माझी सैन्यगाथा (भाग १४)

Submitted by nimita on 23 September, 2018 - 04:12

आमची ट्रेन तिच्या ठरलेल्या वेळेपेक्षा सात तास लेट चालली होती, त्यामुळे त्या दिवशी आम्हांला पठाणकोटला पोचायला संध्याकाळ होणार होती. आम्ही सगळे सहप्रवासी त्याबद्दल च बोलत होतो तेवढ्यात असं लक्षात आलं की ट्रेन च्या AC मधे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे कारण हळूहळू गरमी जाणवायला लागली होती. त्या बद्दल कोच अटेंडंट ला सांगायला गेले तर तो पट्ठ्या गायब च होता. मग एकानी त्याला शेजारच्या कोच मधून शोधून आणला आणि त्याला AC चं पॅनेल चेक करायला सांगितलं. मनाविरुद्ध का होईना पण त्यानी आमच्या समाधानासाठी एक दोन स्क्रू टाईट केले आणि निर्विकार पणे म्हणाला,” इससे ज्यादा मैं कुछ नहीं कर सकता।” आणि सरळ शेजारच्या थंडगार बोगी मधे जाऊन बसला.
जून महिन्याचे दिवस...त्या दिवसांत आपल्याकडे जरी पाऊस पडत असला तरी उत्तर भारतात चांगलाच उन्हाळा असतो. .. त्यात AC बंद! आमची मधल्या मधे हालत खराब ! आणि AC कोच असल्यामुळे खिडक्या उघडायचा पर्यायच नव्हता. शेवटी ‘आलीया भोगासी असावे सादर’ असा विचार करून सगळे जण ‘हाश्श हुश्श’ करत Indian railway’ ला शिव्या घालत बसले.
पण असं नुसतं बसून राहाणं मला पटत नव्हतं.. त्या काळात प्रत्येक प्रवासात आम्ही ट्रेन च्या time table चं पुस्तक ठेवायचो आमच्या बरोबर.. त्यात ट्रेन मधल्या कर्मचाऱ्यांच्या duties आणि जबाबदारी बद्दल सविस्तर माहिती दिली होती. त्याचप्रमाणे अश्या प्रकारच्या असाधारण situations मधे काय काय करावं याबद्दल ची नियमावली पण होती.
मी आमच्या त्यावेळच्या परिस्थिती बद्दल काही माहिती मिळते का ते बघत होते आणि शेवटी एकदाचं मला ते सापडलं. त्यात लिहिल्या नुसार - जर तुमच्या कोच चा AC काही कारणानी बंद झाला तर त्यानंतर तुम्ही जितका प्रवास कराल त्या प्रवासा करताचे AC चे चार्जेस (पैसे) तुम्हांला परत मिळतात… पण त्यासाठी TC कडून आपल्या तिकिटावर तशी नोंद करून घ्यावी लागते. तसं पाहिलं तर किती सोप्पं होतं सगळं...पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता तो म्हणजे… TC च गायब होता.. त्याला शोधण्यापासून सुरुवात करावी लागणार होती.
हे सगळं जेव्हा मी इतर प्रवाश्यांना सांगितलं तेव्हा त्यांच्यापैकी कोणीही माझ्या बरोबर यायला तयार नव्हते.. बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की,” जाने दिजीए। सौ दो सौ रुपये के लिये कौन इतनी भागदौड करेगा।”
पण प्रश्न पैश्यांचा नव्हता...प्रश्न होता प्रवाश्यांच्या हक्कांचा..प्रश्न होता तत्वाचा..चूक आणि बरोबर चा! पण हे सगळं समजून घ्यायची त्यांची इच्छा नव्हती आणि कुवत तर अजिबात नव्हती. काही जण म्हणाले,” कोई फायदा नहीं है। सरकारी मामला है ना… फालतू में अपना टाइम वेस्ट.” पण मी प्रयत्न करून बघायचं ठरवलं आणि ऐश्वर्या ला कडेवर घेऊन TC च्या शोधात निघाले.आजूबाजूच्या दोन्ही बोगीज् मधे मला काही तो दिसला नाही. मग मी vestibule मधून तशीच पुढच्या बोगीत शिरले.तिथे एका वरच्या बर्थ वर मस्त पैकी AC ची गार हवा अंगावर झेलत बसला होता तो. मी त्याला झालेला सगळा प्रकार समजावून सांगितला आणि माझ्या तिकिटावर योग्य तो रिमार्क लिहून सही करायला सांगितली. त्यावर जणू काही त्याच्या स्वतःच्याच खिशातले पैसे जातायत असा चेहेरा करून तो TC मला म्हणाला,” ये काम मेरा नहीं है।” पुराव्याशिवाय त्याच्याशी बोलण्यात अर्थ नव्हता.. मी परत माझ्या जागेवर आले आणि सामानातून रेल्वे टाइम टेबल चं ते पुस्तक घेतलं आणि पुन्हा त्याच्याकडे गेले.. एक क्षणभर मला झाशीच्या राणीची आठवण झाली. तिच्या सारखीच मी पण माझ्या छोट्याशा बाळाला बरोबर घेऊन लढायला उतरले होते. फरक एवढाच होता की तिच्याबरोबर तिचं सैन्य होतं पण इथे मी मात्र एकटीच होते. जेव्हा मी त्या TC ला पुस्तकातली नियमावली वाचून दाखवली तेव्हा नाईलाजास्तव तो लिहून द्यायला तयार झाला. आणि जेव्हा हे बाकी सहप्रवाशांना कळलं तेव्हा मात्र लगेच सगळे जण आपापली तिकिटं घेऊन TC पाशी पोचले...आणि गम्मत म्हणजे ज्यांना आधी सौ- दो सौ रुपये क्षुल्लक वाटत होते तेच लोक सगळ्यात पुढे होते.
संध्याकाळी शेवटी एकदाचं पठाणकोट स्टेशन आलं आणि आमचा दोघींचा तो eventful प्रवास एकदाचा संपला! स्टेशन वर नितीन होताच ..बसोली च्या रस्त्यावर त्याला झालेला सगळा प्रकार सांगितला . मी हार न मानता माझ्या हक्कासाठी लढले आणि तेही एकटी...हे ऐकून त्यालाही समाधान वाटलं.
प्रवासाच्या दगदगीमुळे जीप मधे बसल्या बसल्या ऐश्वर्या झोपून गेली. जेव्हा आम्ही बसोली ला आमच्या घरी पोचलो तेव्हा जीप मधून उतरताना नितीन नी तिला उचलून घेतलं तर ती चक्क घाबरून रडायला लागली...जणू काही ती त्याला ओळखतच नव्हती! आणि पुढच्या क्षणी ती माझ्याकडे झेपावली. मागच्या एक दीड महिन्यात ती तिच्या बाबांना चक्क विसरून गेली होती. तो सगळा प्रसंग बघून मला खरंच खूप वाईट वाटलं.. खरं सांगायचं तर आधी एक दोन वेळा मी सिनियर बायकांकडून या बाबतीतले त्यांचे अनुभव ऐकले होते. आर्मी परिवारांमधे ही गोष्ट तशी नवीन नव्हती. ऑफिसर्स (आणि जवान ) ना कामानिमित्त महिनोन्महिने परिवारापासून लांब राहावं लागतं. आणि त्यावेळी आत्तासारखे व्हिडिओ कॉल्स, whatsapp वगैरे नसल्यामुळे कितीतरी वेळा लहान लहान मुलं आपल्या वडिलांना विसरून गेल्याचं मी ऐकलं होतं. घरात वावरणाऱ्या आपल्या वडिलांना बघून,” मम्मी, ये अंकल कौन है ?” असं जेव्हा एखादं मूल विचारत असेल तेव्हा त्याच्या आई वडिलांना काय वाटत असेल!
इतके दिवस मी इतरांकडून जे नुसतं ऐकलं होतं तेच आज आमच्या बाबतीत घडत होतं.
पण हळूहळू ऐश्वर्या ला नितीनची सवय झाली आणि एक दोन दिवसांतच ती पुन्हा ‘बाबा,बाबा’ करत त्याच्या मागे मागे फिरायला लागली.
आमच्या घरामागच्या अंगणात एक छोटीशी किचन गार्डन होती. आमच्या आधी त्या घरात राहणाऱ्यांना बहुदा घोसाळी (घोसावळी) आवडत असावी, कारण पूर्ण जागेत फक्त घोसावळ्याचेच वेल होते आणि तेही अगदी बहरलेले… त्यामुळे - दर दोन तीन दिवसांनी त्यातली तयार झालेली घोसावळी काढून कॉलनी मधे सगळ्यांच्या घरी पाठवणं - हे एक काम माझ्या मागे लागलं होतं.
त्या घोसावळ्यांचा अजून एक फॅन रोज रात्री आमच्या बागेला भेट देऊन जायचा…. हो, एक कोल्हा अगदी नित्य नियमानी रोज रात्री मागे किचन गार्डन मधे घुसायचा, जर मिळाली तर खाली पडलेली घोसावळी खायचा, नाही तर मग तसाच पुढे येऊन किचनच्या दाराबाहेर ठेवलेल्या मोठ्या कचरा कुंडीला धक्का मारून ती खाली पाडायचा..खरं म्हणजे त्यात बागेतला पाला पाचोळा च असायचा.. बहुदा त्यातही तो घोसावळी शोधत असावा. त्याचं हे सगळं रुटीन मी डायनींग रूमच्या खिडकीतून रोज बघत होते.
हा असा पूर्ण रामरगाडा करून तो शांतपणे निघून जायचा, पण दुसऱ्या दिवशी सकाळी मला मात्र तो सगळा कचरा पुन्हा गोळा करायला लागायचा. यावर काहीतरी उपाय शोधायला हवा होता. त्या कोल्ह्यानी बागेतली घोसावळी खाण्याला माझा काही आक्षेप नव्हता., पण त्यानंतर तो जो कचरा करायचा ते थांबवणं आवश्यक होतं.
एवढी मोठी कचऱ्याची बादली घरात ठेवणं अशक्य होतं आणि अयोग्य देखील. त्यामुळे मग मी रोज संध्याकाळी त्या बादलीच्या झाकणावर एक मोठ्ठा दगड ठेवून द्यायचे.
त्या कोल्ह्यानी एक दोन वेळा जोरात धडक मारून ती बादली आडवी करायचा प्रयत्न केलाही, पण थँकफुली त्यात तो अयशस्वी झाला…
नितीनचा तिथला जो सहायक होता त्याच्या बाबतीत पण एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट मला समजली होती.
अगदी एखाद्या बॉलीवूड मूव्ही सारखी! आमच्याच युनिट मधल्या एक सिनियर लेडी नी सांगितली होती….जसं सिनेमा मधे दाखवतात ना तसंच… प्रेमात पडलेले दोन जीव, पण मुलीच्या घरच्यांचा लग्नाला सक्त विरोध- कारण काय - तर म्हणे मुलगा सैन्यात आहे!
जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली तेव्हा त्या मुलानी (म्हणजे नितीनच्या सहायक नी) आमच्या युनिट च्या CO ला सगळी कहाणी सांगितली. त्याच्या कहाणीची सत्यता पडताळून बघितल्यावर CO नी आणि इतर ऑफिसर्स नी मिळून त्या प्रेमी जोडप्याचं लग्न लावून द्यायचं ठरवलं. पण मुलीच्या बाजूनी कोणीच नव्हते...मग काय .. युनिट मधले एक ऑफिसर आणि त्यांच्या बायको नी कन्यादान केलं.. लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. ‘आर्मी हा एक खूप मोठा संयुक्त परिवार आहे ‘ असं म्हणतात ते अगदी खरं आहे हे जाणवलं मला त्यावेळी.
आम्हांला तिघांना एकत्र राहून जेमतेम एखादा महिना झाला असेल, नितीन ला पुन्हा एका कोर्स साठी MHOW (महू) ला जावं लागणार होतं...तीन महिन्यांकरता.
ऑगस्ट महिन्यात नितीन कोर्स साठी निघून गेला आणि पुन्हा एकदा माझं आणि ऐश्वर्याचं ‘एकटं’ राहाणं सुरू झालं.
पण यावेळी मी घराच्या प्रत्येक खोलीत नितीनचा एक फोटो ठेवला होता- ऐश्वर्या ला अगदी सहज दिसेल असा… बेडरूम मधे तिचा आणि तिच्या बाबांचा एकत्र असा एक फोटो ठेवला होता… जेणेकरून तिचे बाबा सतत तिच्या डोळ्यासमोर राहतील आणि ती त्यांचा चेहेरा विसरणार नाही. रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना आम्ही दोघी फोटोतल्या तिच्या बाबांना ‘गुड मॉर्निंग’ आणि ‘गुड नाईट’ म्हणायचो. संध्याकाळी बाहेर बागेत खेळायला जाताना पण ती नितीनच्या फोटोला ‘बाय’ करून जायची…
आणि माझी ही स्ट्रँटेजी खरंच यशस्वी झाली .. कारण तीन महिन्यांनंतर जेव्हा ऐश्वर्या नी नितीनला बघितलं तेव्हा ती ‘बाबा,बाबा’ म्हणत पळत जाऊन त्याला बिलगली. त्यावेळचा नितीनच्या चेहेऱ्यावरचा आनंद मला अजूनही लक्षात आहे.
आमच्या युनिट मधे मराठी जवानांची संख्या बरीच असल्यामुळे दर वर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात यायचा आणि तोही अगदी उत्साहानी!त्या मुळे बसोली सारख्या त्या छोटयाशा गावातही मला अगदी पुण्याच्या गणेशोत्सवाची आठवण झाली.
त्यावेळची एक गंमत आठवली… अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवसापासून खूप जोरात पाऊस पडत होता आणि तोही अगदी संततधार ! हायवे पासून बसोली गावात येणाऱ्या रस्त्यावर एक छोटासा ओढा होता.खरं तर इतर वेळी त्याचं अस्तित्व ही नाही जाणवायचं कधी कारण त्यात कधीच फारसं पाणी नसायचं. पण चोवीस तास सतत पडणाऱ्या त्या पावसामुळे त्या वेळी मात्र तो ओढा अगदी दुथडी भरून वाहात होता. त्याच्यावरचा तो छोटासा पुलदेखील पाण्याखाली बुडून गेला होता.दुसऱ्या दिवशी जेव्हा गणपती विसर्जनाची मिरवणूक निघाली तेव्हा त्या ओढ्याला पार करून पुढे कसं जायचं हा एक प्रश्न निर्माण झाला. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे पुल नक्की कुठे आहे ते कळायला मार्ग नव्हता.
एक बाजूला overnight promotion मिळल्यामुळे तो ओढा अचानक एका छोट्या नदी सारखा भासत होता आणि दुसऱ्या बाजूला आम्ही सगळे आणि आमचे गणपतीबाप्पा!
पण हार मानेल ती आर्मी कसली???
युनिट च्या ऑफिसर्स आणि जवानांनी मिळून एक रणनीती ठरवली आणि त्या दिशेनी काम सुरू झालं. काही जण चक्क त्या वाहत्या ओढ्यात उतरले आणि अक्षरशः पोहत पोहत पुलाच्या दिशेनी निघाले. त्यांना तसं पोहताना बघून ओढ्यातल्या पाण्याचा अंदाज आला. त्यांनी सगळ्यांनी ओढ्यावरच्या पुलाचं exact लोकेशन माहीत केलं आणि त्याच्या दोन्ही बाजुंनी एक मानवी साखळी तयार केली ...जणू काही त्या पुलाचे दोन्ही बाजूचे कठडेच ! मग काय, त्या पाण्याखाली लपलेल्या पुलावरून एक मोठा आर्मी ट्रक (3tonner)आमच्या गणपतीबाप्पांना दुसऱ्या तीरावर घेऊन गेला.
त्यावेळी आपल्या आर्मी बद्दल, आपल्या सैनिकांबद्दल वाटणारा आदर अजूनच वाढला. वाटलं, यांनी मनात आणलं तर काहीच अशक्य नाहीये यांच्यासाठी !
त्या दिवशी आम्ही गणपतीबाप्पाना ऐलतीरावरुनच निरोप दिला आणि आपापल्या घरी परतलो. पण ओढ्याचं पाणी उतरायला नंतर जवळ जवळ तीन चार दिवस लागले ; तोपर्यंत आमचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला होता. त्यामुळे अचानक सगळ्यांच्या घरी भाज्या, फळं, या आणि अश्या वस्तूंचा तुटवडा जाणवायला लागला. पण त्या परिस्थितीत देखील सगळे जण एकमेकांच्या मदतीला हजर होते….ज्यांच्या घराच्या किचन गार्डन मधे भाज्या, फळं वगैरे होती ती त्यांनी इतरांच्या घरी पाठवली. आणि ‘एकमेकां साह्य करू ‘ या म्हणीचा अर्थ खरा करून दाखवला.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान ! तुमचे लेख वाचुन अभिमानाने उर भरुन येतो की एका जवानाची पत्नी तशीच शुर वीर आहे, आणी कुठल्याही प्रसंगाला सामोरे जायला ती तितकीच तत्पर आणी मनाने खंबीर आहे.

जेव्हा मी त्या TC ला पुस्तकातली नियमावली वाचून दाखवली तेव्हा नाईलाजास्तव तो लिहून द्यायला तयार झाला. आणि जेव्हा हे बाकी सहप्रवाशांना कळलं तेव्हा मात्र लगेच सगळे जण आपापली तिकिटं घेऊन TC पाशी पोचले...आणि गम्मत म्हणजे ज्यांना आधी सौ- दो सौ रुपये क्षुल्लक वाटत होते तेच लोक सगळ्यात पुढे होते.>>>>> हे असे लोक शिवाजी महाराज नेहेमी दुसर्‍याच्या घरी जन्माला यावेत असे वाटणार्‍या कॅटेगरीतले असतात. तुमच्या धाडसाचे खरेच कौतुक !

अप्रतिम ! अगदि ओघवतं लेखन असतं तुमचं ! आणी झाशीची राणी म्हणालात तर ते खरच आहे! आपल्या हक्कासाठी लढणं हे केव्हाही प्रशंसनीयच आहे. मग ती गोष्ट दुसर्‍यांना क्षुल्लक का वाटेना!

नेहमीप्रमाणेच अप्रतिम! >>>> + 999

ओघवते लेखन....

तुमची जिद्द, ट्रीक्स, आर्मी लाईफ... सर्वांनाच सलाम....

______/\_____