लॅच उघडुनी घरामधे

Submitted by बेफ़िकीर on 23 August, 2018 - 07:32

लॅच उघडुनी घरामधे
==========

लॅच उघडुनी घरामधे
बाबा येऊ शकतीलच
आईला ना जमायचे
शरीर नाही आईला

रक्ताला सुचले तेव्हा
निळीच होती भरली मी
लाल अक्षरे का आली
आशय कळला शाईला?

कोणी कूर्मगती घेते
गोगलगाय कुणी बनते
माझ्यावीण कुणी नाही
साऱ्या जगात घाईला

तुला मिळो आराम म्हणुन
जागत बसली केव्हाची
अंगाई ऐकव आता
दमलेल्या अंगाईला

लिंगाइतका जीव तुझा
वेळेवर मोठा होतो
जीव कसा प्रसवावा हे
विचार एका बाईला

त्याच्यासाठी तर जाती
लाखोजण चालत चालत
शिक्षा का झाली आहे
समजेना रखुमाईला

ज्यांना घडवत बसलो मी
त्यांचे वार न परतवले
पुरस्कार दे एखादा
माझ्या बेपर्वाईला

वाट पाहती अनेकजण
माझे तोंड उघडण्याची
चुकून झालेच जर असे
याल तुम्ही डबघाईला

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याच्यासाठी तर जाती
लाखोजण चालत चालत
शिक्षा का झाली आहे
समजेना रखुमाईला>>>>>> अप्रतिम Happy