सारंगिया

Submitted by चैतन्य दीक्षित on 6 September, 2018 - 01:25

तुझ्यातला सारंगिया
माझ्या मागे सावलीसा
कधी माझ्याहून आर्त
कधी मूक अव्यक्तसा

कधी माझ्याबरोबर
सूर्यसा तू डोक्यावर
कधी माझ्याहून दुणा
जणू माझ्यातून उणा !

तुझ्यातल्या सारंगीचे
रंग, माझा मनःपट,
माझ्या सुरांचे कुंचले
ओथंबून काठोकाठ

विलंबित कधी द्रुत
श्वासनि:श्वासांची लय
मीट डोळे, पहा मन
तुझे माझे चित्रमय !

~ चैतन्य

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आह!

कधी माझ्याबरोबर
सूर्यसा तू डोक्यावर
कधी माझ्याहून दुणा
जणू माझ्यातून उणा !>>>> क्या बात है!

तुझ्यातल्या सारंगीचे
रंग, माझा मनःपट,
माझ्या सुरांचे कुंचले
ओथंबून काठोकाठ>>>> मस्तच।
सारंगिया मस्त नाव दिलेय. आवडली कविता।