उकडीची मोदक फुले

Submitted by सोनू. on 16 September, 2018 - 10:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

उकड -
3 कप पाणी
2 कप तांदळाची पिठी
अर्धा चमचा मीठ
एक चमचा तूप
खाण्याचा लाल व हिरवा रंग

सारण :
१ वाटी ओलं खोबरं
पाऊण वाटी चिरलेला गूळ
एक चमचा तूप
३ वेलच्यांचे दाणे कुटून किंवा पूड करून

क्रमवार पाककृती: 

ही पाककृती माझी नाहीय. फेसबुकवर कोणीतरी फोटो दिले होते ते पाहून प्रयत्न केला. तिनेही असेच कुठेतरी पाहिले होते. मूळ पाककृती वाल्या व्यक्तीचे आभार.
तुम्हाला ही आवडले तर तुम्हीही प्रयत्न करा व इतरांना शिकवा.
मोदकाचेच सारे काही करायचेय फक्त आकार फुलांचा द्यायचा. खूप वेळखाऊ काम आहे पण झाल्यावर बघायला छान वाटतं त्यामुळे वेळ असेल तर नक्की करा.

उकड - मी सध्या OPOS - One Pot One Shot च्या प्रेमात आहे त्यामुळे त्यांची आटालिसीस पद्धत वापरली. त्याने उकड शेवटचे फुल होई पर्यंत छान मऊ होती. फुले व मोदक पण सात आठ तासांनंतरही मऊ होते. माझे नेहमी एवढ्या वेळाने वातड व्हायचे.

3 कप पाणी, अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तूप कुकरात घालून 1 शिट्टी करायची. गॅस बंद करून कुकरची वाफ काढून टाकायची नी त्यात 2 कप तांदळाची पिठी घालून फोर्क ने ढवळून घ्यायचं, गुठळ्या फोडायच्या. मग कुकरला झाकण लावून 10 मिनिटे तसाच ठेवायचा. मग उघडून पीठ काढून घेऊन मळायचं.

पिठाचे 2 भाग करा
एक भाग तसाच पांढरा राहूदे
दुसऱ्या भागातून थोडा भाग काढून त्यात खाण्याचा हिरवा रंग चमचाभर पाण्यात कालवून मिसळा तर उरलेल्या भागात तसाच लाल रंग मिसळा. हो दोन्ही पीठे नीट मळून रंग एकजीव करा

सारण :
१ वाटी ओलं खोबरं
पाऊण वाटी चिरलेला गूळ
एक चमचा तूप
3 वेलच्यांचे दाणे कुटून

खोबरं, गूळ नी तूप एकत्र करून शिजवून घ्या. हे पण कुकरात घालून एक शिट्टी करून करता येईल. मग त्यात वेलची पूड / कूट टाका.

फुलं बनवायची कृती :

एका वेळी दोन फुले होतात. त्यासाठी 3 पांढरे, 2 लाल व दोन लहान हिरवे गोळे लागतात. अगदी लहान लहान गोळ्या करून घ्या.

आता बोटांनीच गोल गोल दाबून लाल व पांढऱ्या गोळ्यांचे गोल पुऱ्यांसारखे आकार करा. सगळीकडून सारखा दाब देऊन समान जाडीची पुरी असूदे. छोटीच असल्याने लगेच जमते. हिरव्या गोळ्या मधे दाबून वाटीसारख्या बनवा.
मला लिहिताना हे कठीण वाटतय पण फोटो बघून समजेल की हे फार सोपं आहे.

Phule_purya.jpg

आता पांढऱ्या नी लाल पुऱ्या पाणी लावून एक आड एक ठेवा. मध्यभागी बोटाने दाब देऊन थोडं चिकटवा.

Phule_maandani.jpg

सुरीने त्यांचे समान दोन भाग करा.

Phule_kaapani.jpg

आता या दोन्ही भागांची दोन फुले होतील. चमच्याने या भागांच्या कापलेल्या भागाकडे सारण ठेवा. एका बाजूला थोडीशीच तर दुसऱ्या बाजूला जास्त जागा रिकामी ठेवली की फुल गुंडाळायला सोपं जातं.

Phule_Saaran.jpg

जिकडे कमी जागा ठेवलीय तिथून गुंडाळायला सुरुवात करा. हा फुलाचा खालचा भाग दाबत दाबत जा. शेवटाच्या मोकळ्या भागाला पाणी लावून फुल चिकटवा.
असेच दुसरे फुल.

Phule_gundaali.jpg

आता त्या हिरव्या वाटीला आतून थोडे पाणी लावून त्यात हे फुल ठेवा आणि वाटी चिकटवा.

ही झाली दोन्ही फुले तयार.

Phule_kacchi.jpg

मोदकांसारखे उकडून घ्या.

Phule_Vaafavane.jpg

हे फुल

Phule_Poorna.jpg

मोदक नी फुले

Phule_Taat.jpg

वाढणी/प्रमाण: 
फुलांच्या आकारानुसार. २० फुले होऊ शकतील.
अधिक टिपा: 

सारण भरण्याच्या आधीच गुंडाळून फुलाचा आकार किती होतो ते पाहून घ्या म्हणजे गोळ्या केवाढया करायच्या ते ठरवता येईल.

माहितीचा स्रोत: 
फेसबुकवर कोणीतरी फोटो दिले होते ते पाहून प्रयत्न केला.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला हा प्रकार खुपच आवडला. कलात्मक वाटला.
पण अजुन ती आटालिसीस पद्धतीने उकड काढायचे धारिष्ट्य झाले नाही एन गणपतीत.
गेल्या वेळेला इथले वाचून, तांदूळ वाटून उकड करायचा प्रयत्न फसलाय.
कधीतरी टाईमपास म्हणून करेन. मला ते ज्यास्त पाण्याने एकदम सैल अशी उकड नाही होणार हि चिंताय.

कोणी केली का मोदकाची अशी उकड?

हि आयडीयाची कल्पना मस्त होती....

स्पर्धेत न चालायला काय आहे? पारंपारीक मोदक रेसीपी आहे की ... चालतय की. बघा विचारून/

Pages