आमची गच्ची

Submitted by nimita on 25 August, 2018 - 09:36

असं म्हणतात की जेव्हा एखादी मुलगी लग्न होऊन तिच्या सासरी जाते तेव्हा बरंच काही माहेरी सोडून जाते...तिच्या स्वभावातला बालिशपणा, तिच्या बर्याचश्या सवयी वगैरे वगैरे!

माझ्या लग्नानंतर देखील माझं काही बाही माझ्या माहेरी राहून गेलं.. (माझा बालिशपणा मात्र मी बरोबर घेऊन आले....असं मी नाही तर माझ्या आजूबाजूचे लोक म्हणतात!)

पण त्याबद्दल मला कधीच खंत नाही वाटली, कारण मागे राहिलेल्या पेक्षा मला जे काही नवीन गवसलं ते ही माझ्यासाठी तितकच महत्वाचं होतं.

फक्त एक गोष्ट अशी आहे जिला माहेरी सोडून आल्यानंतर मला तिची किंमत कळली. खरं तर ती कुठलीही वस्तू नाहीये...तो एक अनुभव आहे.....आणि त्या अनुभवाचं नाव आहे -' आमची गच्ची' !!!

गच्चीसारख्या एका निर्जीव जागेला मी 'अनुभव' म्हणातीये हे वाचून बऱ्याच जणांना ती अतिशयोक्ती वाटेल. पण माझ्या माहेरची गच्ची ही माझ्यासाठी नुसती जागा नव्हती; तर ती माझ्या अस्तित्वाचा, माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक होती. माझं बालपण, शाळा कॉलेज मधले ते सप्तरंगी दिवस- थोडक्यात काय तर लग्ना आधीच्या माझ्या सगळ्या आठवणींत आमची गच्ची सापडते मला!

लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हा आमची मामे, मावस, आत्ते, चुलत एवढेच नाही तर चुलतमामे चुलतमावस अशी तमाम भावंडं आमच्या घरी राहायला यायची तेव्हा रात्रीच्या जेवणानंतर आमचा मुक्काम गच्चीतच असायचा. तिथे ओळीनी गाद्या घालून आम्ही सगळे झोपायचो. पण त्याआधी गप्पांच्या मैफिली रंगायच्या. एकमेकांची चेष्टा मस्करी, खोड्या ..खूप धमाल यायची. मधेच कोणीतरी नुकत्याच पाहिलेल्या सस्पेन्स सिनेमाची स्टोरी सांगायचा.मग कोणी मुद्दाम भुताखेताच्या गोष्टी सुरू करायचा. मनातून प्रत्येक जण जरी कितीही हादरला असला तरी अगदी शूरवीर असल्याचा आव आणण्यात सगळे पटाईत! पण मग रात्री मधेच कधीतरी माझी झोप उघडायची आणि जेव्हा आजूबाजूच्या उंच झाडांच्या चित्रविचित्र सावल्या दिसायच्या तेव्हा मात्र मी ठरवायची..'उद्या पासून खाली घरातच झोपणार मी!' पण हा माझा ठराव मी कधीच अंमलात नाही आणला.

दिदी (आमची मोठी बहीण) रोज रात्री झोपताना तिच्या उशीजवळ एक काठी ठेवून झोपायची..नक्की आठवत नाहीये, पण बहुतेक क्रिकेटचा स्टंप होता तो! तिला विचारलं तर म्हणायची," रात्री जर चोर आला तर?" मला नेहेमी वाटायचं," चोर आला तर तो दिदीला कशाला उठवेल? चुपचाप, आवाज न करता खाली घरात जाईल ना! मग हिच्या काठीचा काय उपयोग?" पण ही शंका बोलून दाखवायची हिम्मत नाही केली कधी..

आमच्यातले काहीजण अगदी ऊन तोंडावर येईपर्यंत झोपायचे..डोक्यावरून पांघरूण घेऊन! त्यांचं पांघरूण ओढून त्यांना उठवण्यात जो असुरी आनंद मिळायचा ना त्याची तुलना करता येणं केवळ अशक्य आहे!

उन्हाळा आणि गच्ची यांच्या बरोबर अजून एक आठवण जोडलेली आहे..आमची आई उन्हाळ्यात दर वर्षी वाळवणं घालायची. साबुदाण्याच्या पापड्या, बटाट्याचा कीस, कुरडया, सांडगे...पूर्ण वर्षभराची बेगमी जरून ठेवायची ती. सकाळी ऊन चढायच्या आत आई वाळवण घालायची, मग मधे साडेबारा एक च्या सुमाराला एकदा गच्चीत जाऊन त्या पापड्या, कुरडया, कीस सगळं नीट चेक करायचं आणि एक एक करून सगळं उलटं करून ठेवायचं...म्हणजे दोन्ही बाजूनी नीट वाळायला मदत होते. इतक्या टळटळीत उन्हात गच्चीत जायला फारसे कोणी तयार नसायचे, पण मी मात्र अगदी आवडीनी जायचे ...कारण त्यात माझा स्वार्थ दडलेला असायचा....अर्धवट वाळलेल्या पापड्या आणि बटाट्याचा कीस हे माझे खास आवडते पदार्थ होते.... त्या 'उलट सुलट' च्या खेळात थोड्या पापड्या आणि कीस यांच्यावर ताव मारायला मिळायचा.

या शिवाय आई वर्षभराचं धान्यही भरून ठेवायची..गहू, तांदूळ, वेगवेगळ्या डाळी.….ही सगळी धान्याची पोती आली की रोज त्यातलं थोडं थोडं धान्य गच्चीत उन्हात टाकायचं आणि संध्याकाळी खाली घेऊन यायचं. हा कार्यक्रम बरेच दिवस चालायचा.. आणि त्यात आम्ही बच्चे कंपनी तिला मदत करायचो. बाबांची फिरतीची नोकरी असल्यामुळे त्यांना आमच्या बरोबर खूप कमी वेळ मिळायचा. पण जेव्हा ते घरी असायचे तेव्हा कितीतरी वेळा रविवारी किंवा एखाद्या सुट्टीच्या निवांत दिवशी मी आणि बाबा गच्चीत बसून बुद्धिबळ खेळायचो....बुद्धिबळ हा खेळ मला माझ्या बाबांनी शिकवला, ते या खेळात खूप पटाईत होते.. त्यांना हरवणं सोपं नसायचं. खास करून'जोरातलं बुद्धिबळ' खेळताना तर त्यांचे डावपेच समजणं महाकठीण असायचं. त्यांच्या प्रत्येक सोंगटीला दुसऱ्या सोंगटीचा सपोर्ट असायचा, म्हणजे अगदी राजापासून ते प्याद्यापर्यंत सगळ्यांना!आणि 'जोरातल्या' बुद्धिबळाच्या नियमांनुसार - जर एखाद्या सोंगटीला दुसऱ्या एखाद्या सोंगटीचा जोर किंवा सपोर्ट असेल तर तुम्ही तिला मारुच शकत नाही.. त्यामुळे मोस्टली बाबाच जिंकायचे.

कधी आम्ही सगळी मुलं मिळून गच्चीवर पत्ते खेळायचो..रमी, गड्ड्या झब्बू, साधा झब्बू, गुलामचोर, not at home (याला मी लहान असताना 'नाटे काटे ठोम' म्हणायची), ५-३-२,७-८, बदाम सात, भिकार सावकार...अगणित खेळ खेळायचो आम्ही. पत्ते 'कुटणे' हा शब्द कदाचित आमच्यामुळेच सुचला असेल कोणालातरी.

गुढी पाडव्याच्या दिवशी कॉलनीत सगळ्यात पहिली गुढी आमच्या गच्चीत उभारली जावी यासाठी आम्हां मुलांची खूप धडपड चालायची. त्यासाठी सकाळी लवकर उठून (सुट्टी असून सुद्धा) आम्ही आईला सर्वतोपरी मदत करायचो. आणि गच्चीत जेव्हा आमची गुढी उंच उभारली जायची तेव्हा खूप आनंद व्हायचा. पण या सगळ्या सोहळ्यात एक गोष्ट अगदी मनाविरुद्ध व्हायची...आणि ती म्हणजे- कडुनिंबाचा पाला खाणं... आमचे मोठे काका आम्हांला सगळ्यांना कडुनिंबाची पानं खायला लावायचे...आणि त्यांना 'नाही' म्हणायची कोणाचीच हिम्मत नव्हती. मग त्यांनी दिलेली पानं लगेच न खाता, उगीचच हातात धरून 'नंतर खाते' म्हणत टाळाटाळ केली जायची. त्यांचं लक्ष नाही असं बघून मी हळूच गच्चीतल्या भल्यामोठ्या पाण्याच्या टाकीमागे लपून ती हातातली पानं तिथल्या पाईप खाली घुसवून बाहेर यायची आणि त्यांना संशय येऊ नये म्हणून ' किती कडू आहे' असं म्हणत तोंड वाकडं करत खाली पळ काढायची.

आमच्या घरी नवचंडी, शतचंडी सारखे मोठमोठे यज्ञ व्हायचे ते देखील याच गच्चीत! त्यासाठी खूप आधीपासून तयारी सुरू व्हायची. आम्ही सगळी भावंडं मिळून (आम्ही आणि आमच्या काकांची मुलं) सगळी गच्ची झाडून , धुवून काढायचो, गोमूत्राचे सडे घालायचो. गच्चीला चारही बाजुंनी कनात बांधली जायची..जिन्यावर रांगोळ्या रचल्या जायच्या...एखाद्या कार्यालयासारखी सजायची आमची गच्ची! मग मुख्य यज्ञाच्या दिवशी सगळीकडे पूजा सांगणाऱ्या गुरुजींचा खणखणीत आवाजातला मंत्रोच्चार घुमत राहायचा. संध्याकाळ नंतर हळूहळू घागरी फुंकायला बायका यायला लागायच्या. काहीजणी तर पहाटेपर्यंत थांबायच्या. त्यांच्या घागरीतून येणार तो 'घुम्म घुम्म' असा आवाज आज इतक्या वर्षांनंतरही घुमतो कानात! त्या बायकांबरोबर आम्हीही थोड्या वेळासाठी का होईना पण घागर फुंकायचो. सगळं वातावरण एका वेगळ्याच शक्तीनी प्रेरित व्हायचं. आमची गच्ची पावन होऊन जायची.

फक्त यज्ञ च नाही तर अजून ही बरीच कार्य झाली आहेत आमच्या गच्चीत! मुंज, साखरपुडा, लग्न, बारसं, मोठ्या काकांची साठीशांती ,..... सगळं काही साजरं केलंय या गच्चीनी आमच्या बरोबर.

आमच्या मित्र मैत्रिणींच्या पार्टीज्, family get togethers सगळं काही गच्चीतल्या मोकळ्या हवेत व्हायचं.

आमच्या बागेत शिरीष, गुलमोहोर, अशोक अशी मोठमोठी झाडं होती. त्यातल्या शिरीष आणि गुलमोहोर च्या फांद्या गच्चीच्या कठड्यावरून आत झुकलेल्या होत्या. गुलाबी रंगाची शिरिषाची फुलं आणि लाल-केशरी रंगाचा गुलमोहोर यांनी नटलेली गच्ची खरंच खूप बहारदार दिसायची.

त्या बहरलेल्या झाडांसमोर आम्हांला उभे करून आमच्या बाबांनी आमचे कितीतरी फोटो काढले होते.

लहान वयातला आमचा वेडेपणा पण बघितलाय आमच्या गच्चीनीं.. मी आणि संजीव (माझा चुलत भाऊ) गच्चीवर जाऊन बरेच प्लॅन्स बनवायचो. त्यातला एक खूपच adventurous आणि secret प्लॅन म्हणजे चुलीवर भात शिजवायचा. आम्हांला वाटत होतं की जेव्हा हा भात आपण सगळ्यांना खायला देऊ तेव्हा सगळे आपलं किती कौतुक करतील.पण हे एक secret mission असल्यामुळे आम्ही ते गच्चीवर करायचं ठरवलं.

मग काय, तीन दगडांची चूल मांडली. आईकडून एक पातेलं, तांदूळ, पाणी वगैरे सगळं आणलं. आंब्याच्या पेटीमधून आलेलं ते पिवळं गवत चुलीत ठेऊन त्याच्यावर भाताचं पातेलं ठेवलं. फुल्ल जोश मधे ते गवत पेटवलं ....आणि बघता बघता ते सगळं गवत जळून गेलं....आणि हे सगळं इतक्या लवकर झालं ..अहो, भात तर सोडाच, पण पातेलं धड गरम सुद्धा नाही झालं.

अशा रितीनी आमचं mission फुस्स झालं. पण एका गोष्टीचं समाधान होतं... ते secret mission असल्यामुळे इतर भावंडांना त्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे आमच्या 'इज्जत चा फालुदा' नाही झाला.

आमचा दोघांचा अजून एक प्लॅन होता...पण हा प्लॅन बौद्धिक पातळीवरचा होता....आम्ही दोघांनी मिळून एक मासिक काढायचं ठरवलं होतं...आणि तेही इतर मासिकां सारखं नाही..एकदम 'हटके'! त्यात नुसत्या गोष्टी नाही , तर शब्दकोडी, चित्रं, जोक्स वगैरे सगळं असणार होतं! पहिल्या मीटिंग मधे हे सगळं ठरलं ....आणि ही मीटिंग गच्चीत च झाली..हे सांगणे न लगे.... पण गंमत म्हणजे ती मीटिंग पहिली आणि शेवटची होती! त्यांनंतर अजून पर्यंत आमचा मासिकाचा प्लॅन अपूर्णच आहे.

माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्नं झाल्यावर उन्हाळ्यात गच्चीत झोपणाऱ्यांची संख्या केवळ चार राहिली...मी आणि माझी तीन चुलत भावंडं..पराग (माझा सख्खा भाऊ) कधी या भानगडीत नाही पडला

पण आम्ही चौघं मात्र रोज रात्री खूप धमाल करायचो. दिवसभराचा गप्पांचा कोटा रात्री गच्चीत पूर्ण व्हायचा.आणि का कोणास ठाऊक, पण मला उगीचच वाटायचं, की 'मी मोठी आहे त्यामुळे या तिघांना नीट guide करणं माझं कर्तव्य आहे'....खास करून पुष्यमित्र ला..तो सगळ्यात लहान होता, पण तेवढाच गरम डोक्याचा.. एकदा आमच्या घरासमोरच्या वस्तीत कोणीतरी त्यांच्या घरावर हिरवा झेंडा लावला.. खरं म्हणजे त्याला झेंडा म्हणणंही अयोग्य ठरेल..एक हिरव्या रंगाचा कापडाचा तुकडा होता तो! पण पुष्यमित्र नी ते बघितलं आणि त्याला खूप राग आला..' आता थांब, तू बघच गं प्रियाताई, मी त्याच्यापेक्षा उंच भगवा झेंडा लावतो आता!!' असं म्हणत स्वारी गच्चीतल्या आमच्या टाकीवर चढायला तयार ! त्याला कसंबसं समजावून टाकीवरून खाली उतरवलं.. मग काय त्या रात्री झोपताना 'आपण रागावर कसा कंट्रोल ठेवला पाहिजे, उगीच लोकांना खुन्नस देणं कसं चुकीचं आहे, आपल्या अश्या वागण्यानी आपल्या आईवडिलांना त्रास होईल'..वगैरे वगैरे सगळं त्याला ऐकायला लागलं.....सांगणारी अर्थातच मी!

माझ्या लग्नानंतर जेव्हा मी आणि नितीन पहिल्यांदा हैदराबाद हुन पुण्याला गेलो होतो तेव्हा माझा हाच छोटासा भाऊ गच्चीच्या छज्यावर जाऊन बसला होता....आणि जेव्हा आम्ही घराच्या दारापाशी आलो तेव्हा वरून आमच्यावर पुष्पवृष्टी करून आमचं दोघांचं स्वागत केलं होतं त्यानी! त्यावेळी त्याच्या चेहेऱ्यावरचा तो आनंद आणि त्यानी आम्हांला दिलेलं हे surprise माझ्या कायम लक्षात राहील.

या आणि अशा कितीतरी आठवणी जोडल्या गेल्या आहेत आमच्या गच्चीबरोबर!

जसं जसं माझं वय वाढत गेलं, तसं तसं नकळत माझं आणि गच्चीचं नातं देखील बदलत गेलं. लहानपणी मी फक्त खेळ आणि दंगामस्ती साठी गच्चीत जायची, पण कॉलेज मधे गेल्यावर माझ्या काही खास मैत्रिणीं बरोबर तासन् तास मी गच्चीत बसून हितगुज केलंय.. आम्ही एकमेकींना सांगितलेली secrets, आमची gossip sessions सगळं काही गच्चीतच व्हायचं.

कॉलेज मधे असताना मैत्रिणींबरोबर याच गच्चीत फिरत फिरत परीक्षेचा अभ्यास आणि त्याची उजळणी केलीये मी!

माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट मी माझ्या आईबरोबर शेअर करायची. पण आई अचानक आम्हांला सोडून कायमची निघून गेल्यानंतर मात्र माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. आता माझं मन मोकळं करायला मी कुठे जाणार? कोण माझ्या मनातली वादळं शांत करणार? एक दिवस अशीच द्विधा मनस्थितीत असताना माझी पावलं गच्चीच्या दिशेनी वळली.

संध्याकाळची वेळ होती. मी गच्चीतल्या माझ्या नेहेमीच्या जागी जाऊन बसले. मनात विचारांची गर्दी झाली होती.खूप उदास आणि एकटं वाटत होतं. मी किती वेळ तशी बसले होते, काय माहीत! पण थोड्या वेळानी आपोआप मोकळं, हलकं वाटायला लागलं. सगळी उदासी, सगळी मरगळ कुठेतरी गायब झाली होती.

त्या क्षणापासून 'गच्ची' मला मैत्रिणी सारखी वाटायला लागली. त्यानंतर जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग आले, मन उदास झालं तेव्हा या गच्चीनीच मला धीर दिला.आणि कितीतरी आनंदाचे क्षणही मी गच्चीत जाऊन एन्जॉय केले.

तर अशी ही आमची गच्ची...इतरांसाठी भलेही ती एक मोकळी जागा असेल, पण माझ्या मनात मात्र तिच्यासाठी एक वेगळी, स्पेशल जागा आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंय.
पुरुषांची पण असते बरं का माहेरची गच्ची.
आमच्या गावच्या गच्चीच्याही खूप आठवणी आहेत, अजूनही कधी कधी त्या घराचे, गच्चीचे स्वप्न पडतात, विशेष करून माकडांच्या धुमाकुळीचे.

प्रत्येक वाक्याला "मी पण , माझं पण , आम्ही पण, हो हो असच आहे" असं होत होतं
तुमच्या "फ्यान क्लबासाठी" अर्ज करु म्हण्तो ... Happy

प्रत्येक वाक्याला "मी पण , माझं पण , आम्ही पण, हो हो असच आहे" असं होत होतं
तुमच्या "फ्यान क्लबासाठी" अर्ज करु म्हण्तो ... +1111111