मराठी भाषा दिन

Submitted by अभिषेक अरुण गोडबोले on 19 September, 2018 - 00:47

"झालंय ना ते..?"
"हो...आता हॅंडबिलाचं राहिलंय,चंदू करतो म्हणतंय"
"चंद्या करेल पण फक्त त्याला आठवण कर..परत काळे पर्यंत जायला नको,त्या टकल्याला तेवढंच पाहिजे असतंय"
"कधी येणारेत..?"
"कोण काळे ? येईल कि संध्याकाळपर्यंत.."
"अरे काळे नाही,साहेब कधी येणारेत ?"
"साहेब..सांगितलंय उद्या संध्याकाळी येतील म्हणून,पण बघू काय काय होतंय.."
"आयला तुझ्या घरी येणारेत ना साहेब ? भाऊ लय हवा करतोय आजकाल.."
"तर काय ? राहुल्या तूपण जरा अक्कल चालवली असतीस तर आपला २ दिवसाचा कार्यक्रम मंजूर होत होता"
"नाही रे बॅटरी,काळे साहेब बोलले ना मला,यावेळी एकच दिवसाचा द्यायचा होता आपल्याला कार्यक्रम.साहेबांनीच सांगितलेलं तसं"
"अरं शहाण्या इलेक्शन नाय होय मार्च मध्ये,मग हे असले कार्यक्रम करत बसले तर प्रचाराची तयारी कोण करणार ? त्यामुळं साहेबानी तसं ठरवलं असल,का ओ पंत ?"
"खरंय..चंद्याला लावा फोन.."
"काय काय डोक्यात ठेवायला लागतंय राव हा ? एक पक्ष चालवायचा म्हणजे...लोकांना बोलायला काय जातंय घरी बसून आणि पंत विषय कसा माहिते का आपले साहेब एका शब्दावर फिरवतात सगळं त्यामुळंच जळतात रे माकडं दुसऱ्या पक्षातली नाहीतर मला सांग त्या उम्याच्या फादरन आत्महत्त्या केली तेव्हा एक रुपया तरी दिलेला का यांनी ? साहेबांच्या पीएला भेटला उम्याचा भाऊ मग मदत मिळाली आपल्या पक्षाच्या फंडातून...चेष्टा नाही एवढा लगेच चेक देणं !"
"राहुल्या उद्या मराठी भाषा दिन आहे,काहीतरी करूया राव आपण "
"कसला दिन ? ए भाई आपल्या पक्षात हे असल डे वगरे मनात नाहीत हा,बोलशील कुठंतर,सुजवतील तुझी"
"अरे मूर्ख माणूस,मराठी भाषा दिन म्हणलं मी,आपली भाषा साजरी करायचा दिवस"
"आपली भाषा ?"
"हां"
"साजरी करायची ?"
"हां मग ? करायला नको ?"
"बसा बोंबलत,ऐकायचंच नाही तर काय सांगणार ?"
"ए ए ए सम्या,एवढा काय पेटतोय लगेच ? अर आता नाही कळत आमाला तुझ्यागत सगळं"
"मग माकडछाप सांगतोय ना मी ? ऐकतोय कुठं तू ?"
"ऐकणार ना भावा,नाय कोण म्हणलं पण आपल्याला समजलं पाहिजे ना तू काय बोलतोय ते ?"
"आपल्या भाषेचा दिवस आहे उद्या..मग त्यात.."
"अरे पण तो रोजच असतो कि"
तू ऐकणारेस ?
हा बोल...
वि.वा.शिरवाडकर ज्यांना आपण कुसुमाग्रज म्हणून ओळखतो. फार मोठे लेखक,कवी आणि नाटककार होऊन गेले आपल्या महाराष्ट्रात. त्यांचा जन्मदिवस असतो २७ फेब्रुवारीला.तो दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो.
आयला...भारीये हा...मग करूयात ना भाई साजरा...काय करायचं बोल...पोरांना पुस्तक वाटायची काय ? का प्रभातफेरी काढूया..फुल गर्दी आणतो आपण,तू बोल फक्त...
वेगळं करूया काहीतरी...
काय करूया...
पुस्तकं देऊ आपण पोरांना शाळेत...
तेच तर बोललो ना मी,पुस्तकं...
फुकट नाहीत द्यायची.
मग ? पैसे घ्यायचे ? काय बोलतो ? पैसे कोण देणार आपल्याला ? पैसे..
पैसे नाही..स्पर्धा घ्यायच्या...
स्पर्धा ? कसल्या ?
निबंध आणि वक्तृत्व सपर्धा...
निबंध आणि व...काय वक्तृ काय ?
वक्तृत्व स्पर्धा...
हा तेच ते...करू ना...उद्याच सांगतो शाळेत आपल्या हा...चंद्या उद्या नोटीस लावायला सांगायची हा शाळेत...
करू कि...दादा म्हणलं म्हणल्यावर होणार...ते निबंध आणि ते वक्तृ..वक्तृ...
वक्तृत्व...
हा तेपण होणार....
अरे पण सम्या,विषय काय स्पर्धेचा ?
मराठी भाषा दिन...
चांगलंय विषय पण याबद्दल माहित असणारे का कुणाला ?
मग माहिती काढतील...अरे साहेबांची आत्तापर्यंतची भाषण जरी काढली ना तरी हे एवढं लिहिता आणि बोलता येईल यावर...
हे बरोबर बोलला हा दादा तू...
बरं चला आवरायला घ्या...बसू नका,चला...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह.. संवाद खुसखुशीत आहेत.
पण ह्याला प्रतिसाद का नाही आले.

साहेब कोण असतील त्याचा विचार करत आहे.