वर्षालहरी

Submitted by द्वादशांगुला on 1 October, 2018 - 13:22

यावर्षी पावसाळा सुरु झाला त्यावेळी कट्ट्यावरील मित्रमैत्रिणींनी मागणी केली म्हणून लिहिलेली ही कविता आनंददादाच्या आग्रहास्तव आज येथे पोस्ट करत आहे. Happy
माबोवर पहिल्यांदाच कविता या साहित्यप्रकारातलं लेखन टाकतेय. आशा आहे आपल्याला आवडेल. Happy

_____________________________________________

अवचित जेव्हा धरा गातसे आतुरतेची गाणी
नकळत टपटप पडते कानी मेघांबराची वाणी

प्रेमळ ही धरणी कुशीत घेऊन थोपटते थेंबांना
सलज्ज कुमारिकेसम दिसे ती जलबिंदू निथळताना

वसुधेचे हे रूप न्याहाळता उल्हास पहा पशूंचा
अलवार गाते प्रसन्न गाणी ही खगभाटांची वाचा

मधूर कूजनाने खगांच्या, प्रसन्न धरती होते
आल्हादमय वार्याने मग तृणपाते डोलते

सरी कोसळतात शांतपणे, क्ष्मादेवी आनंदी होते
जणू बावर्या राधेच्या गाली खळी गोड उमटते

वृद्ध कणखर पर्वत मग बरसत्या मेघांना थांबवतो
मिठीत घेऊन लहानग्या थेंबबाळांना हा जोजवतो

वीज लकाकते कुठेतरी, वर्षेला मार्ग दाखवण्यासाठी
गर्व तिचा हा किती, कडाडते अस्तित्त्व दिसण्यासाठी

ही वात्सल्यमूर्ती वर्षा न्हाऊ घालते या धरतीला
नंतर कौतुकाने तिच्या कंठात घालते बिंदूमाला

लाजून ही सलज्ज धरित्री, पांघरते हिरवा शालू
शालूवरचे प्रत्येक पर्ण हे खुशीत लागले डोलू

लहान बालकांच्या हर्षोद्गाराने पृथ्वी खुदकन हसावी
बरोबर त्याचवेळी सुरेख इंद्रधनुची लकेर दिसावी

-जुई नाईक
९ जून २०१८

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुरेख जमलीए अगदी.
पडते तेव्हा मेघांबराची वाणी>>> पडते ऐवजी झरते हवय का? कारण वाणी झरते, पडत नाही.

धन्यवाद शालीजी! Happy

'पडते' मलाही खटकलं.. थोडा बदल केलाय.. योग्य वाटतोय का? Happy

कविता मनापासून वाचल्याबद्दल खूप आभार आपले! Happy

Happy

धन्स! Happy