एकादशी दुप्पट खाशी - राजगिऱ्याच्या पाल्याचे सूप - मनस्विता

Submitted by मनस्विता on 23 September, 2018 - 12:03

मायबोलीवरच्या ह्या पाककृती स्पर्धेबाबत कळले आणि माझ्या मावशीला साकडे घातले. उपवासाचेच पदार्थ करून बघायचे असे माझे आधीच ठरले असल्याने मावशीला त्या पदार्थांची यादी पाठवून दिली. मग काय तिने सगळी यादी एका कागदावर उतरवून काढली आणि मला फोन केला. खरं तर तेव्हा मी पण ती यादी व्यवस्थित पहिली नव्हती. पण तिने काय जिन्नस चालणार आणि काय नाही हे व्यवस्थित बघून मला पदार्थ सुचवले. अश्या वेळेस आपण किती नशीबवान असे वाटून गेले. एक मेसेज फक्त व्हॉटसअँप वर पाठवला आणि तिने इतके कष्ट घेऊन एकापेक्षा जास्त पदार्थ सुचवले. पण माझ्याकडेच असलेला अपुरा वेळ ह्यामुळे मी त्यातला फक्त एकच करून पाहू शकले.

तर आता सविस्तर पदार्थांची यादी आणि कृती देते.

पदार्थ:
राजगिऱ्याच्या पाला (धुवून आणि चिरून) - २ वाट्या
बटाटा (उकडून) - १
मिरे - ४-५
जिरेपूड - १/२ चमचा
तूप - १/२ चमचा
मीठ - चवीनुसार

42383570_1968734053165520_683603251282575360_n.jpg

कृती:
१. राजगिऱ्याच्या पाला धुवून आणि चिरून तूपावर वाफवून घ्यावा.
२. उकडलेला बटाटा कुस्करून घ्यावा.
३. शिजलेला राजगिऱ्याच्या पाला आणि बटाटा मिक्सरवर चांगला बारीक करून घ्यावा.
४. मिरे बारीक करून त्यांची पूड, जिरेपूड आणि मीठ वरील साहित्यामध्ये मिसळावे.
५. हे सर्व मिश्रण एका भांड्यात काढून त्यात गरजेनुसार पाणी घालून उकळायला ठेवावे.
६. उकळले कि तुमचे सूप तयार!

42383564_1968734779832114_2554987142862340096_n.jpg

सूपला छान हिरवागार रंग येतो. आणि चवीला साधारणतः पालक सुपसारखे लागते. त्यात बटाटा घातल्याने त्याला चांगला दाटपणा येतो तसेच पोटभरीचे होते.

मायबोली आणि गणेशोत्सव संयोजकांचे अनेक आभार! त्यांनी दिलेल्या थीमनुसार बराच विचार करून काही चाकोरीबाहेरचे पदार्थ करून बघितले गेले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users