तुझेच गाणे ओठावरती

Submitted by निशिकांत on 21 September, 2018 - 01:24

(आज माझी ही रचना वाचा आणि ऐका पण! ही रचना पुण्याचे प्रसिध्द तरुण संगीतकार आणि गायक श्री निखिल महामुनी यांनी गायली आणि संगीतबध्द पण केलेली आहे. एका कार्यक्रमात पेश पण केली होती त्यांनी. ऐकण्यासाठी रचनेच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. ही पेशकश थोडी हटके आणि थोडा बदल म्हणून देत आहे.)

तुझिया वरती गीत लिहाया शब्द जुळवतो
तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो

तुझे हासणे, तुझे बोलणे, तुझे लाजणे
मला आवडे कधी तुझे ते रुसून बसणे
तुझ्या भोवती सदा सर्वदा मी रुणझुणतो
तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो

वसंत फुलला जेंव्हा भेटी झाल्या अपुल्या
आठवणीच्या शुभ्र तारका मनी कोंदल्या
बेमौसम का श्रावण तू येता रिमझिमतो?
तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो

मिसळुन गेलो केंव्हा आपण पत्ता नाही
दोस्तीमध्ये गाजवलेली सत्ता नाही
आठव येता झर्‍याप्रमाणे मी झुळझुळतो
तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो

सुखदु:खाची एकच व्याख्या अपुली आहे
सूर, ताल, लय आयुष्याची जपली आहे
केसामध्ये फुले तुझ्या अन् मी दरवळतो
तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो

तू नसताना क्षितीज असते काजळलेले
चैन हरवुनी भाव मनाचे वादळलेले
तुला शोधण्या अंधःकारी मी मिणमिणतो
तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो

आम्रतरूवर मोहर नसता, कोकिळ ताना
सदा ऐकल्या मिठीत आपण मोहरताना
आम्राईतुन झुळूक होवुन मी सळसळतो
तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो

क्लिक करा-- https://www.youtube.com/edit?o=U&video_id=ab-0ExszE2k

निशिकांत देशपांडे मो.क्र.९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users