्या पगाराची गरज होती. गावाकडे गिरणी बांधण्यासाठी त्याने नवीन कर्ज घेतली होती. आता लग्न झाल्यामुळे घर खर्च वाढले होते'

सुखदासच्या वैवाहिक सुखासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारी आणि समीहन बरोबर असताना सर्व मर्यादा पाळणारी समर्पिता अजूनही समीहन च्या स्वप्नांशी समरस होती.अजूनही समीहनच्या अडचणी तिच्या अडचणी होत्या, याला प्रेम म्हणावं, मैत्री म्हणावी, ममता म्हणावी, आसक्ती म्हणावी का मातृत्व म्हणावं हे समर्पिताही कधी ठरवू शकली नाही. मॅट्रिकच्या परीक्षेनंतर, जेव्हा संयुक्ताने सुखदासशी लग्न करून समर्पिता होण्याचा निर्णय घेतला त्यानंतरची ही तिच्या आयष्यातली सर्वात मोठी परीक्षा होती.

सुखदास -संयुक्ताचे वेगाने बदलणारे वैवाहिक जीवन, हा संयुक्ताच्या आई-वडिलांसाठी ही काळजीचा विषय होता. जावयाने काय किंवा मुलाने काय मोठे कतृत्व करावे,नाव लौकिक कमवावा इचछा होत्या. ज्या समाजात सुखदास -संयुक्ता राहत होते त्या समाजासाठी परमार्थाच्या नादाला लागून, संन्याशांबरोबर जनसेवा करायला जाणे, हा घरातल्या स्त्री वर्गाला ज्यांचे शतकानु शतके काम पुरुषांना सुखोपभोग देणे हे होते त्यांच्यासाठी कमीपणा आणणारे होते.लक्ष्मीपतीचें नातेवाईक, सगे सोयरे, किंवा प्राध्यापक साहेबांचे (संयुक्ताचे वडील) नातेवाईक, सुखदास समर्पितामध्ये नाही तर घराच्या इतर मुलीत रस घेतो का? हे बघायला जात होते. आपल्या कुटुंबामध्ये हे परमार्थाचे भूत सोडून कोणत्यातरी स्त्रीच्या सुखभोगात सुखदासने रमावे येवढीच त्यांची इच्छा होती.

समाजाच्या नजरा झेलत समर्पिता दिवस काढत होती. एक दिवस तिने आपल्या कामाच्या निमित्ताने समीहनशी भेट घेतली. समीहनला बदललेल्या परिस्थितीची चांगलीच जाण होती. आता आजूबाजूचा समाज समीहन-संयुक्ताचे नाते चिकित्सापूर्वक बघत होता. समीहन चे नवीन झालेले लग्न, नोकरीतील वेगाने झालेल्या प्रगतीने निर्माण झालेले स्थान, आणि नवीन गिरणीच्या निमित्ताने निर्माण झालेले हितसंबंध त्याची पुढची स्वप्ने, त्याला आकार देण्यासाठी चाललेला प्रयत्न या सर्वात आता त्याला आपल्या चारित्र्यावरचा संशय ही मोठी समस्या वाटायला लागली होती. अशा परिस्थितीत समर्पिताशी जवळीक ठेवून लक्ष्मीपतींशी संबंध बिघडवणे समीहनला परवडणारे नव्हते. समर्पिता समीहन ला भेटली. भेटीत बोलता बोलता सुखदासचा विषय निघाला. इतक्यावर्षात पहिल्यांदा समीहन आणि समर्पिता आपल्या आयुष्याबद्दल सविस्तर बोलत होते. समर्पिताच्या मनात समीहन च्या कतृत्वा प्रेम आणि आदर अजूनही होता. त्यांचेसंभाषण संपताना,समीहन ने समर्पिताला वेदांमधला श्लोक सांगितला,

'कार्येषु मंत्री करणेषु दासी ।
रूपे षु लक्ष्मी, क्षमया धरित्री ।
भोज्येषु माता शयनेषु रंभा ।
शत धर्मयुक्ता: कुलधर्म पत्नी।'

समर्पिता हे ऐकून घराकडे वळली आणि वेगाने चालू लागली तिने आपल्या भावना आवरायचं प्रयत्न केला पण तरीही या सगळ्या आवरण्याला झुगारून एक पाण्याचा ओघळ डोळ्यातून आला, कितीतरी वेळ दाबून ठेवलेला आवंढा फुटला.. कार्येषु मंत्री,कारणेषु दासी,रूपेषु लक्ष्मी समर्पिता आधीपासून होतीच,क्षमाया धरित्री म्हणावं असा काही गुन्हा समर्पिताच्या घरच्यांनी केला नव्हता. या सगळ्या प्रतिष्ठित, सुशिक्षित, सामाजिक आणि आर्थिक यशाच्या आसनावर आरूढ झालेल्या सर्वांची तिच्याकडून मूक अपेक्षा - ' भोज्येषु माता, शयनेषु रंभा ।' हीच होती. आज कित्येक वर्षांनी पहिल्यांदा तिला कर्तव्यदक्ष, कष्टाळू, स्वावलंबी, महत्वाकांक्षी समीहन च्या आत कोठेतरी दडलेला पुरुषी अहंकार दिसला. कित्येक वर्ष मनामध्ये समीहनशी असलेले ते एक अबोल नाते आज तुटले होते. आज पहिल्यांदा समर्पिता खूप एकटी झाली होती.

सुखदास आपला दिनक्रम धरून होता. आजूबाजूच्या सर्वांचे इशारे कळून न कळल्यासारखे करत, तो समर्पिताशी त्यांच्या खाजगी जीवनातही सय्यम ठेवून वागत असे. रात्रीची प्रार्थना आता तो न चुकता करत असे. समर्पिता पासून दुर्गादेवीं पर्यंत सगळ्यांच्या सदिच्छा असल्या तरीही त्या टाळून आपला आंतरिक शांती देणारा मार्ग आचरणे त्याला अवघड होत होते. कोठेतरी मनातून सगळ्या लोकांच्या सदिच्छांचे प्रेम पण वाटत असे आणि चीड पण येत असे. या सगळ्यांचे सुखदास विषयीचे सुखचिंतन, नीती किंवा न्यायनिष्ठेतून न येता आत्मप्रतिष्ठेच्या काळजीतून येत असे.

अशाच एका विचारात असताना त्याला लाटू महाराजांनी सांगितलेली ठाकूरांची गोष्ट आठवली. एकदा मठात लाटू महाराज सांगत होते, ठाकूर म्हणत, 'सर्व कामे करा, पण मन ईश्वराकडे लावून ठेवा. बड्या घरची मोलकरीण जशी, मालकाकडे दिवसभर काम करते, पण तिचं मन असतं खेड्यातल्या तिच्या घराकडे ! मालकाच्या पोरांना ती "माझा हरी", माझा राम", म्हणत खेळवते, वाढवते पण अंतरी जाणून असते कि ती तिची कोणी नव्हेत'.

या ठाकूरांच्या शब्दांचा अर्थ सुखदासला आज समजत होता. सगळेच त्याच्या सुखासाठी चिंतन करणारे होते, पण सगळ्यांना आत्म प्रतिष्ठेची काळजी सतावत होती. सगळेच त्याचे होते आणि कोणीच त्याचं नव्हतं.

समर्पिता आता इतरांच्या सांगण्यावरून 'शयनेषु रंभा' होण्यासाठी पुरती विटली होती. हे पूर्वीपेक्षा खूप बदललेले आणि कधी स्वप्नात पण न पाहिलेले सुखदासाचे नवीन रूप, तिच्यापेक्षा वेगळे असले तरीही कोठेतरी तिला मनात भावले होते. अजूनही तिची आपल्या आणि समाजाच्या उद्धाराची स्वप्ने समीहन च्या स्वप्नांशी मिळती जुळती असली तरीही, त्यासाठी 'शयनेषु रंभा' बनणे तिच्या स्वाभिमानी स्वभावात बसण्यासारखे नव्हते. 'रूपेषु लक्ष्मी' असलेली समर्पिता लक्ष्मीपतीच्या व्यापारात 'कार्येषु मंत्री, करणेषु दांसी' आणि दुर्गादेवींबरोबर 'भोज्येषु माता होऊन गेली होती. सुखदासही रात्रीचे थोडा काळ शांत बसणे आणि प्रार्थना करणे कधी चुकवत नसे. आठवड्यातील काही तास संन्याशी लोकांबरोबर सेवा करण्याचा उपक्रम चालूच होता. कधी मधी आपण 'शयनेषु रंभा' नाही हे चुकत तर नाही ना असा विचार समर्पिताच्या मनात डोकावत असे. एक दिवस विचारात ती पण सुखदास बरोबर मठात आली.. लाटू महाराजांनी त्या श्लोकाचे राहून गेलेले पद सांगितले ...

कार्येषु मंत्री करणेषु दासी
रूपे षु लक्ष्मी, क्षमया धरित्री
भोज्येषु माता शयनेषु रंभा
धर्मानुकूला शत धर्मयुक्ता: कुलधर्म पत्नी।

म्हणजे धर्मानुकूला - म्हणजे धर्माचरणासाठी अनुकूल.. आता कसलाच संदेह राहिला नव्हता.

असेच काही दिवस निघून गेले, समीहनने गिरणीची कर्जे फेडून, पाडलेले पोहे शेवयांच्या विक्रीसाठी कलकत्ता शहरात दुकान घेतले होते.. समीहन शहरातल्या नावाजलेल्या उद्योजकांपैकी एक होऊ घातला होता. त्याच्या गिरणीत,दुकानात होतकरू व्यक्तीना रोजगार मिळत होता. सुखदास आणि समर्पिताचाही दिनक्रम चालू होता...

आज अनेक महिन्यांनी, समर्पिता आणि सुखदास त्यांच्या कलकत्त्या बाहेरील बंगालीत काही दिवस राहायला जाणार होते.. त्यांना आता पालक व्हायचे होते..
लक्ष्मीपती आणि दुर्गादेवी यांच्या चेहेर्यावर 'याची दिसासाठी केला होता अट्टाहास' हे समाधानाचे हास्य पसरले!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults