तुझ्या रंगी रंगले

Submitted by nimita on 2 October, 2018 - 05:25

हमपे ये किसने हरा रंग डाला

खुशी ने हमारी हमें .......मार डाला

टीव्ही वर एका रिऍलिटी शो मधे माधुरी दीक्षित चं हे गाणं दाखवत होते. मी माधुरी दीक्षित ची जबरदस्त फॅन आहे, त्यामुळे साहजिकच माझ्याही नकळत माझे डोळे टीव्ही स्क्रीनवर खिळून होते. माधुरीजींची अदाकारी बघून मन अगदी 'गार्डन गार्डन ' झालं.. तो शो संपला, टीव्ही पण बंद केला, तरी ते गाणं मनात वाजत राहिलं. गाणं गुणगुणताना अचानक मनात एक मजेशीर विचार आला.. वाटलं..हे गाणं - म्हणजे पूर्ण गाणं नसलं तरी पहिल्या दोन ओळी - माझ्या बाबतीत पण अगदी बरोब्बर लागू पडतात.

माझ्या आयुष्यात पण असाच एक हिरवा रंग आला आणि त्यामुळे माझ्या खुशी नी पण मला असंच अगदी मार डाला....

मी साधारण आठवी नववीत असल्यापासून मला आर्मड् फोर्सेस् बद्दल खूप आकर्षण होतं.तो कडक इस्त्रीचा युनिफॉर्म, ती शिस्त सगळं सगळं खूप आवडायचं मला. आमच्या नातेवाईकांपैकी कोणीच सैनिकी पेशात नव्हते, त्यामुळे माझ्यासाठी ते एक वेगळंच जग होतं.. कधीच न अनुभवलेलं पण तरीही एक अनामिक ओढ लावणारं जग....स्वप्नातली दुनियाच जणू!!

कॉलेज मधे असताना माझ्याही नकळत मी मनातल्या मनात ठरवून टाकलं होतं की ...'लग्न करीन तर फौजीशी च !

पण जेव्हा मी एका आर्मी ऑफिसर ची पत्नी म्हणून सैन्यात दाखल झाले तेव्हा थोड्याच दिवसांत माझ्या लक्षात आलं...माझं लग्न जरी एक सैनिकाशी झालं असलं तरी माझं नातं मात्र संपूर्ण आर्मी शी जोडलं गेलं होतं !...

Now, I was a member of the Olive Green family.

आम्हां आर्मीवाल्यांकरता olive green हा फक्त एक रंग नाहीये तर तो एक अनुभव आहे. एक अतिशय उच्च कोटीचं समाधान देणारा अनुभव!

आणि म्हणूनच आजचा हा लेख त्या ऑलिव्ह ग्रीन करता...आपल्या आर्मी करता !

लग्नानंतर जेव्हा मी पहिल्यांदा नितीनच्या युनिट मधे गेले तेव्हा माझ्या मनात खूप उत्सुकता होती . माझ्या स्वप्नातली दुनिया आता मी प्रत्यक्षात अनुभवणार होते. उत्सुकता तर होतीच पण मनात कुठेतरी एक शंकाही होती.. वाटत होतं की मी या नवीन जीवनशैली मधे नीट ऍडजस्ट होईन ना? एका सैनिकाची पत्नी म्हणून माझी जी कर्तव्य असतील ती नीट पार पाडू शकेन ना?

कारण इथले protocols, etiquettes, इथली जीवनशैली सगळं माझ्यासाठी नवीन होतं... पण थोड्याच दिवसांत मी या भल्या मोठ्या आर्मी फॅमिली ची एक सदस्य बनले.आणि माझ्याही नकळत या ऑलिव्ह ग्रीन रंगात रंगून गेले.

आर्मी नी मला खूप काही दिलं... आणि तेही अगदी भरभरून....

माझ्यातल्या कितीतरी सुप्त कलागुणांची मला जाणीव झाली ...खूप काही शिकले मी इथे...म्हणजे अगदी dry flower arrangements पासून ते seven course dinner बनवण्यापर्यंत!

Cultural events मधे सूत्र संचालन करण्यापासून ते एकांकिकेची script लिहिण्यापर्यंत सगळं करवून घेतलं या आर्मी नी माझ्याकडून! सगळं म्हणजे शब्दशः सगळं...

हे सगळे नवनवे अनुभव माझ्या खात्यात जमा होत गेले आणि त्यामुळे माझं जीवन समृद्ध होत गेलं.

एखादा बाशा ( छोटंसं गवताचं घरकुल) असो नाही तर राजमहालासारखा प्रशस्त बंगला..... त्या राहत्या जागेत नंदनवन फुलवण्याचं कसब याच आर्मी कडून शिकले मी.

माझी आई नेहेमी म्हणायची," जे आहे ते गोड मानून घेता आलं पाहिजे!" लहान होते तेव्हा या वाक्याचा नक्की अर्थ कळायचा नाही, पण आर्मीमुळे आईच्या त्या वाक्याचा खरा अर्थ समजला... नुसता समजलाच नाही तर माझ्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग झाला.

लग्नानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत मी युनिटमधल्या ऑफिसर्स आणि लेडीज कडून सतत एक वाक्य ऐकायची...'वेलकम टू द आर्मी फॅमिली!'

त्यावेळी ते ऐकताना खूप छान वाटायचं, आपलेपणाची भावना जाणवायची त्या वाक्यातून! आणि खरंच जशी जशी मी माझ्या नव्या आयुष्यात रुळत गेले तशी तशी त्या आपलेपणाची प्रचिती येत गेली....अगदी पदोपदी! एखाद्या व्यक्तीला आपलं मानणं खरंच किती सोपं असतं....माझ्या आसपास च्या लोकांनी त्यांच्या वागण्यातून मला हे शिकवलं..

सर्वधर्मसमभाव.... किती भारदस्त शब्द आहे नाही हा! पण आर्मी नी या शब्दाचा अर्थ अगदी सोप्पा केला ... समोरच्या व्यक्तीला ती जशी आहे तशी स्वीकारणं....अशा वेळी त्या व्यक्तीचा धर्म, श्रद्धा, जात, भाषा, प्रदेश, आहार या आणि अशा क्षुल्लक गोष्टींना काडीचीही किंमत राहत नाही...सगळे जण एकत्र येतात...एक परिवार म्हणून राहतात..

जितक्या श्रद्धेनी एखादी मराठी व्यक्ती गुरुद्वारा मधे जाऊन गुरू ग्रंथ साहिब चे पाठ म्हणते तितक्याच भक्तीनी एखादी मुसलमान व्यक्ती जन्माष्टमीच्या दिवशी मंदिरात हवन करते.

हे जीवनाचं सार मला आर्मी नी शिकवलं.

आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवून जातो...आपल्याही नकळत.. आणि आर्मी मधे दर दोन तीन वर्षानंतर नवीन लोकांशी संपर्क झाल्यामुळे मला तर खूप काही शिकायला मिळालं. इतर प्रांतांतल्या लोकांची राहाणी, त्यांच्या कडच्या खास रेसिपीज, त्यांचे सणवार, रीती रिवाज....खरंच किती समृद्ध आहे आपल्या देशाची संस्कृती ! विभिन्न तरीही एकसंध... 'अनेकता में एकता' या शाळेत शिकलेल्या वाक्याचा खरा अर्थ मला आपल्या आर्मी नी शिकवला.

आधी मला वाटायचं की 'नाती जोडणं आणि ती जपणं ही देखील एक कला आहे , आणि ती प्रत्येकाला जमतेच असं नाही.' पण आर्मी च्या या भल्या मोठ्या कुटुंबाची एक सदस्य झाले आणि रोज एक नव्या नात्यात बांधली गेले.. आणि गंमत म्हणजे, ही नाती जपायला मला कुठलाही वेगळा प्रयत्न नाही करावा लागला. Blood is thicker than water - असा समज असणाऱ्यांनी एकदा तरी या olive green नात्यांची दखल घ्यावी, अशी माझी त्यांना अगदी नम्र विनंती आहे. एकदा का तुमची एखाद्याशी ओळख झाली की आपोआप तुम्ही एका नात्यात बांधले जाता.... आणि या नात्यांचे प्रकार तरी किती- इथे तुम्हांला अगणित मित्र मैत्रिणी मिळतात, राखी पौर्णिमेला सख्खा भावाच्या हक्कानी तुमच्याकडून राखी बांधून घेणारे ऑफिसर्स तेवढ्याच हक्कानी तुम्हाला 'राखी का शगुन' पण देतात.करवा चौथ च्या दिवशी भल्या पहाटे तुमच्यासाठी 'सरगी' घेऊन येणारी एखादी सीनिअर लेडी तुमच्या सासूची जागा घेते. एखाद्या नव्या नवरीला आईच्या मायेनी समजावून, वेळ प्रसंगी हलकेच दटावून, हळू हळू या ऑलिव्ह ग्रीन परिवारात सामावून घेणारे सगळे जण लवकरच तिची फॅमिली होतात.

आपल्या आयुष्यात आपण बऱ्याच गोष्टी गृहीत धरतो...आपली माणसं, आपली नाती, आपल्याला मिळणाऱ्या सुख सुविधा...थोडक्यात काय तर आपण आपलं सगळं आयुष्यच गृहीत धरतो. आणि याचा परिणाम म्हणजे आपल्याला या सगळ्यांची किंमत कळत नाही.

आर्मी मधल्या कामाचं स्वरूप असं आहे की ज्यामुळे प्रत्येक ऑफिसर ला वेळोवेळी आपल्या परिवारापासून दूर राहावं लागतं आणि तेही सलग २-३ वर्षं! हे वाटतं तेवढं सोपं नाहीये.. पण या वेगळं राहण्यामुळे एक फायदा होतो... लांब असलेल्या आपल्या जवळच्या माणसाची किंमत कळते. माणूस दूर असलं तरी त्याच्या बरोबरच नातं अधिकाधिक घट्ट होत जातं.

मी आणि माझा परिवार ही याला अपवाद नाही. त्या मुळे मी सुद्धा आहे त्या परिस्थितीत खुश राहायला शिकले. 'साधू संत येती घरा ...' या धर्तीवर ' सर्व कुटुंबीय असती घरा, तोचि आम्हां दिवाळी दसरा' हे आमचं ब्रीदवाक्य बनलं.

जर ठरवलं तर अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आणि प्रसंगांतूनही आनंद उपभोगता येतो... हे माझ्या लक्षात आलं.

प्रत्येक व्यक्तीची अशी अपेक्षा असते की आपल्या जोडीदाराच्या मनात आणि त्याच्या आयुष्यात आपलं एक खास , स्पेशल स्थान असावं... आणि तसं असतंही !

पण माझ्या या ऑलिव्ह ग्रीन फॅमिली मधल्या प्रत्येक स्त्री ला एक जाणीव असते..... 'तिच्या जोडीदाराच्या मनात आणि आयुष्यात ती एकटी नाहीये', त्याच्या मनातलं ते अढळ पद तिचं एकटीचं नाहीये......तिच्या बरोबर किंबहुना तिच्यापेक्षा थोड्या उच्च स्थानावर असते तिच्या जोडीदाराची देशभक्ती, देशासाठी स्वतःच्या जीवावर उदार होऊन लढायची त्याची मर्दुमकी !'

प्रत्येक वीरपत्नी ला ही खात्री असते की जर कधी देश आणि परिवार यांच्यात निवड करायची वेळ आली तर तिचा जोडीदार मागचा पुढचा विचार न करता त्याच्या मातृभूमी च्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावेल.

आणि हे सगळं तिच्या जोडीदारालाही मनोमन माहित असतं, म्हणूनच तर तो सगळा संसार तिच्या भरवशावर सोडून देशासाठी जीव द्यायला देखील तयार असतो.

पण या बाबतीत तिची काहीच तक्रार नसते, कधीच!

उलट तिला या गोष्टीचा सार्थ अभिमान असतो!

अशी वीरपत्नी होण्याचं भाग्य मला लाभलं -केवळ या माझ्या ऑलिव्ह ग्रीन फॅमिलीमुळे !

अश्या या आपल्या आर्मी बद्दल कितीही लिहिलं तरी कमीच आहे. असं म्हणतात की," तुम्ही एखाद्या व्यक्तीला आर्मी मधून बाहेर काढू शकता...पण त्या व्यक्ती मधली आर्मी बाहेर काढणं कधीच शक्य नाही!"

जो कोणी या ऑलिव्ह ग्रीन मधे रंगला, त्याचं आयुष्य इंद्रधनुष्यी झालंच म्हणून समजा !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users