भारलेल्या त्या क्षणांचे

Submitted by अनन्त्_यात्री on 12 September, 2018 - 09:13

भग्न शिल्पातून भटकत कोणते हे भूत रात्री
विव्हळले, "आरंभ विसरा, शेवटाची येथ खात्री
भोगुनी उपभोग उरते शून्य केवळ मर्त्य गात्री
क्षणिक येथे तेज, अंती घोर तम प्रत्येक नेत्री"

चांदण्याच्या कवडशाने भग्न मूर्ती उजळली
ध्वस्तता मिरवीत अंगी अंतरीचे बोलली,...
"निर्मितीचा दिव्य प्याला प्राशुनी मज घडविले,
आज जरी मी भंगले अन विजनी ऐसी विखुरले
सर्जनाच्या अमृताने अजूनही मी भारले….

....भारलेल्या त्या क्षणांचे तेज असते शाश्वत
तेच साऱ्या सर्जनाचे, निर्मितीचे इंगित "

Group content visibility: 
Use group defaults

वा!