स्वातंत्र्य म्हणजे काय नक्की?

Submitted by निशिकांत on 21 August, 2018 - 01:02

स्वातंत्र्य म्हणजे काय नक्की? ( परवाच मी "स्वातंत्र्याची पहाट" या नावाची सकारात्मक उर्मी असलेली कविता पोस्ट केली होती. आज आपल्या स्वातंत्र्याची काय हालत झाली आहे ही मन विषण्ण करणारी रचना सादर. )

स्वातंत्र्य म्हणजे काय नक्की
असतय हेच कळायचय
दारिद्र्याच्या बेड्या तोडुन
झेंडा वंदन करायचय

ध्वजारोहणासाठी येती
हात पुढे का बरबटलेले?
नैतिकतेची दिवाळखोरी
राजकारणी खरकटलेले
पुन्हा एकदा मतदानातुन
चलेजाव म्हणायचय
दारिद्र्याच्या बेड्या तोडुन
झेंडा वंदन करायचय

देश जाहला मुक्त तरी पण
आम्ही खितपत पडलो सारे
रूढीवादी बुरसटलेले
सदैव वाहे दूषित वारे
परंपरांच्या जंजाळातुन
मला बाहेर पडायचय
दारिद्र्याच्या बेड्या तोडुन
झेंडा वंदन करायचय

काळी करणी इतकी! यांनी
अंधाराला काळे केले
हिम्मत यांची भरदिवसाही
नको नको ते चाळे केले
अंधाराशी लढण्यासाठी
किरण शलाका बनायचय
दारिद्र्याच्या बेड्या तोडुन
झेंडा वंदन करायचय

हिमालयाच्या ताठ कण्याने
रस्त्यावरती प्रजाच येइल
आक्रंदाच्या वणव्यामध्ये
भस्मासुरही जळून जाइल
फिनिक्सप्रमाणे राखेमधुनी
आकाशाला भिडायचय
दारिद्र्याच्या बेड्या तोडुन
झेंडा वंदन करायचय

निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users