सोबती

Submitted by VB on 30 August, 2018 - 12:29

आज प्रिया पहिल्यांदा एकटीच फॅक्टरी व्हीझिटला जात होती. यापूर्वी ती जेव्हा कधी ऑडिट साठी इकडे यायची तेव्हा कोणीतरी असायचे तिच्यासोबत. तसे पाहता आजही डेझी असणार होती तिच्यासोबत, पण डेझीची तब्बेत अचानक बिघडल्याने प्रियाला एकटीलाच जावे लागले होते. माहीत नाही का ? पण आज प्रियाला सारखी रुखरुख लागली होती, काही कारण नसताना तिला घाबरल्यासारखे वाटत होते. त्यातच वाटेत लागलेल्या ट्रॅफिक मुळे तिला तिकडे पोचायलाच उशीर झाला अन त्यामुळे तिचे तिथले काम संपायला देखील .

जेव्हा काम संपवून प्रिया तिथून निघत होती तेव्हा संध्याकाळचे सात वाजून गेले होते, त्यात कामाच्या गडबडीत नेमके आजच ती तिचा मोबाईल चार्ज करायला विसरली त्यामुळे तोदेखील शेवटचे श्वास घेत होता, कधीही बंद पडेल अशी अवस्था. त्यात ही फॅक्टरी देखील अगदीच आडवळणी होती. अगदी रिक्षा जरी पकडायची तरी दहा मिनिटे चालत नाक्यावर जायला लागायचे. प्रियाच्या मनाची चलबिचल ओळखून तिथल्या मॅनेजरने तिला लिफ्ट ऑफर केली, पण तिने हसून नकार दिला कारण काही झाले तरी तिला त्यांच्यावर तितकासा विश्वास वाटत नव्हता, अन म्हणून एकटीच निघाली ती. थोडेसे चालल्यावर प्रियाला जाणविले की बऱ्यापैकी अंधारून आलेय, मनात तीच अनामिक भीती दाटून आली होती. असेच ती कशीबशी पोहचली नाक्यापर्यंत, पण आज तिथे रिक्षा नव्हत्या. बराच वेळ वाट पाहून देखील एकही रिक्षा आली नाही, अंधार तर वाढतच होता. प्रिया तर आता पूर्ण रडवेली झाली होती. मोबाईल देखील बंद पडला होता, त्यामुळे कुणाशी संपर्क करणे देखील शक्य नव्हते. काय करावे काही कळेना, एखादं दुसरे वाहन जात होते, काही जण जाता जाता मुद्दाम गाडी स्लो करायचे, पण त्यामुळे प्रियाची भिती अजूनच वाढत होती. अन राहून राहून तिला सारखी अमितची आठवण येत होती. नेमके आज ती इकडे येताना तो त्याच्या डेस्कवर नव्हता त्यामुळे निघताना त्याला भेटली नव्हती ती.

पण म्हणतात न जेव्हा मने जुळतात , कुणावर तरी आपण अगदी मनापासून प्रेम करतो तेव्हा त्या व्यक्तीशी संवाद साधायला कुठल्याही साधनांची आवश्यकता नसते. अन नेमके तसेच घडले. कसे काय माहीत पण अचानक अमित आला होता प्रियाला घ्यायला. त्याला समोर पाहताच आतापर्यंत चे सारे उसने अवसान गळून पडले प्रियाचे. त्याचा हात हातात घेऊन खूप खूप रडली ती, अन त्यानेही तिला रडू दिले.
जरावेळाने जेव्हा ती थोडी शांत झाली तेव्हा तिने त्याला विचारले की तो इकडे कसा? त्यावर अमितने सांगितले की तिचा फोन लागत नव्हता अन त्याला सारखे असे वाटत होते की ती नक्की तिथेच आहे अन तिला त्याची आता या क्षणी खूप गरज आहे, अन म्हणूनच फॅक्टरी मॅनेजरने ती तासभारापूर्वी तिथून गेल्याचे कळवून देखील तो आपल्या घरी न जाता तिकडे आला होता. आणि खरेच प्रिया होती तिथे, बावरलेली, घाबरलेली.

अमित अन प्रिया तसेच हातात हात घेऊन काहीवेळ थांबले तिथे. अमितच्या हातात आपला हात देताक्षणी प्रियाला जाणविले की किती सुरक्षित होती ती आता. क्षणभरापूर्वी वाटणारी सगळी भीती, तो एकटेपणा, असहायपणा कुठल्या कुठे पळून गेला होता.
प्रियाला परत एकदा जाणविले की आज पुन्हा एकदा अमितने त्याच्या कृतीतून दाखवून दिले होते की अगदी काहिही होवो, मी आहे तुझ्यासाठी, तुझ्यासोबत. त्याने न बोलता तिने ऐकले त्याचे मूक आश्वासन की "तुझ्या दुःखाच्या क्षणी तू न बोलावता देखील तुझे दुःख कमी करण्यासाठी मी प्रयत्न करेन, जेव्हा कधी तुला माझी गरज असेल तेव्हा तू न बोलावता देखील तुझ्या मदतीसाठी मी असेन, आयुष्यात कधीही काहीही होवो मी तुझ्यासाठी तुझ्यासोबत असेन " अन दरवेळी प्रमाणे ह्याही वेळी प्रियाला खात्री पटली की अमितच तिच्यासाठी योग्य आहे अन मुख्य म्हणजे तो तिचा आयुष्यभरासाठीचा सोबती आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटलं की आता तिला कुणीतरी वाईट रीक्षावाला भेटणार
किंवा
चांगला रीक्षावाला असेल पण तिला तो वाईट आहे असं वाटेल आणी मग काहीतरी प्रसंग होऊन त्याचा चांगुलपणा तिला पटेल.

मग अचानक अमित आल्यावर आणि तो डेस्कवर नव्ह्ता वैगेरे वाचुन वाटलं की अमित भुत असेल Lol

पण कथा साधी सोपी छान आहे Happy

सस्मित +१..
आजकाल साधे सरळ विचार येतच नाही मनात Biggrin

आजकाल साधे सरळ विचार येतच नाही मनात ... एकदम बरोबर. काही दिवसांनी सरळ साधी कथाच सस्पेन्स स्टोरी वाटायला लागेल...

छान लिहिलंय.
भावना खूप तरल आहेत हे जाणवते.

अनु धन्यवाद☺️

बरेच जणांना कदाचित शेवटी एखादे ट्विस्ट अपेक्षित होते, पण मला असे काही सुचलेच नाही, कारण मला कथा लेखन येत नाही, रादर तेवढी कुवतच नाही. पण तरी कधी कधी लिहिण्याचा मोह आवरत नाही, मग काही आठवणी, काही जे आजूबाजूला घडते, अन ते जपावेसे वाटते असे काही उतरविते.
बाकी मला वाटते की खरेतर आयुष्य बरेचदा साधे सोपेच असते, पण आपण त्याला कॉम्प्लिकेट करतो अन आपलाच आंनद हरवून बसतो