विषाणूदेवा !

Submitted by Asu on 6 October, 2018 - 22:52

विषाणूदेवा !

पाऊस सरला उन्हे तापली
विषाणूंनी अन् संधी साधली
व्हायरस सारे व्हायरल झाले
ताप तापून जनगण थकले

ऑक्टोबर हीट सुरू जाहली
विषाणुंची खूप प्रजा व्यायली
वातावरण झाले उष्ण दमट
विषाणू निपजले कितीक पट

सर्दी खोकला घसा धरला
अंगोअंगी बहु ताप भरला
खोकून खोकून छाती भरली
वाघोबाची केपळ शेळी उरली

अंगी बळ ना काही उरते
पाय उचलता धडकी भरते
उठणे बसणे नकोच वाटे
सर्वत्र दिसती बाभूळ काटे

चिडचिड सदैव वाटे भारी
पंधरवाड्याची कैदच घरी
विषाणू राजा कृपा करी
नको पडो कुणी आजारी

विषाणूदेवा पडतो पाया
त्राण न उरले थकली काया
दिवसां मागून दिवस वाया
सांगा जाल कवण उपाया

थंड पाणी पिऊ नको
बाहेर काही खाऊ नको
सुट्टी घेऊन आराम कर
प्रसन्नवदने वदती डॉक्टर

आयुष्य म्हणजे केवळ तरणे
वाहत जाईल तिथेच वाहणे
हातपाय आपुले फक्त बहाणे
आपुल्या हाती ना आपुले जिणे

- प्रा.अरुण सु.पाटील(असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults