बोहारिण

Submitted by सुप्रिया जाधव. on 17 September, 2018 - 09:57

गल्लीच्या दुसऱ्या टोकातुन
कानी ये खणखणीत हाळी
'जुने पुराणे कपडे देउन
भांडी घेता का हो भांडी ?'

चटपटीत तरतरीत रखमा
मजबुत बांधा, सुबक ठेंगणी
नशिबी लिहिली पायपीट पण
कर्तृत्वाची दिसे झळाळी

भाळावर ठसठशीत कुंकू
पोतीमधली जुळी डोरली
नउवारी हिरव्या लुगड्यावर
गाठ बांधली इरकल चोळी

किणकीणती काचेचे बिलवर
पैंजण पट्ट्या, जुनी जोडवी
पदर डोइवर परंपरेचा
वेसण घाली नथ नाकातिल

उतरवलेल्या पाटीमध्ये
डबे-डुुबे अन तांब्या-चरवी
वाट्या पेले विविध वाडगी
प्रारब्धाची वर गाठोडी

काखेमध्ये कळशी हंडा
लहान-मोठे पिठाचे डबे
परात ताटे थाळ्या त्यातच
गंज तपेली खलबत्तेही

शर्ट पँट चादरी बेडशिट
रखमाचा साड्यांवर डोळा
देण्यापेक्षा कल घेण्यावर
भांडयांसाठी घासा-घीशी

मनासारखा घडता सौदा
आनंदे डोळे चमचमती
मागुन घेते कोरड्यास पण
तिचाच ठेचा, शिळी भाकरी

डोक्यावरती चढवत पाटी
महिनाभर रखमा गायबते
बोहारिण नेईल दटावत
घास पिलांना आई देते

ऋतू बदलती, वर्षेसुद्धा !
पिढ्या पिढयांना रखमा परिचित
युगायुगांची नेत लक्तरे
समृद्धीने भरते घागर !

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users