शहरामुळे कदाचित

Submitted by निशिकांत on 20 August, 2018 - 00:07

ओसाड गाव झाले
गजबज असे सदोदित
विझले दिवे घरातिल
शहरांमुळे कदाचित

येतात बालपणचे
खेड्यामधील आठव
पारावरील गप्पा
संभाषणात लाघव
शहरातल्या सुखाने
झालो न मी प्रभावित
विझले दिवे घरातिल
शहरांमुळे कदाचित

सारेच तिथे माझे
मीही पण सार्‍यांचा
तुटवडा तिथे नव्हता
अश्रू पुसणार्‍यांचा
गर्दी असून झालो
शहरी कसा तिर्‍हाइत?
विझले दिवे घरातिल
शहरांमुळे कदाचित

एकत्र कुटुंबाच्या
मी चाखले फळांना
आधार सर्व देती
थंडावती झळांना
ना जिंकलो तरीही
झालो न मी पराजित
विझले दिवे घरातिल
शहरांमुळे कदाचित

शहरी घरात कुत्रे
वृध्दाश्रमात आई
मोकाट श्वान गावी
आई घरात राही
असुनी कुटुंब निर्धन
नसते कुणी निराश्रित
विझले दिवे घरातिल
शहरांमुळे कदाचित

हळव्या मनास आता
हळहळही ना वाटे
अन् बधीर हृदयाला
बोचतात का काटे?
जगण्यात स्वतःसाठी
मी केवढा पटाइत!
विझले दिवे घरातिल
शहरांमुळे कदाचित

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता नेहमीप्रमाणेच सराईत हातांनी रांगोळी सहज काढत जावी तशीच जमली आहे फक्त काही गोष्टी मनास पटत नाहीत .जसे की,
"शहरी घरात कुत्रे
वृध्दाश्रमात आई
मोकाट श्वान गावी
आई घरात राही
असुनी कुटुंब निर्धन
नसते कुणी निराश्रित"...शहरात जशी काही घरी आईवडिलांना भयानक वागणूक देण्यात येते तशीच परिस्थिती गावाकडची काही पोरं एकाकी उरलेल्या पालकांना देतात त्यांचे छळण्याचे प्रकार फक्त वेगळे असतात.असो,शेवटी ही तूमची कविता आहे त्यात काय लिहावं हा तुमचा प्रश्न आहे...