श्रावणशीळ

Submitted by Asu on 28 August, 2018 - 23:55

श्रावणशीळ

शीळ घालितो सुसाट वारा, वेळूच्या बनाबनातून
जणू घुमतो कृष्ण पावा, गोपींच्या मनामनातून

लता वेली गुंग नाचण्या, शीळेच्या मंद तालावर
बासरीचे स्वरतरंग उठती, यमुनेच्या शांत जलावर

नर्तन करती श्रावण सरी, पिसाट वाऱ्याच्या सुरावरी
रानोरानी शीळ घालती, धुंद नर्तकीच्या घुंगरा परी

शीळ ऐकून जणु प्रकटले, इंद्रधनु ते निळ्या अंबरी
मोरपीस जसे खोवले, घननिळ्या कन्हैयाच्या शिरी

शीळेचे असे हे गारुड भारी, अनुभवावे एकदा तरी
आनंदे नित शीळ घालावी,उदास हृदयी प्रीत पेरावी

नसेल शीळ ज्याच्या ओठी, भासेल जगण्या उणीव मोठी
शीळ जादूभरी असते ऐसीे, क्षणात फिरवुन आणी कैसी!

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
(29.08.2018)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults