कधीच न संपणारा 'सिग्नेचर' पॉज!

Submitted by Charudutt Ramti... on 31 August, 2018 - 12:35

गेल्या आठवड्यात वाजपेईजींच जाणं चांगलंच मनाला लावून गेलं. अगदी मनस्वी वाईट वाटलं...घरातलं कुणी वयस्क अनेक वर्षं अंथरुणात खिळून काहीही न बोलता एकट्यान्ं गुमान आजारपण सोसत असतं. त्याचं करणा-याला ते आजारी नातेवाईकाचं दुख: बघवत नसतं. आणि एक दिवस ते जरजर शरीर घेऊन ते अंथरुणात अडकलेल आप्त् आपल्याला सोडून दूर निघून जातं. ते गेल्यावर एकीकडे माणूस आपल्यातून कायमचं निघून गेल्याचं दुख: तर दुसरीकडे निघून गेलेली व्यक्ती एकदाची ते कष्ट प्रद भोग सोसण्यातून सुटली ही निश्वास सोडायला लावणारी भावना असते. तशी च काहीशी भावना झाली, वाजपेईजिंच्या जाण्याची बातमी कळल्या कळल्या. नंतर बराच वेळ मग हळवं वाटायला लागलं. आपल्याच घरातलं कुणीतरी गेल्या सारखं.

स्थळ कांदिवली. वेळ, साधारण दुपारी साडेतीन चारची. अनिरुद्ध ताम्हनकर, आमचा त्यावेळ चा रूममेट, टी. सी. एस. मध्ये जॉब ला. तो आला, शनिवारी दुपारी ऑफीस मधून. पटपट बॅग ठेवली आणि म्हणाला…

“राम येतोस काय…?”

मी काहीतरी फडतूस काम करत होतो, ते तसंच अर्धवट टाकून उठलो, आणि आम्ही दोघांनी कांदिवली स्टेशन वरुन दादरची फास्ट लोकल पकडली. साल दोन हजार एक किंवा दोन हजार दोन... आता नक्की आठवत नाही. दादर स्टेशन वरुन झप्झप मग शिवाजी पार्क वर आलो. आम्हाला दोघांना दादरच्या शिवाजीपार्क वर ओथंबलेल्या त्या अलोट गर्दीत कुठेतरी दूर बसायला कशी बशी जागा मिळाली...धुळीतच आम्ही दोघांनी मस्तपैकी फत्कल मारत बैठक ठोकली. स्टेज वर कुणीतरी शिवसेना की भाजप चे आमदार जमावाला माईक वरुन ''पुढे सरका...मागे अजुन लोक येताहेत…त्यांना बसायला जागा करण्या साठी पुढे सरका" अश्या स्वरूपाच्या सूचना करत होते. प्रचंड मोठा पडसाद उमटवणारा लावूड स्पीकर चा आवाज चोफेर घुमत होता.. बांबू आणि सुतळाचे दोर जागोजागी लावून सुद्धा गर्दीस आवर घालायला कार्यकरत्यांच्या अक्षरश: नाकीनऊ येत होते. इतक्यात तुतारी चा प्रचंड घोष झाला...आणि स्पीकर वरुन आवाज आला... “बाळासाहेब आणि वाजपेईजी दोघांचं ह्या आजच्या सभेच्या ठिकाणी आगमन झालेलं आहेsss”. एक भगवा आणि एक पांढरा, एक तेजस्वी आणि एक तपस्वी, असे दोन विहंगम नेते एक एक अश्या पायर्या चढत स्टेज वर अवतरले. एक ज्वालामुखी सारखा तामसी आणि आषाढातल्या खवळलेल्या समुद्रा सारखा रौद्र तर दुसरा कोजागीरीच्या पौर्णिमेच्या चंद्रासम शीतल आणि उजव्या हाताच्या करांगुलीत चांदीच्या अंगठी मध्ये घालतात त्या मोत्यासारखा शांत परंतु तितकाच ओजस्वी. त्या दिवशी संध्याकाळी शिवाजी पार्क वर बाळासाहेब ठाकरे आणि वाजपेई जी अशी दोघांची तुडुंब गर्दीतील ती ऐतिहासिक सभा संपन्न झाली. ठाकरे त्यांच्या रांगाड्या अश्या मराठी मधून ठाकरी शैलीत जवळ जवळ अर्धा पाऊण तास बोलले. आणि बाळासाहेबांच्या नंतर अटल बिहारी वाजपेईजी त्यांच्या अस्खलित अशा संस्कृत प्रचूर हिंदी मध्ये मोजून एक तास पंधरा मिनिटं बोलले. वाजपेईजिंच्या त्या दिवशीच्या अमोघ वक्तृत्व शैलीचा आस्वाद घेण्यासाठी लोटलेल्या त्या अथांग जनसागरातील मीही एक क:पदार्थ असा फेसाळला क्षण होतो. त्यांच्या भाषणातील दोन संदर्भां मधील 'पॉज' च्या वेळी सभेत होत असलेली उत्सुकता पूर्ण चीडीचूप अशी प्रदीर्घ शांतता...आणि त्या पॉज नंतर होणा-या त्यांच्या पंचलाईनच्या फेकी नंतर झालेला टाळ्यांचा कडकडाट हे सॉलिड कॉंबिनेशन मी त्या सभेत अक्षरश: अवाक होत, ' वक्ता दशसहस्त्रेषू म्हणजे काय? ' ते 'याची देहा याची डोळा' प्रथमच अनुभवलं !

आमची आक्खी पिढी तशी भाग्यवानच! काय एक एक राजकीय नेते आम्ही पहिले! एकीकडे राजकारणातला बुद्धिबळाचा खेळ अर्धवट सोडून गेलेले राजेश पायलट असोत वा प्रमोद महाजन, तर एकीकडे सार्वजनिक जीवनातील त्यांची मैफिल अगदी भैरवि पर्यंत पूर्णत्वाला नेणारे वाजपेईजी. क्लिष्ट राजकारणाचा सारीपाट खेळत असताना आपल्या नितिमत्ते च्या बिलोरी काचेला जरासुद्धा कुठेही टवका पडू न देता तब्बल साठ पासष्ठ वर्ष सतत राष्ट्राला समर्पित करून घेणारे आयुष्य जगलेले अटलजी. आपलं तेरा दिवसाचं सरकार पडल्यावर तसू भर ही खेद न करता अगदी निर्मोही वृत्तीने पराजयाला सामोरा जाणारा हा निस्संग पण तितकाच तत्वनिष्ट असा सन्यस्त राजयोद्धा... वर्षभरानी पुन्हा तितक्याच निस्वार्थिपणे पंतप्रधान पदी आरूढ झाला. मला आठवतंय आम्ही त्या वेळी असू अठरा वीस वर्षाचे. त्या वेळी दर दीड दोन वर्षातून एकदा संसदेत अविश्वास ठराव मांडला जाई. कित्येक वर्षे नुसतं फ्रॅक्चर मॅंडेट घेऊन आपली डेमॉक्रेसी कूर्मगती ने पुढे सरकत होती.

त्या अविश्वास ठरावाच्या वेळची, वाजपेईजींची, त्यांचे नेहरूंबरोबर होणारे वैचारिक वादविवादाचे संदर्भ असलेली विवेकसमृद्ध अशी संसदेतील अभ्यासपूर्ण भाषणं असोत, किंवा त्यांचे इंदिराजिंच्या आणीबाणी च्या काळात होणार्या मतांतराच्या हकिकति असोत ती दूरदर्शन च्या लोकसभा च्यनेल वर अगदी डोळ्यांची पापणी ही ‘न’ लवू देता, दुपारच्या वेळी कॉलेज चे लेक्चर्स चुकवून हॉस्टेलवरच्या टी. व्ही. वर आम्ही ऐकत असु. ते जवळ जवळ एक व्यसनंच झालं होतं. क्रिकेटची फायनल मॅच टी. व्ही. वर पाहण्यासाठी तास चुकवताना जसा गिल्ट यायचा मनात, तसा गिल्ट मात्र मला वाजपेइंजींचे भाषण ऐकण्यासाठी लेक्चर्स चुकवताना मात्र कधीच यायचा नाही. उलट आपण लेक्चर बंक करून वाजपेइंजींचे भाषण ऐकतोय म्हणजे जणू काही एखादे महान राष्ट्रकार्यच करतोय अश्या थाटात... ‘सम्या’ जरा 'प्रॉक्सी' मार माझी मशीनड्रॉयिंग च्या प्रॅक्टिकलला...मी येतो चार वाजता च्या अप्लाईड मेकनिक्स च्या लेक्चर ला...जरा हॉस्टेल वर जाऊन आलो...मशीन ड्रॉयिंग ला कल्टि आज. अश्या थाटात आम्ही जायचो, दूरदर्शन वर लोकसभेचे लाइव प्रक्षेपण पाहायला. हॉस्टेल चा टी. व्ही. मेस च्या हॉल मधे होता. तिथे ऑलरेडी बर्मुडा हाफ पॅंट आणि कॉलर नसलेल जुनाट टी शर्ट परिधान केलेले सतरा अठरा भावी राजकीय विस्लेशक सिगरेटी फुंकत टी. व्ही. ला नजर रोखून बसलेले असायचे. इतर वेळी त्या मेस मधे खूप धुडगुस असे. वाजपेईजिंच्या भाषणाच्या वेळी मात्र चीडी चुप्प शांतता... अक्षरश: पीन ड्रॉप सायलेन्स. वीस पैकी साधारण तेरा चौदा...भाजपा प्रेरित. पाच सहा 'धर्म निरपेक्ष' कॉंग्रेस वादी आणि डाव्यांच्या पैकी मात्र कुणीच नसायचं. गंमत म्हणजे, वाजपेईजींची भाषण ऐकायला सगळी वीस च्या वीस टाळकी, पण एकदा का त्यांचं भाषण संपलं की भाजपावाले ही जायचे आणि कॉंग्रेसवाले ही गायब. मग चर्चा रंगायची ती कॅंटीन मधे...भुर्जीपावा बरोबर भाजपा ने हारलेल्या विश्वास दर्शक ठरावा आधी कॉंग्रेस ने टाकलेल्या जाळ्यात कसे भाजपा वाले अडकले ह्याची. तोंडी लावायला डाव्यांच्या दूटप्पी पणाच्या हकिकती.

“एका मतानं गेलं राव सरकार फक्त च्याsयsला”... अश्या हळहळ व्यक्त करणार्या वाक्यांपासून ते “काय... लेकांनो एक खासदार नाही फोडता येत तुमच्या भाजपा वाल्यांना काय देश चालवणार हे तुमचे खाकी हाप चड्डी वाले...?” असं म्हणंत धर्मनीरपेक्ष कॉंग्रेसी मित्र आपल्या भुर्जीचे बिल, कुणीतरी संघ वाला, काल लावलेली पैज हरल्या बद्दल उदार पणे देईल अशी अपेक्षा करत, आपल्या हाप चड्डी बर्मुडा ला तेलकट भुर्जीचे हात पुसत. आणि बिल न देताच कॅंटीन मधून बाहेर पडता पडता आमच्या कडे पाहून फिदी फिदी हसत निघून जात. आता ह्यांना कुणी सांगावं? ते एका मतानं हारणं पत्कारित, असलं फोडा फोडीचं राजकारण करून सत्ता दडपण्या पेक्षा, म्हणूनच आम्हाला हरून सुद्धा 'अजेय' असलेले अजातशत्रू वाजपेयी जी जिवापाड आवडंत.

पुढं मग वाजपेईजींच ते स्थिर सरकार आलं. मग अनेक पेनल्ट्या आम्ही न लावून ही जिंकल्या, जेंव्हा साडे चारशे सैनिकांच्या प्राणांच्या आहूतीने पाकडयांच्या उरावर चढत आपल्या सैन्याने कारगिल वर परत एकदा तिरंगा फडकवत विजय दिवस साजरा केला. किंवा मग हायड्रोजन बॉम्ब च्या प्रचंड अणूस्फोटानंतर, अमेरिकेच्या सॅटेलाईट ला हुलकावणी देत पोखरणच्या निर्जन वाळवंटा मध्ये बुद्ध पुन:श्च एकदा हसला. किंवा फार मोठमोठाल्या गोष्टी न करता अगदी साधंच बोलायचं झालं तर आमच्या गावा जवळून जाणार्या कोल्हापूर बेळगावच्या गोल्डन क्वाड्रिलेटरल वरून पोटातलं पाणी ही न हलू देता, मोटार सायकली पळवत आम्ही गोव्या पर्यंत च्या स्वैर सहली केल्या.

पक्ष येतील, जातील...सरकारं बनतील आणि तशीच पडतीलही. पण हिमालयात पसरलेल्या शिवालिक पर्वत रांगेतील उंच शिखरासारखं जगणं जगलेल्या वाजपेयी जिंच्या सारख्या नेत्यांमुळे लोकशाही पद्धतीचा भुसभुशीत झालेला पाया अधून मधून घट्ट होण्यास मदत झाली हे मात्र नक्की. बोथट राजकारणाच्या पटलावर कुणीतरी संवेदना घेऊन आल्याबद्दल थोडा आशावाद जागृत झाला. स्वतंत्र भारतातल्या राष्ट्र उभारणी साठी आयुष्य वेचलेल्या नेत्यांबद्दल कुणी ग्रंथ लिहायला घेतला तर पहिल्याच पानावर वाजपेयी जी असतील. आम्ही लहान असताना आमच्या गल्ली बोळातील आजोबांना विचारात असु. तुम्ही टिळक पाहिलेत का? तुम्ही गांधीजींना पाहिलेत का? आणि कुणी हो असं उत्तर दिलं तर आमची त्या आजोबांच्या बद्दलची प्रतिमा अगदी उंचावून जायची. अजुन चाळीस पन्नास वर्षानंतर कुणी मला विचारलं 'तुम्ही वाजपेयींना पाहिलंत का?' तर मला त्या गांधीजींना पाहिलेल्या आजोबांचा चेहरा आठवेल आणि उगाचंच स्वत: मूठ भर मास चढेल अंगावरती.

पण परवा वाजपेयीजिंच्या जाण्यानं विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील आणि एकविसावं शतक उदयास येत असताना घडलेला 'न भुतो न भविश्यति' असा हा अटल नामक एक अध्याय पूर्ण झाला आमच्या पिढीतील अनेकांच्या आयुष्यातला. पंधरा ऑगस्टचा वर गेलेला तिरंगा... अचानकपणे अटलजिंच्या पार्थीवावर झाकण्यासाठी खाली उतरला. तो तिरंगा उतरत असतानाच उदासिनतेची छटा पसरवणारे बिगुल वाजले. लाल किल्याच्या कोनाड्यामध्ये शांततेची प्रतीक म्हणून जगलेली असंख्य कबुतरं त्या बिगुला च्या रुदनाने दचकून निरभ्रश्या सुन्या आकाशी उडून गेली. कानाचे पडदे फाडणारे आणि हृद्य दडपून टाकणार्‍या तोफांच्या सलामी झडल्या. दिल्लीतल्या आसमन्ति बंदुकींच्या गोळयांच्या फायरी झडल्या. भयाण शांततेत परत एकदा राष्ट्रगीत वाजलं. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रगीतावर भरून आलेले आमचे ऊर.. त्याच राष्ट्रगीतातले रवींद्र संगीता सारखे कोमल स्वर कानी पडल्यावर मात्र डोळ्यांच्या कडा किंचित ओलावून आल्या. कंठ दाटून आला क्षणार्धात. तुमचा हसरा चेहरा आठवला. तुमची सुमूखी प्रतिमा आठवली. जड अंत:कारणाने मग आम्ही तुम्हाला परत एकदा टी.वी. वर पाहिले...शेवटचे...अगदी शेवटचे...तुम्ही मग तो परत एकदा पॉज घेतला. पण त्या तुमच्या ‘सिग्नेचर’ पॉज नंतर च्या कवितेच्या ‘गीत वही गाता हूं’ ह्या तुम्ही खर्ज आवाजात म्हणलेल्या तुमच्या ओळी मात्र परत ऐकूच आल्या नाहीत...

चारूदत्त रामतीर्थकर
३१ ऑगस्ट २०१८, पुणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लिहीलय...
वाजपेयींजींच वर्णन ही खुप आवडल.
वाजपेईजिंच्या जाण्याची बातमी कळल्या कळल्या. नंतर बराच वेळ मग हळवं वाटायला लागलं. आपल्याच घरातलं कुणीतरी गेल्या सारखं >>>+१

वाचता वाचता, आमची पिढी खरोखर किती भाग्यवान होती ह्याची जाणीव झाली. मन भरून आले.
" झाले बहू, असतील बहू, होतील ही बहू परि यासम हाच ! " असेच माझ्या मनात सतत येत असते.

मी पण त्यांची भाषणे मन लावून ऐकायचे. त्या आधी व नंतर ही कोणाची भाषणे ऐकावीत असे वाटले नाही.
त्यांच्या चितेला अग्नी दिला तेव्हा न कळत डोळे घळाघळा वाहु लागलेले! Sad

छान लिहिलंय.ज्यांच्या मृत्यू ची बातमी ऐकल्यावर आजोबा गेल्याचं फिलिंग येऊन रडू आलं असे दोनच.अटलजी आणि अब्दुल कलाम.

सुरेख लिहिलंय. आता वाचतानाही पाणी आलं डोळ्यात.
अटलजींप्रमाणेच सोमनाथ चॅटर्जींच्या निधनानेही एक अध्याय संपल्यासारखं वाटलं. अशी माणसं ' दिग्गज' या उपाधीला सार्थ करतात.

Sad सुरेख लिहीलयं. पं. लालबहादूर शास्त्री, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यानंतर भारताला लाभलेले हे दोन हिरे, मा. अटलबिहारी वाजपेयी आणी प्रो. अब्दुल कलाम आझाद.

चांगलं लिहिलंय.
त्यांची भाषणं फार ऐकलेली नाहीत. ते पंतप्रधान असतानाची एक मुलाखत पाहिली होते- एक व्यक्ती म्हणून त्यांना प्रश्न विचारलेले. फार दिलखुलास उत्तरं दिलेली त्यांनी.
आता त्यांच्याबद्दलचे अनेक मृत्यूलेख वाचताना आणि जीवनपट पाहताना जाणवलं- राजकारणात माणुसकी जपणार्‍या , विरोधकांना शत्रू न मानणार्‍या लोकांचं पर्व कदाचित त्यांच्यासोबत संपलंय.

लेखावर दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे धन्यवाद !

मस्त लिहिलंय. सध्याची परिस्थिती पहाता वाजपेयी, बाळासाहेब, फर्नांडिस यांचासारखे धडाडिचे नेते/वक्ते आता होणे नाहि...

लेख आवडला .
अटलजीसारखे नेते होणे आता मुश्किल !

लेख आवडला .
अटलजीसारखे नेते होणे आता मुश्किल !

वाजपेयींजींच्या जाण्याची बातमी कळल्या कळल्या. नंतर बराच वेळ मग हळवं वाटायला लागलं. आपल्याच घरातलं कुणीतरी गेल्या सारखं >+१

पण त्या तुमच्या ‘सिग्नेचर’ पॉज नंतर च्या कवितेच्या ‘गीत वही गाता हूं’ ह्या तुम्ही खर्ज आवाजात म्हणलेल्या तुमच्या ओळी मात्र परत ऐकूच आल्या नाहीत....>>घुसलं... अगदी आरपार.

Sad सुरेख लिहीलयं. पं. लालबहादूर शास्त्री, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यानंतर भारताला लाभलेले हे दोन हिरे, मा. अटलबिहारी वाजपेयी आणी प्रो. अब्दुल कलाम आझाद.
Submitted by रश्मी.. on 1 September, 2018 - 17:16

इथे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम असं हवं ना?

ज्यांच्या मृत्यू ची बातमी ऐकल्यावर आजोबा गेल्याचं फिलिंग येऊन रडू आलं असे दोनच.अटलजी आणि अब्दुल कलाम.

>>>> +१

ज्यांच्या मृत्यू ची बातमी ऐकल्यावर आजोबा गेल्याचं फिलिंग येऊन रडू आलं असे दोनच.अटलजी आणि अब्दुल कलाम.

सरकारे आयेगी और जायेगी, ये देश रहना चाहिये असे निस्वार्थपणे म्हणणारे अटलजी. मला अणुस्फोट करता आला नाही पण तुम्ही तो करा असे त्यांना सांगणारे श्री पी व्ही नरसिम्ह राव आणि त्यांच्याकडून धुरा सांभाळत असताना दबावाला बळी न पडता अणुसंपन्न होण्यासाठी अणुचाचणीस परवानगी देणारे खंबीर वाजपेयीजी.

मागच्याच महिन्यात रामेश्वरम येथे डॉ कलाम यांचे सुंदर स्मारक पाहिले.

सामान्य मच्छीमाराचा मुलगा शालेय शिक्षण करत असताना पेपर टाकण्याचे काम करून चरितार्थाला हातभार लावणारा, त्याच्या शिक्षणासाठी आपले दागीने गहाण ठेवणारी त्यांची बहीण असे असून देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होताना आपल्या कुटुंबाचा खर्च सुद्धा स्वतःच्या खिशातून करणारा हा भारतमातेचा सुपुत्र त्यांचे स्मारक पाहताना मला अश्रू आवरले नाहीत.

अप्रतिम! वाजपेयी आठवतच राहतील. जेव्हाजेव्हा राजकारणात ढवळल्यासारखं काही होईल, तेव्हातेव्हा आठवत राहतील. त्यांची आठवण अटल आहे!