सदैव शिक्षका……

Submitted by Asu on 5 September, 2018 - 00:20

शिक्षक दिनानिमित्त,
माझ्यासह माझ्या समस्त शिक्षक बांधवांची क्षमा मागून
शिक्षकांनाच अर्पण…

सदैव शिक्षका……

सदैव शिक्षका तुला
शिक्षक रहायचे
देशाचे आधारस्तंभ
तुला घडवायचे

अंधार दिसे सर्वत्र तुला
दीप व्हायचे
मार्ग दाखविण्या सदा
जळत रहायचे

कुणी शिको वा नको
शिकवत राहायचे
वाळू रगडून रगडून
तेलही गाळायचे

वांझभूमीत ज्ञानबीज
सतत पेरायचे
पीक येवो वा न येवो
दिनरात श्रमायचे

ज्ञानप्रसार तुझा विचार
ध्यानी ठेवायचे
वादळे उठो कितीही
नाही ढळायचे

नसेल कधी पगार तुला
दुःख विसरायचे
गीता काढून शाळेत
पारायण करायचे

फळाची अपेक्षा नको
कर्म करायचे
काम अंगी पडेल ते
निमूट करायचे

शिक्षक दिन बैलपोळा
लक्षात ठेवायचे
साजरे होतात म्हणून
भाग्य मानायचे

सदैव शिक्षका तुला
शिक्षक राहायचे
घाण्याच्या बैलासम
सतत फिरायचे

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
(05.09.2018)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults