माझ्या आयुष्यातली 'रेल'चेल !

Submitted by Charudutt Ramti... on 19 October, 2018 - 07:17

‘नव्याचे नऊ दिवस’ ला इकॉनॉमिक्स मध्ये “ द लॉ ऑफ डिमिनीशींग मार्जिनल युटिलिटी ” असा अवजड शब्द प्रयोग केला गेला आहे. आणि ह्याच थियरीची “ उपभोक्त्याचे संतोषाधैक्य कालानुरूप घटत जाते” अशी मराठीतील व्याख्या केली जाते. खरं बोलायचं तर रोजच्या रोज वापरातल्या साध्या सोप्या म्हणींना असाध्य आणि जड शब्द वापरून त्यांची क्लिष्ट आणि अगम्य अशी रचना केली त्यांचे इकॉनॉमिक्स चे थेअरम बनतात - हे माझं मत, पण ह्या माझ्या मताला अर्थशास्त्रात शून्य किंमत आहे. ह्या नव्याचे नऊ दिवसाची असंख्य उदाहरणं देता येतील.

पण ह्याचं सर्वात उत्कृष्ट उदाहरण म्हणजे पहिल्यांदी पहिल्यांदी विमानाने केलेला प्रवास ! कारण विमान प्रवासाचे कौतुक पहिल्या दोन तीन प्रवासातच संपते. पहिल्या दोन प्रवासाच्या 'गगन भरारी' आणि 'आकाश ठेंगणे झाले' वगरे च्या कवी कल्पना एकदा का शिळ्या झाल्या की, तिसऱ्या चौथ्या प्रवासात मग चांगलाच आळस भरतो शरीरात प्रवासाचा. पाचव्या आणि सहाव्या प्रवासात मग लठ्ठ पगाराच्या वैमानिकाची आणि अगदी जाणीवपूर्वक सडपातळ बांधा जपलेल्या एअर होस्टेस ची अक्षरश: दया येऊ लागते. पूर्वी 'महाराजा' वगैरे मॅस्कॉट असलेल्या राजबिंड्या एअर इंडिया ची सुद्धा आताशा पार रया गेलीय. जेट एअर वेज , स्पाईस , इंडिगो बिंडीगो ह्याना तर काही किंमत च उरलेली नाही.

पूर्वीच्या काळी प्रवाश्यांशी अगदी अदबीनं आणि प्रेमानं वागायच्या सगळ्या एअर होस्टेस. बहिणी ला सासरी कितीही त्रास असला तरी, तिच्या सासरची माणसं, आपल्या घरी लग्नानंतर प्रथमच आल्यावर एखादी गृहकृत्यदक्ष गृहिणी कशी अदबीनं आणि प्रेमानं अगत्य केल्याचं भासवते स्वत:च्या घरी आलेल्या बहिणीच्या सासरच्या लोकांना, तशी शिताफी ह्या एअर होस्टेस पूर्वी दाखवत हॉस्पिटॅलिटीच्या आवरणाखाली. परंतू अलीकडे अलीकडे मात्र लग्न होऊन दहा बारा वर्ष झाली की, त्याच बायका कश्या नवऱ्याशी एकजात तुसडे पणाने वागतात, तश्या ह्या अलीकडच्या वाया गेलेल्या एअर होस्टेस पॅसेंजर लोकांशी वागू लागल्यात हल्ली. केवळ आठ दहा विमानांच्या जोरावर, एवढे पाच पाच हजार रूपये प्रवासभाडे घेऊन सुद्धा प्रवाश्यांना अशी वर्तणून देणाऱ्या एअर लाईन्स पेक्षा, अठरा हजार बसेस चा ताफा पदरी बाळगणारी आणि तरीही प्रवाश्यांना 'प्रियकराने प्रेयसीची पाहावी तशी' तासंतास वाट पाहायला लावणारी आमची महामंडळाची एष्टीच बरी. फारच अडचण होतं असेल, ह्या एततदेशीय एसटीची तर मग आमच्या आंग्ल कालीन रेल्वेला तर तोडच नाही. साठ सत्तर वर्षांपूर्वी जशी वर्तणूक आणि सेवा प्रवाशांना मिळत होती तशीच आजही मिळते. ब्रीदवाक्य एकाच, “तुम्ही या नाहीतर मरा, आम्ही आमचे निघालो! ” गुणवत्ता, सेवाभाव, ग्राहकहीत, असले फडतूस विचार आमच्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या ‘गावी’ सुद्धा नाहीत. ह्या ऐरलाईन्स च्या कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर असतो तसा खोटेपणाचा आव आजिबात नाही. खरे पणा हाच एकमेव स्थायीभाव.

प्रथमच नोकरीस लागलो तेंव्हा माझ्या क्षुल्लक वेतन श्रेणी नुसार रेल्वे ने वातानुकूलित थ्री टायर आणि हळू हळू मग पदोन्नती मिळत गेली तशी टू टायर ने केलेल्या प्रवासाची एक पर्वणी असायची. परंतु तोपर्यंत आक्ख आयुष्य ‘मिरज लोंढा कोल्हापूर मिरज’ ह्या पॅसेंजर व्यतिरिक्त माझा आणि रेल्वेचा दूरान्वये ही संबंध नव्हता. आमच्या वेळी हे आजच्या सारखे गुगल मॅप्स किंवा जीपीआरएस सारखी कौतुकं उपलब्ध नव्हती. पण अत्ता जरी गुगल मॅप उघडून पाहिलंत तर, मिरज, लोंढा वगैरे साध्या गोरगरीब गावांचा, हा असा रमी च्या डावात लावतात त्यापेक्षाही विचित्र, सिक्वेन्स बनवून त्याची पाटी, पॅसेंजर का असेना पण रेल्वे च्या प्रत्येक डब्यावर ठोकण्याचे हे असे धाडस फक्त दक्षिण मध्य रेल्वे चे कर्मचारीच करून जाणे. नोकरी निमित्तानं कारवार उडुपी मधून आपली घरं सोडून हुबळी मार्गे बदल्या होत हॊत मिरजे ला नाईलाजास्तव स्थायिक झालेले कानडी किंवा तुळू बोलणारे भट, नायक अथवा नाडगीर वगैरे दक्षिण मध्य रेल्वेचे महत्वाचे स्टेशन असलेल्या मिरज जंकशनचे स्टेशन मास्तर. कसा काय रूट ठरवला असा हा विचित्र, ह्या स्टेशन मास्तर मंडळींनी कोण जाणे. धुळ्याहून आलेल्या खान्देशी माणसाला वाई मार्गे सातारा ह्या त नक्की काय खोच आहे हे समजायला कसं जड जातं ना, तसंच हे “मिरज - लोंढा – कोल्हापूर – मिरज” प्रकरण समजायला अत्यंत जड आहे!

बाहेरून गर्द लाल रंग फासलेल्या पॅसेंजर डब्यांच्या आत मात्र फिकट पिवळसर दुधी रंगात बुडवलेली आणि त्या रंगांचे दाट सर वाळलेले ओघळ असलेले शिसवी लाकडाच्या फळ्यांची बाकं असायची बसायला. ह्या पॅसेंजर रेल्वेच्या टणक आणि मजबूत अश्या शिसवाच्या फळीवजा लाकडी बाका बसून कित्येक वर्षे रुकडी, निमशिरगाव, तम्दलगे, जयसिंगपूर अशी झप झप मागे जाणारी स्टेशने आम्ही मोजली आहेत. ही सगळी अगदी छोटी छोटी आणि लीन गावं. जयसिंगपूर त्यातल्या त्यात समृद्ध, तंबाखूच्या व्यापारामुळे. पण बाकीची गावं मात्र सात पिढ्या कर्ज बाजारी असल्यासारखी वाटणारी. पण तसली छोटी छोटी गावे सुद्धा अगदी मनोरंजक पणे बाहेर खिडकीतून पहात जनरल डब्ब्यात बसून आम्ही सुट्टीला मिरजेहुन कोल्हापूरला आमच्या मावशी कडे उन्हाळ्यात न चुकता जात असू.

आठ रुपयाला पडणाऱ्या, त्या पोलादी बांधणीच्या काळ्या कुळकुळीत एडमंडसन च्या वेल ऑईल्ड पंचिंग मशीन च्या आतून, बुकिंग क्लार्कच्या काळा कडाप्पा बसवलेल्या खिडकीतून झप्पकन पडलेल्या पुठ्ठयाच्या त्या आयताकृती तिकिटाचा आम्ही अगदी उत्सुकपणे नयन मोंगियाने विकेट कीपिंग करताना झेलावा तसा झेल दोन तळ हातांच्यावर झेलत असू. दहा रुपयाच्या नोटे च्या बदल्यात आठ रुपयांचं तिकीट आणि जयसिंगपूर स्टेशन वर दोन रुपयांची खाऱ्या शेंगदाण्याची पुडी. हिशेब चुकता. बॅलन्स शीट टॅली.

मिरज हे त्यावेळी भारतातलं एकमेव असं जंकशन होतं की जिथे ब्रॉड, मीटर आणि नॅरो अशी तीनही गेजेस ची रेल्वे पाहायला मिळायची. पुणे कोल्हापूर, ब्रॉडगेज. मिरज बेंगलोर ( त्यावेळी बेंगलोर ला बेंगलोर असंच म्हणत कारण कलकत्त्याचं कोलकाता, मद्रास चं चेन्नई आणि बेंगलोर चं बंगळुरू अजून व्हायचं होतं. हे नामांताराचं खुळ बरंच अलीकडे आलं , राजकारण्यांना दुसरं काहीच करायला जमेना तेंव्हा ! ). आणि सर्वात महत्वाची म्हणजे`अत्यंत जुनी अशी मिरज पंढरपूर नॅरो गेज जी बार्शी लाईट ह्या नावाने प्रसिद्ध होती. इतके पंत प्रधान झाले देशात, तितकेच रेल्वे मंत्रीही झाले पण ह्या तीन गेजेस वाल्या मिरज स्टेशन ला नख लावायचं कुणी जराही धाडस केलं नाही. अगदी आपले जनता दलाच्या मधू दंडवत्यांनी सुद्धा कोकण रेल्वे साठी तीळ तीळ तुटत असताना इकडे मिरजेच्या नॅरो गेज चं मात्र ब्रॉड काय मीटर गेज मधेही जिरणोध्दार करण्याचं कधी ध्यानीमनी सुद्धा आणलं नाही.

पण नंतर कधी तरी बरेच वर्षानंतर तिकडे दक्षिणेतले आदिलशाही राजवटीत जगत असल्यासारखे वागणारे बंगलोर चे जाफर शरीफ रेल्वे मंत्री म्हणून देशाच्या नशिबी आले. आणि मग त्यांच्या कोणत्या तरी रेल्ववे च्या बजेट मध्ये मिरज ते पंढरपूर बार्शी लाईट नॅरो गेज मुळा सकट उपटून त्या जागी मीटर गेज घालण्याचा कट रेल्वे बोर्ड करत असल्याचं संसदेत उघड पणे सांगितलं. त्या दिवशी सच्च्या मिरज कराने 'जिलबी चौक' ते 'कोकणे गल्ली' ते वंटमुरे कॉर्नर जिथे जागा मिळेल तिथे कोपरा सभा घेत आणि अक्षरश: ढसा ढसा रडत निषेध व्यक्त केला संध्या काळी साडे सात नंतर रोज भेटण्याच्या कट्ट्यावर. पण ह्यातली अतिशयोक्ती सोडली तर मिरज स्टेशन ची बार्शी लाईट गेल्यावर मात्र हे ऐतिहासिक स्टेशन, आता आपली ब्रिटिश कालीन व्हाइसरॉय कडून कमावून आणलेली पाच हजारी मनसबदारी गमवून बसलं आणि म्हणायला जंक्शन असले तरी, मनमाड, दौंड, भुसावळ, वगैरे इतर अगदी सर्वसामान्य स्टेशनांच्या यादीत, औरंगजेबाच्या वाढदिवसाला सगळे दक्खन चे सरदार कसे उभे राहिले शेवटच्या रांगेत, तसं हे आमचं स्टेशन पोरक्या सारखं निमूटपणे उभं राहिलं दिल्लीकरांच्या आज्ञेपुढे काही नं चालल्यामुळे.

पण “मिरज – कोल्हापूर – मिरज” असा वरचे वर केलेला आणि कधी काळी फार फार तर लांबचा म्हणजे ‘मिरज - वास्को – मिरज’ असा संह्याद्री ओलांडत पण तरीही दक्खन च्याच अवती भवती प्रवास केलेला माझ्यासारखा ‘प्रवासी एका घडीचा’ एकदम कॉलेज बिलेज संपवून जेंव्हा चाकरमानी म्हणून कामावर रुजू होतो मुंबईला आणि मग नोकरी धंद्या निमित्त दिल्ली पंजाब ला वगैरे प्रवास सुरु होतो केल्याने देशाटन च्या धर्तीवर तेव्हा प्रवासाचे सगळे माप दंडच एकदम बदलून जातात. रोज पॅसेंजर पाहून सवय असलेल्या व्यक्ती ला, दादर, सी. एस. टी. किंवा बॉम्बे सेंट्रल च्या तुलनेने अजस्त्र भासणाऱ्या स्थानकांच्या प्लॅटफॉर्म क्र. एक वरून सुटणाऱ्या ऑगस्ट क्रांती राजधानी, किंवा सुपरफास्ट गीतांजली सारख्या ट्रेन्स पाहणे म्हणजे म्हणजे बाथरूम मधल्या उडणाऱ्या झुरळ पाहून भिणाऱ्या माणसाला साक्षात जटायू पक्षी दिसल्याचा प्रकार होता. ( किंवा पु. लं. च्या भाषेत गांडूळा ला शेष नाग भेटल्याचा प्रकार ).

मुंबई सेंट्रल ते हजरत निजामुद्दीन किंवा न्यू देहली जं. ह्या ओव्हर नाईट ऑगस्ट क्रांती च्या प्रवासाची कैफ़ियत काही औरच. थोडक्यात, खिडकीत बसून, आजू बाजू ला कृष्णेच्या आणि पंचगंगेच्या पाण्यावर पोसलेली संथ गती ने मागे पडत जाणारी उसाची हिरवीगार शेतं पाहत पाहत तोंडात टाकायची हातातली शेंगदाण्याची पुडी गेली आणि तिच्या जागी ‘मुंबई मिरर’ किंवा ‘मिड डे’ चा कॉम्प्लिमेंटरी अंक आणि त्याच बरोबर ट्रेन च्या पॅन्ट्रीकार मध्ये बनवलेलं गरमागरम टोमॅटो सूप आलं, ब्रेड स्टिकस आले. कार कुर कार कूर करत रखडत रखडत चाललेले ओबड धोबड डबे गेले आणि, आमच्या नशिबी हाय स्पीड ए. सी. बोगी आल्या. आधी असलेली कोळसा, वाफ, आणि जेम्स वॅट वगैरेची स्टीम इंजिनं आम्ही लहान असतानांच कालबाह्य झाली होती. त्यानंतर चित्तरंजन लोकोमोटिव्ह फॅक्टरी मध्ये बांधलेली मजबूत पण, तरीही घाट आला की दमेकऱ्या सारखी धापा टाकत टाकत चढ चढणारी डिझेल ची इटारसी , बनारस वगैरे जुनाट इंजिनं सुद्धा बऱ्याच अंशी गेली. त्या जागी कृष्णानं ऐटीत मोरा चं पिस भाळी खोचावं तशी डोक्यावर पेंटोग्राफ खोचलेली दहा दहा हजार हॉर्स पॉवर ची बी. एच. इ. एल. च्या कारखान्यांमध्ये बनलेली इलेकट्रीक इंजिनं आमच्या रेल्वेप्रवाश्यांच्या नशिबात आली. रेल्वे तीच! पण तिच्यामध्ये असे, जनुकीय बदल घडत गेले आणि माझ्या प्रवासाचे जुने संदर्भ मात्र पराकोटीचे बदलले.

परवा बरेच वर्षांनंतर मिरज स्टेशन वर गेलो. काहीही कारण नसताना. पण तीच जुनी पॅसेंजर शेवटच्या प्लॅटफॉर्म नं. सहा वर उभी होती. लाल रंग जाऊन फक्त तिच्या जागी निळा रंग आलेला. बाकी तिच्या साता जन्मीच्या नशिबी असलेलं उपेक्षितपण जसंच्या च्या तसं शाबूत. पन्नासेक लाकडी पायर्यांच्या आणि शंभरेक लोखंडी गजांच्या व्यामिश्रतेतून बनलेला तो जुना दादर चढून चालत चालत शेवटच्या प्लॅटफॉर्म वर गेलो. वेळेवर सुटण्याची कोणतीही गडबड नसलेल्या त्या पॅसेंजर गाडीच्या डब्यात चढलो. गार स्पर्श असलेल्या लोखंडी खिडकीच्या दोन्ही बाजूच्या कड्या काढून खिडकी वर केली. अंधाऱ्या डब्यात उजेड पसरला. दोन मिनिटं लाकडी बाकावर बसलो. लोखंडी गजांना डोकं टेकवून आणि डोळे तिरके करून ‘डब्यातून इंजिन दिसतंय का?’ ते पाहिलं. गाडी वळणावर आली की हा माझा आवडता छंद, इंजिन पाहण्याचा. कित्येक वर्षांनंतर मोठं झाल्यावर माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने शाळेत गेलं आणि वर्गात जाऊन आपल्या नेहमीच्या बाकावर बसल्यावर कसं जुन्या आठवणीनं व्याकुळ आणि कासावीस व्हायला होतं, तसं दोन मिनिटं झालं त्या पॅसेंजरच्या बाकावर बसल्यावर! चटकन वाटलं, पळत पळत जावं आणि त्या तिकीट खिडकी पुढं टाचा उंच करून परत मिरज कोल्हापूर आठ रुपयांचं तिकीट काढावं आणि सरळ कोल्हापूरला जावं. पण मग परत लक्षात आलं पण आता तिथे मावशी राहात नाही. माझीही आता परीक्षा संपत नाही. आणि पूर्वीसारखी मला उन्हाळ्याची सुट्टीही लागत नाही. निमूट पणे डब्यातून खाली उतरलो. थोडा दूर चालत गेलो. यार्डा पर्यंत. खाली बसलो वाकून. आणि कान रूळाला लावून परत तोच दूरच्या रेल्वेच्या कंपनांचा आवाज ऐकू येतोय का ते चाचपून पाहिलं. तोच पूर्वीचा रूळ, त्याच पूर्वीच्या रेल्वे इंजिनाची पोलादी चाकं आणि आणि त्यांचा माझ्याशी असलेला कित्येक वर्षं जुना ऋणानुबंध सांगणारा सूक्ष्म आवाज दूरवरून कानाला स्पर्श करून गेला. मी त्यातल्या त्यात सुखावल्या मनानं परत फिरलो !

चारुदत्त रामतीर्थकर
पुणे, १९ ऑक्टोबर २०१८.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय !!!!

यावरून आठवलं की मुंबई च्या उपनगरीय स्थानकांवर एक वजन मोजण्याच मशीन असायचं
त्यात रुपया टाकला की काटा फिरून वजन छापलेलं तिकीट मिळायचं
जुन्या आठवणी.

छान लिहिलंय....

कालांतराने हे अनुभव कोणाला माहितीच नसतील सो हुरहुर तर नसेलच आणि नंतर तर रिलेट ही नाही करता येणार..
अर्थात ही भावना टिकेलंच फक्त वस्तु, घटना, आठवणी वेगळ्या असतील..

आमचं बालपणीच स्टेशन कुर्डुवाडी , सर्व अनुभवले आहे , गेले ते दिवस

खूप आवडला लेख. हुरहूर वाटलीच. आता वातानुकूलित गाड्यांतून ऐटीत सूप वगैरे पिण्याच्या काळात अगदी जुन्या काळचा चित्रात पाहिलेला पाण्याचा फिरकीचा तांब्या, भला मोठा टिफिन डबा, होल्डॉलची भली मोठी वळकटी, त्यात कोंबून भरलेल्या प्रवासोपयोगी वस्तू वगैरे विन्टाज आर्काइव्हमध्ये दिसणार्‍या गोष्टी आठवल्या. नंतर प्रवास सोपा होत गेला. तिकिटे कम्प्यूटरवर मिळू लागली. पन्च्ड तिकिटांवरचे तारीख वेळ यांचे अस्पष्ट ठसे जाऊन कार्ट्रिजची शाई संपली म्हणून अस्पष्ट उमटलेली कम्प्यूटर तिकिटे आली. मुंबईत नऊ डब्यांच्या लोकल जाऊन बारा/पंधरा डब्यांच्या गाड्या आल्या, महिलांसाठी एक छोटा डबा होता त्याचे तीन डबे झाले, महिलांसाठी खास सर्विसेस आल्या, ढेकूणवाले लाकडी बाक जाऊन प्रथम पत्र्याचे, मग फाय्बरचे बाक आले. लाकडी फळ्यांचे इंडिकेटर जाऊन इलेक्ट्रॉनिक इन्डिकेटर, घड्याळे असे अनेक बदल झाले. पूर्वी डेक्कन क्वीनने जाणे हा स्टेटसचा भाग होता. आता शताब्दि, राजधानी वगैरे सुपर फास्ट वातानुकूलित आणि सर्व सोयीयुक्त गाड्यांतून प्रवास करणेसुद्धा तितकेसे 'कूल ' राहिलेले नाही. जुने जाऊन त्याची जागा नव्या गोष्टी घेणारच. आणि घडलेले बदल चांगले असतील तर त्याबद्दल हळहळण्यात अर्थ नाही. फक्त स्मरणरंजता मात्र राहातेच.

हिरा जी , फारच सुंदर टिपणी.
>>> त्याबद्दल हळहळण्यात अर्थ नाही. फक्त स्मरणरंजता मात्र राहातेच. <<< अगदी शंभर टक्के सहमत !
तुम्ही दिलेल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद.