अशी सांजवेळ

Submitted by Asu on 15 September, 2018 - 01:53

अशी सांजवेळ

दिवस नाही रात्रही नाही
संधीची वेळ
अशी सांजवेळ

दिवसाचा आधार गेला
रात्रीचा अंधार आला
भुतं लागली नाचायला
मनाची हुरहूर
अंगाची हुुळहुळ,
अशी सांजवेळ

संगतीची तहानलेली
विरहाने ठसठसलेली
घरात असून एकटं करणारा
नको त्या विचारांचा खेळ
अशी सांजवेळ

दिव्याच्या ज्योतीवर
नाचताय सावल्या
भातुकली खेळताय
भुतांच्या बाहुल्या
आवाज येतात कुठून
धस्स होतं पोटात
रामराम येतं ओठात
असती सारे मनाचेच खेळ
अशी सांज वेळ

पाल कधी चकचकते
खिडकी उगा फडफडते
घुबडाच्या धुत्कारात
हृदय कातरत जाते
अधांतरी पिंगळावेळ
अशी सांजवेळ

सजणाच्या चाहुलीत
जीवात जीव येतो
सुरक्षित मिठीतही
जीव धडधडतो

आयुष्य हे असेच असते
सारा मायावी खेळ
अशी सांजवेळ

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)

© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults