ब्लाॅगर मी होणार

Submitted by सदा_भाऊ on 28 August, 2018 - 09:39

[या लेखा मधे कोणाच्याही भावना दुखवण्याचा उद्देश नसून केवळ विनोद निर्मीती हा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यातून जर कोणाच्या भावना दुखल्याच तर दुखू देत निवांत!]

चायनीज लोकांमधे एक प्रथा अथवा विश्वास आहे की वयाच्या चाळीशी नंतर जरी पत्नी असली तरी एक प्रेयसी जरूर असावी. मन मोकळं करायला बरीच मदत होते म्हणे! नेमका मी पडलो मराठी! एकतर मोकळं करण्यासारखं काही शिल्लकच नाही आणि त्यात असल्या प्रथा मराठी संस्कृतीत परवडणाऱ्या नाहीत. तरीपण चाळीशी नंतर आपण काहीतरी नवीन आणि सनसनाटी करावं असं प्रत्येकाला वाटू लागतं. मलाही तसंच काहीतरी वाटू लागलं. म्हणजे नक्की काय करावं हे वाढत्या वजनाकडं पाहून काही समजत नव्हतं. उगाच सलमान आणि आमिर खानां प्रमाणे सिक्स पॅक देह करणे शक्य नव्हतं. कारण हा देह मेगा सिंगल पॅक पुर्वीपासूनच झालेला आहे. नवीन वाद्य शिकावे तर घरादाराला त्रास आणि शिवाय संगीत क्षेत्रातील अज्ञान अगाध! अध्यात्माला लागावं तर उगाचच लौकर वार्धक्य अवस्था आल्या प्रमाणे वाटू लागेल. तर मग मी करावे तरी काय? मुलांच्या अभ्यासात पार बुडून गेलेल्या सौ ला मी एक दिवस मुड चांगला पाहून प्रश्न विचारला, “मला काहीतरी वेगळं सनसनाटी करायचंय. हे रोजचं रूटीन ना फार वैताग आणणारं आहे.” क्षणभर हातातलं काम थांबवून तिनं माझ्याकडं कटाक्ष टाकला. “तुझी तब्येत ठिक आहे ना?” असा काळजीयुक्त उपहासाचा प्रश्न आला. “तसं नव्हे, परवाच कोणीतरी व्हाटसॲप वर लिहलं होतं. स्वत:चे आयुष्य स्वत:च्या मर्जी प्रमाणे जगायला शिका. गेलेला क्षण परत येत नाही. काहीतरी असं करा की तुम्हाला केल्याचं समाधान मिळेल. राहून गेलं अशी भावना नष्ट होईल.” मी पण जरा हट्टालाच पेटलो होतो. ‘काय वैताग आहे’ या त्रासिक भावनेने तिने मला स्पष्ट सांगितले “मला बरीच कामे पडली आहेत. मुलीची दहावी ची परीक्षा तोंडावर आलीय. मला असल्या युक्त्या शोधण्यात रस नाही आणि वेळ तर मुळीच नाही.”

मी अखेरीस हतबल होऊन ‘अकेला हूं यारो..’ या गाण्याच्या चालीमधे विचार करू लागलो. काही केल्या उत्तर सापडेना. कोणीतरी सांगितलं की पुस्तकं वाचायला सुरू कर. पण त्यात सनसनाटी काय ते काही सापडत नव्हते शिवाय वाचताना डुलका लागायचा. एकानं सल्ला दिला की गाण्याचा क्लास लाव. आता या भसाड्या आवाजाला कोण सूर लावायला तयार होणार? लांबलचक बोगद्याच्या टोकाला प्रकाशाची तिरीप दिसावी आणि बाहेर पडण्याचा मार्ग दिसावा त्या प्रमाणे मला आयुष्य रूपी अंधारमयी व कंटाळवाण्या बोगद्या मधे अखेरीस एक आशेचा किरण दिसला. माझा एक खुप जूना मित्र अचानक भेटला आणि त्याने मला एक भन्नाट कल्पना दिली. तो म्हणला मी ब्लाॅगर आहे. मी अज्ञान उघडे करीत त्याला विचारलेच, म्हणजे तू नक्की काय करतोस? त्यानं समजावलं.. “अरे आता नोकरी करून खुप मिळवलं, मिळवतोच आहे. पण आयुष्याला तोच तोच पणा आलाय. आज वरच्या आयुष्यात जो काही अनुभव, व्यक्ती, त्यांचे स्वभाव यांचा जो मी संचय केला आहे तो मी लिखाणाद्वारे मांडत आहे. माझे आता बरेच फाॅलोअर झाले आहेत. बरेच लोक मला मान सन्मानाने प्रश्न विचारतात. माझ्या अनुभवाचा त्याना काहीतरी उपयोग होतो यातच समाधान. पण मित्रा माझे ब्लाॅग मात्र जोरदार हिट झाले आहेत हं!” मला थोडं थोडं तो जे काय म्हणतो ते लक्षात येऊ लागलं होतं. ज्या गोष्टीच्या शोधासाठी आपण इतके दिवस तळमळत होतो, ती कल्पना स्वत:हून माझ्याकडे चालत आली होती. मी पण ठरवलं की आता आपण लिखाण करायचे.

मी थोडा अंदाज घेण्यासाठी आणि फुशारकी मारण्यासाठी घरामधे सौ समोर माझा प्रस्ताव मांडला. “अजून आहेच का ते खुळ! त्यापेक्षा मुलीच्या दहावीच्या अभ्यासात जरा लक्ष घाल” असे उत्साहदायी विचार ऐकले. मी त्याचे फारसे वाईट वाटून न घेता माझा मुद्दा पुढे दामटलाच. “अभ्यासाचं काय? तू घेतेच आहेस, जिथं अडेल तिथं मी आहेच ना. पण मी आता काहीतरी लिखाण करावं, स्वत:चा ब्लाॅग सुरू करावा. असा विचार करतोय.” माझे विचार ऐकून सौ थोडी विचाराधीन झाली. तिला माझी कल्पना पटली असे मला वाटले.. पण ईश्वराच्या मनात काहीतरी तिसरेच होते. “तुमच्या कन्येला उद्या सकाळी एक निबंध लिहून शाळेत द्यायचा आहे. जरा तिला मदत करा. बघू तुमची लिखाणाची शैली कशी काय आहे.” मला आदरार्थी संबोधन झाले की ती चिडलीय हा माझा अनुभव! पण आता हे तिचे प्रोत्साहन समजून घ्यावे का माझी फिरकी समजावी या बुचकळ्यात मी पडलो. तरीपण हार न मानता माझ्या समोर फेकलेल्या आव्हानाला स्विकारले. मी ताबडतोब मुलीला कागद पेन घेऊन यायला सांगितले. विषयाची सुरवात कशी असावी? मुळ मुद्दा कसा खुलवावा आणि शेवट आपल्याला नक्की काय सांगायचे आहे त्यावर कसे घेऊन यावे? यावर विषय न विचारताच भाषण ठोकू लागलो. शांतपणे सर्व ऐकून झाल्यावर तिनं मला निबंधाचा विषय सांगितला. ‘Role of Singapore government in Education System’ आता मात्र माझी विकेट क्रिजला बॅट लावण्या पूर्वीच जाण्याची वेळ आली होती. हा काय निबंधाचा विषय झाला? ‘टिळकांचा बाणेदारपणा’, ‘महात्मा गांधी’, ‘वीर सावरकर’ असे निबंध लिहण्यात आमचे बालपण गेले. अगदीच वेगळेपण म्हणाल तर ‘आमची शाळेची सहल’, ‘माझी दिवाळीची सुट्टी’ किंवा अगदी जहाल विषयाची कमाल मर्यादा म्हणजे ‘टिव्ही शाप की वरदान’, ‘विज्ञानाचे दुष्परीणाम’, ‘भविष्यातील भारत’. या अशा विषयांवर छान पैकी डोकं लावून निबंध लिहण्यात आम्ही पेनातील शाई संपवली होती. आता हा काय विषय आहे? पण युध्दात उभे राहण्या आधीच शस्त्र टाकून पळ काढण्याच्या आरोपा पासून वाचण्यासाठी मला असल्या विषयावर सुध्दा निबंध लिहणे भाग होते. अशा कठीण प्रसंगी द्रौपदीला राजसभेत खेचून आणल्यावर श्रीकृष्णाची जशी मदत झाली तशी किंवा त्याहून अधिक मदत माझ्यातील द्रौपदीला गुगल रूपी कृष्णाची झाली. मी ताबडतोब गुगल फिरवले आणि दोन चार संदर्भातील साईट उघडलल्या. त्यांचा कसाबसा ताळमेळ घालून दोन पानाचा मसुदा निबंधाच्या नावाखाली ढकलला. कन्येने नाखुशीनेच तो स्विकारला. दोन दिवसानी मला लाल भडक शेऱ्यानी भरलेला निबंधाचा कागद दाखवण्यात आला. ‘गुगलचा वापर समजून व योग्य करावा.’ असा शेवटचा शेरा तर माझ्यावर वाघासारखा गुरगूरत असल्याचा भास होत होता. या उपर शिक्षीकेने कन्येला जवळ बोलवून असेपण सांगितले म्हणे “अशा अवघड विषयाचे निबंध लिहीताना वडिलांची मदत घेत जा.” आणि त्या दिवसा पासून निबंधाचा ससेमिरा माझ्या मागचा कायमचा मिटला. ताईची अशी अवस्था पाहून चौथीतला छोकरा गुणाकार भागाकार ची गणिते सुध्दा मला विचारायला नकार देऊ लागला.

तीळमात्र सुध्दा माझा निग्रह ढळू न देता मी लिखाणाला सुरवात केली. मी लॅपटाॅपलाच मराठी लेखनाची सोय करून घेतली आणि माझे लेख लिखाण सुरू झाले. काही विषय मनात घोळत होते ते एक एक करीत त्यावर रसभरीत लिखाण करू लागलो. ते लेख मी माझ्या फेसबुक वर टाकू लागलो. एक दोन मराठी मंडळांचा सभासद होऊन तिथे पण ते लेख टाकू लागलो. लेख आला आणि गेला, फेसबुकच्या अखंड दुथडी भरून वाहणाऱ्या ‘फिडस’ मधे माझे लेख वाहून जाऊ लागले. नाही म्हणायला कोणीतरी ठराविक मित्र मंडळी लाईक वगैरे करू लागली; पण काही मित्रांचे प्रेम तर इतके अचाट होते की ०.२५ मिलीसेकंदा मध्ये त्यांचे ‘लाईक’ येऊ लागले. लेख वाचायला किमान पाच मिनीटे तरी लागावीत अशी माझी अपेक्षा असे, पण अखेरीस मैत्रीच श्रेष्ठ! माझ्या ऑफिसमधे मी माझ्या लेखांचा प्रचार चालू केला होताच. त्यामुळे माझे ज्युनियर इंजिनीयर नाईलाजास्तव ‘लाईक’ करू लागले; अगदी अमराठी सुध्दा! एक तर लाईक चा आकडा फारच क्षुद्र होता आणि जो होता तो खरा नव्हता. या उपर अजून सनसनाटी असं काहीच घडत नव्हतं. मला काही खोचक काॅमेंटस पण मिळाल्या ‘लिखते रहो!’ त्या पुढील ‘जमेल एक दिवस’ ही गाळलेली काॅमेंट मी समजून घेतली. फेसबुकवर इतर काही सक्रिय मराठी मंडळी भसाभसा त्यांचे लेख छापत होते आणि त्याना शेकडो नी काॅमेंटस शिवाय लाईक्स मिळत होते. त्यां लेखांच्या दर्जा बद्दल मी काही टुकार किंवा भुक्कड म्हणणार नाही हं. उगाच मी कशाला नावे ठेवू? पण त्याना मिळणाऱ्या लाईक्स मुळे माझ्या लेखाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहीले होते.

एक दिवस मी असाच अंत:र्मुख होऊन बसलेला असताना माझा सहकारी इंजिनीयर माझ्या डेस्कवर आला. “सर, तुम्ही खुप छान ब्लाॅग लिहीता.” माझे डोळे अचानक आलेल्या स्तुती शब्दांमुळे विस्फारले गेले. जणू माझ्या मनात काय विषय चाललाय तोच त्यानं ओळखला. मी डोळ्यात जमा होऊ लागलेले अश्रू गिळले (कसे विचारू नका) आणि फक्त इतकंच बोलू शकलो. “हो रे! पण... “ तसा तो बोलू लागला. “तुम्ही फेसबुकला अख्खा लेख टाकू नका, फक्त लिंक द्या. तुमचा लेख एखाद्या ब्लाॅग साईट वर ठेवा. तुम्हाला कळू लागेल की किती वाचक आहेत आणि कोणत्या देशातून आहेत.” मला जरा सगळं नवीनच होतं, पण त्याच्या बोलण्यात मला दम वाटला. मी ताबडतोब माझ्या तज्ञ मित्राच्या मदतीने माझी एक ब्लाॅग साईट सुरू करून घेतली. माझे जे काही दोन चार लेख खरडून झाले होते, ते तिथं ढकलले आणि फेसबुक वर त्याची प्रस्तावना लिहून लिंक देणे सुरू केले. आणि अहो आश्चर्यंम! माझ्या लेखाचे वाचक आकडे धडाधड वाढू लागले. पुर्वी वीस पंचवीस लाईक्स वर लढाई जिंकली मानणारा मी आता हजारात वाचक गण गोळा करू लागलो. गुगल वाल्यानी तारखे नुसार, देशा नुसार सर्व हिशोब सादर केला. मला अचानक कुठंतरी पुलं च्या पंक्तीमधे दूर टोकाला जागा मिळाल्याचा आनंद व्हायला लागला. काही अनोळखी दूरच्या वाचकानी मला ‘उत्तम!’ असा अभिप्राय पण कळवला.

पण का कोणास ठाऊक! अजूनही मला सनसनाटी वाटत नव्हतं. माझा फॅन फाॅलोअर अजूनही जरा मिळमिळीतच वाटत होता. त्यात बहुतांशी मावशी, आत्याच्या वयाच्याच होत्या. पुन्हा एकदा मन उदास होऊ लागले. या वेळी मात्र सौ ने माझा गंभीरपणा गांभिर्याने घेतला. तिला माझं असं गंभीर बसणं बरं वाटलं नसावं. एक दिवस तिनं शांतपणे हा विषय छेडलाच. “मला वाटतंय की तुझं जरा मार्केटींग कमी पडतंय! तुला थोडं सोशल सर्कल निर्माण करावं लागेल. तुझ्या कोशातून बाहेर पडून बाहेरच्या जगात डोकावायला आणि मत द्यायला सुरू करायला हवं. मत काहीही असो, अशानं बदनामी कधीच होत नसते. तर फक्त प्रसिध्दीच मिळते.” मला तिचा मुद्दा समजत होता पण ‘नक्की ते कसं?’ हे काही समजत नव्हतं. अखेरीस मी तिच्या हो ला हो म्हणत “कृपया मार्गदर्शन करा.” असे बोलून हात जोडले. तिला अशा ब्लाॅग आणि सोशल मिडीया चा गाढा अनुभव! गेली पंधरा अधिक वर्षे ती या क्षेत्रामधे खेळून बऱ्यापैकी पारंगत झाली होती. अनेक मंडळांची ती सभासद होती. ऑर्कूट, गुगल प्लस सारख्या जाळ्याना उभारताना आणि पडताना पण तिने पाहीलेले होते. तिचा व्यासंग फार मोठा होता. तिच्या अनुभवाचा पुर्ण मान ठेवून मी शिष्यत्व पत्करले.

“सर्व प्रथम तू प्रसिध्द अशा स्वतंत्र मराठी मंडळांमधे नाव नोंदवून टाक. दहिहंडी.काॅम, भेळपुरी.काॅम, खरवस.काॅम आदी मंडळांमधे थोडा रूळायला लागलास आणि तुझा आत्मविश्वास दुणावला की सर्वात प्रसिध्द अशा सायओली.काॅम मंडळात नाव नोंदवून शिरकाव कर. अशा मंडळांमधे आपले खरे नाव न वापरता लेखणी नावाने बिनधास्त वावर करायचा. नाव निवडताना सुध्दा त्यावरून स्वभावाचे दर्शन झाले पाहीजे. भन्नाट वारा, क्षप्र, टग्या आदी काही प्रसिध्द व्यक्ती या मंडळात स्वच्छंद पणाने वावरत असतात. तू पण असेच काहीतरी नाव वापरून प्रवेश कर. प्रत्येक मंडळाची संस्कृती, रूढी भिन्न असते. ती नीट समजावून शिकून घे. कोणा समोरही अज्ञान उघडे करून तोंडावर आपटू नकोस. सायओली सारख्या मंडळात बरीच हुशार मंडळी हिंडत असतात. त्याना बरेच विचित्र शब्दप्रयोग करण्याची आचरट सवय आहे. ते नीट समजून घे. तुला ते चटकन कळले पाहीजेत आणि चपखल पणे वापरता आले पाहीजेत. कायरे म्हणजे व्हाटसॲप, लिहून आभार म्हणजे नोटेड वुईथ थॅंक्स, गटग म्हणजे गेट टुगेदर, भशु म्हणजे भरपूर शुभेच्छा. या मंडळांवर काही लोकांचा खास दबदबा असतो. तुला त्यांच्या कंपूत सामिल व्हावे लागेल. जे इतके सहज सोपे नाही.” मी सुन्न व्हावं का थक्क व्हावं या विचारात पडलो. अखेरीस मार्गदर्शनाचे सर्व मंत्र तंतोतंत पाळण्याचे वचन देऊन कामाला लागलो.

आता मी अशा मंडळातून दिवसभर हिंडत फिरत असतो. उगाच काहीतरी बोलून लक्ष वेधून घेत असतो. आणि सनसनाटी नसेना का पण फॅन फाॅलोअर गोळा करीत असतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तुम्ही ( हो तुम्हीच हो, तू नाही) वय लिहिलं नसतं, मुलगी दहावीला लिहिलं नसतं तरी लेखनातून वय उघडं पडलंच.
अनुभवी पत्नीने सायओली.कॅाम वर नंतर प्रवेश कर हे सांगण्यात काहीतरी कावा आहे हे लक्शात आले असेलच. एक मोठा प्रतिस्पर्धी घरातच होणार आणि सॅाउअर क्रीम.
दिवाळी अंकासाठी योग्य लेख.
-----
पाचकळपणा जाऊ दे, माझ्या मते लेखनाचा विषय महत्त्वाचा. चाळीस वयाला गुंतवणिकीची गुंतागुंत वाढत जाते. यावर विनोदी लिहा. आपल्याला चटके बसलेले किस्से इतरांसाठी उल्लेखनीयच असतात.

मस्तच लिखाण......ताईची अशी अवस्था पाहून चौथीतला छोकरा गुणाकार भागाकार ची गणिते सुध्दा मला विचारायला नकार देऊ लागला......:D Lol Proud Proud

ॲमी... ती काल्पनीक संकेतस्थळे आहेत. तत्सम काही उपलब्ध आहेत. माहीती गोळा करून ज्ञान वाढवावे.

Srd - हा हा! अहो, तू नव्हे तुम्ही... वय लपवण्यासाठी असला आयडी वापरलात पण तरी आम्हाला वय कळलेच. पन्नाशी नक्की गाठली असणार. हा हा हा!
गंमत हं! तुम्ही अजूनही सोळा वर्षाचेच वाटता.
देवाशप्पथ! मला माझं वय लपवण्याचं काहीच कारण नाही. तशी मला गरज पण वाटत नाही.
गुंतवणूकीवर मी कोण लिहणार? अहो इथं बडे बडे दिग्गज भरलेत गुंतवणूकीवर बोलणारे! आपण त्यांच्याकडेच आशेने पाहू.
चैत्रगंधा - धन्यवाद _/\_

Pages