ही कविता वाचू नये

Submitted by नाचणी सत्व on 22 August, 2018 - 11:55

आकाशात जेव्हां दोन चंद्र असतील
क्षितिजाजवळ
पंधरा दिवसांकाठीच्या सोमवती अमावस्येनंतरची
सर्वात मोठी पौर्णिमा असेल
त्या अमावस्येला समुद्र युगारंभाच्या सुरूवातीइतका
मागे हटून अमृतकुंभ दिसले असतील
आणि
सर्वात मोठ्या भरतीच्या लाटांनी
सह्याद्रीच्या शिखरांचे चुंबन घेतले असेल
हिमालयीन शिखरांचे माथे
झुकले असतील
त्या समयी
जेव्हां उधाणवारा नेहमीप्रमाणे शीळ घालेल
बोचरे मतलई वारे पश्चिमेकडून भणभणत असतील
बगळ्यांची माळ सरोवराच्या किनारी उतरली असेल
सारसपक्षांच्या विहंगम विहाराने तळ्यात देवतांची गर्दी असेल
ब्रह्मकमळ उमललेले असेल
आणि सोनचाफ्याचा गंध दरवळत असेल
केवड्यावर नागमणी असलेली देवता दर्शन देईल
देवदूतांची पावले थबकली असतील
जन्मोजन्मीचे फेरे तेव्हां सैलावले असतील
आणि सेटमॅक्सवरील हीरा ठाकूरच्या बासरीचे सूर
आसमंती दरवळत असतील
तेव्हां आपली भेट होईल
म्हणून प्रिये
सूर्यवंशम वर राग धरू नकोस..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users