बदलतात तळव्यावरिल हस्तरेषा !

Submitted by सुप्रिया जाधव. on 16 September, 2018 - 05:41

बदलतात तळव्यावरिल हस्तरेषा !

कधी वाटते छंद त्याचा जडावा
कधी वाटते मोकळा श्वास घ्यावा !
कधी वाटते तू असावेस माझे
कधी वाटते की बरा हा दुरावा !

तुला काय सांगू प्रखरता झळांंची ?
कशी बाळगावी अपेक्षा फळांची ?
असे प्रेम विरहात करपून जाते
ससेहोलपट होत जाते मनांची

दुतर्फा तमाचेच घनदाट जंगल
सुरू संशयाची अहोरात्र दंगल
उरी पेटण्याची तिची जिद्द आहे
दिवा तेवण्यानेच होईल मंगल !

बदलतात स्वप्ने बदलतात इच्छा
स्मृती सोडती का कुणाचाच पिच्छा ?
सख्या तिष्ठते फक्त इतक्याचसाठी
बदलतात तळव्यावरिल हस्तरेषा !

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users