मरेस्तोवर अभ्यास केला - घास रे रामा

Submitted by नाचणी सत्व on 21 August, 2018 - 00:22

ऑर्कुट हे पहिले समाजमाध्यम म्हटले जाते ज्यामुळे जगभरातील विविध ठिकाणचे लोक एकाच वेळी गंभीर चर्चा करू लागले. विविध स्तर आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीमुळे खटके उडू लागले. आपल्या आपल्या जगातून दुस-याकडे पाहताना बनलेल्या मतांना पलिकडच्या जगातून सुरूंग लागू लागला. अर्थात प्रत्येकालाच आपले मत मुद्देसूद पद्धतीने मांडता येत नाही. वादविवादांचा सराव प्रत्येकाला असतो असेही नाही ( आणि काही जणांना वादविवादांचे व्यसन लागले हे अलाहिदा) .

माध्यमात ज्यांना स्थान नाही असे लोक चाचरत का होईना आपल्या समस्या बोलू लागले. शेतकरी वर्ग येऊ लागला. त्या निमित्ताने शेतकरी संघटनांची आंदोलने, त्यांचे प्रश्न सूज्ञांना समजू लागले. हे लोक येईपर्यंत ठराविक मंडळांचे शेतक-यांबद्दलचे ज्ञान पाजळले जात असे. त्यात शेतक-याला आयकर नाही, तो फुकट्या आहे वगैरे ओका-या असत. अशा मंडळींना शक्यतो इग्नोर केले जाई. पण त्या वेळीही दूध आंदोलनाबाबत टोकाची असंवेदनशील मतं व्यक्त केली जात. कांदाफेक आंदोलनादरम्यान शेतक-यांना माज आला आहे वगैरे वक्तव्ये केली जात.

त्याला उत्तर म्हणून तुम्हाला काय होतंय एसीत बसून आणि लाखभर महिना पगार घेऊन बोलायला असं एखादे वक्तव्य झालेले आठवते. त्या वक्तव्याचा मग व्यवस्थित समाचार घेतला गेला. तुम्ही म्हशीवर बसून गावभर उंडारत होता त्या वेळी आम्ही अभ्यास करत होतो अशी पोस्ट आली कि मग त्या खाली कुजकट टोमण्यांचा रतीब घातलेला आढळायचा. एकंदर पाण उतारा केलेला असायचा. या उपहासाची सवय नसणा-यांना त्यास उत्तर कसे द्यावे हे ठाऊक नसायचे. काही मंडळी मग संतप्त होत. म्हणजे ही मंडळी आंदोलनावर कुजकट टीका करणार, अशुद्ध (ग्रामीण) भाषेची टिंगल करणार (आमचीच भाषा बोला हा आग्रह) आणि यांना एकही वाक्य खपत नाही याचा राग अनावर झाला कि मग शिवीगाळ सुरू होत असे. परिणाम म्हणून त्या त्या कम्युनिटीतून असे लोक हाकलले जात.

हे झाले नमनाला घडाभर तेल अर्थात पार्श्वभूमी. ऑर्कूटच्या काळात मोठ्या पगाराच्या नोक-या आयटीत मिळत असत. त्या आधी कित्येक वर्षे इंजिनिअयरींग आणि मेडीकलचे प्रभुत्व होते. जोडीला काही काळ कॉमर्स क्षेत्राला बरे दिवस आले होते. मग एमबीए ची टूम आली. वाढत्या खासगी कॉलेजेस मुळे अध्यापक महाविद्यालयांची मागणी वाढली.

थोडक्यात करीयर साठी अभ्यास अनिवार्य झाला. अधिक आकर्षक संधींमुळे अनेक जण त्याकडे ओढले गेले. स्पर्धा वाढली. मग टक्केवारी वाढत गेली. त्यामुळे खाजगी क्लासेसचे पेव फुटले. स्पर्धा अधिकच तीव्र झाली. लातूर पॅटर्न सारखे फक्त गुणांना महत्व देणारे पॅटर्न आले. नववीचा अभ्यासक्रम गुंडाळून दहावीचा अभ्यास सुरू करायचा आणि नववी दहावी पूर्ण करून वर्षभर फक्त प्रश्नपत्रिका सोडवून घेण्याला महत्व आले. परीक्षा हा कौशल्याचा भाग झाला. पण महाराष्ट्रातून स्पर्धापरीक्षांना दहावीत पहिल्या आलेल्या मुलांचा कस लागत नव्हता. त्यामुळे आयसीएसई आणि सीबीएसईच्याआ शाळा चालू झाल्या.

या सर्व गदारोळात अभ्यास केला म्हणजे करीयर होते आणि जे अभ्यास करत नाहीत ते आळशी असा समज घट्ट झाला. अभ्यास करीयरसाठी केला जातो असे संस्कार पालकांवर आणि त्यांच्या मुलांवर झाले. आमच्या शाळेत एक दिवस शिक्षकांनी सुवाच्य अक्षरात सुविचार लिहीला होता "लहानपणी अभ्यासरूपी कष्ट केले तर मोठेपणी आराम मिळेल, लहानपणी आराम केला तर फलाटावर हमालरूपी कष्ट करावे लागतील". श्रम आणि बुद्धी यांची विभागणी ही अशी होत होती. श्रमाला प्रतिष्ठा नाही असे अप्रत्यक्ष सुचवणारे अनेक संस्कार कळत नकळत त्या वयात होत असत.

दुसरीकडे शाळा न शिकलेले किंवा जुजबी शिकलेले बनिये मात्र व्यवसायाचे प्रात्यक्षिक घेऊन पैसा कमावत गेले. अभ्यास करणारे सर्व नोकरीकडे वळत होते. पण नोकरी करणा-यांसाठी धंदे मात्र अभ्यास न केलेले बनिये टाकत होते. या अभ्यास केलेल्यांना खाऊ घालायला अभ्यास न करणारे शेतकरी शेतात (उनाडक्या करीत) फिरत होते.

व्यवसायात घालवलेला वेळ हा ते ते कौशल्य / ज्ञान मिळवण्यासाठी घालवलेला असतो हे अनेक जणांना पचनी पडत नव्हतं. शेतीसाठीही काही ज्ञान आवश्यक असून त्यासाठी काळ्या मातीत राबावे लागते याची गंधवार्ता अनेकांना अजूनही नाही. हे ज्ञान चार भिंतीत बसून येत नाही. केवळ पुस्तके वाचून शेतीच काय स्वयंपाक सुद्धा येत नाही. करूनच बघावं लागतं. आपल्या पुस्तकी अभ्यासाच्या या पद्धतीत प्रात्यक्षिकाद्वारे ज्ञान मिळण्याला वाव नाही. त्यामुळे आपल्याकडे महत्वाचे तंत्रज्ञान विकसित होत नाही. आपल्याकडे फक्त सॉफ्टवेअर क्षेत्रामधे स्वावलंबन आहे. बाकीच्या सर्व क्षेत्रामधे परदेशी तंत्रज्ञान आहे. ते वापरण्याचे कौशल्य आपल्याला मिळते. अभियांत्रिकीमधे तर ते ही नाही. अभियंत्यांना सहा महीने ट्रेनिंग द्यावे लागते. कित्येक मशीन्स त्याने कॉलेजमधे पाहिलेल्या नसतात.

काळाचा महीमा असा की आता साडेचार लाख अभियंत्यांचा जागा असूनही त्यातल्या ६०% रिक्त राहू लागलेल्या आहेत. कारण अभियंत्यांना नोक-या नाहीत. या अभ्यासक्रमाचा उपयोग धंदा सुरू करायला होत नाही. किमान डॉक्टर आपला धंदा सुरू करतो. पण गरजेपेक्षा जास्त डॉक्टर्सची संख्या शहरातून उपलब्ध होतेय. परिणामी अनेक जण माशा मारताहेत. उपनगरातून होमिओपॅथी झालेले डॉक्टर्स सर्रास अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करतात. पण गावाकडे जायची यांचीही तयारी नसते. कारण लाख रूपये घालवल्यानंतर शहरातच एक दिवस नावारूपाला येऊ ही अपेक्षा. तसेच आम्ही एव्हढा अभ्यास केला तर व्हाईट कॉलर्ड जॉब हवा. इंजिनियर / डॉक्टर झालो म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा हवी हा अपेक्षा असते. माझ्या एका मित्र डॉक्टर आहे. त्याची बायको डॉक्टर आहे. वडील आणि आजोबा डॉक्टर होते. काका बिका सगळे धरून डॉकटरांचे खानदान. त्याला डॉक्टर म्हणवून घेण्यात स्वारस्य नाही. याउलट एकजण गावाकडून आलेला. संघर्ष करून डॉक्टर झालेला. त्याला फक्त नावाने हाक मारली की त्रास होतो. त्याचा उल्लेख डॉक्टर म्हणून केला की गडी खूष !

थोडक्यात प्रतिष्ठा आणि विनामेहनतीचे काम यामुळे या क्षेत्रांना पसंती होती. आता मात्र गोंधळाचे वातावरण आहे. मोठ्या संख्येने पालकांमधे अशा बदलाच्या वेळी काय करायचे याची माहिती नसते. आता तर शेतीही उद्ध्वस्त होत चालल्याने जी मंडळी शिकून प्रतिष्ठीत व्यवसाय करू पाहत होती त्यांच्यातही नैराश्य आलेले आहे. थोड्या मुलांचे करीयर होते.

आज जसे शेतक-याला मुलगी मिळत नाही किंवा पुरोहिताला मुलगी मिळत नाही तसेच अभियंत्याच्या बाबतीत होत आहे. पुढे डॉक्टरच्या बाबतीत होईल. काही वर्षांपूर्वी वकील असणे मानाचे समजले जाई. त्यामुळे सगळे वकील होऊ लागले. त्याचा परिणाम असा झाला की कलेक्टर ऑफीस किंवा कुठल्याही सरकारी कार्यालयापुढे वकील लोक छत्री टाकून बसू लागले. त्या क्षेत्राची पत राहिली नाही.

याउलट आम्ही रात्रंदिवस अभ्यास करत असताना तुम्ही उंडारत होता असे ज्याच्याबद्दल वाटायचे आणि हा मुलगा वाया जाणार याची खात्री होती तो काहीही करता येत नसल्याने जमिनीचे व्यवहार करता करता आला मोठा बिल्डर झाला हे पाहिले आहे. आता तो आमचा बालपणीचा मित्र आहे हे अभिमानाने सांगावे लागते. एजंट साठी एक वेगळे कौशल्य लागते. ज्ञान लागते हे आता मान्य करावे लागते.

शाळा चुकवून तालमीत जाणारा एक जण शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकून आता स्वतःच्या ब्रॅण्डच्या जिम चालवू लागला आहे. त्याच्याकडे शिकायला लोक येतात. ते ही ज्ञानच आहे. आपल्या पूर्वीच्या घोकंपट्टीच्या चाकोरीत तसे समजले जात नव्हते एव्हढेच. अशी असंख्य उदाहरणे आहेत. घोकंपट्टी केली म्हणजेच ज्ञान मिळवले किंवा आपण इतरांपेक्षा जरा लायक झालो या समजाला आता नाही म्हटले तरी धक्का बसत चाललेला आहे. आम्ही त्या वेळी कष्ट केले म्हणून आता आरामाचे आयुष्य जगतो हा सिद्धांत आता परिस्थिती खरी होऊ देईना.

तर लांबलचक लेखाच्या शेवटी तात्पर्य किंवा कुठलाही संदेश नाही हे जरा विचित्र नाही का वाटत ? अहो, परिस्थिती मोठी विचित्र असते म्हणतात. सगळी समीकरणे उलटी पालटी करून टाकते. तर मग लेखाचे काय ? सहज निरीक्षण आहे हे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरी परिस्थीती...
वास्तविक पुस्तकी अभ्यास आणि पैसा ह्याचा फारसा संबंध नाहिच.

इंजिनीयर होणे ही सर्वात मोठी चूक आहे असं आता वाटत असलं तरी ज्या काळात इंजिनीयर झाले त्या काळात सर्व दादा ताई तेच करत होते Happy
वेगळा पाथ वगैरे घेण्याची एनर्जी, अक्कल आणि रिसोर्सेस यापैकी काहीही नव्हतं.
इंजिनीयर झाले नसते तर मला केमिस्ट्री मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आणि रिसर्च करायल आवडले असते.
सध्याच्या काळात स्पोर्ट न्यूट्रिशन, डायटीशियन, सी ए वगैरे जास्त चांगले चालणारे व्यवसाय आहेत असे वाटते.

Agent व्हायला तोंडात साखर आणि येस sir करायची तयारी पाहिजे फक्त. इधरका माल उधर करायला काय डोकं लागतं? बंगलोरला बायका घर-संसार संभाळून उरलेल्या वेळात real estate agent बनतात. सध्या एका agent शी संबंध येतोय. जितक्या वेळा घरी येते तितक्या वेळेस सासूला पायलागू! सुनेला complex यायला की मी लग्न झाल्यापासून इतक्या वेळेस माझ्या सासूला दंडवत घातले नसतील Happy तितके ती घालते आहे. मग आम्ही तिची समजूत घातली की तुझ्याकडे एवढा पैसे आहेत की तू दर आठवड्याला सासूला नमस्कार घालायला एक बाई hire केली आहेस असं समज:)

त्यामुळे सगळे वकील होऊ लागले. त्याचा परिणाम असा झाला की कलेक्टर ऑफीस किंवा कुठल्याही सरकारी कार्यालयापुढे वकील लोक छत्री टाकून बसू लागले. त्या क्षेत्राची पत राहिली नाही.>> घोर अज्ञान. चांगल्या/बर्‍या लॉ स्कूलमधून लॉ केले असेल, मूट कोर्ट्स, प्रॅक्टीकल्स, आणि ईंटर्नशिप मन लावून केल्या असतील तर लॉ पास झाल्यावर उत्तम पगाराची (फ्रेशर संगणक अभियंत्या पेक्षा नक्कीच जास्त) नोकरी लागू शकते. लॉसाठी हल्ली प्रवेश परिक्षा आहे. महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी उत्तम लॉ कॉलेजेस आहेत. पण अजूनही ईंजिनिअरिन्ग्चे खूळ जात नाही हे दुर्दैव. लॉ बरोबर सी एस किंवा सी ए अशी अजून एखादी प्रोफेशनल डिग्री असेल तर अजून फायदा होऊ शकतो.

लंपन दादा , प्रत्येक क्षेत्रात टॉप करणा-याला करीयर करता येते. तो विषय नाही चालला इथे. त्यावर चर्चाही अस्थानी ठरेल इथे.

कमिशन business ने आपल्या (भारताच्या) अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान केले आहे. कोणीच(बहुतांश) काही निर्माण करत नाही. नो specialization, no skills.

अहो टॉप नाही म्हणत, आहे तो अभ्यास नीट केला तरी उत्त्म करिअर होउ शकते. बर्‍याच लॉ कॉलेजेस मध्ये प्रॅक्टीकल्सवर भर दिला जातो.

लंपन दादा.
पूर्वीच्या काळी वकील बनण्याचे एव्हढे मोठे फॅड आले होते की चांगले ज्ञान असलेल्याला देखील व्यवसाय करणे अवघड झाले होते. कलेक्टर कचेरी किंवा अशा ठिकाणी छत्र्या टाकून वकील तुमच्या पाहण्यात आले नाहीत का ? यात घोर अज्ञान कसले ? विषय प्रवाहाबरोबर वाहत जाण्याचा आहे. मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला कि काय होणार ? मूठभरांचे नाव होते, चांगला व्यवसाय होतो. काहींवर अन्यायही होत असेल पण बाकीचे उगीचच वकील झालेले अशी परिस्थिती होती. तुम्ही हे नाकारत असाल तर मग प्रश्नच नाही.

हीच परिस्थिती नंतर इतर क्षेत्रात आली असे वर स्वच्छ लिहीले आहे. तुम्ही नेमके काय वाचले कल्पना नाही.

काहिहि असले तरी इजिनीयर झालो म्हणजे आपणच हुशार आणी सगळ काहि आपल्यालाच कळत हा अटिट्युड बरेचदा दिसतो. इतरांना तुच्छ लेखण्यात इजिनीयर जमात सगळ्यात पुढे असते असेच दिसते. वास्तविक बघता बरेचदा पुस्तकाबाहेरचे काहिच येत नसते तरिहि..... आमच्याच हाफिसात आहेत असे नमुने......

तुम्ही जे लिहिले आहे ते चित्र फार पूर्वीचे आहे आणि त्यातले बरेच वकिल काही नाही तर लॉ करू अशा भावनेतून वकिल झालेत. ९०च्या दशकात ४०% असले तरी लॉ कॉलेज, पुणे इथे प्रवेश मिळायचा. आता अशी परिस्थीती नाही. तेव्हा ते परसेप्शन सध्याच्या लॉ कोर्स बद्द्ल ठेवू नका एवढेच सांगत आहे.

तुम्ही जे लिहिले आहे ते चित्र फार पूर्वीचे आहे >> आताचे चित्र आहे असे कुठे म्हटलेय ?
प्रांमाणिकपणे वाटतमाकी तुम्ही पुन्हा एकदा मन लावून वाचावे. हे असले प्रश्न पडणार नाहीत.

त्या क्षेत्राची पत राहिली नाही.>> असे ढळढळीत विधान केले आहे की. आणि सद्यस्थीती माहित नसेल तर अजून गैरसमज कशाला पसरवा.

बरं

भारी लिहिलय Happy आवडले एकदम
एक उल्लेख राहून गेला असे वाटले तर ते बी ए बी एड विषयी पण येवू दया

लेख व निरिक्षण छान आहे Happy

मी काढलेला अर्थः
शिक्षण माणसाला शहाणे बनवते, पण व्यवहार ज्ञान आणि चौकस वृत्ती हवीच!
एकाच साच्यात राहुन नाही चालणार, जगात काय चालले आहे हे माहित असणे गरजेचे आहे. Happy Happy

शिक्षण माणसाल शहाणॅ बनवते, पण व्यवहार ज्ञान आणि चौकस वृत्ती हवीच!
एकाच साच्यात राहुन नाही चालणार, जगात काय चालले आहे हे महित असणे गरजेचे आहे.>>
हो आणि फक्त काय चालले हे माहिती असुन उपयोग नाही, तर त्यात असलेल्या संधी, योग्य वेळी योग्य तेव्हढेच कष्ट करुन त्यात फायदा करुन घ्यायची इच्छाही हवी. नाहीतर आमच्या सारखे फक्त गाढव काम करत रहावे लागेल.
एक निरिक्षण नोंदवु इच्छितो. ह्यात उत्तरेकडची (उप, बिहार) जनता खुपच स्मार्ट असते (आपण महाराष्ट्रीय त्याला चाटूगीरी म्हणतो) ते कमी मेहनतीत, कमी वेळात फायदा उचलुन वर जातात आणि मराठी, साउथ जनता गाढव काम करत राहते.

करेक्ट किल्ली. पुस्तकी अभ्यास जरूर करावा पण त्यासोबत व्यवहार ज्ञान ही उपयोगाचे आहे. माझ्या शालेय आयुष्यात मी अनेक पुस्तकातले किडे पाहिले ज्यांना लोकांशी धड २ शब्द पण बोलता येत नसत, शिवाय रस्ता क्रॉस करणे, रिक्षा करून कुठेतरी जाणे इतका ही आत्मविश्वास नसे. अभ्यास नक्की उपयोगी पडतो पण त्या पेक्षा जास्त पिपल स्किल जास्त महत्वाचे ठरते, ते शिकले तर पैसेम मिळवणं कठिण नाही.
सध्या पैसे मिळवणे हे फक्त ध्येय नसून तो पैसा मोठ्या पदावर जाऊन मिळवणे हा प्रेस्टिज पॉईंट झाला आहे. उदा. एखाद्या हापिसातला एखादा छोटा मोठा मॅनेजर जर २५ हजार कमवत असेल आणि एक वडापाव चा पॉईंट चालवणारा माणूस ३० हजार कमवत असेल तर सन्मान हा २५ वाल्याला मिळतो. का ते माहित नाही.
खरंतर जगायला पैसा लागतो हे खरं आहे, त्यामुळे तो कोणत्या ना कोणत्या (अर्थात योग्य) मार्गाने मिळवणे हेच ध्येय असले पाहिजे. कोणतेही काम छोटे-मोठे असणे नसणे हे आपण बनवतो. पैसा शेवटी पैसा आहे.

हो आणि फक्त काय चालले हे माहिती असुन उपयोग नाही, तर त्यात असलेल्या संधी, योग्य वेळी योग्य तेव्हढेच कष्ट करुन त्यात फायदा करुन घ्यायची इच्छाही हवी +११११
खरंतर जगायला पैसा लागतो हे खरं आहे, त्यामुळे तो कोणत्या ना कोणत्या (अर्थात योग्य) मार्गाने मिळवणे हेच ध्येय असले पाहिजे. कोणतेही काम छोटे-मोठे असणे नसणे हे आपण बनवतो. पैसा शेवटी पैसा आहे.+११११

शेवटी सुसन्स्कृत पणा असावा , तो शिक्षणाने येतो , पण हे पुन्हा जनरलाईझ नाही करता येणार.. कुठलीही गोश्ट तुम्ही कशी घेता आणि त्यावर व्यक्त () कसे होता ह्यावर अवलम्बुन आहे

एकीकडे आपण म्हणतो की श्रमप्रतिष्ठा राखायला हवी. आणि त्याचवेळी आपण एखाद्या कामाला गाढवकाम असे म्हणतो. सगळेच कुठे ना कुठे असा विचार करतो कारण आपले पोषण अश्या विचारांवर झालेले असते.

अग्निपंख : तुम्हाला व्यक्तिश: उद्देशून काही म्हणायचे नाही. कृपया समजून घ्या.

अरे कहना क्या चाहते हो भाई?
जो तो आपापल्याला शक्य त्या प्रकाराने आणि पर्यायाने शिकतो किंवा शिकत नाही, नोकरी करतो किंवा धंदा करतो , पोटापुरते किंवा गडगंज कमावतो
कुणी काय करावे, कसे जगावे ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
बाकीच्यांना का चौकश्या?
शिक्षण घेणाऱ्यांपैकी किती टक्के वाया गेलेत/बेकार बसलेत आणि न घेणाऱ्यांपैकी (धंदा/राजकारण/शेती) किती टक्के यशस्वी आहेत वगैरे काही आकडेवारी आहे का?
उगाच अमक्याचा ढमका बिल्डर होऊन इंजिनीयर पेक्षा डब्बल कमावतोय वगैरे उदाहरणे कुणीही देउ शकतो.
त्याच्यावरुन निष्कर्ष काढायचा?

लेख चांगला आहे. परिस्थितीचे वर्णन.

<<<शेवटी तात्पर्य किंवा कुठलाही संदेश नाही हे जरा विचित्र नाही का वाटत ?>>>
मला नाही विचित्र वाटत. उलट येता जाता संदेश देत जायचं, तात्पर्य काय सांगायचं याचा इथे काही उपयोग होत नाही. शेवटी लोक स्वतःला वाटेल तो अर्थ काढून भांडायला तयार!
<<मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला कि काय होणार ? मूठभरांचे नाव होते, चांगला व्यवसाय होतो.>>
हे एक तात्पर्यच.

मलाहि वाटते की शिक्षणामुळे फायदा होतो. विचार करण्याची सवय होते, निरनिराळी मते वाचायला मिळून माहिती मिळते.
पण शेवटी मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा हे व्यक्तीवर अवलंबून आहे. त्यामुळे जनरलाइज नाही करता येणार.

आजकाल सर्वांना फक्त एक रामबाण उपाय हवा असतो जो जगातील सगळे प्रश्न सोडवेल. तसे नसते. शिक्षण हा एक भाग आहे, तसे इतर अनेक उपाय थोडी थोडी मदत करतात. मग सुधारणा होते.

मलाहि वाटते की शिक्षणामुळे फायदा होतो. विचार करण्याची सवय होते, निरनिराळी मते वाचायला मिळून माहिती मिळते.
पण शेवटी मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा हे व्यक्तीवर अवलंबून आहे. त्यामुळे जनरलाइज नाही करता येणार.
आजकाल सर्वांना फक्त एक रामबाण उपाय हवा असतो जो जगातील सगळे प्रश्न सोडवेल. तसे नसते. शिक्षण हा एक भाग आहे, तसे इतर अनेक उपाय थोडी थोडी मदत करतात. मग सुधारणा होते. +११११११११११११११११

शि़क्षणातून सुसंस्कृतता येते हे वाचून स्वदेस मधला संवाद आठवला.

"जब भी हम मुकाबले में दबने लगते है, तो हम एक ही चीज का आधार लेते है, संस्कार, परंपरा...."

आपण एवढे शिकून आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या लोकांपेक्षा यशस्वी होऊ शक्लो नाही हा न्यूनगंड 'सुसंस्कृतपणात' आधार शोधत आहे.

Pages