काम हे फक्त काम असतं

Submitted by nimita on 5 October, 2018 - 03:29

गणपतीबाप्पा कडून पुढच्या वर्षी लवकर यायचं वचन घेऊन त्याची पाठवणी केली की लगेच देवीच्या आगमनाचे वेध लागतात.

लवकरच नवरात्र सुरू होणार - देवीची रोजची पूजा, नऊ दिवस अखंड ज्योत, कुमारिका पूजन, हळदी कुंकू, नवमीला पुरणा वरणाचा स्वैपाक ! दसऱ्यापर्यंत मान वर करायलाही फुरसत नसते.

नवरात्र उत्सव हा स्त्रीच्या शक्तीचा उत्सव असतो असं म्हणतात. स्त्री आणि धरती यांना आपल्या संस्कृती मधे नेहेमीच पूजनीय मानलं आहे. आणि याचं मुख्य कारण असावं -त्यांची सृजनशक्ती - नवनिर्मितीची शक्ती!

नवरात्र पूजेतला घट, त्याच्या अवतीभोवती च्या मातीतून उगवणारं नवधान्यांचं शेत ही सगळी याच सृजनशक्ती ची प्रतीकं आहेत, असं या क्षेत्रातल्या जाणकारांचं मत आहे. आणि मलाही ते पटतं.

पण मला नेहेमी एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटतं ...ज्या स्त्री ला आपल्या पूर्वजांनी इतकं उच्च स्थान दिलं, तिला पूजनीय मानलं, त्याच स्त्री चं या समाजातलं स्थान हळू हळू इतकं ढळलं की पुरुष तिला आपली दासी मानायला लागला ! हे वैचारिक दारिद्र्य का आणि कशामुळे निर्माण झालं याबद्दल बऱ्याच तज्ज्ञांनी वेळोवेळी त्यांची मतं मांडली आहेत. मी या बाबतीत काही बोलावं इतकी कदाचित माझी योग्यता नाही.

पण गेल्या काही दशकांपासून सुरू असलेल्या 'स्त्री मुक्ती' चळवळीची पाळंमुळं स्त्रियांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीत लपलेली आहेत, हेही तितकंच खरं आहे.

मी लहान असल्यापासून 'स्त्री मुक्ती', 'स्त्री पुरुष समानता' हे शब्द कायम ऐकत आले आहे.यातला 'स्त्री-पुरुष समानता' हा शब्द मला नेहेमीच कोड्यात टाकतो. या संदर्भातली माझी विचारधारा आज इथे मांडणार आहे. बऱ्याच जणांना कदाचित माझं म्हणणं पटणार नाही...but it's okay! मला तरी कुठे पटतं प्रत्येकाचं म्हणणं !!

माझ्या मते मुळातच स्त्री आणि पुरुष समान नाहीयेत...प्रत्येकाचं एक भिन्न व्यक्तित्व आहे, भिन्न ओळख आहे. जर आपण आपल्या आजूबाजूच्या निसर्ग सृष्टीकडे पाहिलं तर सहज लक्षात येतं की देवानी या पृथ्वीवर कोणत्याही दोन रचना एकसारख्या नाही घडवल्या. या चराचर सृष्टी चं अस्तित्व टिकून राहण्यासाठी जेवढं आवश्यक होतं तेवढंच जग त्यानी निर्माण केलं. 'ना कम, ना ज़्यादा।' प्रत्येक रचना ही unique आणि exclusive आहे. आणि म्हणूनच ही सृष्टी चिरंतर राहावी यासाठी यातल्या प्रत्येकाची आवश्यकता आहे. म्हणतात ना, 'One for all and all for one'.. काहीसं तसंच !

आणि म्हणूनच मला वाटतं की 'स्त्री आणि पुरुष समान नाहीत' कारण जर ते समान असते तर मग देवानी कुणाला तरी एकालाच या पृथ्वीवर पाठवलं असतं, नाही का?

पण ज्या अर्थी त्यानी ही दोन वेगळी अस्तित्व घडवली त्या अर्थी त्यांच्यात भिन्नता आहे... पण त्याच वेळी देवानी एक अजून काळजी घेतली.. स्त्री आणि पुरुष या दोघांपैकीं कोणालाही पूर्णत्व नाही दिलं....एक संपूर्ण अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जे काही लागतं ते स्त्री आणि पुरुष या दोन जीवांमध्ये वाटून टाकलं.

पण हे विभाजन ही किती चतुराईनी केलंय... म्हणजे, तसं पाहिलं तर प्रत्येक साच्यात सगळं काही आहे, फक्त त्यांचं प्रमाण कमी जास्त आहे. स्त्री च्या व्यक्तिमत्वात काही पैलू अधिक तर पुरुषामध्ये दुसरं काहीतरी जास्त!

एकूण काय तर स्त्री आणि पुरुष हे दोघंही एकमेकांना पूरक आहेत. एकावाचून दुसऱ्याचं अस्तित्व निरर्थक !

दोघांमधे कोणी उच्च नाही आणि कोणी नीच नाही. एकाशिवाय दुसऱ्याला पूर्णत्व नाही!

खरं म्हणजे आपल्या पूर्वजांनी हे पूर्णत्वाचं सत्य किती सहजपणे आपल्यासमोर मांडलं आहे. पण आपल्याला ते समोर दिसत असूनही, कळत असूनही आपण सोयीस्कर पणे त्याकडे कानाडोळा करतो.

ब्रम्हा, विष्णु, महेश.... या सृष्टीचे त्रिदेव !अशी मान्यता आहे की- ब्रम्हा सृष्टीची रचना करतो, विष्णु तिचं पालन करतो आणि शिव संहार करतो. पण नीट विचार केला की लक्षात येतं... या तिन्ही देवांना सुद्धा त्यांच्या या कामात स्त्री ची गरज भासते... तसं पाहिलं तर समस्त देव आणि देवी यांच्याकडे अतुलनीय दैवी शक्ती आहेत, त्यांनी मनात आणलं तर त्यांच्यापैकी कोणीही स्वबळावर काहीही करू शकतो/शकते....नाही का?

पण तसं नाहीये, आणि म्हणूनच या त्रिदेवांच्या बरोबर देवीची तीन वेगवेगळी रूपं आपल्याला दिसतात. प्रत्येक देवाच्या कार्याला योग्य तो हातभार लावणारी देवी !!!

एखाद्या गोष्टीची नव्यानी रचना करायची असेल तर त्यासाठी बुद्धीची आवश्यकता असते, आणि म्हणून ब्रम्हदेवा बरोबर आहे सरस्वती..बुद्धीची देवता...

आपल्या संसाराची गाडी सुरळीतपणे चालवण्यासाठी, कुटुंबातल्या सदस्यांच्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला पैश्यांची गरज असते- हे तर सर्वमान्य आहे. आणि हेच साधं सोप्पं समीकरण आपल्याला विष्णु आणि त्यांची पत्नी लक्ष्मी यांच्या नात्यात दिसतं.

शिव आणि शक्ती (पार्वती) च्या बाबतीतही अगदी असंच तर आहे... कुठल्याही गोष्टीचा विनाश करायचा असेल तर त्यासाठी शक्तीची गरज लागते... देवीचं शक्तीस्वरूप म्हणजेच पार्वती महादेवाला त्याच्या कार्यात हातभार लावण्याचं काम करते.

हे तीनही देव आणि त्यांच्या नियोजित कार्यासाठी त्यांना पूरक असणारी देवीची तीन रूपं !!!

किती सहजपणे समजावून सांगितलंय आपल्या पूर्वजांनी आपल्याला...की स्त्री आणि पुरुष हे एकमेकांना पूरक आहेत...एकाशिवाय दुसरा अपूर्ण आहे.

काही दिवसांपूर्वी वाचनात आलं होतं...कोणीतरी विष्णु आणि लक्ष्मी यांच्या प्रतिमेबद्दल आक्षेप घेतला होता...विष्णु आणि लक्ष्मी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र दिसतं.. लक्ष्मी विष्णुच्या पायांपाशी बसली आहे आणि एवढंच नाही तर ती चक्क चक्क विष्णुचे पाय चेपते आहे. तर तिच्या या अशा प्रतिमे वर आक्षेप घेतला होता कोणीतरी.. त्यांचं म्हणणं- 'या मधे स्त्रीला पुरुषापेक्षा कमी लेखलं आहे.'

यावर जेव्हा सगळ्या बाजुंनी विचार केला तेव्हा वाटलं, ब्रम्हदेव-सरस्वती त्याच प्रमाणे शंकर आणि पार्वती या दोन्ही जोड्यांमधे सरस्वती आणि पार्वती यांना त्या त्या देवांच्या बरोबरीनी, त्यांच्या शेजारी बसलेलं बघतो आपण नेहेमी. मग लक्ष्मीचं स्थान विष्णुच्या पायांशी का ? यातून नक्की काय संदेश दिलाय आपल्या पूर्वजांनी आपल्याला ?

यावर थोडं संशोधन केल्यावर असं लक्षात आलं की लक्ष्मी म्हणजे अर्थातच पैसा- संपत्ती! आपल्याला सुखानी जगण्यासाठी तिची गरज असते याबद्दल शंका नाही. पण या धनरुपी लक्ष्मीला तेवढंच महत्व दिलं पाहिजे. आपल्या आयुष्यात जर 'पैसा' हेच सर्वस्व बनलं तर अनर्थ ओढवतो हे जगजाहीर आहे.. त्यामुळे या लक्ष्मीला आपल्या आयुष्यात वरचढ होऊ देऊ नये, आपण तिचे दास न बनता तिला आपलं दास्य करायला लावावं..….मला तरी त्या पाय चेपणाऱ्या लक्ष्मीकडे बघून हेच लक्षात येतं!

या 'स्त्री पुरुष समानते' मधे मला अजून एक गोष्ट खटकते आणि ती म्हणजे...बहुतांशी स्त्रियांना वाटतं की - त्यांनी 'so called पुरुषांची कामं' केली म्हणजेच त्यांची योग्यता सिद्ध होते... असं केल्यामुळे आपण पुरुषांच्या बरोबरीला आलो अशी काहीशी अभिमानाची भावना निर्माण होते त्यांच्या मनात!

मुळात 'ही स्त्रियांची कामं आणि ही पुरुषांची कामं' असं कामांचं विभाजन कोणी ठरवलं हाच एक मोठ्ठा प्रश्न आहे. काम हे फक्त काम असतं..ज्याला जे जमेल आणि आवडेल ते काम त्यानी करावं... काही वेळा परिस्थिती ची किंवा काळाची गरज म्हणून कामाचं स्वरूप बदलावं लागतं. याचीही बरीच उदाहरणं सापडतात आपल्या पुराणांत ! दशरथाच्या बरोबरीनी युद्ध करून त्याचा प्राण वाचवणारी कैकेयी असो किंवा अज्ञातवासात एक आचारी म्हणून काम करणारा भीम असो... या उदाहरणातून एकच गोष्ट लक्षात येते, आणि ती म्हणजे 'कुठल्याही कामावर कोणाच्या नावाचं शिक्कामोर्तब नसतं. काळ, वेळ आणि त्या वेळची परिस्थिती बघून जे काम पडेल ये इमाने इतबारे पार पाडणं हे महत्वाचं !

पण हे साधं सोपं सत्य काळाच्या ओघात कुठेतरी हरवून गेलं आणि हळूहळू पुरुषांची कामं आणि बायकांची कामं अशी विभागणी समोर आली.काही अपवाद वगळता जगभरात सगळीकडे पुरुषप्रधान संस्कृती चं बस्तान बसलं आणि त्याचा परिणाम म्हणून नकळत पुरुष करत असलेल्या कामांना समाजात श्रेष्ठ दर्जा मिळायला लागला आणि स्त्रिया करत असलेली कामं दुय्यम ठरली. .

साहजिकच स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायला किंवा 'आपण ही पुरुषांपेक्षा कमी नाही' हे दाखवून देण्यासाठी स्त्रिया 'so called पुरुषांची देखील कामं करायला लागल्या आणि इथेच त्यांच्या शारीरिक आणि मानसिक शक्तीची ओढाताण सुरू झाली. स्वतःला पुरुषांच्या तुलनेत सिद्ध करण्याच्या नादात त्या आपलं स्त्रीत्व विसरल्या. त्यांच्याही नकळत त्यांनी स्वतःच पुरुषांना आणि त्यांच्या कामाला अव्वल स्थान दिलं.

कामाचं स्वरूप भिन्न असू शकतं पण त्यामुळे त्या कामाचा दर्जा मात्र कधीच कमी होत नाही. या जगात कोणतंही काम क्षुल्लक नाही हे रामायणातल्या त्या छोट्याशा खारुताईंनी सिद्ध केलंय.

जे काम केल्यानी आपल्याला समाधान मिळेल, आनंद होईल ते काम करावं...अगदी मनापासून, जीव ओतून जर एखादं काम केलं तर त्यात आपण यशस्वी होणार हे नक्की! या सगळ्यात स्पर्धा किंवा स्वतःला सिद्ध करून दाखवणं या असल्या तुच्छ गोष्टींना कुठेच स्थान नसावं.

जर तमाम स्त्री-पुरुषांनी असा विचार केला तर सगळे एकत्र काम करून या पृथ्वीवर नंदनवन फुलवतील यात शंकाच नाही !!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळात 'ही स्त्रियांची कामं आणि ही पुरुषांची कामं' असं कामांचं विभाजन कोणी ठरवलं हाच एक मोठ्ठा प्रश्न आहे. काम हे फक्त काम असतं..ज्याला जे जमेल आणि आवडेल ते काम त्यानी करावं... +१११११
लिखाण छान आहे Happy

मुळात 'ही स्त्रियांची कामं आणि ही पुरुषांची कामं' असं कामांचं विभाजन कोणी ठरवलं हाच एक मोठ्ठा प्रश्न आहे. काम हे फक्त काम असतं..ज्याला जे जमेल आणि आवडेल ते काम त्यानी करावं...>>> अगदी सहमत.
ताकदीची कामं समर्थपणे पेलणार्या स्त्रियाही बघितल्यात आणि अत्यंत चविष्ट असा स्वयंपाक करणारे व सोबत घर सांभाळणारे पुरूषही बघितलेत.
मुळात काम करणार्याला काहीच प्राॅब्लेम नसतो..प्राॅब्लेम असतो तो समोरून ते बघणार्या लोकांच्या चश्म्यात.

राहू दे रोहिणी. नसेल आवडला त्यांना लेख. प्रत्येकाची विचार करायची पद्धत वेगवेगळी असते, त्यामुळे माझे विचार प्रत्येकाला पटतीलच असं नाही ना! आणि मी तसं लिहिलं देखील आहे या लेखात.... पण जर एखाद्याला माझे विचार पटले नाही याचा अर्थ ते अयोग्य आहेत असंही नाही.

<<<मुळात काम करणार्याला काहीच प्राॅब्लेम नसतो..प्राॅब्लेम असतो तो समोरून ते बघणार्या लोकांच्या चश्म्यात.>>>

अनुमोदन.

<<<भंकस लेख!>>>
एक तर भंकस का ते लिहा नि तुम्ही स्वतः याच विषयावर एक भंकस नाही असा लेख लिहून दाखवा.
म्हणजे तुम्ही काम करणार्‍या का चष्म्यातून बघणार्‍या ते कळेल. म्हणजे अनुल्लेख करायचा तुमचा का तुमच्या लिहिण्यात काही अर्थ आहे असे समजायचे.

लेखावर आलेला पहिलाच प्रतिसाद वाचला नाही वाटत कोणीच!
की अर्थ कळला नाही त्याचा??

===
काम हे फक्त कामच असतं वगैरे फ़ंडे झाडणाऱ्यांचं https://www.maayboli.com/node/67499 याबद्दल काय मत आहे?

अ‍ॅमी +१.
स्त्रियांनी परंपरेने आपल्या वाट्याला आलेली कामे हलकी आहेत, असे समजू नये, पुरुषांची बरोबरी करायला जाऊ नये असं अप्रत्यक्षरीत्या सुचवलंय. वर ती देवादिकांची दिलेली उदाहरणे तर भंपक वाटली. अशा उदाहरणांनी कोणतीही गोष्ट पटवता येऊ शकेल.

एका परिच्छेदात 'काम हे काम असतं.. स्त्रीचं आणि पुरुषाचं असं काही नसतं' हा मुद्दा आणि नंतरच्या परिच्छेदात 'स्त्रिया सो कॉल्ड पुरुषांची कामं करायला गेल्या, त्यांच्या शारीरिक, मानसिक शक्तीची ओढाताण सुरू झाली आणि त्या स्त्रीत्व विसरल्या' असं मत. नक्की काय म्हणायचंय मग?

लक्ष्मी म्हणजे पैसा आणि पैशाला आयुष्यात फार महत्त्व देऊ नये, अनर्थ होतो वगैरे मराठी लोकांची फार लाडकी मतं असतात कायमच. आणि -
'प्रत्येक देवाच्या कार्याला योग्य तो हातभार लावणारी देवी' <<<< हे उलट का नाही म्हणे? देवीच्या कार्याला हातभार लावायला देव!
देवादिकांची उदाहरणं भंपक वाटली याला +1. बाईने संसार, मुलंबाळं सांभाळून पतीदेवाच्या कार्याला फक्त हातभार लावावा, स्वतःचे वेगळे काही कार्य करायला जाऊन स्त्रीत्व हरवून बसू नये(म्हणजे काय देव जाणे!), एवढाच अर्थ या गोल गोल लिखाणातून लागला.

भरत आणि श्रद्धा यांच्या प्रतिसादांशी सहमत. लेख अजिबात आवडला नाही.
तुमचा कॅन्सरवर लिहिलेला लेख सोडला तर बाकी कुठचंही लिखाण फार मनापासून आवडलं नाही.

इथल्या प्रतिक्रिया वाचून नि त्याला इतक्या लोकांनी अनुमोदन दिल्यामुळे आता भंकस लेख कसा नसतो हे पहायची उत्सुकता लागली आहे.
इथे भंकस म्हणणार्‍या लोकांना एक नम्र विनंति - मला एखादा भंकस नसलेला लेख कुठे आहे ते सांगाल का? म्हणजे मलाहि कळेल भंकस कशाला म्हणायचे नि कशाला नाही. ज्यांनी भंकस म्हंटले त्यांचाच एखादा लेख असेल तर सांगा, मी वाचीन.
धन्यवाद.

भरत, श्रद्धा +१

सहमती दर्शवणाऱ्या बाकी सगळ्यांना _/\_

===
सस्मित,
What does loco mean in slang?

1844, American English, from Spanish loco (adj.) "insane," of uncertain origin, perhaps from Arabic lauqa, fem. of 'alwaq "fool, crazy person." Loco -weed (1877) was name given to species of western U.S. plants that cause cattle and horse diseases that make them stagger and act strangely.

गेल्या काही दिवसांत माझ्या लेखावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. सर्व वाचकांचे मनापासून आभार- माझा लेख वाचल्याबद्दल आणि वेळात वेळ काढून त्यावर प्रतिक्रिया दिल्याबद्दल. काही जणांना लेख आवडला तर काहींना नाही आवडला. प्रत्येकाची विचार करायची पद्धत वेगळी असते, त्यामुळे जे मला योग्य वाटतं ते इतरांना वाटेलच असं नाही; आणि तसा माझा आग्रहही नाही.
पण काही जणांना माझं म्हणणं पटलं नाही म्हणून ते अयोग्य आहे असंही नाही.
मी जेव्हा एखादं लिखाण करते तेव्हा ‘ ते सगळ्यांना आवडावं’ या हेतूनी नाही करत. I don't write to please others. माझ्या मनातले विचार कागदावर उतरवणं हाच त्यामागचा हेतू असतो.
मला वाटतं आता आपण सगळ्यांनी हा विषय इथेच संपवावा कारण आपसातील चर्चेला आता हळूहळू वादविवादाचं स्वरूप यायला लागलं आहे.
पुन्हा एकदा सर्व वाचकांना धन्यवाद.

हे फक्त लेखन आवडणं, न आवडणं इतकंच नाही, तर त्यातली मतं पटणं न पटणं, असं आहे.
वादविवाद = मतांतरं , चर्चा.
अर्थात तुम्हांला त्यात पडायचं नसेल, तर तसा आग्रह नाही.

मला आवडलाय कारण वेगळा दृष्टीकोण . बाकी पटलाय का नाही इतक्या खोलात विचार केला नाही कारण तेच वेळ आणि गरज पडली तर काम करावे लागतेच तुमच्या वाटणीच असो की नसो. काम न करणे हा ऑप्शन असेल तर तो पण वापरावा. मी काम करतो / करत नाही म्हणून तू पण तसंच कर असे नको. ज्यानी- त्यानी स्वतः ला आवडतं ते करावं. त्यासाठी स्वातंत्र्य असायला हवं, स्वातंत्र्य बरोबरच जबाबदारी येते आणि जबाबदारी ची किंमत मोजावी लागते. इतकंच मला माहिती आहे.

loco mean in slang> >>>>ओके. इंग्लिशमधे लोको आहे काय.
मला वाटलं मराठी शब्दाला कायतरी शॉफॉ आहे Happy
धन्यवाद अ‍ॅमी.
अमांच्या कमेंटी पण कधी कधी महान असतात. Light 1

<<<वर ती देवादिकांची दिलेली उदाहरणे तर भंपक वाटली.>>>
आजच्या जमान्यात, आपल्या देवादिकांच्या गोष्टी उदाहरण किंवा उपदेश म्हणून सांगण्याच्या लायकीच्या नाहीत.
तश्या भंपक गोष्टी इतर धर्माच्या नि इतर ठिकाणच्याहि आहेत. पण त्याचे उदाहरण आज देऊ नका - अज्जिबात पटत नाही.