फरसाणाची भाजी

Submitted by योकु on 21 August, 2018 - 11:44
farasanachi bhaji
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फरसाण किती आहे त्यानुसार जरा प्रमाणं बदलतील. तरी एक परिमाण म्हणून...
- दोन-अडीच मुठी भरून कुठलंही फरसाण
- दोन टोमॅटो
- दोन कांदे
- लाल तिखट
- मीठ
- तेल
- जिरे
- चिमटीभर साखर
- कोथिंबीर वरून घ्यायला

क्रमवार पाककृती: 

साधारणपणे पावसाळ्याच्या दिवसांत फरसाणादी प्रकार सादळतात आणि मग ते कुणी खात नाही. एकदिवस हा प्रकार करून आणि खाऊन पाहीला; अफलातून चव जमली होती; म्हणून इथे देतोय.

लोखंडी कढई सणसणून तापवून त्यात जरा तेल तापवावं आणि जिरं चांगलं फुलवावं; तसं ते फुललं की मगच बारीक चिरलेला कांदा, कडा लालसर तांबूस होईतो परतून घ्यावा.
यात आता बारीक चिरलेला टोमॅटो घालून मसाला तेल सोडेस्तोवर परतावं. यात चवीनुसार मीठ, तिखट घालावं आणि त्याचा कच्चटपणा जाईतो अजून एखादमिनिट परतावं.
नंतर हातानीच जरा कुस्करून फरसाण यात घालावं आणि भाजी छान हलवून घ्यावी. फारच कोरडं वाटत असेल तर जरासा पाण्याचा शिपका देऊन एक दणदणीत वाफ आणावी.
चव पाहावी आधी आणि गरज पडली तरच मीठ आणि टोमॅटो ने फारच आंबटसर झालेली असेल तर पाव चमचा साखर घालून सिजनिंग अ‍ॅडजस्ट करावं. वर कोथींबीर घालून गरमगरम भाजी, पोळी, फुलके यांसोबत खावी.

FB1.jpgFB2.jpg

वाढणी/प्रमाण: 
भाजीप्रमाणे
अधिक टिपा: 

- तिखट, मीठ आणि साखर घालतांना जरा जपून. फरसाणात या तीनही गोष्टी असतातच.
- हवे असतील तर यात थोडे फ्रोजन मटार, मके थॉ करून घालता येतील
- ताज्या फरसाणाचीही अशी भाजी जमेल आणि त्यात कुरकुरीत पणा हवा असेल तर राखता येईल
- ही भाजी जरा चढ्या चवीचीच सुरेख लागेल सो त्यानुसार तिखटाचं प्रमाण ठरवा
- भाकरी, पोळी ऐवजी या भाजीकरता फुलका जास्त चांगला लागतो

माहितीचा स्रोत: 
कुठल्यातरी युट्यूब चॅनल वर पाहीलेली
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमची इमरजन्सी वाली भाजी अगदी काहीच नसले की मस्त फरसाणचा डबा उघडून. कांदा टोमटो परतून त्यात फरसाण वरून तिखट मसाला वैगेरे.. झटपट भाजी..

फरसाण भाजीला वापरा, मिसळीला वापरा, भेळेला वापरा किंवा नुसताच बोकणा भरा.. कांदा खालुन खा, कांदा पोह्यावर पेरुन खा बहुद्देशिय असा पदार्थ

ज्यातत्यात साखरेची चिमूट घालणं बंद कर बघू! Proud

>>

हो हो, तिखट कसं तिखटासारखंच खावं .. उगीच काय पोह्यात साखर, साबु खिचडीत साखर, छ्या:

योकुच्या रेस्पीत साखर असते हे बघून मला भयंकर आनंद होतो. Proud
पूर्वी मी होस्टेल-पीजी-मेस या चक्रात असताना टिपिकल गुळाच्या भाजीइतक्याच सहजपणे बिनगुळाची भाजी आणि थोडा चमचमीत स्वयंपाक (दुसर्‍याने केलेला!) खाऊ शकत होते. पण आता अनेक वर्षांच्या सवयीने गूळ घातलेली भाजी-आमटीच घशाखाली उतरते. चटणी, साखि यातही साखर हवीच! नाहीतर फार एकसुरी वाटते चव. उलट मी एकदा पनीर-मटर भाजी केली पंजाबी पद्धतीने, त्यातही अग्दी चिमटीभर साखर दिली ढकलून, तर एरवी पंजाबी चवी अजिबात न आवडणार्या पब्लिकनेही चाटून पुसून खाल्ली भाजी! त्यामुळे साखर-गूळ एलिमेंट आता अनिवार्य झालंय.
(अपवाद : पावभाजी वगैरे स्पेशल प्रकार Wink )

छान आहे रेसिपी, परवा युट्युबवर अशीच वेफर्सची भाजी पाहिली, विष्णुजींनी दाखवली होती.
पापडाची भाजी सुध्द्दा छान लागते Happy
दुधीभोपळा वगैरे भाजी केली तर कधीतरी खारीबुन्दी टाकायची त्यात , जस्ट काहीतरी चेन्ज म्हणून !

साखर ज्याची त्याची आवड, मी नाही घालत ह्या प्रकारात. चटणी, कोशिबिरीत साखर नाही घालत काही ठराविक अपवाद वगळता . बाकी रस्सा भाज्या, आमटी हे आमच्याकडे गोडा मसाला, गुळ घालून असतात.

मीही घालते बाबा साखर. Happy भाज्या , पोहे, साखि मधे पण. पण याचा अर्थ ते पदार्थ चवीला गोड करायचे असा नसतो. पदार्थाची मूळची चव खुलते उलट. त्या हिशेबानेच घालायची.

टोमॅटो ने फारच आंबटसर झालेली असेल तर पाव चमचा साखर घालून सिजनिंग अ‍ॅडजस्ट करावं. >>> हे वाक्य महत्वाचं आहे योकुंचं. कधी कधी टोमाटो अति आंबट लागतात पण त्यावेळीही मी पाव चमचा नाही अगदी चार दाणे घालेन Wink .

फरसाणात थोडी तरी साखर असतेच. >>> इथे दोन्ही प्रकार मिळतात, एक गोडसर फरसाण आणि एक छान तिखट.

ह्या भाजीत साखर घालेनसं वाटत नाही पण साखि, पोहे ह्यात अर्धा चमचा साखर असतेच आणि लागतेच. एरवी भाजी, आमटीत किंचीत गूळही मस्टच.

योग्या एक नंबर भाजी. मी नक्की करून पाहिन.
माझी एक मैत्रिण तुझ्यासारखीच क्रियेटिव्ह आहे. ती सेम अशीच भाजी आपल्या कुर्डया असतात ना त्याची करायची. भिजवून ठेवून टोमॅटो कांदा फोडणी.
त्यानंतर भजी च्या गाडीवरून फक्त कावळे ( वडे किंवा भजी तेलात घोळायला टाकताना जे छोटे छोटे पिठाचे थेंब तळले जातात) तेच विकत आणायची आणि त्याची मस्त ग्रेव्हीची भाजी करायची. आणि ते स्वस्त पण मिळायचे खूप. ५ रुपयांचे आणले की आम्ही चौघी जणी ती भाजी खात असू.

त्यानंतर भजी च्या गाडीवरून फक्त कावळे ( वडे किंवा भजी तेलात घोळायला टाकताना जे छोटे छोटे पिठाचे थेंब तळले जातात) तेच विकत आणायची आणि त्याची मस्त ग्रेव्हीची भाजी करायची. +१११ भारी आयडीया

अर्र लोख्हो, साखर भाजी गोड करायला वापरायची नाहीय. तिखट पदार्थात चिमटीभर गोड घातल्याने मूळचा तिखटपणा खुलतो. तसंच गोड पदार्थात चिमटीभर खारट घातल्यानं गोड पदार्थाची गोडी खुलते; यावर दुमत नसावं कुणाचं बहुधा.

या डिश मध्ये पर्टीक्युलर्ली, फरसाणात आंबटपणाकरता बहुतेकवेळेला सायट्रिक अ‍ॅसीड असतं, ते कोरडं असतांना आपलं अस्तित्व जाणवून देत नाही पण पाण्याचा हबका/टोमॅटो चा ओलसरपणा आल्यावर विरघळतं आणि आपला आंबटपणा दाखवतं; अजून त्यात टोमॅटो पण घातलेला (त्याचाही आंबट्पणा नक्की सांगता येत नाही) आहे सो मी केलेली भाजी साखरेची चिमूट घालूनही आंबटसर राहीली होती; म्हणून मी कृतीत पाव चमचा साखर लिहिलीय; पण त्याऐवजी तिखट्पूड जास्त वापरून आंबट-किंचितशी गुळचट-तिखट ही चव वगळून आंबट - तिखट चव साधता येऊ शकेल.

आता कृती करून पाहा आणि कळवा इथे... Happy

छान पोस्ट योकु.

गोड वस्तूत पण मीठ नाही चालत हो वैयक्तीक मला, माझी एक नणंद शिऱ्यात मीठ घालायची, तसं मी गोड फार कमी खाते पण कोणाला जाणवलं नाही तरी मला मात्र मीठ पहिलं जाणवायचं तसंच vice versa होतं पोहे, सा खि त मला साखरेचं.

अर्र लोख्हो, साखर भाजी गोड करायला वापरायची नाहीय>>>> हेच लिहायला आलेले. अगदीच काही पाव 'किलो' साखर नको वापरायला....पाव 'चमचा'च काम करुन जाईल.
गोडात मीठाचं पण सेम. चिमूटभरच. असलं तर जाणवेलच असं नाही. पण नसलं तर नक्की जाणवतं.

ती सेम अशीच भाजी आपल्या कुर्डया असतात ना त्याची करायची. भिजवून ठेवून टोमॅटो कांदा फोडणी.
<<
कुर्डया पापड यांचा चुरा डब्यात खाली जमतो. तो 'वेळायचा'. म्हणजे शेवया 'वेळतात' तसे उकळत्या पाण्यातून काढायचा. पास्ता करतो तशी कृती. फक्त बराच कमी वेळ लागतो, कारण कुरडई, नागलीचे पापड वगैरेचे पीठ प्री कुक्ड असते.

मग कोरडी कांद्याची फोडणी करून त्यात परतल्या की अगदी छान भाजी होते.

सरत्या उन्हाळ्यात नवे पापड कुरडया घालतात तेव्हा मागच्या उरसुरची ही भाजी खानदेशात फेमस आहे. त्या दिवसांत बाजारात भाज्या पण फारशा नसतात.

खूपच छान रेसीपी आहे. माझ्या कडेही मिक्स फरसाणाची अर्धवट संपलेली पुडी आहे. आज रात्री हा मेनू म्हणजे अगदी योग्य आहे.

Pages