टुन्ना किरणुद्दीन आणि गाढव

Submitted by किरणुद्दीन on 14 September, 2018 - 04:31

अर्पणपत्रिका - अधून मधून चिमटे काढण्याची हुक्की असलेल्या एका समाजवादी विचारवंत मित्रास समाजवादी टुन्नाकडून अर्पण

टुन्ना किरणुद्दीन आणि गाढव
====================

कुठलाही चांगला वक्ता उपलब्ध नसल्या कारणाने गावातल्या माजवादी मंडळींनी टुन्ना किरणुद्दीनचं भाषण शिक्षकदिनानिमित्त आयोजित केलं होतं. टुन्नाला काय बोलावं याचा प्रश्न पडला होता. त्याने आजवर जगातले सर्व उपदेश तोंडपाठ करून याच्या त्याच्यावर उधळण्याव्यतिरिक्त सलग असं भाषण केलं नव्हतं. त्यातून भाषणात स्वत:चे विचार मांडायचे असतात असं एका जाणकाराने सांगितल्यावर तर त्याला जरा टेन्शनच आलं होतं.

भाषणाला जात असतांना रस्त्यावर लोळणा-या एका गाढवाला पाहून टुन्ना किरणुद्दीनला हसायला आलं. त्याचा तणाव कुठल्या कुठे नाहीसा झाला. त्याच्या मनात आलं की कसला हा प्राणी ? कुठेही लोळतो ! आपल्या स्थितीचं त्याला अजिबात भान नसतं.

मग त्याने संध्याकाळी चौकात तल्लीन होऊन भाषण ठोकलं. भाषणाच्या ओघात गाढवासारखा गुरू नाही असंही विधान त्यानं केलं.
कुठल्याही स्थितीत ज्याची ब्रह्मानंदी टाळी लागते ते गाढव म्हणजे समाजवादी विचारवंत आहे असंही टुन्ना म्हणाला. टुन्नाची गाडी हेलकावे खात खात गाढवावर टीका करू लागली.

एकाच वेळी गाढव गुरूही असतं, समाजवादीही असतं, मेण्टॉरही असतं आणि त्याच वेळी गाढवासारखं वागू नये त्यामुळे समाजात हसं होतं असं सांगितल्याने उपस्थितांना काहीच न कळून भाषण खूप भारी झालं असं सर्वांना वाटलं. त्या रात्री एक विचारवंत जन्माला आला.

दुस-या दिवशी टुन्ना ब्रश करत बाल्कनीत आला तर घरासमोर शेकडो गाढवं जमली होती. टुन्नाला गाढवांची भाषा अवगत होती.

एक म्हातारं गाढव म्हणालं "पोरा, आख्खं जग आमच्याकडे लक्ष न देता आपापल्या रस्त्याने जातं. तूच एक निघालास ज्याने वेळात वेळ काढून आमच्याकडे लक्ष दिलं. आमच्यावर कसं का होईना बोलून आमची दखल घेतलीस. आम्हाला प्रसिद्धी दिलीस. त्यामुळे तमाम गाढवांतर्फे तुझा सत्कार करण्यात येत आहे. आजपासून ्तुला आम्ही आमच्यातला समजून गदर्भभूषण हा पुरस्कार देत आहोत.."

गाढवांतर्फे टुन्नाला पुरस्कार दिला जाताना आख्खं गाव हसत होतं.
टुन्ना पुन्हा एकदा खजील झाला ( हे सांगायलाच हवं का ?)

#टुन्ना_किरणुद्दीनच्या_कथा

Group content visibility: 
Public - accessible to all site users