उत्सव

Submitted by Mia on 23 August, 2018 - 13:58

आज चंदा खुप खुश होती. अचानक काही तरी घबाड मिळते की माणूस जसा वेडावतो तस तिचं झालेलं. लक्ष्मी शाळेतन रडत परत आलेली. पोरं, पार कावरीबावरी झालेली. घरात आली आणि तिला बिलगलीच की! चंदिला कळेच ना काय झालं ते, लक्ष्मीन सारी हकीकत सांगितली. तिला शाळेत खेळता खेळता, अचानक सगळी मुलं चिडवायला लागली. ती घाबरून बाईंकडे गेली, बाईंनी तिला एका रिकाम्या वर्गात नेलं आणि तिचा ड्रेस मागून पुढून पाहिला. का काय माहीत पण त्यांच्या डोळ्यात पाणी आल्यासारख काहीतरी झाल. त्या तिच्याकड़े सहानुभूतीने पाहु लागल्यात. त्यांनी तिला जवळ घेतली आणि थापडवले. लक्ष्मीला कळना काय झालं ते?? बाई तिला म्हटल्या आधी घरी जा आणि आईला सांग की तू वयात आली आहे.

लक्ष्मी थबकलीच, जरी तिला वयात येणं म्हणजे नेमकं काय माहित नसलं तरी, ते काही तरी भयंकर असत हे तिला माहीत होते. शरीरात होत असलेल्या बदलाबद्दल तिला लाज वाटत होती. काय झालं आहे हे न कळल्यामुळे ती घाबरलेली, धावतच घरी गेली आणि आईला जाऊन बिलगली. "आये मला बघ ना कसं होतय ते , म्या बाईंना सगळं सांगितल. त्या म्हटल्या मी वयात आले असं. मला नाय समजत काय व्हतंय ते." हमसून हमसून रडत ती चंदाला सांगु लागली. एवढया साऱ्या संभाषणात चंदाने फक्त एक वाक्य अगदीं स्पष्टपणे ऐकले, मग लेकीच्या बाकीच्या बडबडीकड़े तीचे लक्षच राहिले नाही. "अंग, येडे किती छान झाल बघ, अणि तू रडतेयस??? तू वयात आली म्हंजे, मोठीं झालीं, शानी झाली की! त्यात रडायला काय झालं? आत्ता तू देवाची फेवरीट होणारेस.. ..." लक्ष्मीने दिलेल्या बातमीने चंदाला आभाळ ठेंगणे झाले. ती काय करू न कसे करू असे वागायला लागली.

आत्ता ही गोष्ट गावात पसरवायला हवी, तीपण लवकरात लवकर. आपल्यासोबतच्या बायकांना सांगावं आधी, असंही आपल्याला कोण त्याच आपली फ्यामिली. थोड्या जळतील, पण ते चालायचच. चंदाच्या मनात विचार चालू होते. कसला तरी ठाम निर्णय घेतल्यासारखे चंदा एकदम उठली. आणि पोरीला म्हणाली, "चल, मी काय ते तुला सांगती". पोरीचं आवरुन ती लगबगीने बाहेर गेलीं, मोठ्ठ कसलं काम आहे सांगुन. लक्ष्मीला कळेचना तिची आय अशी का वागतेय.

थोड्या वेळाने चंदा आली,खुप खुशीत दिसत होती. लक्ष्मीला काही कळेना. "पोरी, नशीब काढुन आलीस, आज रात्री देवीच्या मंदिरात तुझ्या शाण्या हुण्यांचा उत्सव हाय. सगळं गावचं मोठं मोठं लोक येणारयेत. पुजारी बुवा सवता पूजा करणार तुजी देवीसंग. सगळ्या मावश्या, तुझ्या मोठया बहिणी असनार तिथं, सगळी गाणं म्हणणार, आयला साकडं घालणार! लई मोठ्ठ नशीब हाय तुझं."
आईच्या बोलण्यानं लक्ष्मी भांबावली, पण सगळे ऐकून काय काय मज्जा येणार याचा विचार करु लागली. ती आज गावात फेमस होणार, त्या चेंगट सुनंदीला ती चांगलं उत्तर देणार. आज आपल्यासाठी उत्सव म्हणून आईने लक्ष्मीला चांगलंच सजवलं. तिचं रेशमी परकर पोलक जे थोडं घट्ट होतं म्हणून ती घालत नसे ते आईने घरात नवीन कापड एकच म्हणुन तिला घातलं. ती स्वता पण लई छान तयार झालेली. आज आय लई छान दिसत व्हती, इतकी छ्यान तर ती दर शुक्रवारी देवळात जाते तेव्हांही दिसत नाही.

देवळात आज खरंच मोठ्ठा उत्सव चालू असतो. लक्ष्मी भोवती आज सगळ्या मावश्या आणि तिच्या मोठ्या बहिणी फिरत गाणीं म्हणतायेत, गावातली सारी मोठीं मोठीं माणसें त्या उत्सवात हजर हायेत, सरपंच, मोठे पाटिल, गण्या शेट, सावकार, मोठया वाडयातले भट आणि अजून बरेंच. सगळी लक्ष्मीला लई निरखून पाहताय. लक्ष्मी आज द्येवाची फेव्हरिट झाली ना! तिच्या तायांकडे तिची नजर जाते , त्या जरा नाराज दिसतायेत. बरोबर आहे, ह्या थोडीच देवाच्या फेव्हरिट झाल्या व्हय आणि कुणासाठी झालाय का एव्हढा मोठ्ठा उत्सव, आलीत का एवढी मोठी लोकं! आपली आय बेष्ट, तीची सर्वांसोबत ओळख हाय, म्हणून लोक आल्याती.

एकीकडे उद्या शाळेत सुनंदीची कशी जिरविन, तिला शाळेत कसा मान मिळेल, सगळी कशी दचकुन राहतील अश्या स्वप्नाचा उत्सव लक्ष्मीच्या मनात चाललेला असतो, तर दूर चंदाच्या मनात पाटलान हातात दिलेल्या नोटानी उत्सव साजरा होत असतो.
पाटील आज आपल्याला का असे टक लाउन बघतायेत ह्याचा विचार लक्ष्मी करत असताना, चंदा विचार करतेय आक्ख्या आयुश्याभरात जेव्हढ आपण कमावल् नाय तेव्हढ आपल्या बारा वर्ष्याच्या लेकीमुळे आज आपल्याला भेटलय... ... बरोबर हाय कोवळी कळी, पिकलेल्या फुलापेक्षा सुवासिक!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users